मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८

दिवाकर
नाट्यछटा
१९११ ते १९३१ या काळात कै. शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांनी एकूण ५१ नाट्यछटा लिहिल्या.इतक्या वर्षांच्या कालौघात त्या आजही टिकून आहेत. त्यानंतर बाकी बावन्नावी टिकून रहाणारी (बावनकशी) नाट्यछटा कुणी लिहिल्याचे ऐकिवात नाही. दिवाकरांना नाट्यछटा हा प्रकार सुचला तो ब्राऊनिंगच्या 'मोनोलॉग' या काव्यप्रकारावरून. ब्राऊनिंगकडून उसने घेतलेले हे बीज त्यांनी अस्सल मराठी बाजाने फुलवले. It does not matter what you borrow, but what you make of your borrowing हे सिद्ध् व्हावे असे. नाट्यछटा म्हणजे नाटकाची संक्षिप्त आवृती नव्हे, स्वगतासारखे एकांगी संभाषणही नव्हे. नाट्यछटा म्हणजे कमीत कमी शब्दांत एखाद्या प्रासंगिक वर्णनातून अधिक व्यापक सूत्र समोर मांडणारा एक स्वतंत्र साहित्यप्रकार. नाट्यछटेत वापरली जाणारी विरामचिन्हे, बोलीभाषेतले शब्द, तात्कालिन संदर्भ, मधूनमधून घेतले पॉजेस यातून एक मोठे चित्र उभे रहाते.
दिवाकरांनी हा प्रकार आपल्या अभिव्यक्तीसाठी का निवडला असावा? मला समजते त्यानुसार दिवाकर हे अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू आणि कमालीचे संवेदनशील होते. त्या काळातील इतर साहित्यप्रकारांचा विचार केला तर त्यांत त्या वेळी एक साचेबंदपणा, तोचतोचपणा आलेला असावा - अपवाद अर्थात केशवसुतांचा- त्या काळात वर्डस्वर्थ्, शेली, कीट्स् वगैरे कवींच्या वाचनाने दिवाकरांना लिखाणाच्या या नवीन प्रकाराची निर्मिती करण्याची स्फूर्ती मिळाली असावी. त्याआधी त्यांनी शेक्स्पिअरच्या नाटकांवर आधारित काही नाटके लिहिण्याचा प्रयत्नही केला होता. तो मात्र काही सफल झाला नाही. स्वभावाने अबोल आणि भिडस्त असणार्‍या दिवाकरांना आपले अंतरंग, त्यातली सुखदु:खे - म्हणजे सुखे कमी, दु:खेच जास्त - व्यक्त करण्यासाठी नाट्यछटेचा जिवंतपणा आणि त्यातली किंचित सांकेतिकता अधिक भावली असावी.
दिवाकरांच्या नाट्यछटा समजून घ्यायच्या म्हणजे त्या काळातली स्थिती समजून घ्यायला हवी. एका बाजूला परकीय साम्राज्यामुळे समजलेले इंग्रजी लेखकांचे विचार आणि त्यामुळे आपल्या समाजातील न्यूनांची होत असलेली जाणीव असावी. दुसरीकडे जानवी, सोवळी, एकादष्ण्या आणि श्रावण्या यात करकचून बांधलेला समाज असावा. एकीकडे बालविवाह आणि बालविधवा, केशवपन आणि विधवांचे सर्व प्रकारांने शोषण हे राजरोसपणे चाललेले असावे, तर दुसरीकडे बाळंतरोगाने तान्ह्याला जन्म देऊन मरणारी तरुण आई आणि इन्फ्लुएंझा ते प्लेगाने पटापट मरणारी माणसे असावीत, असे हे कोणत्याही संवेदनशील माणसाला कमालीचे अस्वस्थ करणारे विसंवादी सामाजिक वातावरण असावे. या सगळ्यातून दिवाकर तरले ते केवळ वाचनामुळे. या अफाट वाचनातूनच त्यांना लेखनाची स्फूर्ती मिळाली असावी. नाट्यसंवाद हा नाट्यप्रसंगांसारखा प्रकार त्यांनी हाताळल्याचे दिसते. 'कारकून' हे नाटक आणि 'सगळेच आपण ह्यः ह्यः', 'ऐट करू नकोस!' या नाटिका त्यांनी लिहिल्याची माहिती आहे. मेटरलिंकच्या ' द साइटलेस' या नाट्यकृतीचे त्यांनी भाषांतर केल्याचीही माहिती आहे,आज हे सगळे कुठे आहे कोण जाणे!
दिवाकर हे इंग्रजीचे उत्तम शिक्षक होते. शिक्षक म्हटल्यावर त्याचा व्यासंग असलाच पाहिजे अशा जुन्या विचारसरणीचे हे लोक. ऑस्कर वाइल्ड, पुशकिन, पिनिअरो, गॉर्की वगैरे लेखकांचे साहित्यही दिवाकरांनी वाचल्याचे उल्लेख आहेत. रविकिरण मंडळाचेहही ते सदस्य होते. दिवाकरांच्या नाट्यछटा 'उद्यान' मासिकात आणि 'ज्ञानप्रकाशा'त छटेमागे एक रुपया या मानधनाने प्रसिद्ध झाल्या. शेवटी दिवाकरांनी काही भावकथाही लिहिल्या. वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी इन्फ्लुएंझाने दिवाकर मरण पावले.
आता थोडेसे 'तेवढेच ज्ञानप्रकाशात' या नाट्यछटेविषयी. या कथेला संदर्भ आहे तो  रमाबाई रानडे यांच्या मृत्यूचा. पण तोही केवळ संदर्भ म्हणून. या छटेच्या निमित्ताने दिवाकर माणसाच्या दुटप्पी स्वभावावर, दिखाऊपणावर नेमके बोट ठेवतात."चला! मोठी एक कर्तीसवरती बाई गेली!" असे म्हणून रमाबाईंच्या मोठेपणाचे गळे काढणारे हे प्राध्यापकमहोदय त्यांच्या अंत्यदर्शनाला जायचा विषय काढतात, पण त्यातला त्यांचा हेतू वेगळाच आहे. मृतांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या तथाकथित प्रतिष्ठित माणसांची - बव्हंशी प्राध्यापकांची - यादी 'ज्ञानप्रकाशा'त प्रसिद्ध् होत असे. या निमित्ताने का होईना, आपले नाव या वर्तमानपत्रात छापून यावे अशी ती प्रसिद्धीची लालसा आहे. 'पेज थ्री' या सिनेमात सोनी राजदानने आत्महत्या केल्याचा निरोप येतो तेंव्हा डॉली ठाकूर कपड्यांची खरेदी करत असते. आता अंत्यदर्शनाला जावे लागणार, मग तिथे नवे कपडे नकोत का असा तात्काळ थेट रोख विचार करून ती त्या विक्रेत्याला 'शो मी समथिंग इन व्हाईट' असे निर्विकारपणे सांगते - तेच हे माणसात लपलेले गिधाड! "मला तरी कुठे येवढे जावेसे वाटते म्हणा!" यात त्याचा हिडीस चेहरा दिसतो, पण पुढे "कारण आता गेले काय अन् न गेले काय सारखेच!" अशी फिलॉसॉफिकल सारवासारव केल्याने तो अधिकच बेगडी आणि भेसूर दिसू लागतो! 'प्यासा' मध्ये जिवंत असताना ज्या भावाला हिडीसफिडीस केली त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कवितेच्या रॉयल्टीच्या रकमेवर घासाघीस करणारे त्याचे भाऊ याच वैश्विक कुटुंबातले!
अडीचएकशे शब्दांच्या दिवाकरांच्या या नाट्यछटेत हे इतके सगळे लपलेले आहे. संभाषण सुरु आहे असे वाटावे अशी भाषा हे तर नाट्यछटेचे वैशिष्ट्यच असते. "...हो, बरोबर...." अशी सुरुवात, "-केंव्हा? आता मगाशी सहाच्या सुमारास?" असा प्रश्न. "....बाकी बर्‍याच थकल्या होत्या म्हणा!" अशी वाक्ये, यांनी या छटेला एक 'परफॉर्मिंग क्वालिटी आली आहे. असे वाटते, की हा माणूस समोर आहे, बोलतो आहे!
नुसत्या संवादांतून स्वभाव आणि प्रसंग रेखाटन हे चांगल्या नाट्यछटेचे गमक आहे. दिवाकरांना ते इथे उत्तम रीत्या साधले आहे 'तेवढेच 'ज्ञानप्रकाशा' त!' मला दिवाकरांच्या सर्वोत्तम छटांपैकी एक वाटते ती त्यामुळेच.
तेवढेच 'ज्ञानप्रकाशां' त
"... हो, बरोबर, दोनदा आपल्याकडे येऊन गेलो मी. - नाही, काल नाही, संध्याकाळी आलो होतो ते परवा आणि सकाळचे जे म्हणता ती कालची गोष्ट. असो, गाठ पडली. चला. - हो ते विचारणारच होतो, की शेजारी एवढी गडबड कसली? सारख्या मोटारी अन् गाड्या येताहेत! बायकांची तर ही गर्दी लोटली आहे! - केंव्हा? आता मगाशी सहाच्या सुमारास? - नाही बोवा, तुम्ही सांगेपर्यंत वार्तासुद्धा नव्हती याची मला! आज बरेच दिवस आजारी आहेत, फारशा कुठे जात-येत नाहीत, येवढे ठाऊक होते! पण इतक्यात काही होईलसे.. बाकी बर्‍याच थकल्या होत्या म्हणा! ...साठ का हो! साठाच्या पलीकडे खास गेल्या होत्या!..असो.चला! मोठी एक कर्तीसवर्ती बाई गेली! पेशवाईनंतर महाराष्ट्रात इतक्या योग्यतेची मला नाही वाटत दुसरी कोणी असेलशी! खरे आहे.अगदी खरे आहे! मनुष्य आपल्यामध्ये असते, तोपर्यंत आपल्याला त्याची कल्पना नसते! - स्वभावाने ना? वा! फारच छान! अतिशय मनमिळाऊ आणि शांत! कटकट म्हणून नाही! - हळूहळू, थोडं थोडं , पण खरोखर मोठं कार्य केलं! अन् फारसा गाजावाजा न करता! - आधीच थोरामोठ्यातली ती! अन् रावसाहेबांचे वळण! मग काय विचारता! - बोलणे काय, चालणे काय आणि - हो! लिहिणेसुद्धा - तेच म्हणतो मी - की 'आठवणी' कशा नमुनेदार लिहिल्या आहेत! - मराठीत असे पुस्तक नाही आहे! - ते काय विचारायला नको! आज गर्दी म्हणजे - सगळा गाव लोटायचा आता! मोटारी आणि गाड्यांचा चालला आहे धडाका! - काय? खूपच लोटली आहे हो! दर्शनासाठी दिवाणखान्यातच ठेवलेले दिसते आहे त्यांना! चला येत असलात तर... जाऊ म्हणतो! इतकी माणसे जात आहेत तेंव्हा- हो गर्दी तर आहेच्! - राह्यलं. तब्येत बरोबर नसली तर नाही गेले! मला तरी कुठे येवढे जावेसे वाटते म्हणा! कारण आता गेले काय, अन् न गेले काय सारखेच! पण् बोवा 'अमुक एक फलाणे प्रोफेसरद्वय आले होते शेवटच्या दर्शनाला!' तेवढेच 'ज्ञानप्रकाशा'त.
हायरे दैवा ! सत्तर मुलें ! - पण सगळीं मला टाकून गेलीं ना ! बाळांनो ! अरे माझ्या छबकड्यांनो ! या ! जेथें असाल तेथून धांवत येऊन मला - आपल्या आईला - एकदां तरी कडकडून भेटारे ! - काय ! काय म्हणतां ? माझी सगळी लेंकरें मरुन पडलीं आहेत ! - हाय ! अहो आणा ! मी आपल्या पायां पडतें ! पण कसेंही करुन त्यांची व माझी एकदां तरी भेट करवा ! त्यांच्या मुखाचें मला शेवटचें चुंबन घेऊं द्या ! - मरायच्यापूर्वी त्यांचे दोन गोड शब्द तरी माझ्या कानी पडूं द्या ! - हाय ! त्यांची व माझी आतां मुळीच भेट व्हायची नाहीं ? ते स्वर्गाला जायला निघाले आहेत ? कोठें आहेत ? अरे बाळांनो ! थांबा ! आपल्या आईशीं जातां जातां दोन शब्द तरी बोला ! - अगबाई ! एकाएकी कसला बरें गोंगाट सुरु झाला ? काय ? माझीं मुलें आली ? कोठें आहेत तीं ? मला नाहीं का - हो दिसायची तीं ? नुसतें त्यांचें बोलणेंच मला ऐकूं येईल ? थांबा ! बाळांनो ! अरे, असा गलका करुं नका ! एक एक जण बोला ! - काय म्हटलेंत ? जगामध्यें गेलां होतां ? अस्सें कां ? जगामध्यें काय पाहिलें ? कसें आहे जग ? बाळांनो ! अशी गर्दी करुं नका ! - सांगा ! नीट सांगा !
' १ - जग कसें आहे म्हणतेस ? अग बाई ! जग म्हणजे भयंकर काळोख आहे काळोख ! आणि काय सोसाट्याचा वारा तो ! अरे राम ! नको रे बुवा पुन्हा आपल्याला तें जग !
२ - नाहीं ग आई ! हा कांही तरीच सांगत आहे झालें ! मी सांगूं का तुला जग कसें आहे तें ? जग म्हणजे निव्वळ चंद्रप्रकाश आहे चंद्रप्रकाश ! काय ती रमणीय बाग ! अहाहा ! पुष्पांच्या मधुर सुवासानें माझा जीव कसा अगदी आनंदानें गुंग होऊन गेला होता !
३ - खरेंच ! जगांतल्या विड्यांच्या धुरानें व शौचकुपांतील नरकाच्या घाणीनें माझा जीवसुद्धां अगदीं गुंग होऊन गेल होता ! ओकून ओकून माझी कोण पुरे वाट झाली ! आणि हा म्हणतो जग मधुर सुवासानें भरलेलें आहे !
४ - कांही नाहीं ! सगळें खोटें आहे ! जिकडे तिकडे पाणीच पाणी ! आणि मध्यें एक दीपगृह ! याशिवाय जगांत दुसरें तिसरें कांहीसुद्धां नाहीं !
५ - अरे काय सांगत आहांत तरी काय तुम्ही ! आई, यांचें तूं कांहीसुद्धं ऐकूं नकोस ! अबब ! काय ती लक्षावधि माणसांची धांवपळ ! सारख्या आगगाड्या येत होत्यां आणि जात होत्या ! त्यांच्या त्या कर्कश ओरडण्यानें व माणसांच्या गोंगाटानें ती प्रचंड इमारत कशी अगदीं गुदमरुन गेली होती ! छे ! छे ! माझें डोकें तर अगदी फिरुन गेलें होते !
६ - ठेवलीं आहेत लक्षावधि माणसें ! जगामध्यें काय तो एकच मनुष्य आहे ! आई, जगांत जिकडे तिकडे डोंगरच डोंगर आहेत ! अहाहा ! काय तें सुंदर व लहानसें देऊळ ! प्रत्यक्ष शांततादेवीच तेथें वास करीत आहे !
७ - कांहीं नाही ! जग म्हणजे निवळ सडकी घाण आहे घाण ! अनंत रोगांनीं कुजविलेल्या देहांतील घाण उपसणें किंवा प्रेतें फाडणें येवढेंच काय ते जगामध्यें आहे !
८ - नाही - नाहीं ! जग म्हणजे दारु आहे दारु ! बिभत्स गाणीं, हसणें - खिदळणें - नाचणें -
९ - अरे वा ! हा तर नाचायला लागला की ! अरे वेड्या ! जगांत तुरुंगाशिवाय दुसरें तिसरें कांहींसुद्धा नाही ! अरे बापरे ! काय तो आरडाओरडा ! आणि काय ते रक्ताच्या चिळकांड्या उडविणारे - व उघड्या देहावर तडातड उडणारे भयंकर फटकारे ते ! नको रे बुवा ! आठवण झाली कीं कसे शहारे येतात अंगावर !
१० - आई ! जग म्हणजे नाटक आहे नाटक ! पोटाची खळगी भरण्याकरितां हंसणें खोटें - रडणें खोटें - आणि प्रेम करणेंही पण खोटें ! समजलीस !
११ - छे ! छे ! भलतेंच कांहीं तरी ! सुस्वर वाद्यें - मधुर गायन आणि शुद्ध पतिपत्नीप्रेम - यांनीच सर्व जग व्यापले आहे ! हार्मोनियम वाजविणार्‍या पतीच्या मानेभोंवती प्रेमानें आपला उजवा हात टाकून व डाव्या हातानें मुलाला कडेवर घेऊन, मधुर कंठांतून सकल विश्वावर गायनामृत सिंचन करणार्‍या त्या प्रेमळ पत्नीला पाहून मला किती आनंद झाला म्हणून सांगूं तुला ! आई ! -
१२ - संपलें कीं नाहीं चर्‍हाट अजून तुझें ? खून ! विश्वासघात ! यांनी सगळें जग भरलें आहे ठाऊक आहे ! अरे, मॅकबेथ नाटकाच्या दुसर्‍या अंकांतील दुसरा प्रवेश वाचून पहा, म्हणजे समजेल मी काय म्हणतो तें ।
१३ - कांही नको वाचायला ! अरे भाऊ, श्रीरामचंद्राशिवाय या जगांत दुसरें कांहीं तरी आहे का ? अहाहा ! काय तें भव्य देवालय ! हजारों स्त्रीपुरुषांच्या हदयांतून बाहेर पडलेला केवढा तो रामनामाचा प्रचंड गजर !
१४ - निवळ कत्तलखाना ! निर्दय खाटकांनी - रक्तांनी भरलेल्या मोठमोठ्या सुर्‍यांनीं - व दुष्ट मांसाहारी लोकांनी सर्व जग व्यापले आहे ठाऊक आहे ! नको ! माणसाच्या तीव्र क्षुधेवर कापायला आणलेल्या निरुप्रदवी पशूच्या आत्म्यांनी काढलेला भयंकर रुदनस्वर ऐकणें नको !
..... हायरे दैवा ! सत्तर मुलें ! - पण सगळीं मला टाकून गेलीं ना ! बाळांनो ! अरे माझ्या छबकड्यांनो ! या ! जेथें असाल तेथून धांवत येऊन मला - आपल्या आईला - एकदां तरी कडकडून भेटारे ! - काय ! काय म्हणतां ? माझी सगळी लेंकरें मरुन पडलीं आहेत ! - हाय ! अहो आणा ! मी आपल्या पायां पडतें ! पण कसेंही करुन त्यांची व माझी एकदां तरी भेट करवा ! त्यांच्या मुखाचें मला शेवटचें चुंबन घेऊं द्या ! - मरायच्यापूर्वी त्यांचे दोन गोड शब्द तरी माझ्या कानी पडूं द्या ! - हाय ! त्यांची व माझी आतां मुळीच भेट व्हायची नाहीं ? ते स्वर्गाला जायला निघाले आहेत ? कोठें आहेत ? अरे बाळांनो ! थांबा ! आपल्या आईशीं जातां जातां दोन शब्द तरी बोला ! - अगबाई ! एकाएकी कसला बरें गोंगाट सुरु झाला ? काय ? माझीं मुलें आली ? कोठें आहेत तीं ? मला नाहीं का - हो दिसायची तीं ? नुसतें त्यांचें बोलणेंच मला ऐकूं येईल ? थांबा ! बाळांनो ! अरे, असा गलका करुं नका ! एक एक जण बोला ! - काय म्हटलेंत ? जगामध्यें गेलां होतां ? अस्सें कां ? जगामध्यें काय पाहिलें ? कसें आहे जग ? बाळांनो ! अशी गर्दी करुं नका ! - सांगा ! नीट सांगा !
' १ - जग कसें आहे म्हणतेस ? अग बाई ! जग म्हणजे भयंकर काळोख आहे काळोख ! आणि काय सोसाट्याचा वारा तो ! अरे राम ! नको रे बुवा पुन्हा आपल्याला तें जग !
२ - नाहीं ग आई ! हा कांही तरीच सांगत आहे झालें ! मी सांगूं का तुला जग कसें आहे तें ? जग म्हणजे निव्वळ चंद्रप्रकाश आहे चंद्रप्रकाश ! काय ती रमणीय बाग ! अहाहा ! पुष्पांच्या मधुर सुवासानें माझा जीव कसा अगदी आनंदानें गुंग होऊन गेला होता !
३ - खरेंच ! जगांतल्या विड्यांच्या धुरानें व शौचकुपांतील नरकाच्या घाणीनें माझा जीवसुद्धां अगदीं गुंग होऊन गेल होता ! ओकून ओकून माझी कोण पुरे वाट झाली ! आणि हा म्हणतो जग मधुर सुवासानें भरलेलें आहे !
४ - कांही नाहीं ! सगळें खोटें आहे ! जिकडे तिकडे पाणीच पाणी ! आणि मध्यें एक दीपगृह ! याशिवाय जगांत दुसरें तिसरें कांहीसुद्धां नाहीं !
५ - अरे काय सांगत आहांत तरी काय तुम्ही ! आई, यांचें तूं कांहीसुद्धं ऐकूं नकोस ! अबब ! काय ती लक्षावधि माणसांची धांवपळ ! सारख्या आगगाड्या येत होत्यां आणि जात होत्या ! त्यांच्या त्या कर्कश ओरडण्यानें व माणसांच्या गोंगाटानें ती प्रचंड इमारत कशी अगदीं गुदमरुन गेली होती ! छे ! छे ! माझें डोकें तर अगदी फिरुन गेलें होते !
६ - ठेवलीं आहेत लक्षावधि माणसें ! जगामध्यें काय तो एकच मनुष्य आहे ! आई, जगांत जिकडे तिकडे डोंगरच डोंगर आहेत ! अहाहा ! काय तें सुंदर व लहानसें देऊळ ! प्रत्यक्ष शांततादेवीच तेथें वास करीत आहे !
७ - कांहीं नाही ! जग म्हणजे निवळ सडकी घाण आहे घाण ! अनंत रोगांनीं कुजविलेल्या देहांतील घाण उपसणें किंवा प्रेतें फाडणें येवढेंच काय ते जगामध्यें आहे !
८ - नाही - नाहीं ! जग म्हणजे दारु आहे दारु ! बिभत्स गाणीं, हसणें - खिदळणें - नाचणें -
९ - अरे वा ! हा तर नाचायला लागला की ! अरे वेड्या ! जगांत तुरुंगाशिवाय दुसरें तिसरें कांहींसुद्धा नाही ! अरे बापरे ! काय तो आरडाओरडा ! आणि काय ते रक्ताच्या चिळकांड्या उडविणारे - व उघड्या देहावर तडातड उडणारे भयंकर फटकारे ते ! नको रे बुवा ! आठवण झाली कीं कसे शहारे येतात अंगावर !
१० - आई ! जग म्हणजे नाटक आहे नाटक ! पोटाची खळगी भरण्याकरितां हंसणें खोटें - रडणें खोटें - आणि प्रेम करणेंही पण खोटें ! समजलीस !
११ - छे ! छे ! भलतेंच कांहीं तरी ! सुस्वर वाद्यें - मधुर गायन आणि शुद्ध पतिपत्नीप्रेम - यांनीच सर्व जग व्यापले आहे ! हार्मोनियम वाजविणार्‍या पतीच्या मानेभोंवती प्रेमानें आपला उजवा हात टाकून व डाव्या हातानें मुलाला कडेवर घेऊन, मधुर कंठांतून सकल विश्वावर गायनामृत सिंचन करणार्‍या त्या प्रेमळ पत्नीला पाहून मला किती आनंद झाला म्हणून सांगूं तुला ! आई ! -
१२ - संपलें कीं नाहीं चर्‍हाट अजून तुझें ? खून ! विश्वासघात ! यांनी सगळें जग भरलें आहे ठाऊक आहे ! अरे, मॅकबेथ नाटकाच्या दुसर्‍या अंकांतील दुसरा प्रवेश वाचून पहा, म्हणजे समजेल मी काय म्हणतो तें ।
१३ - कांही नको वाचायला ! अरे भाऊ, श्रीरामचंद्राशिवाय या जगांत दुसरें कांहीं तरी आहे का ? अहाहा ! काय तें भव्य देवालय ! हजारों स्त्रीपुरुषांच्या हदयांतून बाहेर पडलेला केवढा तो रामनामाचा प्रचंड गजर !
१४ - निवळ कत्तलखाना ! निर्दय खाटकांनी - रक्तांनी भरलेल्या मोठमोठ्या सुर्‍यांनीं - व दुष्ट मांसाहारी लोकांनी सर्व जग व्यापले आहे ठाऊक आहे ! नको ! माणसाच्या तीव्र क्षुधेवर कापायला आणलेल्या निरुप्रदवी पशूच्या आत्म्यांनी काढलेला भयंकर रुदनस्वर ऐकणें नको !
१५ - हा ! हा ! हा ! अरे वेडयांनो ! जग म्हणजे एक सर्कस आहे सर्कस ! पशूंनीच काय, पण माणसांनींसुद्धां, त्या लहानशा वर्तुळामध्यें जगाच्या नियमाप्रमाणें वावरलें पाहिजे ! जरा कोठें चुकायचा अवकाश, कीं बसलेच चाबकाचे फटकारे अंगावर ! तेथें स्वच्छंदीपणाला यत्किंचितसुद्धां वाव नाहीं ! हो !
१६ - कांहीं तरी सांगत आहेस झालें ! सद्गुणी आत्म्यांचा छळ आणि आत्महत्या, यांनींच सगळें जग भरलें आहे ! ' नाहीं रे देवा आतां मला हा छळ सोसवत ! ' असें रडत रडत म्हणून त्या गरीब बिचार्‍या बालविधवेनें कशी धाडकन् विहिरीमध्यें उडी टाकली पण ! जग म्हणजे छळ, निराशा -
१७ - आग ! आग ! अरे बाबा, सगळें जग आगीमध्यें होरपळून - भाजून - मरत आहे ! मनाला - जिवाला - शेवटी देहालासुद्धां आग लागते आग ! शिव ! शिव ! केवढा तो भयंकर अग्नीचा डोंब ! - चार - पांचशे माणसें कशी ओरडून - ओरडून - तडफडून - अखेरीं मेलीं पण !
१८ - नाहींग आई ! ईश्वरभक्तीशिवाय जगांत दुसरें कांहीसुद्धां नाही ! महात्मा ख्राइस्टच्या तसबिरीजवळ गुडघे टेकून - हात जोडून - आणि नेत्र मिटून बसलेली व शांत अशा ईश्वरी प्रेमामध्यें बुडून गेलेली ती चौदा - पंधरा वर्षाची बालिका मीं पाहिली मात्र ! - अहाहा ! त्या वेळेस मला केवढी धन्यता आणि किती आनंद झाला म्हणून सांगूं तुला ! आई -
१९ - अहो धांवा ! डेस्डिमोनेचा खून झाला ! कॉडेंलिया फांसावर चढली ! पांखरें मेलीं - वणवा पेटला ! धांवा ! धांवा !! हाय ! जगांत अन्याय ! अन्याय ।
२० - हा ! हा ! हा ! अरे वेडयांनो ! जग मुळीं नाहींच आहे ! हं ! कसला अन्याय ! आणि कसची ईश्वरभक्ति !
इतर मुलें - नाहीं ! तूं खोटे बोलतोस ! जग आहे ! आम्ही सांगतों जग कसें आहें तें ! ऐका ! ऐका ! गलका करुं नका ! ऐका ! '
आगपेटी - बाळांनो ! अरे थांबा ! असा गोंगाट करुं नका ! हं ! सांगा ! नीट पुनः एक एक जण सांगा ! कसें आहे म्हटलेंस जग ? - सगळाच गोंधळ ! एकाचेंही सांगणें दुसर्‍याच्या सांगण्याशीं मुळींच जुळत नाहीं ! खरें तरी कोणाचें मानूं ! - आणि खोटें तरी कोणाचें समजूं ! काय म्हटलेंस ? तूं सांगतोस खरें जग कसें आहे तें ? बरें तर, सांग पाहूं - आई ! मेलें ! मेलें ! कोणी चांडाळानें मला पायाखाली चिरडली ! मी मेलें !!.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भंगु दे काठीन्य माझे - कवी बा.सी.मर्ढेकर

भंगु दे काठीन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे येऊ दे वाणीत माझ्या सुर तुझ्या आवडीचे, राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारांतले गा, अक्षरां आकार त...