शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

भारुड - संसार


भारूड हा एक मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. याद्वारे साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. अनेक संतांनी समाजप्रबोधनपर भारुडे लिहिली आहेत. ज्ञानेश्वर आणि नामदेव या एकनाथपूर्व तसेच तुकाराम, रामदास या एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारुडे लिहिली, पण एकनाथमहाराजांसारखी विविधता त्यांत नाही. संत तुकडोजी महाराजांच्या रचनादेखील प्रचलित आहेत.

इतिहाससंपादन करा


‘भारूड‘ या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ ‘धनगर‘ असा आहे. त्याच्या स्पष्टीकरणासाठी महानुभाव पंथाच्या ऋद्धपुर वर्णन या ग्रंथाचा आधार घेऊन ‘रातप्रभेचे नि घोडे, मेंढिया श्रृंगारती भारुडे‘ असे म्हटले आहे. महाभारतात शकुंतला आख्यान, भारूड सांग हा गीतप्रकार होता. म्हणजेच अथर्वशीर्षांच्या रचनेचा काळ हा सुमारे २५०० वर्षांपूर्वीचा होता. त्यावरून ‘भारूड‘ हा शब्द किमान २००० वर्षे इतका प्राचीन असण्याची शक्यता आहे. वेदकाळी व वेदोत्तरकाळी येते प्रसंगी प्राकृत लोकांचे जानपदाचे, करमणुकीचे प्रकार होत. त्यांतून वैदिक देव व त्यांच्या शौर्यप्रसंगांची स्तुती गायली जायची. याज्ञिक लोकांनंतर यज्ञांची जागा देवपूजेने तर संस्कृत भाषेची जागा प्राकृत भाषेने घेतली, तेव्हा कालमानानुसार पालटते रूप घेऊन जानपद वाङ्मय भारूड स्वरूपात आले असावे. भारुडाचे उगमस्थान म्हणजे हरिकीर्तन आणि कीर्तन परंपरेचे जनक म्हणजे नामदेव महाराज. नामदेव नाचून जे कीर्तन करायचे त्याला लळित म्हणतात आणि लळितातून रूपकाचा जन्म झाला. अध्यात्म सांगायचे ते एखाद्या गोष्टीमधून किंवा रूपकाच्या माध्यमातून. भारुडाचा प्रधान हेतु हाच होता.
'बहुरूढ' या शब्दाचा अपभ्रंश 'भारूड' झाला असेही काहींचे मत आहे.संदर्भ हवा ]

स्वरूपसंपादन करा


एकनाथांच्या भारुडांतून त्यांचा आध्यात्मिक अनुभव अगदी सोप्या भाषेत मांडला गेला आहे. सदाचार आणि नीती यावर त्यांचा मोठा भर होता. त्यामुळे समाजाला कळणारी भाषा व पेलणारे तत्त्वज्ञान त्यांच्या भारुडांत आढळते. नाथांच्या भारुडांत विषयांची विविधता खूप आहे. साऱ्या जीवनाचे अवलोकन आणि चिंतन या भारुडांमधून व्यक्त झाले आहे. भारुडांच्या रचनेत अध्यात्म, मनोरंजन, दोष-दुर्गुणांचे भंजन तसेच गूढगुंजन आहे. भारूड लिहिण्याच्या प्रयोजनांवरून व रचना संकेतांवरून एकनाथांची भारूडे ही आध्यात्मिक उद्बोधन, प्रबोधन व लोकरंजन साधण्यासाठी केलेली रूपकात्मक स्फुट रचना होय. म्हणूनच संस्कृत वाङ्मयात जे स्थान पुराणांचे आहे तेच संत वाङ्मयात भारुडांचे आहे. भारूडरचनांमध्ये नाट्यतत्त्वे ठासून भरलेली असतात. त्यामुळे त्यांचे नाट्यरूपांतर सहजतेने होते.
भारूड हा प्रबोधनासाठी उपयुक्त असा काव्यप्रकार असल्याने बऱ्याच संप्रदायांनी त्याचा उपयोग करून घेतला आहे. संस्कृत किंवा प्राकृत भाषेत भारूड हा शब्द भारूड या गीत प्रकाराला उद्देशून जरी असला तरी या भाषांमध्ये भारूड रचना उपलब्ध नाही. त्यामुळे भारूड या काव्यरचनेचा उगम हा मराठी भाषेतच झाला. संत ज्ञानेश्वर हेच भारुडाचे आद्यरचनाकार असावेत असा एक प्रवाह मानतो. मात्र त्या आधीही भारुडे प्रचलित होती. संत एकनाथ महाराजांनी भारूड या काव्यरचनेला शिखरावर नेऊन पोहोचविले.
भारूडातील विषय हे सर्वसामान्यांच्या परिचयाचे व नित्याच्या व्यवहारात वावरणारे व आढळणारे असतात. व्यवसाय, नाती-गोती, सामाजिक वृत्तिदर्शन, गाव, दैवी भूमिका, भूत-पिशाच्च, पशु-पक्षी, सण आदि बाबी असे विविध विषय एकनाथांच्या भारुडांत दिसून येतात.

प्रकारसंपादन करा


भारुडाचे साधारणपणे भजनी भारूडसोंगी भारूडआणि कूट भारूड असे तीन प्रकार मानले जातात. पैकी भजनी भारूड हे कीर्तनासारखे. कूट भारूड म्हणजे ज्याचा अर्थ लावावा लागतो, जसे 'चिंचेच्या पानी एक देवालय उभारिले, आधी कळस मग पाया रे' किंवा 'मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती...'सारख्या कूट रचना होत.

आजचे स्वरूपसंपादन करा


एकनाथमहाराजांनी ४५० वर्षांपूर्वी ‘एडका’ या भारुडाची रचना केली होती. एकनाथांची अशी रूपके सध्याचे एचआयव्ही/एड्ससारखे आजार रोखण्यासाठी तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच राज्याच्या एड्स नियंत्रण संस्थेद्वारे आज लोककलेच्या माध्यमातून लोकजागृती करण्यासाठी भारुडांचा उपयोग केला जातो.

सादरीकरणसंपादन करा


लोकशिक्षणासाठी संतांनी भारुडांची रचना केली. भारूड हे नुसते गायनाने दाखवायचे नसते तर त्याचे संपादनही करावे लागते. भारुडांत ब्रह्म ज्ञानाला गोष्टीचे रूप देऊन मनोरंजन करावे लागते. तसेच भारूड म्हणणारी व्यक्ती ही अध्यायाबरोबरच नटही असावी लागते. या दोन्ही गोष्टींची सांगड घातली गेल्यामुळेच भारुडांनी जनमनोरंजनाची साधने म्हणून शतकानुशतके लोक शिक्षणाचे व स्वधर्म जागृतीचे कार्य केले आहे. हीच भारुडे लळितात अभिनय करून संभाषणे टाकून म्हटली जातात आणि म्हणूनच लळिताचे बीज भारुडात आहे असे म्हटले जाते. मराठी संतांनी प्रौढ, सुशिक्षित जनांसाठी भागवतज्ञानेश्वरी, गाथा, अमृतानुभवअशा प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती केली. तसेच इतर सर्वजनांनाही परमार्थाचा आनंद घेता यावा व अध्यात्म सुलभ व्हावा म्हणून भारुडांची व्यवस्था केली. हा एक वारकरी कला आविष्कार आहे.

स्त्री भारूड सादरकर्त्यासंपादन करा

पूर्वी भारूड फक्त पुरुष सादर करीत असत. परंतु ही परिस्थिती आता बदलली आहे. संत साहित्याच्या अभ्यासक गंगूबाई जाधव, लक्ष्मीबाई गिराम आणि चंदाबाई तिवाडी या स्त्री-भारुडकर्त्या भारुडे सादर करीत असतात. चंदाबाई तिवाडी यांना तर संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर कार्यक्रम करण्यास त्यांना आमंत्रित केले जाते. महाराष्ट्रात निरंजन भाकरे, चंदाबाई तिवाडी आणि मीराबाई उमप हे भारूड सादरर्कते आहेत. स्वातंंत्र्यपूर्व काळात जुन्नर तालुक्यातील राधाबाई आरोटे व सीताबाई आरोटे (डुंंबरवाडी) यांंनी महाराष्ट्रभर वारकरी भारुडे सादर केली. पुरुषवेष धारण करुन या दोघी बहिणींंनी मुंंबईसह महाराष्ट्र गाजविला. मुंबईमध्ये त्यांच्या भारुडासाठी अलोट गर्दी व्हायची.

भारूड महोत्सवसंपादन करा


वामन केंद्रे यांनी दरवाडी येथे इ.स. २०११ मध्ये भारूड महोत्सव आयोजित केला होता. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी भारुडाची कला जिवंत ठेवली आहे त्यांनी १४ मे २०१६ पर्यंत ‘बहुरूपी भारूड’चे २१०० प्रयोग केले आहेत.

सांगते तुम्हा वेगळे निघा ।
वेगळे निघून संसार बघा ।।

संसार करता शिणले भारी ।
सासु सासरा घातला भरी ।।

संसार करता शिणले बहु ।
दादल्या विकून आणले गहू ।।

गव्हाचे दिवसे जेविली मावशी ।
मजला वेडी म्हणता कैसी ।।

संसार करता दगदगले मनी ।
नंदा विकल्या चौघीजणी ।।

एका जनार्दनी संसार केला ।
कामक्रोध देशोधडी गेला ||

अधिक माहितीसंपादन करा


एकनाथ महाराज तसे इतर संतांची भारुडे मूळ स्वरूपात कृपया विकिस्रोत येथे द्यावीत दुवा :विकिस्रोत

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

(३१ मे १७२५–१३ ऑगस्ट १७९५). एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.
खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते; खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले.पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.”
आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरत्यांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार वागत असत.
मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. पण १७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली, तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.
अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार ⇨ ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणाऱ्यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.
अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी ⇨ शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने बाईंच्या लौकिकात आणखीच भर पडली.
अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.
अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली.
राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्‍वरला हलविली (१७७२). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्‍वरहे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंगसारख्या कुविख्यात डाकूला फाशीदिली. होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.
त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या.
जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम-वैद्य नेमले. स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.
बाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर,मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्‍वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामेया ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली.
अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्‍वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरापंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर-सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.
अखेरच्या दिवसांत त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे दोन भाऊ वारले. मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला (१७९०), तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईचे देहावसान झाले. त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली.
अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने १७९२ मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या; पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले.
मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्रीकर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती, हे त्यांचे आयुष्यच सांगते.
महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

संदर्भ : १. कणेकर, मुक्ता, लोकराज्ञी अहिल्याबाई होळकर, पुणे २०१३.
२. चंपानेरकर, मिलिंद; कुलकर्णी, सुहास, यांनी घडवलं सहस्रक, पुणे, २००३.
३. देशपांडे, सु. र. मराठेशाहीतील मनस्विनी, पुणे, २००५.
४. लोही, म. ना. देवी अहिल्याबाई होळकर-वास्तव दर्शन, नागपूर, १९९९.
वाड, विजया
स्त्रोत : मराठी विश्वकोश
पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर
 प्रस्तुत कविता शं. ल. नाईक यांची आहे.
 प्रसिद्ध कवी. विविध मासिके, वृत्तपत्रे , नियतकालिके यांतून लेखन. त्यांची गंमत नगरी, प्राण्यांची शाळा, सोनी मोनी, डोंगरझाडीत, नदी किनारी, पिल्लू,  माकडाची वरात, सुंदर भारत घडवू हे कवितासंग्रह, तीन कोडी संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या माकडाची वरात ह्या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार मिळाला आहे. तसेच काव्य गौरव पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे लहान मुलासाठी सातत्याने दर्जेदार लेखन करणारे शं. ल. नाईक हे मुलांचे आवडते बालसाहित्यिक आहेत. किशोर, सवंगडी मुलांचे मासिक आणि बाल साहित्याला वाहिलेल्या मासिकातून त्यांनी खूप लिखाण केले आहे. पाठ्यपुस्तकात त्यांच्या कविता आहेत. त्यातही त्यांचे दर्जेदार साहित्य आहे त्यांच्या लिखाणाचा दर्जा अतिशय उत्तम आहे.
   प्रस्तुत कवितेमधून पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला आहे .
धन्य धन्य ती अहिल्याबाई, धन्य ती चिरे करणी 
उंच सुरानो गाऊ या रे, गाऊ तिची गाणी 
महाराष्ट्र भूमीत जन्माला आली 
इंदूरची मग राणी झाली
 लेकरांसमान प्रजेला जपली 
होळकरांच्या घराण्यात ती दिसली रे शोभुनी
 संकट रुपी वादळ आली
 वीरासम ती धैर्य दविली
 स्त्रियांची फौज उभारली
 शत्रुवरती होता धाक, तेजस्वी होती वाणी 
तीर्थक्षेत्री बांधले घाट
 मंदिराचा केला थाट 
अन्नछत्रे तर  360 
भुकेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी पशुपक्ष्यांसाठी राखीव  रान
गोरगरिबांना अन्नदान
 सर्वधर्मियांना दिला मान 
शांततेचे राज्य तिचे अन वृत्ती समाधानी

बुधवार, १ जानेवारी, २०२०

जग बदल घालुनी घाव - अण्णाभाऊ साठे

       तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या  मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.


 अण्णाभाऊ साठे मानवतावादी लेखक होते. शोषणमुक्ती हा त्यांचा ध्यास होता. कष्टकरी, दलित, शोषित, पीडित यांचे शोषण संपविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. येत्या १ ऑगस्टपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने.

अनेक नामवंत साहित्यिकांच्या वाट्याला त्यांच्या हयातीत उपेक्षाच आली. जशी महात्मा जोतीराव फुले यांच्या वाङ्मयाची त्यांच्या काळात उपेक्षा झाली, तशीच उपेक्षा अण्णाभाऊ साठे यांचीही झाली. अण्णाभाऊंचे साहित्य रूपवादी, रंजनपर, परधार्जिणे आणि भडक आहे, ते साहित्यबाह्य प्रेरणेवर आधारलेले आहे अशी टीका झाली. मराठी 'कादंबरीचे शतक' लिहिणाऱ्या कुसुमावती देशपांडे यांनी तर कोण हे अण्णाभाऊ साठे? असा प्रश्न केला होता. होय अण्णाभाऊ सामाजिक बांधिलकी मानणारे, समाजपरिवर्तनाचे शस्त्र हाती घेऊन लेखन करणारे साहित्यिक होते. कम्युनिस्ट चळवळीशी त्यांचा जवळून संबंध होता. पण सर्वसामान्य कष्टकरी, दलित, उपेक्षित आणि धर्मव्यवस्थेने हक्क नाकारलेले स्त्री-पुरुष हे त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होते. समीक्षकांना त्यांचे साहित्य प्रचारकी, रंजनपर वाटले असेल, पण हजारो वाचकांनी त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची अक्षरश: पुन:पुन्हा पारायणे केली. त्यांच्या साहित्यातून प्रगट झालेली त्यांची सर्वसामान्य माणसांविषयीची आंतरिक तळमळ व त्यांच्या सुखदु:खाचे चित्रण करण्याची ओढ वाचकांच्या मनाला भुरळ घालत असेल. वाचनीयता हे तर त्यांच्या साहित्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होतेच, पण त्याचबरोबर मराठी मनाचा आणि महाराष्ट्रीय सांस्कृतिक विशेषांचा अत्यंत मनोज्ञ आविष्कार त्यांच्या कथा-कादंबऱ्यादी सर्वच लेखनातून समृद्ध स्वरूपात झालेला असल्याने, त्यांच्या साहित्याला वाचकांची अधिक पसंती असेल.

'मुंबई नगरी ग बडी बाका।
ताजी प्रतिक्रिया
लेख सुंदर आहे सुरेख आहे पण अण्णाभाऊंच्या साहित्यात अतिशयोक्ती आहे असे तुम्ही जे म्हटलात ते तुमचे मत मला पटले नाही त्यात काय अतिशयोक्ती आहे ते मला सांगावे मी तुमच्या संदेशाची वाट पा...+
????? ????


जशी रावणाची दुसरी लंका।।

वाजतो ग डंका - डंका चहूमूलकी।

राहयाला गुलाबाचे फूल की।।'

या शब्दांत पठ्ठे बापूराव मुंबई मायानगरीचे वर्णन करतात. तर याच मुंबई नगरीचे वर्णन करताना अण्णाभाऊ लिहितात -

'मुंबईत उंचावरी। मलबार हिल इंद्रपुरी।।

कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती।।

परळात राहणारे। रात दिवस राबणारे

मिळेल ते खाऊन घाम गाळती।।

पठ्ठे बापूरावांना मुंबई गर्भश्रीमंत दिसते, तर अण्णाभाऊंना तीच मुंबई विषम व्यवस्थेचे प्रतीक वाटते. अण्णाभाऊंच्या वेगळ्या जीवनदृष्टीचा येथे प्रत्यय येतो. 'ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तोलली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे' अशी त्यांची विज्ञाननिष्ठ भूमिका होती. 'जग बदल घालुनि घाव, असं सांगून गेले मला भीमराव' अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची निष्ठा होती. अण्णाभाऊंचे सारेच लेखन उपेक्षितांच्या बाजूचे आणि त्यांच्या अटीतटीच्या जगण्यातील संघर्षाचे व अनुभवविश्वाचे प्रखर वास्तव अधोरेखित करणारे आहे.

अत्यंत शौर्यवान, स्वामिनिष्ठ, प्रामाणिक, धैर्यशील, नीडर आणि कलंदर कसबी कलावंताच्या मांग जातीत १ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव जि. सांगली येथे अण्णाभाऊंचा जन्म झाला होता आणि १८ जुलै १९६९ रोजी मुंबईच्या चिरागनगरीच्या झोपडपट्टीत अत्यंत हलाखीच्या अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. शाळेची पायरीदेखील न चढलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी ३७ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, ११ पोवाडे, ३ नाटके, शेकडो गाणी, लावण्या, छकडी अशी विपुल साहित्यसंपदा निर्माण केली आहे; ही खरोखरी अचंबित करणारी गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्या लहान वयात वाटेगावच्या परिसरातील पाटील-कुलकर्ण्यांच्या बेमुर्वतखोर वागण्याचा, त्यांच्या अत्याचाराच्या आणि चांगुलपणाचाही अनुभव घेतला होता, त्यासंबंधीच्या अनेक अनुभवकथा तेथील जाणत्या लोकांकडून ऐकलेल्या होत्या. इंग्रजी अधिकाऱ्यांच्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात बेरड-मांग-रामोशांनी दिलेल्या लढ्याच्या कथा-गाथा त्यांच्या सतत कानावर पडत होत्या. त्यातल्या अनेक गोष्टी त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. वाटेगावच्या परिसरातील पाण्याने तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्या आणि नद्यांच्या काठांवरचा समृद्ध हिरवागार संपन्न निसर्ग त्यांनी डोळ्यांत साठवून ठेवला होता. ग्रामदेवतांच्या यात्रा-खेत्रातील उत्सवी वातावरणात त्यांचे बालपण गेले होते. जत्रेत अनेक वाद्ये वाजवण्यापासून दांडपट्ट्यासारखे मर्दानी खेळ त्यांनी सवंगड्यांसह खेळले होते. अवती-भोवतीच्या आयाबायांच्या तोंडची गाणी, ओव्या, गोष्टी-आख्यायिकांचा ठसा त्यांच्या कोवळ्या मनावर कोरला गेला होता. पातिव्रत्य धर्माचे पालन करणाऱ्या अनेक स्त्रिया त्यांच्या भोवताली वावरत होत्या. त्या निष्ठावान स्त्रियांचे राजरोस होणारे शोषण त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते आणि त्याविषयीचा संताप व चीड त्यांच्या मनात धुमसत असावी. पुढे मुंबईला गेल्यानंतर तेथील झोपडपट्टीतील उघडेवाघडे जगणे, त्यांच्या जगण्यातील भयाण वास्तव त्यांनी पाहिले. त्यांचा भूकेकंगालपणा आणि भुकेची आग शांत करण्यासाठी त्यांची होणारी ससेहोलपट, अवैध मार्गाचा अवलंब या साऱ्या गोष्टी त्यांनी जवळून अनुभवल्या आणि ते विदारक आणि अद्भुत वास्तव त्यांनी साहित्यातून मांडले. शिक्षणापेक्षा अनुभव हाच मोठा गुरू असतो या गोष्टीची अनुभूती त्यांचे साहित्य वाचताना येते.

अण्णाभाऊ साठे यांच्य लेखनात अद्भुतता, अतिशयोक्ती, अतार्किकता आहे, पण त्यात तेवढेच नाही; त्यातून जीवनातील विदारक वास्तवही प्रगट झाले आहे. लोककथेतील अद्भुतता, अतिशयोक्ती मानवी मनाला भुरळ घालते. पण त्यातून प्रगट झालेले जीवनातील तत्त्वज्ञान व वास्तवाचे दर्शन त्या मनाला अंतर्मुख करून विचार करायला लावते. रंजन करता करता व्यापक जीवनदर्शन घडविण्याचे सामर्थ्य लोककथेत असते. लोकपरंपरेतील मौखिक साहित्याचे वैशिष्ट्य अण्णाभाऊ साठे यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून कलात्मक रूप घेऊन आविष्कृत झालेले आहे. या संदर्भात त्यांची 'स्मशानातील सोनं' ही कथा लक्षात घेता येईल. गाव सोडून मुंबईला पोट भरण्यासाठी गेलेला भीमा दगडाच्या खाणीत काम करीत असतो. पण ती खाण अचानक बंद होते. उपाशी असलेला भीमा स्मशानातून-प्रेतातून सोने शोधण्याचे काम सुरू करतो आणि एका रात्री भीमा पुरलेले प्रेत उकरत असताना कोल्ही-लांडग्यांचा प्रेतावर हल्ला होतो. भीमा आणि त्या हिंस्र प्राण्यात झुंज सुरू होते, त्या झुंजीचे अद्भुत चित्रण अण्णाभाऊ करतात. त्या झटापटीत प्रेताच्या जबड्यात भीमाचा हात अडकून त्यांच्या हाताची बोटे तुटतात. आता बंद पडलेल्या खाणीचे काम सुरू होते, पण काम करणाऱ्या भीमाच्या हाताला बोटे नसतात. पोट जाळण्यासाठी भीमाने केलेल्या घनघोर लढाईचे वर्णन अण्णाभाऊंनी समर्थपणे केले आहे. भुकेच्या तीव्रतेचे भयानक दारिद्र्याचे वास्तव कथेत आहे. अशा प्रकारच्या अनेक कथांमध्ये अद्भुत आणि वास्तव एकाचवेळी अवतरते. हे अण्णाभाऊंनी मौखिक साहित्याच्या परिचयातून आत्मसात केले आहे.

अण्णाभाऊ साठे यांनी ज्या काळात लेखनाला सुरुवात केली, त्यावेळी वि. स. खांडेकर आणि ना. सी. फडके वाङ्मयविश्वाच्या यशशिखरावर आरूढ झालेले होते. ना. सी. फडके यांच्या लेखनाने प्रेमाची स्वप्नचित्रे रेखाटून तरुण-तरुणींची मने काबीज केली होती आणि वि. स. खांडेकरांनी देशप्रेमाच्या आणि ध्येयवादाच्या स्वप्नाळू दुनियेत तरुण पिढीला गुंतवून त्यांना आकर्षित केले होते.

अण्णाभाऊ साठे, या दोन्ही लेखकांनी उभा केलेला वाङ्मयीन माहोल बाजूला सारून स्वतःचा एक नवा रस्ता निर्माण करीत होते. 'मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही', अशी त्यांची लेखनामागील भूमिका होती. 'माझी जीवनावर फार निष्ठा असून मला माणसे फार आवडतात. त्यांची श्रमशक्ती फार महान आहे, त्यांच्या बळावरच हे जग चालतं. त्यांची झुंज आणि त्यांचं यश यावर माझा विश्वास आहे', असे त्यांचे मत होते. त्यामुळेच त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी तीच माणसे आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या चित्रणाविषयी डॉ. बाबुराव गुरव यांनी सविस्तर लिहिले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसवलेला सांगली, सातारा, कोल्हापूरचा परिसर, कृष्णा, कोयना, वारणा, वांग, वेरळा, पंचगंगा या नद्यांकाठचा समृद्ध निसर्ग, त्या प्रदेशातील ग्रामीण संस्कृती, ब्रिटिश काळातील जीवन, दाट जंगल झाडी, डोंगरवाटा, त्यांच्या आश्रयाने सुरू असणाऱ्या क्रांतिकारकांच्या चळवळी, गुंड-दरोडेखोरांच्या दंगली, गावातील भाऊबंदकी, दोन गावांमध्ये पिढ्यान् पिढ्या चालत आलेले वैर, त्यात भरडला जाणारा अस्पृश्य समाज, खून, मारामाऱ्या, तरण्याताठ्या देखण्या पोरीबाळींवर होणारे अत्याचार या साऱ्या गोष्टी अण्णाभाऊ आपल्या साहित्यात मांडत होते. सण-उत्सव, जत्राखेत्रा, बैलगाड्यांच्या शर्यती, कुस्त्यांचे फड, तमाशे, वाघ्या-मुरळींची जागरणे, त्यांचे धनदांडग्यांकडून होणारे शोषण, खेड्यापाड्यातील माणसांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, शेती, शेतकऱ्यांचे एकमेकांवरील प्रेम, सहकार्य, नातेसंबंधातील जिव्हाळा, श्रेष्ठकनिष्ठतेचा भाव, शेतीमध्ये होणारा बदल, पिठाच्या गिरण्या, विहिरीवरील इंजिन, हळूहळू कोसळणारा गावगाडा, बलुतेदाराची स्थितीगती, सावकारशाही, श्रीमंतीच्या जोरावर चालणारा इष्काचा बाजार, गरती स्त्रियांची घराण्याच्या प्रतिष्ठेपोटी होत असणारी घुसमट, देशाच्या स्वातंत्र्याची आच, स्त्रीचे शील, घराण्याचा बडेजावपणा, मोठे दगडी चौसोपी वाडे, महारवाडा, मांगवाडा, भटके-फिरस्ते अशा साऱ्या गोष्टींचे त्यांच्या बारीक-सारीक तपशिलांसह केलेले चित्रण अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात आले आहे. त्यामुळेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे आपल्या भूमीशी घट्ट नाते आहे. परिसराशी जोडलेले असणाऱ्या ह्या साहित्याला आपोआपच व्यापक वैश्विक आयाम प्राप्त झालेला दिसतो. भारतीय भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झालेच, पण धर्मजातीच्या, देशकालाच्या सीमा ओलांडून ते जर्मन, झेक, इंग्लिश, पोलिश, रशियन, स्लोव्हाक या परकीय भाषांमध्ये भाषांतरित झाले. ही अण्णाभाऊंच्या साहित्याचे विलोभनीय यश मानावे लागेल.

अण्णाभाऊ साठे मार्क्सवादी आहेत. त्यांच्या साहित्यातून आधीपासूनच समतावादी विचारांचा आविष्कार दिसत असला तरी मुंबईला गेल्यावर श्रीपाद अमृत डांगे यांच्या सान्निध्यात ते आले आणि त्यांची मार्क्सवादी जाणीव अधिक पक्की झाली. मुंबईतील कामगार जीवन, त्यांचे वर्गसंघर्षाचे तत्त्वज्ञान, तेथील संप, मोर्चे, त्यांच्या रोजीरोटीचा सवाल, कामगारांच्या चळवळीतील फाटाफूट या साऱ्या अनुभवातून अण्णाभाऊंच्या विचारांना पाठबळ मिळत गेले. मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांचे जीवनचित्रण करताना त्यांच्यातील मार्क्सवादी दृष्टिकोनाचा आविष्कार प्रभावीपणे व्यक्त झाला आहे.

अण्णाभाऊ साठे लेखक तर होतेच, त्यापेक्षा शाहीर म्हणून ते अधिक लोकप्रिय होते. ते स्वतः गायक-नट होते. त्यांनी १९४२ मध्ये स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिला. त्या पोवाड्याने कम्युनिस्ट पार्टीच्या वर्तुळात कम्युनिस्ट शाहीर म्हणून प्रसिद्ध झाले. शाहीर अमर शेख, द. न. गव्हाणकर यांच्या सहकार्याने 'लाल बावटा' कलापथक काढले. त्यांच्या मार्क्सवादी भूमिकेचा सर्वाधिक आविष्कार पोवाड्यांमधून व लोकनाट्यातून झाला आहे. लाल बावट्याच्या माध्यमातून वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान आणि साम्यवादी विचार त्यांनी महाराष्ट्रात रुजवला. स्वातंत्र्यलढा, गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन यामधील अण्णाभाऊंचे योगदान मोलाचे होते. 'माझी मैना गावाकडे राहिली' या त्यांच्या छकडीने सारा महाराष्ट्र निनादून सोडला होता. आजही त्या लावणीची जादू ओसरलेली नाही. तमाशाबंदीच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अण्णाभाऊंनी 'लोकनाट्य' ही संज्ञा वापरली आणि अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, देशभक्त घोटाळे, शेटजीचे इलेक्शन, माझी मुंबई इत्यादी लोकनाट्ये लिहून तो शब्द रूढ केला. या लोकनाट्यातून आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्न त्यांनी मांडले. भांडवलदार, शेतकऱ्यांचे शोषण करणारे सावकार, शेटजीभटजी हे त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते. 'धोंड्या' नावाचे एक पात्र निर्माण करून अक्षरशः पुंजापतींच्या वृत्तीप्रवृत्तींवर दगड भिरकावले. प्रबोधन करून परिवर्तन घडविले. वर्गयुद्ध घडविले, सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध उभे राहण्याचे सामर्थ्य मराठी माणसांना दिले. कलानंदाचा आनंद देण्याबरोबरच मराठी मनावर संस्कार केले. मार्क्सवादी विचारांची पेरणी केली.

अण्णाभाऊ साठे मानवतावादी लेखक होते. शोषणमुक्ती हा त्यांचा ध्यास होता. केवळ महाराष्ट्र नव्हे तर साऱ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व कष्टकरी, दलित, शोषित, पीडित यांचे शोषण संपविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. वर्गविरहित समाजाचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले. खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे ध्येयवादी लोकशाहीर होते. मानवमुक्तीचे शिलेदार होते!

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या म. फुले अध्यासनाचे प्रमुख आहेत.

6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. त्यानंतर तब्बल आठवडाभर तमाम चळवळीतील वातावरणावर एक प्रकारची निराशा उमटलेली होती. आठवडाभरानंतर संपूर्ण देशात बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्याची कार्यक्रम सुरू झाले. मुंबईत तर दर दिवसाला चार ते पाच कार्यक्रम होत होते. खेडो-पाडी, गल्ली मोहल्ल्यातून, शाळा कॉलेजांतून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली जात होती.
बाबासाहेबांचं लोकशाहीरांवर प्रचंड प्रेम. ते म्हणायचे.. माझी दहा भाषणं आणि शाहिराचं एक गाणं एकदम समान तोडीचं. मी दहा भाषणात जे सांगतो ते सांगायला शाहिर फक्त एकच गाणं घेतो आणि माझ्यापेक्षाही ताकदीनं ते पोहोचवतो. सर्व लोकशाहिरांचंही बाबासाहेबांवर अपार प्रेम होतं. अशातच तत्कालीन सर्व शाहिरांना एकत्रितपणे बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले.
या कार्यक्रमाला सर्वच थरातून प्रतिसाद मिळाला. सर्वच ख्यातनाम गायक, कवी, शाहिर, लेखक एकत्र आले. अंधेरी इलाख्यातला एक हॉल बुक केला. कार्यक्रमाची आखणी केली गेली. वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे, गोविंद म्हशीलकर, विठ्ठल उमप, विठ्ठल शिंदे, भिकू भंडारे, अण्णाभाऊ साठे यांनी आपापले एक गीत सादर करून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करायची असे ठरवले गेले.
ठरल्याप्रमाणे कार्यक्रम सुरू झाला. वामनदादांपासून विठ्ठल उमपांपर्यंत सर्वच शाहिरांनी आपापलं गाणं सादर केलं. पण अण्णाभाऊंच्या चेहऱ्यावर मात्र एक स्तब्ध भाव झळकत होता. गोविंद म्हशीलकर यांनी अण्णाभाऊंना अखेर न रहावून विचारलंच.. अण्णा काय झालंय? तुम्हाला काही सादर नाही करायचं का? तुम्ही तर गाणंही लिहून आणलेलं नाही.. मग श्रद्धांजली कशी वाहणार?
गोविंद म्हशीलकरांच्या प्रश्नांनी थोडी जाग आलेल्या अण्णा भाऊंनी तात्काळ पेन आणि कागद हातात घेतला आणि हे अजरामर गीत लिहून काढलं. आणि स्वतःच सादर केलं. अण्णा भाऊंचा गळा गोड. त्याला सुरांची जबरदस्त अशी साथ आणि रोम रोम चेतवून टाकणारा त्यांचा आवेश त्या वेळेस प्रत्येकाच्या मनातून बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर आलेली दुःखछटा काढून टाकण्यात यशस्वी झाला होता.
आज अण्णाभाऊंची जयंती … या थोर शाहिरास.. मराठी भाषेस समृद्ध करणाऱ्या ग्रेट साहित्यसम्राटास मानाचा जय भीम…

जग बदल घालुनी घाव

जग बदल घालुनी घाव । सांगून गेले मला भीमराव ।।

गुलामगिरीच्या या चिखलात । रुतून बसला का ऐरावत ।
अंग झाडुनी निघ बाहेरी । घे बिनीवरती धाव ।।

धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।
मगराने जणू माणिक गिळिले । चोर जाहले साव ।।

ठरवून आम्हा हीन कलंकित । जन्मोजन्मी करुनी अंकित ।
जिणे लादुनी वर अवमानित । निर्मून हा भेदभाव ।।

एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चल बा पुढती ।
नव महाराष्ट्रा निर्मून जगती । करी प्रकट निज नाव ।।

गीत: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types)
वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.
मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.
 • कर्तरी प्रयोग
 • कर्मणी प्रयोग
 • भावे प्रयोग
1. कर्तरी प्रयोग (Active Voice) :
जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.
उदा .
 • तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी)
 • ती चित्र काढते. (कर्ता- लिंग)
 • ते चित्र काढतात. (कर्ता- वचन)
कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.
 • 1. सकर्मक कर्तरी प्रयोग
 • 2. अकर्मक कर्तरी प्रयोग
1. सकर्मक कर्तरी प्रयोग :
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
 • राम आंबा खातो.
 • सीता आंबा खाते. (लिंग)
 • ते आंबा खातात. (वचन)
2. अकर्मक कर्तरी प्रयोग :
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
 • राम पडला
 • सिता पडली (लिंग)
 • ते पडले (वचन)
2. कर्मणी प्रयोग (Passive Voice) :
क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात.
उदा .
 • राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)
 • राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग)
 • राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन)
कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.
 • 1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग
 • 2. नवीन कर्मणी प्रयोग
 • 3. समापन कर्मणी प्रयोग
 • 4. शक्य कर्मणी प्रयोग
 • 5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग
1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग :
हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरनातील वाक्य संस्कृत मधील कवीरूपी आढळतात.
उदा.
 • नळे इंद्रास असे बोलीले.
 • जो – जो किजो परमार्थ लाहो.
2. नवीन कर्मणी प्रयोग : 
ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात.
उदा .
 • रावण रामाकडून मारला गेला.
 • चोर पोलिसांकडून पकडला गेला.
3. समापण कर्मणी प्रयोग :
जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
 • त्याचा पेरु खाऊन झाला.
 • रामाची गोष्ट सांगून झाली.
4. शक्य कर्मणी प्रयोग :
जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोगअसे म्हणतात.
उदा .
 • आई कडून काम करविते.
 • बाबांकडून जिना चढवितो.
5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग :
कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा .
 • त्याने काम केले.
 • तिने पत्र लिहिले.
3. भावे प्रयोग :
जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वाचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा .
 • सुरेशने बैलाला पकडले.
 • सिमाने मुलांना मारले.
भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात.
 • 1. सकर्मक भावे प्रयोग
 • 2. अकर्मक भावे प्रयोग
 • 3. अकर्तुक भावे प्रयोग
1. सकर्मक भावे प्रयोग :
ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.
उदा.
 • शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.
 • रामाने रावणास मारले.
2. अकर्मक भावे प्रयोग :
ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात
उदा .
 • मुलांनी खेळावे.
 • विद्यार्थांनी जावे.
3. अकर्तुक भावे प्रयोग :
भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा .
 • आता उजाडले.
 • शांत बसावे.
 • आज सारखे उकडते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...