मंगळवार, ३० जुलै, २०१९

अनुस्वाराचे नियम
नियम १:
१.१ स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
उदाहरणार्थ: गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा.
१.२तत्सम शब्दातील (= संस्कृतातून मराठी जसेच्या तसे आलेले शब्द) अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण (म्हणजे पुढे येणाऱ्या व्यंजनांच्या वर्गातील पंचमवर्णाने) लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे.
उदाहरणार्थ: पंकज = पङ्कज, पंचानन = पञ्चानन, पंडित = पण्डित, अंतर्गत = अन्तर्गत, अंबुज = अंबुज
१.३ पर-सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू (अनुस्वार) देऊनच लिहावेत.
उदाहरणार्थ: 'दंगा, तांबे, खंत, संप' हे शब्द 'दङ्गा, ताम्बे, खन्त, सम्प' असे लिहू नयेत.
१.४ अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर-सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.
उदाहरणार्थ: वेदांत = वेदांमध्ये, वेदान्त = तत्त्वज्ञान; देहांत = शरीरांमध्ये, देहान्त = मृत्यू.
१.५ काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो किंवा कधीकधी तो उच्चार होतही नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये.
उदाहरणार्थ: 'हंसणे, धांवणे, जेंव्हा, कोठें, कधीं, कांहीं' हे शब्द 'हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही' असे लिहावेत.
नियम २ :
२.१ य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.
उदाहरणार्थ: सिंह, संयम, मांस, संहार. हे शब्द 'सिंव्ह, संय्यम, मांव्स, संव्हार' असे लिहू नयेत.
२.२ 'ज्ञ' पूर्वीचा नासोच्चारही शीर्षबिंदूने दाखवावा.
उदाहरणार्थ: संज्ञा.
नियम ३ :
३.१ नामांच्या आणि सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
उदाहरणार्थ: लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.
३.२ आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे.
उदाहरणार्थ: राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे.
नियम ४: वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे व न होणारे अनुस्वार देऊ नयेत.या नियमानुसार 'घरें, पांच, करणें, काळीं, नांव, कां, कांच, जों, घरीं' हे शब्द 'घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, काच, जो, घरी' असे लिहावेत.
नियम ५:
५.१ मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.
उदाहरणार्थ: कवि = कवी, बुद्धि = बुद्धी, गति = गती.
इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा.
उदाहरणार्थ: पाटी, जादू, पैलू.
५.२ 'परंतु, यथामति, तथापि' ही तत्सम अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत.
५.३ व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे ऱ्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत.
उदाहरणार्थ: हरी, मनुस्मृती, वर्गीकरण पद्धती, कुलगुरू.
५.४ 'आणि' व 'नि' ही मराठीतील दोन अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत.
५.५ सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम ऱ्हस्वान्त शब्द असेल (म्हणजेच मुळात संस्कृतात ऱ्हस्वान्त असेल) तर ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावे. दीर्घान्त असेल तर ते दीर्घान्तच लिहावे.
उदाहरणार्थ: बुद्धि - बुद्धिवैभव; लक्ष्मी - लक्ष्मीपुत्र.
५.६ 'विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन्' यांसारखे इन्-अन्त शब्द मराठीत येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या 'न्' चा लोप होतो व उपान्त्य ऱ्हस्व अक्षर दीर्घ होते. परंतु हे शब्द समासात पूर्वपदी आले असता (म्हणजेच समासातील पहिला शब्द असता) ते ऱ्हस्वान्तच लिहावेत.
उदाहरणार्थ: विद्यार्थिमंडळ, गुणिजन, प्राणिसंग्रह, स्वामिभक्ती, मंत्रिगण, पक्षिमित्र, योगिराज, शशिकांत.
नियम ६: मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यातील उपान्त्य इकार किंवा उकार ऱ्हस्व असतो.
उदाहरणार्थ: किडा, विळी, पिसू, मारुती, सुरू, हुतूतू.
तत्सम शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असले तरी त्यातील उपान्त्य इकार आणि उकार मूळ संस्कृतातल्याप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ ठेवावा.
उदाहरणार्थ: नीती, अतिथी, प्रीती, गुरू, शिशू, समिती.
नियम ७:
७.१ मराठी अ-कारान्त शब्दांतील इकार व उकार दीर्घ लिहावेत.
उदाहरणार्थ: गरीब, वकील, सून, फूल, बहीण, खीर, तूप.
तत्सम शब्दातील शेवटले अक्षर अ-कारान्त असले तरी त्यातील उपान्त्य इकार किंवा उकार मूळ संस्कृतातल्याप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ ठेवावा.
उदाहरणार्थ: गुण, गीत, विष, शरीर, रसिक, शूर, शून्य, कौतुक.
७.२ मराठी शब्दांतील जोडाक्षरापूर्वी इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व असतात.उदाहरणार्थ: कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक.मात्र तत्सम शब्दांतील जोडाक्षरांपूर्वीचे इकार व उकार ऱ्हस्व व दीर्घ अशा दोन्ही प्रकारांनी आढळतात. ते मूळ संस्कृतप्रमाणेच लिहावेत.
उदाहरणार्थ: मित्र, पुण्य, तीक्ष्ण, पूज्य, चरित्र, प्रतीक्षा.
मराठी व तत्सम शब्दांतील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरांवर अनुस्वार असल्यास ती अक्षरे सामान्यतः ऱ्हस्व असतात.
उदाहरणार्थ: चिंच, लिंबू, तुरुंग, उंच, लिंग, बिंदू, अरविंद, अरुंधती.
मराठी व तत्सम शब्दांतील विसर्गापूर्वीचे इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व असतात.
उदारणार्थ: छिः, थुः, दुःख, निःशस्त्र.
नियम ८:
८.१उपान्त्य दीर्घ ई-ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी ऱ्हस्व लिहावा.
उदाहरणार्थः गरीब - गरिबाला; चूल - चुलीला, चुलींना;
अपवाद - दीर्घोपान्त्य तत्सम शब्द.
उदाहरणार्थ: परीक्षा - परीक्षेला, परीक्षांना; दूत - दूताला, दूतांना.
८.२ मराठी शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्यरूपात उपान्त्य ई-ऊ यांच्या जागी 'अ' आल्याचे दिसते.
उदाहरणार्थ: बेरीज - बेरजेला; लाकूड - लाकडाला, लाकडांना.
मात्र पहिले अक्षर ऱ्हस्व असल्यास हा 'अ' आदेश विकल्पाने होतो.
उदाहरणार्थ: परीट - पर(रि)टास, पर(रि)टांना.
८.३ शब्दाचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर अशा शब्दाच्या उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'ई'च्या जागती 'य', आणि 'ऊ'च्या जागी 'व' असे आदेश होतात.
उदाहरणार्थ: फाईल - फायलीला, कायलींना; देऊळ -देवळाला, देवळांना.
८.४ पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी 'सा' असल्यास त्या जागी उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो. ('श्या' होत नाही.)
उदाहरणार्थ: घसा-घशाला, घशांना; ससा-सशाला, सशांना.
८.५ पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी 'जा' असल्यास उभयवचनी सामान्यरूपात तो तसाच राहतो (त्याचा 'ज्या' होत नाही).
उदाहरणार्थ: दरवाजा - दरवाजाला, दरवाजांना; मोजा -मोजाला, मोजांना.
८.६ तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर 'क' चे किंवा 'प'चे द्वित्व असेल तर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी हे द्वित्व नाहीसे होते.
उदाहरणार्थ: रक्कम - रकमेला, रकमांना; छप्पर - छपराला, छपरांना.
८.७ मधल्या 'म'पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी अनुस्वारविरहित होते.
उदाहरणार्थ: किंमत - किमतीला, किमतींना; गंमत -गमतींना, गमतींचा.
८.८ ऊ-कारान्त विशेषनामाचे हे सामान्यरूप होत नाही.
उदाहरणार्थ: गणू - गणूस, दिनू - दिनूस.
८.९ धातूला 'ऊ' आणि 'ऊन' प्रत्यय लावताना शेवटी 'व' असेल तरच 'वू' आणि 'वून' अशी रूप तयार होतात, पण धातूच्या शेवटी 'व' नसेल तर 'ऊ' आणि 'ऊन' अशी रूपे तयार होतात.
उदाहरणार्थ: धाव - धावू, धावून; ठेव - ठेवू, ठेवून; गा - गाऊ, गाऊन; धू- धुऊ, धुऊन; कर - करू, करून; हस - हसू, हसवून.
नियम ९ : पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना यातील 'पू' दीर्घ लिहावा.
उदाहरणार्थ: नागपूर, तारापूर, सोलापूर.
नियम १०: 'कोणता, एखादा' ही रूपे लिहावीत. 'कोणचा, एकादा' ही रूपे लिहू नयेत.
नियम ११: 'हळूहळू, चिरीमिरी' यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरे व चौथे ही अक्षरे दीर्घान्त लिहावीत. परंतु यांसारखे पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावेत.
उदाहरणार्थ: लुटुलुटु, दुडुदुडु, रुणुझुणु.
नियम १२: एकारान्त सामान्यरूप या-कारान्त करावे.
उदाहरणार्थ: करणे - करण्यासाठी; फडके - फडक्यांना.
अशा रूपांऐवजी 'करणेसाठी, फडकेंना' अशी एकारान्त सामान्यरूपे करू नयेत.
नियम १३: लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे.
उदाहरणार्थ: असं केलं; मी म्हटलं, त्यांनी सांगितलं.
अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत.
उदाहरणार्थ: असे केले; मी म्हटले; त्यांनी सांगितले.
नियम १४: 'क्वचित्, कदाचित्, अर्थात्, अकस्मात्, विद्वान्' यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द व्यंजनान्त (म्हणजेच पायमोडके) न लिहिता 'क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान' याप्रमाणे अ-कारान्त लिहावेत. कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे लेखन करावे. इंग्रजी शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अ-कारान्त अक्षर आता व्यंजनान्त (म्हणजेच पायमोडके) लिहू नये.
नियम १५: केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत. तदनंतरचे (केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह) मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरून छापावे.
नियम १६: 'राहणे, पाहणे, वाहणे' अशी रूपे वापरावीत. 'रहाणे, राहाणे; पहाणे, पाहाणे; वहाणे, वाहाणे' अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र 'राहा, पाहा, वाहा' यांबरोबरच 'रहा, पहा, वहा' अशी रूपे वापरण्यास हरकत नाही.
नियम १७: 'ही' हे अव्यय तसेच 'आदी' व 'इत्यादी' ही विशेषणे दीर्घान्तच लिहावीत.
नियम १८: पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्व-दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे.

सोमवार, २९ जुलै, २०१९

कवी बालकवींची औदुंबर कविता

औदुंबर रसग्रहण ॥
एखाद्या कुशल चित्रकाराने कुंचल्याच्या अवघ्या चार-सहा फटकाऱ्यांसरशी एखादे सुरेख चित्र निर्माण करावे तद्वत अवघ्या आठ ओळीत बालकवींनी एक सुंदर निसर्गचित्र शब्दांच्या कुंचल्याने या कवितेत रेखाटलेले आहे. हे चित्र रंगविताना कवीने विविध रंग वापरलेले आढळतील. निळासावळा झरा, शेतमळ्यांची हिरवी गरदी, पांढरी पायवाट व काळा डोह-मोजक्या रंगांनी शब्दांच्या चौकटीत बसविलेले हे एक साधे व जिवंत चित्र आहे. बालकवींची रंगदृष्टी येथे आपल्या प्रत्ययास येते.
पहिल्या चार ओळींत टेकड्या, गाव, शेतमळे व झरा यांनी व्यापलेले विहंगम दृश्य दिसते.
शेतमळ्यांच्या हिरव्या गरदीतून वाहणाऱ्या निळ्यासावळ्या झऱ्यावरून जी नजर मागे जाते ती चार घरांचे चिमुकले गाव ओलांडून पैल टेकडीपर्यंत पोचते. केवढा विस्तीर्ण पट कवीने पार्श्वभूमीसाठी घेतलेला आहे! पुढील दोन ओळीत त्या काळ्या डोहाच्या लाटांवर गोड काळिमा पसरून जळात पाय टाकून बसलेला औदुंबर दाखविला आहे.
केवळ निसर्गाचे एक सुरम्य चित्र रंगविण्याचा कवीचा हेतू दिसत नाही. पहिल्या चार ओळींतील आनंदी व खेळकर वृत्तीच्या पार्श्वभूमीवर नैराश्याची छटा पसरविणारे, काळ्या डोहाकडे सरळ चाललेल्या पांढऱ्या पायवाटेचे चित्र पाहून वाचकांची वृत्तीही पार बदलते. जगातील सुखदुःखांकडे विरक्त वृत्तीने पाहणाऱ्या स्थितप्रज्ञासारखा हा औदुंबर वाटतो. विरक्त वृत्तीच्या दत्त या देवतेशी औदुंबराचा निकट संबंध असल्यामुळे या वृक्षाची येथे केलेली निवड औचित्यपूर्ण वाटते.
`ऐल तटावर पैल तटावर, आडवीतिडवी, झाकळुनी जळ गोड काळिमा, जळात बसला असला औदुंबर' या गोड शब्दांत सुंदर अनुप्रास साधला आहे. चिमुकले गाव, निळासावळा झरा, दाट हिरवी गरदी, गोड काळिमा, आडवीतिडवी पायवाट, अशी अर्थवाही व समर्पक विशेषणे वापरून मूळचे चित्र अधिक स्पष्ट केले आहे. औदुंबराला मनुष्य कल्पून येथे `चेतनगुणोक्ती' हा अलंकार साधला आहे. शब्दमाधुर्य व पदलालित्य यांनी ओथंबलेली ही एक प्रासादिक कविता आहे.

औदुंबर

ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून.
चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे.
झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर

कवी: बालकवी. (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)

रविवार, २८ जुलै, २०१९

कवी माधव जुलीयन- आईची आठवण


डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ या दिवशी बडोदा येथे झाला. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर  १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी असून, इंग्रजी कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी “जूलियन” असे टोपणनाव धारण केले. ( माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे. याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे वाव उचलले असेही सांगितले जाते. )
 शिक्षणानंतर १९१८ ते  १९२४ या कालखंडात ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी १९२५ ते  १९३९ या काळात अध्यापन केले.
मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य देखील होते. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय व बहुमान माधवराव पटवर्धनांना जातो. माधव ज्युलियनांनी “दित्जू”, “मा.जू.” आणि “एम्‌.जूलियन” या नावांनीही लेखन केले असून, पैकी काही लिखाण इंग्रजीतही आहे. कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन त्यांनी केले आहे.
कवितांच्या व्यतिरिक्त पटवर्धनांनी भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणार्‍या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.
त्यांच्या प्रकाशित साहित्या मध्ये स्फुट गझला, खंडकाव्य दीर्घकाव्य, काव्यसंग्रह, अनुवादितलेख, संशोधनात्मक व भाषांतरीत वाङ्मय प्रकारांचा समावेश आहे
“कशासाठी पोटासाठी”, “जीव तुला लोभला माझ्यावरी”, “प्रेम कोणीही करीना”, “प्रेमस्वरूप आई”, “मराठी असे आमुची मायबोली” या कविता खुपच प्रसिध्द आहेत.
१९३३ साली नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे जूलियन अध्यक्ष होते, तर १९३४ रोजी बडोदे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष तर १९३६ मध्ये जळगाव येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनाच अध्यक्ष पद माधव जूलियन यांनी भुषवलं.
“छंदोरचना” साठी मुंबई विद्यापीठाकडून डी. लिट. तर मराठी साहित्यातील योगदानाबद्दल भारतातली पहिली डी.लिट. प्रदान करण्यात आली होती. २९ नोव्हेंबर १९३९ रोजी माधव जूलियन यांचं निधन झाले.
                                                                       आईची आठवण


प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

तू माय, लेकरु मी; तू गाय, वासरु मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करु मी ?

गेली दुरी यशोदा टाकुनि येथ कान्हा,
अन्‌ राहीला कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे ;

नैश्ठूर्य त्या सतीचे तू दावीलेस माते ,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीश्य साधन्याते.

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.


चिती तुझी स्मरे ना काहीच रूपरेखा,
आई हवी महणूनी सोडी न जीव हेका.


विद्याधनप्रतिष्ठा  लाभे अता मला ही,
आईविणे परी मी हा पोरकाच राही.

सारे मिळेपरं तू आई पुन्हा न भेटे ,
तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे .

आई तुझया वियोगे ब्रह्मांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे .


किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोती,
अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती !

ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहुनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही

वाटे इथूनि जावे , तूझ्यापुढे निजावे
नेती तुझ्या हसावे , चिती तुझ्या ठसावे !
वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके ,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके?

घे जन्म तू फिरुनी , येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !

आईची महती सांगणारी ही कविता आहे प्रसिद्ध कवी माधव ज्यूलियन यांची. आईची गाथा आपल्या कवितेतून अनेकांनी गायली आहे, प्रत्येक कवीने आपल्या प्रतिभाशक्तीचा वापर करून आपले भाव व्यक्त केले आहेत. 'आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी' ही कवी यशवंतांची कविता असो वा 'आई म्हणजे काय असते' ही फ.मु.शिंदे यांची कविता असो किंवा 'ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होता..' ही कवी ग्रेस यांची कविता असो, 'आई'ची थोरवी शब्दबद्ध असलेल्या सकळ कविता सर्व वयाच्या, सर्व वर्गाच्या अन सर्व प्रांतातील लोकांना या कविता भावल्या. आजही या कवितांचा वाचकवर्ग या कवितांना आठवून हळवा होतो. आपल्या मनातील भावनाच कवी मांडतात अशी यामागची भावना रसिक वाचकांमध्ये असते. माधव ज्युलियन यांच्या या कवितेस आता पाचेक दशके उलटून गेलीत पण ही कविता आजही अनेकांना तोंडपाठ आहे ! यातील आशय अन शब्दांची निवड एकमेकाशी इतके एकरूप झाले की ही कविता माधवरावांची ओळख बनून गेली.

'बालपण देगा देवा' असं संतांपासून सामान्यांपर्यंत सर्वांना वाटत असते, त्यातील एक सहज स्वाभाविक कारण आईच्या प्रेमाच्या ओढीत दडलेले आहे. आई शैशवापासून ते वृद्धत्वापर्यंत सर्वांनाच हवीहवीशी असते. मात्र एक वेळ अशी येते की तिच्यापासून आपण दुरावतो. कारण काहीही असो, आपले घरदार सोडून कधी बाहेर जावे लागले तर सर्वात आधी आठवण येते आईचीच ! 'आईची आठवण झाली नाही' असं सांगणारा माणूस कधी कुणी पाहिला नाही. या कवितेत माधवरावांनी आईपासून विरक्त झालेल्या एका मुलाच्या मनातले आर्त भाव व्यक्त केले आहेत. जगातील कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील प्रेमाचे प्रथम स्वरूप आईचेच असते, म्हणून ते प्रेमस्वरूप आई या शब्दाने कवितेची सुरुवात करतात. मायेचा, वात्सल्याचा जगातला सर्वात मोठा सागर हा आईच्या रूपाने प्रत्येकास जन्मदत्त भेटीत प्राप्त होतो. म्हणून ते पुढे म्हणतात, वात्सल्यसिंधू आई !   


आई जर सोबतीस असेल तर कधीच आबाळ वा परवड होत नाही, मात्र तीच आई आपल्यासवे नसेल तर

जगातली सर्व सुखे असूनही तिची उणीव भासतेच. अशा 'आईस कोणत्या समरप्रसंगी आठवावे ?'असा प्रश्न कुणलाच पडत नाही कारण आई जेंव्हा नसते तेंव्हा साधीसोपी अडचण देखील यक्षप्रश्न बनून समोर उभी राहते. म्हणून माधवराव लिहितात की, "बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?". कारण आई सोबत असली की कुठला प्रश्न उरत नाही अन आई जेंव्हा नसते तेंव्हा कशाचेच उत्तर हाती लागत नाही !
अशा आईची अनेक लक्षावधी रूपे आपल्या प्रत्येकाच्या मनात असतात, अगदी पाळण्यात घातल्यापासून ते घराबाहेर पडताना निरोपासाठी डोळ्यात आलेले पाणी लपवत हात हलवणारी आई असो वा पाठीवर थरथरता हात ठेवून आभाळभर आशीर्वाद देणारी आई असो वा आपल्या आजारपणात आपल्या बिछान्यात अहोरात्र बसून राहणारी आई असो वा आपल्या परीक्षा सुरु असताना आपल्याबरोबर भल्या पहाटे उठून जागी राहणारी आई असो किंवा घरकाम करताना व देवघरातल्या देव्हारयात फुले वाहताना एकाच तन्मयतेने रमणारी आई असो किंवा स्वतः उपाशी राहून आपल्या पिलांना सुखाचे घास भरवणारी आई असो वा माहेरचे उंबरठे टाळून आयुष्यभर मुलांच्या कल्याणासाठी सासरी राहून आपला चंदनदेह झिझवणारी आई अशा अनेक प्रतिमा डोळ्यापुढे येतात. म्हणून कवी म्हणतात की आईची नेमकी कोणती एक विशिष्ठ प्रतिमा मनःचक्षुपुढे येत नाही. अन त्यामुळेच की काय आई हवी हा हेका मन जीवनाच्या अंतापर्यंत कोणीच सोडत नाही. कारण आईच्या मायेची शिदोरीच अशी असते की ती उरतही नाही अन पुरतही नाही.

अशा भावविभोर परिस्थितीत जर अन्य कुणा मातेला तिच्या मुलांवर माया प्रेम करताना पाहिले तर आईच्या आठवणीनी डोळ्यात अश्रू दाटून येणं साहजिक आहे. अशा वेळेस मनात विचार येतात की आपण इथून तडक निघून जावं अन थेट आईच्या कुशीत डोकं टेकवून तिचा हात आपल्या मस्तकी धरावा. कारण आईच्या कुशीत जे सुख आहे ते जगाच्या पाठीवर कधी कुणी देऊ शकणार नाही अन त्याची सर अन्य कुणाला कधी येणार नाही. कितीही पोरका माणूस देखील अन्य कुणाच्या आईच्या कुशीत शिरला तरी त्याला तिथं जी माया प्रेम मिळते ती अवर्णनीय असते. कारण आपण आईच्या कुशीत असताना ती प्रसन्नहास्यवदनाने आपल्याकडे डोळे भरून पाहत असते अन आपण तिला चित्ती साठवत जातो. हे स्वर्गीय सुख घेण्यासाठी आईच्या कुशीतच मस्तक टेकवावे लागते.


मन जेंव्हा अधिक अस्थिर होते, व्यवहारी जगातील तिमिर तांडवात आपले वारू भरकटते तेंव्हा आपण अधीर होतो, बेचैन होतो, सैरभैर होऊन जातो. अशा प्रसंगी आईच्या छातीवर अल्वारपणे माथा टेकला की तिच्या हृदयातील शांत स्पंदनांचा जणू ती झुला झुलवते अन त्यावर आपण नकळत हिंदोळे घेतो. मग मनातले कुंद आभाळ तिथं निवळते. अशा आईची सर कुणाला येऊ शकत नाही, मनात तिच्या सहवासाची इच्छा अधुरी राहते, मन भरत नाही. तेंव्हा माधवराव म्हणतात की, :"आई तू पुन्हा जन्म घे अन मीही पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घेईन. (तेंव्हा कुठे तुझ्या प्रेमाची तहान कदाचित पूर्ण होऊ शकेल).

माधव ज्यूलियन कवितेच्या शेवटी देवालाच विनवणी करतात की, 'आपल्या जीवनात ही एकच अपेक्षा मनी राहिली आहे अन मनातली ही आस खरी ठरवण्याचे काम आता देवाने करावे !"

अत्यंत साध्या सोप्या तरल शब्दांत प्रत्येक पंक्तीगणिक कवी माधव ज्युलियन आईच्या प्रेमाची महती सांगताना तिच्या विरहावस्थेत येणारे भाव कथन करतात. अन वाचणारा त्यात आपल्या जीवनातील क्षण शोधू लागतो, आपल्या आईला आठवू लागतो. आपल्या आईची मूर्ती आपल्या डोळ्यापुढे तरळत राहते अन आपल्या नकळत आपले डोळे ओले होतात. हे या कवितेचे सर्वोच्च यश म्हणावे लागेल. साहित्यिक परीमाणातील यशापयशाच्या मापददंडापेक्षा रसिक वाचकांच्या पसंतीस उतरून साहित्यिक मुल्ये जपण्याचे काम या कवितेने मोठ्या सहजतेने साध्य केले आहे. 


‘प्रेमस्वरूप आई’ या कवितेने अजरामर झालेले, मराठी कवितेच्या प्रसारासाठी स्थापन झालेल्या ‘रविकिरण’ मंडळातील लोकप्रिय कवी, उर्दू-फारसीचे अभ्यासक आणि गझल या काव्यप्रकाराची मराठी वाङ्मयामध्ये समर्थपणे भर घालणारे ज्येष्ठ कवी माधव ज्यूलियन उर्फ साहित्यिक माधवराव पटवर्धन हे मराठी साहित्यातील पहिल्या डी. लिट. पदवीचे मानकरी होते. मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी प्रा. माधव त्रिंबक पटवर्धन यांना ‘छंदोरचना’ या ग्रंथाबद्दल डी. लिट. पदवी देण्याचा निर्णय घेतला. ग्रंथाला डॉक्टरेट देण्याची ही मराठीतील पहिली घटना होती. त्याबरोबरच मराठी वाङ्मयाला हा बहुमान मिळवून देणारे माधव ज्यूलियन हे पहिलेच साहित्यिक ठरले आहेत. विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात माधव ज्यूलियन यांना डी. लिट. प्रदान करण्यात आली. या बहुमानानंतर अवघ्या काही महिन्यांतच म्हणजेच २९ नोव्हेंबर १९३९ रोजी माधव ज्यूलियन यांचे निधन झाले. पुढे महाराष्ट्र साहित्य परिषदेने संस्थेच्या सभागृहाचे माधवराव पटवर्धन सभागृह असे नामकरण करून माधव ज्यूलियन यांच्या वाङ्मयीन कार्याची स्मृती जतन केली.


माधवरावांची ओळख श्रेष्ठ मराठी कवी, कोशकार, छंद:शास्त्राचे व्यासंगी,  साहित्य विमर्शक आणि मराठी 

भाषा शुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कृतें, प्रचारक अशी बहुआयामी आहे.  काव्य रचनेसाठी त्यांनी घेतलेल्या ‘माधव जूलियन्’ ह्या टोपण नावातील ‘जूलियन्’ हे नाव, सुप्रसिद्ध इंग्रज कादंबरीकर्त्री मारी कोरले हिच्या गॉड्स गुडमॅन ह्या  कादंबरीतील ‘जूलियन् ॲडर्ली’ ह्या  उत्कट मनोवृत्तीच्या, सौंदर्यपूजक आणि स्वच्छंद कवीच्या व्यक्तिरेखे वरून त्यांनी घेतले आणि आपल्या ‘माधव’ या नावाला जोडले. माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले असा लोकोपवादही प्रसिद्ध आहे. माधवराव पटवर्धन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी बडोदा येथे  त्यांच्या आजोळी झाला. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय व बहुमान माधवराव पटवर्धनांना जातो. माधव ज्युलियनांनी "दित्जू", "मा.जू." आणि "एम्‌.जूलियन" या नावांनीही लेखन केले असून, पैकी काही लिखाण इंग्रजीतही आहे. कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन त्यांनी केले आहे. 'प्रेम कोणीही करेना', 'मराठी असे आमुची मायबोली', 'कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी', 'अनाम वीराची समाधी', 'शिवप्रताप', 'जीव तुझा लोभला माझ्यावरी रे शोभना' या त्यांच्या अन्य काहीलोकप्रिय कविता होत.

पुणे जिल्ह्यातील आवळस या गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक इंग्रजी शिक्षण त्यांनी बडोदे, अहमदाबाद आणि मुंबई येथे पूर्ण केले (१९०९). बडोदे कॉलेजातून १९१६ मध्ये बी. ए. झाल्यानंतर बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई हायस्कूल मध्ये वर्षभर त्यानी अध्यापन केले. १९१८ मध्ये मुंबईच्या एल्‌फिन्स्टन महाविद्यालयातून फार्सी आणि इंग्रजी हे विषय घेऊन ते  एम्. ए. झाले. जून १९१८ ते ऑक्टोबर १९२५ ह्या  कालखंडात पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि ‘फर्ग्युसन महाविदयालय  ह्या  शिक्षण संस्थांतून त्यांनी अध्यापन केले. न्यू इंग्लिश स्कूलचे ते काही काळ उपप्रमुखही होते. १९१९ मध्ये ह्या  संस्थेचेते आजीव सदस्यही झाले. १९२१ मध्ये कवी श्री. बा. रानडे ह्यांच्याशी यांचा निकटचा परिचय झाला. श्री. बा. रानडे, गिरीश, यशवंत इ. कवींबरोबर, माधवरावही रविकिरण मंडळ ह्या कवि मंडळाचे संस्थापक सदस्य होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी तीव्र मतभेद झाल्या मुळे त्या संस्थेचा त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चा काही काळ मनस्ताप आणि खडतर परिस्थिती ह्यांना तोंड देत त्यांनी काढला; अनिकेत, व्यवसायहीन अवस्थेतही त्यांना राहावे लागले . पुढे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये काही काळ शिक्षक म्हणून राहिल्यानंतर, १९२८ मध्ये कोल्हापूरच्या राजाराम महाविदयालयात फासींचे प्राध्यापक म्हणून त्यांना नेमणूक मिळाली. त्याच वर्षी त्यांचा विवाहही झाला.


माधवरावांच्या काव्य लेखनाला पूर्ववयात त्यांच्या बडोदे येथील वास्तव्यातच आरंभ झाला. बडोदे येथील

त्यांच्या पूर्व वयातील वास्तव्यात काव्य प्रेमी मित्रांचा,  तसेच कवी चंद्रशेखरांचा सहवास त्यांना लाभला. कविमन हे कसे रसिक आणि संस्कारक्षम असते, ह्याचा अनुभव चंद्रशेखरांच्या सहवासात त्यांना मिळाला. निर्दोष व अर्थानुकूल काव्य रचनेचे भान, माधवरावांना चंद्रशेखरांकडून मिळाले. पुण्यास आल्यानंतर त्यांच्या काव्यलेखना लागती आली. रविकिरण मंडळाच्या किरण (१९२३), मधु-माधव (१९२४) आदी सामूहिक प्रकाशनांतून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या. ख्यातनाम फार्सी कवी उमर खय्याम ह्याच्या रुबायांचा माधवरावांनी केलेला मराठी अनुवाद १९२९ मध्ये प्रसिद्ध झाला (उमर खय्यामकृत रुबाया ). उमर खय्यामच्या रुबाया त्यांनी तीन वेळा अनुवादिल्या. उमर खय्यामकृत रुबाया त्यांनी मूळ फार्सी रुबायांवरुनच अनुवादिल्या (एकूण५२४). त्यानंतर एडवर्ड फिट्सलेरल्डने उमरखय्यामच्या रुबायांचे केलेले इंग्रजी रुपांतर 'द्राक्षकन्या' ह्या  नावाने त्यांनी अनुवादिले.‘मधुलहरी’ हे रुबायांचे, त्यांनी केलेले तिसरे भाषांतर. रुबायांच्या फिट्सजेहल्डकृत भाषांतराच्या चौथ्या आवृत्ती वरून हे भाषांतर माधवरावांनी केले होते. 'विरहतरंग' आणि 'सुधारक' ही त्यांची सामाजिक खंडकाव्ये त्यांनी रुबायाच्या केलेल्या पहिल्या अनुवादापूर्वी च प्रकाशित झालेली होती. 'नकुलालंकार' हे त्यांनी लिहिलेले आणखी एक खंडकाव्य. त्यांनी लिहिलेल्या गझल त्यांच्या 'गज्जलांजली'तून  आणि सुनीते 'तुटलेलेदुवे' (१९३८) ह्या  त्यांच्या संग्रहातून संगृहीतआहेत. 'तुटलेले दुवे' ह्या  संग्रहातील सुनीतांतून एक कथासूत्र गुंफण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. 'स्वप्नरंजन'  हा त्यांच्या स्फुट कवितांचा संग्रह. उपर्युक्त ‘मधुलहरी’ व माधरावांच्या अन्य काही कवितामधुलहरी व इतर कविता ह्या  नावाने १९४० मध्ये पुस्तक रूपाने प्रकाशित झाल्या.

माधवराव हे मूलतः  कवी होते. काव्य हाच त्यांच्या समग्रवाङ्‍मय निर्मितीचा केंद्र बिंदू होता; तसेच प्रयोगशीलता हा त्यांच्या काव्यात्म व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा घटक होता. काव्याच्या संदर्भात त्यांनी अनेक प्रयोग केले. प्रयोगशीलते च्या दृष्टीने केशवसुत आणि मर्ढेकर ह्या  दोन युगप्रवर्तक कवींच्या मधील एकमेव दुवा म्हणून माधवरावांचे नाव गौरवाने घेतले जाते. केशवसुती काव्य कल्पनेचे विस्तरण करून मराठी काव्य कल्पने वर एक नवे अंतर्बाह्य संस्करण करण्याचे श्रेय ही त्यांना दिले जाते. त्यांच्या काही कवितांतून मर्ढेकर प्रतिमा सृष्टीची चाहूल लागते. गझल हा काव्य प्रकार मराठीत रुजवण्याचे पहिले श्रेयही त्यांचेच. स्वातंत्र, प्रेम आणि शांती ही मूल्ये त्यांनी आयुष्यभर जोपासली आणि त्यांच्या काव्यातही त्यांचे प्रत्यंतर येते. प्रीती हा त्यांच्या कवितेचा महत्त्वाचा विषय असून प्रेम भावनेच्या अनेक तरल छटा तीत व्यक्त झाल्या आहेत. फार्सी प्रेमकाव्याचा प्रभावही तीवर आहे.


काव्य निर्मिती प्रमाणेच माधवरावांनी काव्य समीक्षा आणि काव्य विचार ही केला. आधुनिक मराठी कवी आणि कविताह्यांच्या संदर्भात त्यांनी आपले समीक्षात्मक लेखन मुख्यतः केले; तिच्यातील न्यूनाधिक्य त्यांच्या दृष्टिकोणातून दाखवून दिले. आधुनिक मराठी कविता बरीचशी परपुष्ट आणि अनुकरण शील आहे, असे त्यांचे मत होते. आधुनिक मराठी कवितेवर त्यांनी इंग्रजीतूनही लेखन केले. चिकित्सकपणा आणि रसग्राही वृत्ती ह्यांचा समतोल समीक्षकाने सांभाळला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी ‘काव्यचिकित्सा’ ही लेखमालाही लिहिली. रसव्यवस्था आणि वाङ्‍मयानंद मीमांसा ह्या विषयांवरही त्यांनी लेखन केले. काव्यविहार व काव्यचिकित्सा हे त्यांचे कविकाव्य विषयक लेखसंग्रह आहेत.


माधवरावांचा फार्सी–मराठीकोश १९२५ मध्ये प्रसिद्ध झाला. तो करताना तौलनिक आणि ऐतिहासिक दृष्टीचा अवलंब त्यांनी केला होता. त्यांची परिश्रम शीलता, सावधानता व सूक्ष्म अभ्यासह्यांचा प्रत्यय ह्या कोशातून येतो. ऐतिहासिक कागद पत्रांच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचे साधन ह्या कोशामुळे उपलब्ध झाले. त्यानंतर दोनच वर्षांनी पद्यरचना शास्त्रावरील छंदोरचना हा त्याचा ग्रंथ प्रसिद्ध झाला . छंद:प्रकार कसे परिणत होत आले, ह्याचे विवेचन करावे आणि छंद:शास्त्राची पुनर्घटना करावी अशा हेतूने हा ग्रंथ त्यांनी लिहिला. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय, हा सिद्धांत त्यांनी ह्या ग्रंथात मांडला. तसेच पद्यरचनाही वृत्तजाति छंद:स्वरूप अशी त्रिविध आहे, हे त्यांनी संशोधन पूर्वक दाखवून दिले. ह्या ग्रंथाची दुसरी परिवर्धित आवृत्ती (१९३७) माधवरावांनी डी. लिट्. ही पदवी मिळविण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडे सादर केली आणि १९३८ मध्ये ही पदवी त्यांना प्राप्त झाली. ह्या ग्रंथाने मराठी पद्यरचनाशास्त्राचा पाया घातला. छंदोरचनेचाच विषय घेऊन त्यांनी पद्यप्रकाश लिहिले. शिक्षक आणि विद्यार्थी ह्याच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.


कवितांच्या व्यतिरिक्त पटवर्धनांनी भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कार करणार्‍या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ सन १९२५ साली सुरु केली आणि त्यांची भूमिका ज्यांना पटली त्यांनीही ती चळवळ पुढे चालविली. या विषयावर अनेक वादविवाद झाले अणि हळुहळू भाषाशूद्धीचे तत्त्व लोकांना पटू लागले. भाषाशुद्धीचे सर्वच पुरस्कर्ते सावरकरांचे अनुयायी होते असे नाही. माधव ज्यूलियन हे पूर्वी भाषाशुद्धीचे विरोधक होते. पण आंधळा विरोध करण्याऐवजी या विषयाचा अभ्यास करुनच तिचे खंडन करावे या हेतूने त्यांनी भाषाशुद्धीचा अभ्यास केला. पण अभ्यास केल्यावर तेच भाषाशुद्धीचे

कट्टर समर्थक बनले ! ते इतके की पूर्वी ते आपल्या कवितांमध्ये फारसी शब्दांची खैरात करत असत. ह्या कविता त्यांनी पुन्हा शुद्ध स्वरूपात लिहून काढल्या ! भाषा शुद्धीचे प्रखर पुरस्कर्ते म्हणूनही ते प्रसिद्ध झाले . त्यासाठी पुढे त्यांनी महाराष्ट्राबाहेरही अनेक व्याख्याने दिली. लेखही लिहिले, भाषाशुद्धिविवेक (१९३८) ह्या ग्रंथात त्यांचे हे लेख संगृहीत आहेत. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. ‘परकीय शब्द न वापरणे, जुन्या मराठी शब्दांचा आठव ठेवून पुरस्कार करणे आणि नव्या नडी स्वावलंबनाने कष्टून भागवणे’ हा आपला संकल्प त्यानी भाषाशुद्धिविवेका च्या प्रस्तावनेत व्यक्त केला. त्यांच्या प्रकाशित साहित्या मध्ये स्फुट गझला, खंडकाव्य दीर्घकाव्य, काव्यसंग्रह, अनुवादितलेख, संशोधनात्मक व भाषांतरीत वाङ्मय प्रकारांचा समावेश आहे.

१९३३ साली नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे जूलियन अध्यक्ष होते, तर १९३४ रोजी बडोदे येथे झालेल्या साहित्य संमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष तर १९३६ मध्ये जळगाव येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद माधव जूलियन यांनी भुषवलं. आचार्य अत्र्यांचा "झेंडूची फुले" हा काव्यसंग्रह माधव ज्यूलियन व रविकिरण मंडळाचे इतर सदस्य ह्यांच्या हलक्या फुलक्या प्रेमकवितांचे विडंबन आहे. माधव ज्युलियन यांच्या सर्व कवितांचे संकलन व संपादन प्रा. रा.श्री. जोग, डॉ. द.न. गोखले, डॉ. सु.रा. चुनेकर यांनी 'समग्र माधव ज्यूलियन' या नावाने केले आहे. माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे  या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत.एका विशिष्ठ वयात माधवरावांच्या कवितांच्या प्रेमात पडलेला रसिक वाचक दुर्मिळच म्हणावा लागेल. तत्कालीन इतर दिग्गज कवींच्या साहित्यनिर्मितीहून वेगळे आणि नवे काव्यलेखन माधवरावांनी केले आणि मराठी कवितेच्या शब्दभांडारात मौलिक भर घातली.माधवरावांच्या आणखी काही कविता खाली दिल्या आहेत. त्यावरून त्यांची बहुविध विषयांना हात घालण्याची कसोटी दिसून येते. त्याच बरोबर त्यांना असलेला शब्दसौंदर्याचा सोस देखील नजरेत भरल्यावाचून राहत नाही. कधी कधी त्यांनी योजिलेले शब्द मोडतोड केलेले वाटतात तर कधी ते ओढून ताणून आणल्यासारखे वाटतात हे एकमेव दोषलक्षण सोडता त्यांच्या कविता नटमोगरी सारख्या वाटत राहतात असं म्हणायला हरकत नाही. 


मराठी असे आमुची मायबोली -

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे

जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी

मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी

मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्‍नधर्मानुयायी असूं

पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसूं

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी

जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली

हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं
.....................................................................................................................................................................

प्रेम कोणीही करेना -

प्रेम कोणीही करेना, का अशी फिर्याद खोटी ?
प्रेम दे अन्यास आधी, ठेविशी का स्वार्थ पोटी ?

आपल्या या चारुतेशी विस्मरूनी जा सुकेशी

भाळता कोणास देशी का न भक्तीची सचोटी ?

प्रेम का संगीन गुच्छी, प्रेम का रंगीन ओठी

प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग त्याची ही कसोटी.

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी

नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी

................................................................................................................................................................


कशासाठी पोटासाठी

खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी,

झोका उंच कोण काढी ?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी

उजेड तो दूर कसा

इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दो डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान

धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी ? पोटासाठी !

..................................................................................................................................................................


जीव तुझा लोभला माझ्यावरी रे शोभना

या ऋणाची विस्मृती ती ना कधी होवो मना !

का मुळी कोणी करावे प्रेम एखाद्यावरी ?

हे तुझे सौजन्य, पाणी आणिते या लोचना

शक्तिच्या राज्यांत सक्ती शोभते, शोभो तिथे !

प्रीतिला स्वातंत्र्य आधी पाहिजे, का होय ना ?

आपुल्यामध्ये पडू दे शैलराजी सह्य ही

भेटती दूरांतरे सप्रेम कृष्णा-कोयना !

चाललो एका दिशेने थोडके का हे असे ?

सागरी एकाच भेटू अंतकाली मोहना !

....................................................................................................................................................................


एकत्र गुंफून जीवित-धागे

प्रीतीचें नर्तन नाचलों मागें
एकटा उभा मी येथें
भोवती शोधीं प्रियेतें
न दिसे का कोठे सोडून गेली ?
लोपते का कधीं प्रीति उदेली !

दृष्टीस पडे हें भयाण मात्र

रेताड कोरडें उथळ पात्र !
जर न सखि संगती
तर मी कुंठीत गति
प्रीति या हृदयीं अथांग खोल
तुडुंब भरली परंतु फोल…… …

...............................................................................................................................................................


शिव प्रताप -

भवानी आमुची आऊ, शिवाजी आमुचा राणा,
मराठी आमुची बोली, गनीमी आमुचा बाणा.
मराठयांच्या प्रदेशाचा कणा हा सहयबन्धारा,
कशाचा पारतन्त्र्याला दर्‍याखोर्‍यांत या थारा

..................................................................................................................................................................


अनाम वीराची समाधी -

[जाति श्यामाराणी]
हें भव्य कुणाचें गे थडगें ?वाहती नृपहि सुम - मण्डल गे. ध्रु०
कुठले कुठले येऔनि लढले, वीर क्षेत्रीं अगणित पडले;
निवारशी जें शव सापडलें, औचलुनि धरिलें त्यास जगें. १
पोटासाठी कुणी शिपाऐ,वा नैराश्यें यमास बाही,
प्राण घे नि दे, भाण्डण नाही, सत्य काय पण कोण बघे ? २
असेल अन्य क्षेत्रीं लढला, परिस्थितीशी बिकट झगडला
न कळे जितला अथवा पडला, का चोरुनि कुणि तद्यश घे. ३
नाव कळेना त्या समराचें. नाव कळेना या वीराचें,
स्मारक पण हें राष्ट्रनराचे ! - झुके खरोखर जग अवघें ! ४
अहुनि औपेक्षा, कहर अवास्तव असेल झुरला प्रेमवचास्तव,
वाद्यसङघ गाजवी अता स्तव, औषध मेल्यावर नलगे. ५
अनामका, तव सरली धडपड नीज तळीं, जरि वर ही गडबड -
जगच्छान्तिची पोकळ बडबड ! खणखणती कोषीं खडगें ! ६

.................................................................................................................................................................


माधवरावांची साहित्यसंपदा - 

फारसी - मराठी शब्दकोष (इ.स. १९२५)
विरहतरङ्ग (इ.स. १९२६, खंडकाव्य)
नकुलालङ्कार (इ.स्. १९२९, दीर्घकाव्य)
स्वप्नरंजन (१९३४, काव्यसंग्रह)
गज्जलांजली(१९३३, स्फुट गझला)
तुटलेले दिवे (१९३८, एक 'सुनितांची माला'नामक दीर्घकाव्य आणि बाकीच्या स्फुट कविता)
उमरखय्यामच्या रुबाया (इ.स. १९२९, मूळ पर्शियन रुबायांचा पहिला अनुवाद)
द्राक्षकन्या (इ.स. १९३१, रुबायांचे दुसरे मराठी भाषांतर)
मधुलहरी (मृत्यूनंतर इ.स. १९४०, रुबायांचे सुधारित तिसरे भाषांतर)
सुधारक (१९२८, दीर्घकाव्य)
भाषाशुद्धि-विवेक (१९३८, लेख आणि भाषणे)
छंदोरचना (१९३७, संशोधनात्मक)
काव्यविहार (इ.स. १९४७, लेखसंग्रह)
काव्यचिकित्सा (निधनोत्तर इ.स. १९६४, लेखसंग्रह)मंगळवार, २३ जुलै, २०१९

निसर्गकन्या- बहिणाबाई चौधरी

काव्यसरस्वती बहिणाबाई चौधरी
३ डिसेंबर बहिणाबाईंची पुण्यतिथी . त्यानिमित्त..निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी या अशिक्षित स्त्रीचे काव्यातून प्रकट होणारे तत्त्वज्ञान शिक्षितांनाही लाजविणारे आहे. जात्यावर किंवा चार स्त्रिया एकत्र आल्यावर त्यांनी ओव्या, गाणी म्हणावीत ती सोपान चौधरी यांनी लिहून ठेवावीत, आचार्य अत्रे यांनी ती पाहावीत आणि संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडणारी कविता प्रकट व्हावी, हा एक अद्भुत योगायोग होय. खांदेशामध्ये जन्मलेल्या बहिणाबाई या खर्‍या अर्थाने निसर्गकन्या होत्या. त्यांच्या कवितेत शेतकरी, रानवनातील निसर्ग,कष्टकरी या सार्‍यांचे वर्णन आलेले आहे. अप्रतिम प्रतीके सहज व सोपी शब्दरचना कवितेतून अगदी आपलासा वाटावा असा गोडवा आणि शेवटी डोळय़ात झणझणीत अंजण घालणारा व आपलासा वाटणारा उपदेश या सर्व पार्श्‍वभूमीवर बहिणाबाई यांची कविता मनामध्ये कधी घर करते ते वाचकाला कळतच नाही.
माझी माय सरसोती, माले शिकवते बोली
लेक बहिणीच्या मनी,किती गुपित पेरली
सरस्वतीप्रमाणेच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या त्या भक्त होत्या. मातीचे ऋण मानण्याचे तत्त्वज्ञान त्या काळात त्यांच्याकडे होते. त्याचप्रमाणे सूर्य हा सृष्टीपोशिंदा आहे हेही त्यांच्या काव्यातून प्रकट होते.
अरे देवाचं दर्शन झालं आपसुक।
हिरीदात सूर्यबापा दाये अरूपाचा रूप॥
माहेरवासीन स्त्रियांच्या नशिबी येणारे सुख व सासरच्या व्यथा हा बहिणाबाईंच्या काव्यांचा आणखी एक पैलू होता. बहिणाबाईंच्या माहेरच्या वर्णनात त्या स्वत:चे माहेर शोधू लागतात. माहेरच्या वाटेने जाणारं मन माहेरपणासाठी कसं आसूसलेल असतं यांची जाणीव बहिणाबाईंच्या कविता वाचल्यावर होते.
माझ्या माहेराच्या वाटे, जरी आले पायी फोड
पाय चालले चालले, अशी माहेराची ओढ
पायाला फोड आले तरी पाय थांबत नाहीत ते माहेराच्या दिशेने चालत राहतात. अशा प्रकारचे वर्णन त्यांच्या अनेक कवितांमधून दिसते. घरोटा,संसार अशा कवितांतून त्यांनी सहजीवनाच्या यशाचे गमक सांगितले आहे.
देखा संसार संसार, दोन्ही जिवाचा सुधार
कधी नगद उधार, सुखा दु:खाचा बेपार
संसार म्हणजे काय? त्यात एकमेकांच्या जिवाचा व विचारांचा कसा आदर करावा ते बहिणाबाईपेक्षा योग्य रीतीने आणखी कोणी चांगले सांगू शकेल, असे वाटत नाही. संसार वेलीवर सुख-दु:खाचा सामना करताना पती निधन झाल्यावर खंबीरपणे संसाराचा गाडा रेटणार्‍या बहिणाबाई या खरोखर आदर्श असे प्रतीक होत्या. पती निधनानंतर त्यांच्यावर दु:खाचा जो डोंगर कोसळला. खरे तर त्यात एक अडाणी, निरक्षर, स्त्री पूर्णपणे नेस्तानाबूत झाली असते. मात्र, त्यांच्या कवितेतून जे संदर्भ समोर येतात ते फार विचार करायला लावणारे आहेत. लपे करमाची रेखा किंवा आता माझा मले जीव यासारख्या कवितांमधून त्यांच्या सोशिकपणाचे व खंबीरतेचे दर्शन घडते.
देव गेले देवाघरी, आणि ठेयीसनी ठेवा
डोयापुढे दोन लाल, रडू नको माझ्या जिवा
पती गेल्यावर दोन मुलांकडे पाहत रडायचे नाही. हे स्वत:ला बजावणारी स्त्री खरोखरच धिरोदात्त असली पाहिजे यात शंका नाही. त्याच बरोबर ज्योतिषासारख्या थोतांडाला विरोध करून
नको नको रे जोतिषा, नको हात माझा पाऊ
माझं दैव माले कये, माझ्या दारी नको येऊ!
असे ठणकावून सांगत आपल्या नशिबात जे आहे त्याला समोर जाण्याची त्यांची बेधडक वृत्ती वाखणण्याजोगी आहे,यात शंका नाही. कष्टकरी व शेतकरी जीवन जगणार्‍या बहिणाबाई त्यांच्या कवितेतून शेतीला बाजूला ठेवू शकल्या नाहीत. शेतीची साधने यात मोघडा, पांभर, कोयप, आऊत, तिफन, चाहूर, वखर, नांगर या सर्व अवजारांचे उपयोग त्यांनी अगदी सोप्या शब्दांत मांडून ठेवले आहेत. शेतकर्‍याला सर्वात जास्त वाट पाहावी लागते, तो पाऊस. तो आल्यावरचे अप्रतिम वर्णन बहिणाबाईंच्या आला पाऊस या कवितेत आढळते. पेरणी, कापणी, रगडणी (मळनी) उफणनी या प्रत्येक शेतकरी कर्माचे जिवंत वर्णन करणार्‍या स्वतंत्र कविता बहिणाबाईंनी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर
धरत्रीच्या कुशीमंदी, बियबियानं निजली
वर्‍हे पसरली नाही, जशी शाल पांघरली
अशा प्रकारे शेतातील बियाणे व त्यातून फुटणारे अंकुर त्याचे वर्णन बहिणाबाईंनी केले आहे. मोट हाकतो एक या कवितेतूनही त्यांनी कष्टकरी जीवन चित्रित केले आहे.
निसर्गातील सुगरण या पक्ष्याच्या खोप्याला अजरामर शब्दरूप देण्याचे काम ज्यावेळी बहिणाबाई करतात, त्याचवेळी गुढी उभारणी, आखजी (अक्षय तृतीया), पोया (पोळा) इत्यादी सणाची महती वर्णन करताना शेतकर्‍याने बैलाची पूजा का करावी तेही बहिणाबाई सांगतात.
वढे नागर वखर, नही कष्टाले गनती
पीक शेतकर्‍या हाती, त्याच्या जिवावर शेती
अशाप्रकारे दु:ख, सण, उत्सव, अध्यात्म धर्म इत्यादी सर्व बाबींवर आपल्या सहजसाध्य शब्दांनी भाष्य करीत बहिणाबाईची कविता समाजासाठी एखाद्या दीपस्तंभासारखी तेवत आहे. कवितेप्रमाणेच सहज बोलण्यातून वापरल्या जाणार्‍या काही सुंदर म्हणी हे सुद्घा बहिणाबाईंचे एक देणं आहे.
१) दया नाही, मया नाही डोयाले पाणी
गोगलगायच्या दुधाचं काढा वो लोणी,२) शिदोळाले आला राग, माले म्हणा फन्या नाग, ३) कयाचे गेली नवस, आज निघाली आवस, ४) आसु नाही ती सासु कशाची?आसरा नाही ती सासु कशाची?
५) माणसानं घडला पैसा, पैशासाठी जीव झाला कोयसा.
##########$$$$$$$$###################किरण शिवहर डोंगरदिवे
समतानगर, मेहकर, जि. बुलढाणा
मोबा ७५८८५६५५७६

धरतीच्या आरशात स्वर्ग पाहणाऱ्या बहिणाबाई

Published On: Aug 24 2018 1:33PM | Last Updated: Aug 24 2018 1:34PM


पुढारी ऑनलाईन : 
बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा) या  गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे.   त्‍यांचा जन्म ११ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते. वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. नथुजी आणि बहिणाबाईंना ओंकार, सोपान आणि काशी तीन अपत्ये  झाली.  

बहिणाबाईना लिहिता येत नव्‍हते. त्‍यामुळे त्‍यांनी केलेल्‍या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्‍यामुळे काळाच्‍या ओघात नष्‍ट झाल्‍या. त्‍या निरक्षर होत्‍या. तथापि त्‍यांच्‍यापाशी जिवंत काव्‍यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्‍यात त्‍यांचे सारे आयुष्‍य गेले. शेतकाम आणि घरकाम करत असताना त्‍या उत्‍स्‍फूर्तपणे ओव्‍या रचून गात असत. लिहिता  न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.
 बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू  पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, ' हे तर बावनकशी सोनं आहे ! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!', आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे यांच्‍या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली आणि ‘धरतीच्या आरशात स्वर्ग  पाहणाऱ्या या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची आज पुण्यतिथी त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या निवडक  कविता....
१. मन वढाय वढाय
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥
२.वाटच्या वाटसरा
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
नशीबीं दगड गोटे
काट्याकुट्याचा धनी
पायाले लागे ठेंचा
आलं डोयाले पानी
वरून तापे ऊन
आंग झालं रे लाही
चालला आढवानी
फोड आली रे पायीं
जानच पडीन रे
तुले लोकाच्या साठीं
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
दिवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट
उतार चढनीच्या
दोन्हि सुखादुखांत
रमव तुझा जीव
धीर धर मनांत
उघडूं नको आतां
तुझ्या झांकल्या मुठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
‘माझेज भाऊबंद
धाईसनी येतीन!’
नको धरूं रे आशा
धर एव्हढं ध्यान
तुझ्या पायानें जानं
तुझा तुलेच जीव
लावीन पार आतां
तुझी तुलेच नाव
मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
वार्‍याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
त्याच्यातं झुकीसनी
चुकुं नको रे वाट
दोन्ही बाजूनं दर्‍या
धर झुडूप हातीं
सोडूं नको रे धीर
येवो संकट किती
येऊं दे परचीती
काय तुझ्या ललाटीं
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
३. माझं इठ्ठल मंदीर
माझं इठ्ठल मंदीर
अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई
उभे इटेवर
टाय वाजे खनखन
मुरदुगाची धुन
तठे चाललं भजन
गह्यरी गह्यरीसन
टायकर्‍याचा जमाव
दंगला दंगला
तुकारामाचा अभंग
रंगला रंगला
तुम्ही करा रे भजन
ऐका रे कीर्तन
नका होऊं रे राकेस
सुद्ध ठेवा मन
आता सरला अभंग
चालली पावली
‘जे जे इठ्ठल रखूमाई
ईठाई माऊली’
शेतामंधी गये घाम
हाडं मोडीसनी
आतां घ्या रे हरीनाम
टाया पीटीसनी
उभा भक्तीचा हा झेंडा
हरीच्या नांवानं
हा झेंडा फडकावला
‘झेंडूला बोवानं’
आतां झाली परदक्षीना
भूईले वंदन
‘हेचि दान देगा देवा’
आवरलं भजन
आतां फिरली आरती
भजन गेलं सरी
‘बह्यना’ देवाचीया दारीं
उभी क्षनभरी
४.अरे संसार संसार
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तव्हां मियते भाकर ॥ १ ॥
अरे संसार संसार
खोटा कधी म्हनू नही
राउळाच्या कयसाले
लोटा कधी म्हनू नही ॥ २ ॥
अरे संसार संसार
नही रडनं कुढनं
येड्या गयांतला हार
म्हनू नको रे लोढनं ॥ ३ ॥
अरे संसार संसार
खीरा येलावरचा तोड
एका तोंडामधी कडू
बाकी अवघा लागे गोड ॥ ४ ॥
अरे संसार संसार
म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल
मधी गॊडंब्याचा ठेवा ॥ ५ ॥
देखा संसार संसार
शेंग वरतून काटे
अरे वरतून काटे
मधी चिकने सागरगोटे ॥ ६ ॥
ऐका संसार संसार
दोन जीवांचा विचार
देतो दु:खाले होकार
अन सुखाले नकार ॥ ७ ॥
देखा संसार संसार
दोन्ही जीवांचा सुधार
कधी नगद उधार
सुखादु:खाचा बेपार ॥ ८ ॥
अरे संसार संसार
असा मोठा जादूगर
माझ्या जीवाचा मैतर
त्याच्यावरती मदार ॥ ९ ॥
अरे संसार संसार
आधी देवाचा ईसार
माझ्या दैवाचा जोजार
मग जीवाचा आधार ॥ १० ॥
५. अरे खोप्यामधी खोपा
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं
WhatsAppFacebookTwittergoogle_plus

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...