मंगळवार, २३ जुलै, २०१९

निसर्गकन्या- बहिणाबाई चौधरी

काव्यसरस्वती बहिणाबाई चौधरी
३ डिसेंबर बहिणाबाईंची पुण्यतिथी . त्यानिमित्त..निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी या अशिक्षित स्त्रीचे काव्यातून प्रकट होणारे तत्त्वज्ञान शिक्षितांनाही लाजविणारे आहे. जात्यावर किंवा चार स्त्रिया एकत्र आल्यावर त्यांनी ओव्या, गाणी म्हणावीत ती सोपान चौधरी यांनी लिहून ठेवावीत, आचार्य अत्रे यांनी ती पाहावीत आणि संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडणारी कविता प्रकट व्हावी, हा एक अद्भुत योगायोग होय. खांदेशामध्ये जन्मलेल्या बहिणाबाई या खर्‍या अर्थाने निसर्गकन्या होत्या. त्यांच्या कवितेत शेतकरी, रानवनातील निसर्ग,कष्टकरी या सार्‍यांचे वर्णन आलेले आहे. अप्रतिम प्रतीके सहज व सोपी शब्दरचना कवितेतून अगदी आपलासा वाटावा असा गोडवा आणि शेवटी डोळय़ात झणझणीत अंजण घालणारा व आपलासा वाटणारा उपदेश या सर्व पार्श्‍वभूमीवर बहिणाबाई यांची कविता मनामध्ये कधी घर करते ते वाचकाला कळतच नाही.
माझी माय सरसोती, माले शिकवते बोली
लेक बहिणीच्या मनी,किती गुपित पेरली
सरस्वतीप्रमाणेच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या त्या भक्त होत्या. मातीचे ऋण मानण्याचे तत्त्वज्ञान त्या काळात त्यांच्याकडे होते. त्याचप्रमाणे सूर्य हा सृष्टीपोशिंदा आहे हेही त्यांच्या काव्यातून प्रकट होते.
अरे देवाचं दर्शन झालं आपसुक।
हिरीदात सूर्यबापा दाये अरूपाचा रूप॥
माहेरवासीन स्त्रियांच्या नशिबी येणारे सुख व सासरच्या व्यथा हा बहिणाबाईंच्या काव्यांचा आणखी एक पैलू होता. बहिणाबाईंच्या माहेरच्या वर्णनात त्या स्वत:चे माहेर शोधू लागतात. माहेरच्या वाटेने जाणारं मन माहेरपणासाठी कसं आसूसलेल असतं यांची जाणीव बहिणाबाईंच्या कविता वाचल्यावर होते.
माझ्या माहेराच्या वाटे, जरी आले पायी फोड
पाय चालले चालले, अशी माहेराची ओढ
पायाला फोड आले तरी पाय थांबत नाहीत ते माहेराच्या दिशेने चालत राहतात. अशा प्रकारचे वर्णन त्यांच्या अनेक कवितांमधून दिसते. घरोटा,संसार अशा कवितांतून त्यांनी सहजीवनाच्या यशाचे गमक सांगितले आहे.
देखा संसार संसार, दोन्ही जिवाचा सुधार
कधी नगद उधार, सुखा दु:खाचा बेपार
संसार म्हणजे काय? त्यात एकमेकांच्या जिवाचा व विचारांचा कसा आदर करावा ते बहिणाबाईपेक्षा योग्य रीतीने आणखी कोणी चांगले सांगू शकेल, असे वाटत नाही. संसार वेलीवर सुख-दु:खाचा सामना करताना पती निधन झाल्यावर खंबीरपणे संसाराचा गाडा रेटणार्‍या बहिणाबाई या खरोखर आदर्श असे प्रतीक होत्या. पती निधनानंतर त्यांच्यावर दु:खाचा जो डोंगर कोसळला. खरे तर त्यात एक अडाणी, निरक्षर, स्त्री पूर्णपणे नेस्तानाबूत झाली असते. मात्र, त्यांच्या कवितेतून जे संदर्भ समोर येतात ते फार विचार करायला लावणारे आहेत. लपे करमाची रेखा किंवा आता माझा मले जीव यासारख्या कवितांमधून त्यांच्या सोशिकपणाचे व खंबीरतेचे दर्शन घडते.
देव गेले देवाघरी, आणि ठेयीसनी ठेवा
डोयापुढे दोन लाल, रडू नको माझ्या जिवा
पती गेल्यावर दोन मुलांकडे पाहत रडायचे नाही. हे स्वत:ला बजावणारी स्त्री खरोखरच धिरोदात्त असली पाहिजे यात शंका नाही. त्याच बरोबर ज्योतिषासारख्या थोतांडाला विरोध करून
नको नको रे जोतिषा, नको हात माझा पाऊ
माझं दैव माले कये, माझ्या दारी नको येऊ!
असे ठणकावून सांगत आपल्या नशिबात जे आहे त्याला समोर जाण्याची त्यांची बेधडक वृत्ती वाखणण्याजोगी आहे,यात शंका नाही. कष्टकरी व शेतकरी जीवन जगणार्‍या बहिणाबाई त्यांच्या कवितेतून शेतीला बाजूला ठेवू शकल्या नाहीत. शेतीची साधने यात मोघडा, पांभर, कोयप, आऊत, तिफन, चाहूर, वखर, नांगर या सर्व अवजारांचे उपयोग त्यांनी अगदी सोप्या शब्दांत मांडून ठेवले आहेत. शेतकर्‍याला सर्वात जास्त वाट पाहावी लागते, तो पाऊस. तो आल्यावरचे अप्रतिम वर्णन बहिणाबाईंच्या आला पाऊस या कवितेत आढळते. पेरणी, कापणी, रगडणी (मळनी) उफणनी या प्रत्येक शेतकरी कर्माचे जिवंत वर्णन करणार्‍या स्वतंत्र कविता बहिणाबाईंनी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर
धरत्रीच्या कुशीमंदी, बियबियानं निजली
वर्‍हे पसरली नाही, जशी शाल पांघरली
अशा प्रकारे शेतातील बियाणे व त्यातून फुटणारे अंकुर त्याचे वर्णन बहिणाबाईंनी केले आहे. मोट हाकतो एक या कवितेतूनही त्यांनी कष्टकरी जीवन चित्रित केले आहे.
निसर्गातील सुगरण या पक्ष्याच्या खोप्याला अजरामर शब्दरूप देण्याचे काम ज्यावेळी बहिणाबाई करतात, त्याचवेळी गुढी उभारणी, आखजी (अक्षय तृतीया), पोया (पोळा) इत्यादी सणाची महती वर्णन करताना शेतकर्‍याने बैलाची पूजा का करावी तेही बहिणाबाई सांगतात.
वढे नागर वखर, नही कष्टाले गनती
पीक शेतकर्‍या हाती, त्याच्या जिवावर शेती
अशाप्रकारे दु:ख, सण, उत्सव, अध्यात्म धर्म इत्यादी सर्व बाबींवर आपल्या सहजसाध्य शब्दांनी भाष्य करीत बहिणाबाईची कविता समाजासाठी एखाद्या दीपस्तंभासारखी तेवत आहे. कवितेप्रमाणेच सहज बोलण्यातून वापरल्या जाणार्‍या काही सुंदर म्हणी हे सुद्घा बहिणाबाईंचे एक देणं आहे.
१) दया नाही, मया नाही डोयाले पाणी
गोगलगायच्या दुधाचं काढा वो लोणी,२) शिदोळाले आला राग, माले म्हणा फन्या नाग, ३) कयाचे गेली नवस, आज निघाली आवस, ४) आसु नाही ती सासु कशाची?आसरा नाही ती सासु कशाची?
५) माणसानं घडला पैसा, पैशासाठी जीव झाला कोयसा.
##########$$$$$$$$###################किरण शिवहर डोंगरदिवे
समतानगर, मेहकर, जि. बुलढाणा
मोबा ७५८८५६५५७६

धरतीच्या आरशात स्वर्ग पाहणाऱ्या बहिणाबाई

Published On: Aug 24 2018 1:33PM | Last Updated: Aug 24 2018 1:34PM


पुढारी ऑनलाईन : 
बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा) या  गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे.   त्‍यांचा जन्म ११ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते. वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. नथुजी आणि बहिणाबाईंना ओंकार, सोपान आणि काशी तीन अपत्ये  झाली.  

बहिणाबाईना लिहिता येत नव्‍हते. त्‍यामुळे त्‍यांनी केलेल्‍या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्‍यामुळे काळाच्‍या ओघात नष्‍ट झाल्‍या. त्‍या निरक्षर होत्‍या. तथापि त्‍यांच्‍यापाशी जिवंत काव्‍यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्‍यात त्‍यांचे सारे आयुष्‍य गेले. शेतकाम आणि घरकाम करत असताना त्‍या उत्‍स्‍फूर्तपणे ओव्‍या रचून गात असत. लिहिता  न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.
 बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू  पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, ' हे तर बावनकशी सोनं आहे ! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!', आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे यांच्‍या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली आणि ‘धरतीच्या आरशात स्वर्ग  पाहणाऱ्या या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची आज पुण्यतिथी त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या निवडक  कविता....
१. मन वढाय वढाय
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥
२.वाटच्या वाटसरा
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
नशीबीं दगड गोटे
काट्याकुट्याचा धनी
पायाले लागे ठेंचा
आलं डोयाले पानी
वरून तापे ऊन
आंग झालं रे लाही
चालला आढवानी
फोड आली रे पायीं
जानच पडीन रे
तुले लोकाच्या साठीं
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
दिवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट
उतार चढनीच्या
दोन्हि सुखादुखांत
रमव तुझा जीव
धीर धर मनांत
उघडूं नको आतां
तुझ्या झांकल्या मुठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
‘माझेज भाऊबंद
धाईसनी येतीन!’
नको धरूं रे आशा
धर एव्हढं ध्यान
तुझ्या पायानें जानं
तुझा तुलेच जीव
लावीन पार आतां
तुझी तुलेच नाव
मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
वार्‍याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
त्याच्यातं झुकीसनी
चुकुं नको रे वाट
दोन्ही बाजूनं दर्‍या
धर झुडूप हातीं
सोडूं नको रे धीर
येवो संकट किती
येऊं दे परचीती
काय तुझ्या ललाटीं
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
३. माझं इठ्ठल मंदीर
माझं इठ्ठल मंदीर
अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई
उभे इटेवर
टाय वाजे खनखन
मुरदुगाची धुन
तठे चाललं भजन
गह्यरी गह्यरीसन
टायकर्‍याचा जमाव
दंगला दंगला
तुकारामाचा अभंग
रंगला रंगला
तुम्ही करा रे भजन
ऐका रे कीर्तन
नका होऊं रे राकेस
सुद्ध ठेवा मन
आता सरला अभंग
चालली पावली
‘जे जे इठ्ठल रखूमाई
ईठाई माऊली’
शेतामंधी गये घाम
हाडं मोडीसनी
आतां घ्या रे हरीनाम
टाया पीटीसनी
उभा भक्तीचा हा झेंडा
हरीच्या नांवानं
हा झेंडा फडकावला
‘झेंडूला बोवानं’
आतां झाली परदक्षीना
भूईले वंदन
‘हेचि दान देगा देवा’
आवरलं भजन
आतां फिरली आरती
भजन गेलं सरी
‘बह्यना’ देवाचीया दारीं
उभी क्षनभरी
४.अरे संसार संसार
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तव्हां मियते भाकर ॥ १ ॥
अरे संसार संसार
खोटा कधी म्हनू नही
राउळाच्या कयसाले
लोटा कधी म्हनू नही ॥ २ ॥
अरे संसार संसार
नही रडनं कुढनं
येड्या गयांतला हार
म्हनू नको रे लोढनं ॥ ३ ॥
अरे संसार संसार
खीरा येलावरचा तोड
एका तोंडामधी कडू
बाकी अवघा लागे गोड ॥ ४ ॥
अरे संसार संसार
म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल
मधी गॊडंब्याचा ठेवा ॥ ५ ॥
देखा संसार संसार
शेंग वरतून काटे
अरे वरतून काटे
मधी चिकने सागरगोटे ॥ ६ ॥
ऐका संसार संसार
दोन जीवांचा विचार
देतो दु:खाले होकार
अन सुखाले नकार ॥ ७ ॥
देखा संसार संसार
दोन्ही जीवांचा सुधार
कधी नगद उधार
सुखादु:खाचा बेपार ॥ ८ ॥
अरे संसार संसार
असा मोठा जादूगर
माझ्या जीवाचा मैतर
त्याच्यावरती मदार ॥ ९ ॥
अरे संसार संसार
आधी देवाचा ईसार
माझ्या दैवाचा जोजार
मग जीवाचा आधार ॥ १० ॥
५. अरे खोप्यामधी खोपा
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं
WhatsAppFacebookTwittergoogle_plus

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...