बुधवार, १ जानेवारी, २०२०

जग बदल घालुनी घाव - अण्णाभाऊ साठे

       तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या  मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.


 अण्णाभाऊ साठे मानवतावादी लेखक होते. शोषणमुक्ती हा त्यांचा ध्यास होता. कष्टकरी, दलित, शोषित, पीडित यांचे शोषण संपविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. येत्या १ ऑगस्टपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने.

अनेक नामवंत साहित्यिकांच्या वाट्याला त्यांच्या हयातीत उपेक्षाच आली. जशी महात्मा जोतीराव फुले यांच्या वाङ्मयाची त्यांच्या काळात उपेक्षा झाली, तशीच उपेक्षा अण्णाभाऊ साठे यांचीही झाली. अण्णाभाऊंचे साहित्य रूपवादी, रंजनपर, परधार्जिणे आणि भडक आहे, ते साहित्यबाह्य प्रेरणेवर आधारलेले आहे अशी टीका झाली. मराठी 'कादंबरीचे शतक' लिहिणाऱ्या कुसुमावती देशपांडे यांनी तर कोण हे अण्णाभाऊ साठे? असा प्रश्न केला होता. होय अण्णाभाऊ सामाजिक बांधिलकी मानणारे, समाजपरिवर्तनाचे शस्त्र हाती घेऊन लेखन करणारे साहित्यिक होते. कम्युनिस्ट चळवळीशी त्यांचा जवळून संबंध होता. पण सर्वसामान्य कष्टकरी, दलित, उपेक्षित आणि धर्मव्यवस्थेने हक्क नाकारलेले स्त्री-पुरुष हे त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होते. समीक्षकांना त्यांचे साहित्य प्रचारकी, रंजनपर वाटले असेल, पण हजारो वाचकांनी त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची अक्षरश: पुन:पुन्हा पारायणे केली. त्यांच्या साहित्यातून प्रगट झालेली त्यांची सर्वसामान्य माणसांविषयीची आंतरिक तळमळ व त्यांच्या सुखदु:खाचे चित्रण करण्याची ओढ वाचकांच्या मनाला भुरळ घालत असेल. वाचनीयता हे तर त्यांच्या साहित्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होतेच, पण त्याचबरोबर मराठी मनाचा आणि महाराष्ट्रीय सांस्कृतिक विशेषांचा अत्यंत मनोज्ञ आविष्कार त्यांच्या कथा-कादंबऱ्यादी सर्वच लेखनातून समृद्ध स्वरूपात झालेला असल्याने, त्यांच्या साहित्याला वाचकांची अधिक पसंती असेल.

'मुंबई नगरी ग बडी बाका।
ताजी प्रतिक्रिया
लेख सुंदर आहे सुरेख आहे पण अण्णाभाऊंच्या साहित्यात अतिशयोक्ती आहे असे तुम्ही जे म्हटलात ते तुमचे मत मला पटले नाही त्यात काय अतिशयोक्ती आहे ते मला सांगावे मी तुमच्या संदेशाची वाट पा...+
????? ????


जशी रावणाची दुसरी लंका।।

वाजतो ग डंका - डंका चहूमूलकी।

राहयाला गुलाबाचे फूल की।।'

या शब्दांत पठ्ठे बापूराव मुंबई मायानगरीचे वर्णन करतात. तर याच मुंबई नगरीचे वर्णन करताना अण्णाभाऊ लिहितात -

'मुंबईत उंचावरी। मलबार हिल इंद्रपुरी।।

कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती।।

परळात राहणारे। रात दिवस राबणारे

मिळेल ते खाऊन घाम गाळती।।

पठ्ठे बापूरावांना मुंबई गर्भश्रीमंत दिसते, तर अण्णाभाऊंना तीच मुंबई विषम व्यवस्थेचे प्रतीक वाटते. अण्णाभाऊंच्या वेगळ्या जीवनदृष्टीचा येथे प्रत्यय येतो. 'ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तोलली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे' अशी त्यांची विज्ञाननिष्ठ भूमिका होती. 'जग बदल घालुनि घाव, असं सांगून गेले मला भीमराव' अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची निष्ठा होती. अण्णाभाऊंचे सारेच लेखन उपेक्षितांच्या बाजूचे आणि त्यांच्या अटीतटीच्या जगण्यातील संघर्षाचे व अनुभवविश्वाचे प्रखर वास्तव अधोरेखित करणारे आहे.

अत्यंत शौर्यवान, स्वामिनिष्ठ, प्रामाणिक, धैर्यशील, नीडर आणि कलंदर कसबी कलावंताच्या मांग जातीत १ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव जि. सांगली येथे अण्णाभाऊंचा जन्म झाला होता आणि १८ जुलै १९६९ रोजी मुंबईच्या चिरागनगरीच्या झोपडपट्टीत अत्यंत हलाखीच्या अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. शाळेची पायरीदेखील न चढलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी ३७ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, ११ पोवाडे, ३ नाटके, शेकडो गाणी, लावण्या, छकडी अशी विपुल साहित्यसंपदा निर्माण केली आहे; ही खरोखरी अचंबित करणारी गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्या लहान वयात वाटेगावच्या परिसरातील पाटील-कुलकर्ण्यांच्या बेमुर्वतखोर वागण्याचा, त्यांच्या अत्याचाराच्या आणि चांगुलपणाचाही अनुभव घेतला होता, त्यासंबंधीच्या अनेक अनुभवकथा तेथील जाणत्या लोकांकडून ऐकलेल्या होत्या. इंग्रजी अधिकाऱ्यांच्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात बेरड-मांग-रामोशांनी दिलेल्या लढ्याच्या कथा-गाथा त्यांच्या सतत कानावर पडत होत्या. त्यातल्या अनेक गोष्टी त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. वाटेगावच्या परिसरातील पाण्याने तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्या आणि नद्यांच्या काठांवरचा समृद्ध हिरवागार संपन्न निसर्ग त्यांनी डोळ्यांत साठवून ठेवला होता. ग्रामदेवतांच्या यात्रा-खेत्रातील उत्सवी वातावरणात त्यांचे बालपण गेले होते. जत्रेत अनेक वाद्ये वाजवण्यापासून दांडपट्ट्यासारखे मर्दानी खेळ त्यांनी सवंगड्यांसह खेळले होते. अवती-भोवतीच्या आयाबायांच्या तोंडची गाणी, ओव्या, गोष्टी-आख्यायिकांचा ठसा त्यांच्या कोवळ्या मनावर कोरला गेला होता. पातिव्रत्य धर्माचे पालन करणाऱ्या अनेक स्त्रिया त्यांच्या भोवताली वावरत होत्या. त्या निष्ठावान स्त्रियांचे राजरोस होणारे शोषण त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते आणि त्याविषयीचा संताप व चीड त्यांच्या मनात धुमसत असावी. पुढे मुंबईला गेल्यानंतर तेथील झोपडपट्टीतील उघडेवाघडे जगणे, त्यांच्या जगण्यातील भयाण वास्तव त्यांनी पाहिले. त्यांचा भूकेकंगालपणा आणि भुकेची आग शांत करण्यासाठी त्यांची होणारी ससेहोलपट, अवैध मार्गाचा अवलंब या साऱ्या गोष्टी त्यांनी जवळून अनुभवल्या आणि ते विदारक आणि अद्भुत वास्तव त्यांनी साहित्यातून मांडले. शिक्षणापेक्षा अनुभव हाच मोठा गुरू असतो या गोष्टीची अनुभूती त्यांचे साहित्य वाचताना येते.

अण्णाभाऊ साठे यांच्य लेखनात अद्भुतता, अतिशयोक्ती, अतार्किकता आहे, पण त्यात तेवढेच नाही; त्यातून जीवनातील विदारक वास्तवही प्रगट झाले आहे. लोककथेतील अद्भुतता, अतिशयोक्ती मानवी मनाला भुरळ घालते. पण त्यातून प्रगट झालेले जीवनातील तत्त्वज्ञान व वास्तवाचे दर्शन त्या मनाला अंतर्मुख करून विचार करायला लावते. रंजन करता करता व्यापक जीवनदर्शन घडविण्याचे सामर्थ्य लोककथेत असते. लोकपरंपरेतील मौखिक साहित्याचे वैशिष्ट्य अण्णाभाऊ साठे यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून कलात्मक रूप घेऊन आविष्कृत झालेले आहे. या संदर्भात त्यांची 'स्मशानातील सोनं' ही कथा लक्षात घेता येईल. गाव सोडून मुंबईला पोट भरण्यासाठी गेलेला भीमा दगडाच्या खाणीत काम करीत असतो. पण ती खाण अचानक बंद होते. उपाशी असलेला भीमा स्मशानातून-प्रेतातून सोने शोधण्याचे काम सुरू करतो आणि एका रात्री भीमा पुरलेले प्रेत उकरत असताना कोल्ही-लांडग्यांचा प्रेतावर हल्ला होतो. भीमा आणि त्या हिंस्र प्राण्यात झुंज सुरू होते, त्या झुंजीचे अद्भुत चित्रण अण्णाभाऊ करतात. त्या झटापटीत प्रेताच्या जबड्यात भीमाचा हात अडकून त्यांच्या हाताची बोटे तुटतात. आता बंद पडलेल्या खाणीचे काम सुरू होते, पण काम करणाऱ्या भीमाच्या हाताला बोटे नसतात. पोट जाळण्यासाठी भीमाने केलेल्या घनघोर लढाईचे वर्णन अण्णाभाऊंनी समर्थपणे केले आहे. भुकेच्या तीव्रतेचे भयानक दारिद्र्याचे वास्तव कथेत आहे. अशा प्रकारच्या अनेक कथांमध्ये अद्भुत आणि वास्तव एकाचवेळी अवतरते. हे अण्णाभाऊंनी मौखिक साहित्याच्या परिचयातून आत्मसात केले आहे.

अण्णाभाऊ साठे यांनी ज्या काळात लेखनाला सुरुवात केली, त्यावेळी वि. स. खांडेकर आणि ना. सी. फडके वाङ्मयविश्वाच्या यशशिखरावर आरूढ झालेले होते. ना. सी. फडके यांच्या लेखनाने प्रेमाची स्वप्नचित्रे रेखाटून तरुण-तरुणींची मने काबीज केली होती आणि वि. स. खांडेकरांनी देशप्रेमाच्या आणि ध्येयवादाच्या स्वप्नाळू दुनियेत तरुण पिढीला गुंतवून त्यांना आकर्षित केले होते.

अण्णाभाऊ साठे, या दोन्ही लेखकांनी उभा केलेला वाङ्मयीन माहोल बाजूला सारून स्वतःचा एक नवा रस्ता निर्माण करीत होते. 'मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही', अशी त्यांची लेखनामागील भूमिका होती. 'माझी जीवनावर फार निष्ठा असून मला माणसे फार आवडतात. त्यांची श्रमशक्ती फार महान आहे, त्यांच्या बळावरच हे जग चालतं. त्यांची झुंज आणि त्यांचं यश यावर माझा विश्वास आहे', असे त्यांचे मत होते. त्यामुळेच त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी तीच माणसे आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या चित्रणाविषयी डॉ. बाबुराव गुरव यांनी सविस्तर लिहिले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसवलेला सांगली, सातारा, कोल्हापूरचा परिसर, कृष्णा, कोयना, वारणा, वांग, वेरळा, पंचगंगा या नद्यांकाठचा समृद्ध निसर्ग, त्या प्रदेशातील ग्रामीण संस्कृती, ब्रिटिश काळातील जीवन, दाट जंगल झाडी, डोंगरवाटा, त्यांच्या आश्रयाने सुरू असणाऱ्या क्रांतिकारकांच्या चळवळी, गुंड-दरोडेखोरांच्या दंगली, गावातील भाऊबंदकी, दोन गावांमध्ये पिढ्यान् पिढ्या चालत आलेले वैर, त्यात भरडला जाणारा अस्पृश्य समाज, खून, मारामाऱ्या, तरण्याताठ्या देखण्या पोरीबाळींवर होणारे अत्याचार या साऱ्या गोष्टी अण्णाभाऊ आपल्या साहित्यात मांडत होते. सण-उत्सव, जत्राखेत्रा, बैलगाड्यांच्या शर्यती, कुस्त्यांचे फड, तमाशे, वाघ्या-मुरळींची जागरणे, त्यांचे धनदांडग्यांकडून होणारे शोषण, खेड्यापाड्यातील माणसांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, शेती, शेतकऱ्यांचे एकमेकांवरील प्रेम, सहकार्य, नातेसंबंधातील जिव्हाळा, श्रेष्ठकनिष्ठतेचा भाव, शेतीमध्ये होणारा बदल, पिठाच्या गिरण्या, विहिरीवरील इंजिन, हळूहळू कोसळणारा गावगाडा, बलुतेदाराची स्थितीगती, सावकारशाही, श्रीमंतीच्या जोरावर चालणारा इष्काचा बाजार, गरती स्त्रियांची घराण्याच्या प्रतिष्ठेपोटी होत असणारी घुसमट, देशाच्या स्वातंत्र्याची आच, स्त्रीचे शील, घराण्याचा बडेजावपणा, मोठे दगडी चौसोपी वाडे, महारवाडा, मांगवाडा, भटके-फिरस्ते अशा साऱ्या गोष्टींचे त्यांच्या बारीक-सारीक तपशिलांसह केलेले चित्रण अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात आले आहे. त्यामुळेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे आपल्या भूमीशी घट्ट नाते आहे. परिसराशी जोडलेले असणाऱ्या ह्या साहित्याला आपोआपच व्यापक वैश्विक आयाम प्राप्त झालेला दिसतो. भारतीय भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झालेच, पण धर्मजातीच्या, देशकालाच्या सीमा ओलांडून ते जर्मन, झेक, इंग्लिश, पोलिश, रशियन, स्लोव्हाक या परकीय भाषांमध्ये भाषांतरित झाले. ही अण्णाभाऊंच्या साहित्याचे विलोभनीय यश मानावे लागेल.

अण्णाभाऊ साठे मार्क्सवादी आहेत. त्यांच्या साहित्यातून आधीपासूनच समतावादी विचारांचा आविष्कार दिसत असला तरी मुंबईला गेल्यावर श्रीपाद अमृत डांगे यांच्या सान्निध्यात ते आले आणि त्यांची मार्क्सवादी जाणीव अधिक पक्की झाली. मुंबईतील कामगार जीवन, त्यांचे वर्गसंघर्षाचे तत्त्वज्ञान, तेथील संप, मोर्चे, त्यांच्या रोजीरोटीचा सवाल, कामगारांच्या चळवळीतील फाटाफूट या साऱ्या अनुभवातून अण्णाभाऊंच्या विचारांना पाठबळ मिळत गेले. मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांचे जीवनचित्रण करताना त्यांच्यातील मार्क्सवादी दृष्टिकोनाचा आविष्कार प्रभावीपणे व्यक्त झाला आहे.

अण्णाभाऊ साठे लेखक तर होतेच, त्यापेक्षा शाहीर म्हणून ते अधिक लोकप्रिय होते. ते स्वतः गायक-नट होते. त्यांनी १९४२ मध्ये स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिला. त्या पोवाड्याने कम्युनिस्ट पार्टीच्या वर्तुळात कम्युनिस्ट शाहीर म्हणून प्रसिद्ध झाले. शाहीर अमर शेख, द. न. गव्हाणकर यांच्या सहकार्याने 'लाल बावटा' कलापथक काढले. त्यांच्या मार्क्सवादी भूमिकेचा सर्वाधिक आविष्कार पोवाड्यांमधून व लोकनाट्यातून झाला आहे. लाल बावट्याच्या माध्यमातून वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान आणि साम्यवादी विचार त्यांनी महाराष्ट्रात रुजवला. स्वातंत्र्यलढा, गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन यामधील अण्णाभाऊंचे योगदान मोलाचे होते. 'माझी मैना गावाकडे राहिली' या त्यांच्या छकडीने सारा महाराष्ट्र निनादून सोडला होता. आजही त्या लावणीची जादू ओसरलेली नाही. तमाशाबंदीच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अण्णाभाऊंनी 'लोकनाट्य' ही संज्ञा वापरली आणि अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, देशभक्त घोटाळे, शेटजीचे इलेक्शन, माझी मुंबई इत्यादी लोकनाट्ये लिहून तो शब्द रूढ केला. या लोकनाट्यातून आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्न त्यांनी मांडले. भांडवलदार, शेतकऱ्यांचे शोषण करणारे सावकार, शेटजीभटजी हे त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते. 'धोंड्या' नावाचे एक पात्र निर्माण करून अक्षरशः पुंजापतींच्या वृत्तीप्रवृत्तींवर दगड भिरकावले. प्रबोधन करून परिवर्तन घडविले. वर्गयुद्ध घडविले, सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध उभे राहण्याचे सामर्थ्य मराठी माणसांना दिले. कलानंदाचा आनंद देण्याबरोबरच मराठी मनावर संस्कार केले. मार्क्सवादी विचारांची पेरणी केली.

अण्णाभाऊ साठे मानवतावादी लेखक होते. शोषणमुक्ती हा त्यांचा ध्यास होता. केवळ महाराष्ट्र नव्हे तर साऱ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व कष्टकरी, दलित, शोषित, पीडित यांचे शोषण संपविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. वर्गविरहित समाजाचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले. खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे ध्येयवादी लोकशाहीर होते. मानवमुक्तीचे शिलेदार होते!

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या म. फुले अध्यासनाचे प्रमुख आहेत.

6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. त्यानंतर तब्बल आठवडाभर तमाम चळवळीतील वातावरणावर एक प्रकारची निराशा उमटलेली होती. आठवडाभरानंतर संपूर्ण देशात बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्याची कार्यक्रम सुरू झाले. मुंबईत तर दर दिवसाला चार ते पाच कार्यक्रम होत होते. खेडो-पाडी, गल्ली मोहल्ल्यातून, शाळा कॉलेजांतून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली जात होती.
बाबासाहेबांचं लोकशाहीरांवर प्रचंड प्रेम. ते म्हणायचे.. माझी दहा भाषणं आणि शाहिराचं एक गाणं एकदम समान तोडीचं. मी दहा भाषणात जे सांगतो ते सांगायला शाहिर फक्त एकच गाणं घेतो आणि माझ्यापेक्षाही ताकदीनं ते पोहोचवतो. सर्व लोकशाहिरांचंही बाबासाहेबांवर अपार प्रेम होतं. अशातच तत्कालीन सर्व शाहिरांना एकत्रितपणे बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले.
या कार्यक्रमाला सर्वच थरातून प्रतिसाद मिळाला. सर्वच ख्यातनाम गायक, कवी, शाहिर, लेखक एकत्र आले. अंधेरी इलाख्यातला एक हॉल बुक केला. कार्यक्रमाची आखणी केली गेली. वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे, गोविंद म्हशीलकर, विठ्ठल उमप, विठ्ठल शिंदे, भिकू भंडारे, अण्णाभाऊ साठे यांनी आपापले एक गीत सादर करून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करायची असे ठरवले गेले.
ठरल्याप्रमाणे कार्यक्रम सुरू झाला. वामनदादांपासून विठ्ठल उमपांपर्यंत सर्वच शाहिरांनी आपापलं गाणं सादर केलं. पण अण्णाभाऊंच्या चेहऱ्यावर मात्र एक स्तब्ध भाव झळकत होता. गोविंद म्हशीलकर यांनी अण्णाभाऊंना अखेर न रहावून विचारलंच.. अण्णा काय झालंय? तुम्हाला काही सादर नाही करायचं का? तुम्ही तर गाणंही लिहून आणलेलं नाही.. मग श्रद्धांजली कशी वाहणार?
गोविंद म्हशीलकरांच्या प्रश्नांनी थोडी जाग आलेल्या अण्णा भाऊंनी तात्काळ पेन आणि कागद हातात घेतला आणि हे अजरामर गीत लिहून काढलं. आणि स्वतःच सादर केलं. अण्णा भाऊंचा गळा गोड. त्याला सुरांची जबरदस्त अशी साथ आणि रोम रोम चेतवून टाकणारा त्यांचा आवेश त्या वेळेस प्रत्येकाच्या मनातून बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर आलेली दुःखछटा काढून टाकण्यात यशस्वी झाला होता.
आज अण्णाभाऊंची जयंती … या थोर शाहिरास.. मराठी भाषेस समृद्ध करणाऱ्या ग्रेट साहित्यसम्राटास मानाचा जय भीम…

जग बदल घालुनी घाव

जग बदल घालुनी घाव । सांगून गेले मला भीमराव ।।

गुलामगिरीच्या या चिखलात । रुतून बसला का ऐरावत ।
अंग झाडुनी निघ बाहेरी । घे बिनीवरती धाव ।।

धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।
मगराने जणू माणिक गिळिले । चोर जाहले साव ।।

ठरवून आम्हा हीन कलंकित । जन्मोजन्मी करुनी अंकित ।
जिणे लादुनी वर अवमानित । निर्मून हा भेदभाव ।।

एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चल बा पुढती ।
नव महाराष्ट्रा निर्मून जगती । करी प्रकट निज नाव ।।

गीत: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शरद baviskar- भुरा

भूरा