सोमवार, २१ जुलै, २०२५

नवा शिपाई - कवितेचा भावार्थ

नवा शिपाई ही कवी केशवसुतांची प्रसिद्ध कविता आहे. 'केशवसुत" या टोपण नावाने कृष्णाजी केशव दामले यांनी काव्य लेखन केलेले आहे.  काव्यरत्नावली या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून 'केशवसुत' या टोपणनावाचा त्यांनी स्वीकार केला. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866 रोजी रत्नागिरी नजीक मालगुंड या गावी झाला. त्यांचे शिक्षण मालगुंड या गावी खेड, बडोदे, वर्धा, नागपूर, पुणे या विविध ठिकाणी झाले.
त्यांचे वडील केशव दामले हे शिक्षक होते. केशवपंत स्वभावाने नि:स्पृही, बाणेदार आणि करारी होते. उत्तम शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र कधीच नांदत नाहीत असे म्हणतात, याचप्रमाणे त्यांचे सर्व आयुष्य दारिद्र्यात गेले. केशवसुत निश्चयी व कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांचे जेष्ठ बंधू श्रीधरपंत यांच्याकडून त्यांना कवितेची गोडी लागली. व त्यांनी कविता लिहावया सुरुवात केली.
संपूर्ण आयुष्य त्यांनी कवितेच्या सानिध्यात घालविले त्यांनी इंग्रजी साहित्याचा सखोल अभ्यास केला त्यांच्या आवडीचे कवी इमर्सन, शेले, किटस् वर्डस्वर्थ हे होते. त्यांच्या कवितेचा प्रभाव त्यांच्या कवितेवर दिसतो. संत तुकाराम महाराजांच्या साहित्याचाही त्यांच्यावर खूप प्रभाव होता. कवीने शब्दाबरोबर न वहावता कल्पनेशी झगडत राहिले पाहिजे. नुसत्या शब्दांच्या थाटाने कविता होत नसते. शब्दात काव्य नाही तर ते कल्पनेत आहे असे त्यांचे ठाम मत होते. कवितेचे बाह्यरूप कुठलेही असले तरी तिचे अंतरंग उदात्त कल्पनांनी व विचारांनी भरलेले पाहिजे तरच तिचे उज्वल स्वरूप प्रकट होईल, एरवी नाही असे ते म्हणायचे. 
कवी केशवसुतांच्या कविता सुरुवातीस करमणूक या नियतकालिकातून प्रकाशित होऊ लागल्या. पुढे त्या सुधारक मासिक मनोरंजन, काव्यरत्नावली यातून प्रसिद्ध झाल्या. कवी केशवसुत हे निसर्गतः कवी होते. हे त्यांच्या प्रत्येक कवितेतून प्रतीत होते. त्यांच्या सर्व कविता स्फूट आहेत. एखादे तरी मोठे काव्य लिहावे अशी त्यांची इच्छा होती, परंतु अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे ती त्यांना तडीस नेता आली नाही. त्यांनी आपल्या मातेसंदर्भात, प्रदेशासंदर्भात कविता लिहिल्या. प्रीती मिळेल काहो, समृद्धी, प्रणय कथन, मयुरासन, ताजमहल या त्यांच्या प्रेमाच्या कविता होत. कविता आणि कवी या त्यांच्या कवितेवरून ते जुन्या शृंखला तोडण्यात सिद्ध होते हे दिसते. ते म्हणतात, "युवा जैसे तो युवती समूह मोहे
तसा कवी हा कवितेस पाहे 
तिला जसा तो करितो विनंती
 तसा हिला हा करीत सुवृत्ती"
आत्मविष्कार हाच नेहमी काव्य निर्मितीचा प्रमुख आधार अशी त्यांची ठाम भूमिका होती. 1886 ते 1904 या काळात ते याच ध्यासात मग्न होते. काव्य, कला, प्रतिभा सौंदर्य, प्रेम, निसर्ग, संवेदना या सगळ्यावर त्यांनी कविता लिहिल्या. शाब्दिक कलाकुसरिने नटलेली कविता ही कृत्रिम काव्य आहे असे त्यांना वाटायचे. केशवसुतांचे शिक्षण हे पुण्यात झाले असले तरी त्यांचे मन नेहमी रमाईचे ते कोकणातच. निसर्गसौंदर्याचे वर्णन त्यांनी अत्यंत तन्मयतेने त्यांच्या कवितेतून केलेले आहे. केशवसुत म्हणजे स्वातंत्र्य, समता याची स्वप्न पाहणारा, तुतारी फुंकणारा नवा शिपाई. तुतारी व नवा शिपाई कवितेतून सगळ्या जुन्या अनिष्ट प्रथा सोडण्याचे आवाहन ते करतात. जुन्या रूढी, परंपरा ह्या कालबाह्य झालेल्या असून त्या त्यागल्याच पाहिजे अशी त्यांची भावना होती. 'नवा शिपाई' ही कविता तर अगदी स्फूर्तीने भरलेली आहे. कवितेमध्ये केलेल्या अमुलाग्र बदलामुळे त्यांना मराठी आधुनिक कवितेचे जनक म्हणून ओळखले जाते. वर्षानुवर्षे विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणाऱ्या कवितेला स्वच्छंद आणि मुक्तरूपात केशवसुतांनी प्रथम सर्वापुढे आणले. आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपूर्झा, हरपले श्रेय, मूर्तीभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत. कवी केशवसुतांनी इंग्रजी काव्य परंपरेतील रोमांटिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टिकोन प्रथम मराठी साहित्यात आणला. कवीच्या अंतः स्फूर्ती खेरीज ती अन्यबाह्य प्रभावात ती असू नये असे त्यांचे म्हणणे होते. काव्य हुकमानुसार नसते, नसावे हा वास्तववाद मराठीत त्यांनीच आधुनिक परिभाषेत मांडला. इंग्रजी कवीचा प्रभाव त्यांच्या कवितेवर असला तरी त्यांची अविष्कार शैली भारतीय होती. इंग्रजी काव्यातील 14 ओळीचा सॉनेट हा काव्यप्रकार सुनीत या नावाने मराठीत रूढ करण्याचे श्रेय केशवसुतांना जाते. त्यांनी रचलेल्या कवितांपैकी 135 कविता आज उपलब्ध आहेत. या कविता महाराष्ट्र सरकारने 'केशवसुतांची कविता' या नावाने प्रकाशित केलेले आहेत. समीक्षक स.गं.मालसे यांनी केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित संपादित केलेले आहे. त्यांच्या अल्पसंख्य कवितांमध्ये अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, मानवतावाद, राष्ट्रीयत्व, गुढ अनुभवांचे प्रगटीकरण आणि निसर्ग असे अनेक विषय सहज आलेले आहेत. आधुनिक कवितेची सर्व वैशिष्ट्ये प्रथमच त्यांच्या कवितेमध्ये येतात. त्यामुळे त्यांना जनकत्वाचा मान दिला जातो. त्यांचे समकालीन कवी कवी गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे),कवी रेंदाळकर, कवी सेवाळकर, काव्यविहारी यासारखे सुप्रसिद्ध कवी सुद्धा स्वतःला  केशवसुतांचे शिष्य म्हणून घेत असत. तुतारी मंडळ या नावाचे एक मंडळ ही स्थापन झाले होते.  
केशवसुतांच्या सामाजिक विचारांची मुख्यतत्वे स्वातंत्र्य, समता, बंधुता व विशाल मानवतावाद ही होती. विशेष म्हणजे पृथ्वीला 'सुरलोकसाम्य' प्राप्त करून देण्याचे एक महान स्वप्न त्यांच्या क्रांतीदर्शी प्रतिभेने पाहिले होते. त्याचाही निर्देश त्यांच्या काही कवितातून आढळतो. झपूर्झा (1893), म्हातारी (1901) व हरपले श्रेय (1905) या त्यांच्या गुढ अनुभूती व नाविन्यपूर्ण अनुभूतीची प्रचिती देणाऱ्या कविता आहेत. शैलीच्या दृष्टीने केशवसुतांच्या काव्यात लालित्य कमी आहे पण काहीशी राकट आणि रांगडी अभिव्यक्ती त्यांच्या काव्य प्रवृत्तीशी सुसंगत ठरते. केशवसुतांचा काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर हरि नारायण आपटे यांनी 1916 मध्ये प्रकाशित केला. अर्वाचीन मराठीत सामाजिक संकल्पनांना भेदून एवढं निर्भीड लेखन करणारा हा कवी 7 नोव्हेंबर 1905 रोजी हुबळी येथे प्लेगने वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी अनंतात विलीन झाला. 

नवा शिपाई - कविता
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें,
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !
ब्राह्मण नाहीं, हिंदुहि नाहीं, न मी एक पंथाचा,
तेचि पतित की जे आंखडिती प्रदेश साकल्याचा !
खादाड असे माझी भूक;
चतकोरानें मला न सुख;
कूपांतिल मी नच मंडूक;
मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे !
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !


जिकडे जावें तिकडे माझीं भांवडें आहेत,
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत;
कोठेंही जा---पायांखालीं तृणावृता भू दिसते;
कोठेंही जा---डोईवरतें दिसतें नीलांबर तें !

सांवलींत गोजिरीं मुलें,
उन्हांत दिसतो गोड फुलें,
बघतां मन हर्षून डुलें;
तीं माझीं, मी त्यांचा,---एकच ओघ अम्हांतुनि वाहे !
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें !

पूजितसें मी कवणाला ?--- तर मी पूजीं अपुल्याला,
आपल्यामधें विश्व पाहुनी पूजीं मी विश्वाला;
‘ मी ’ हा शब्दच मजला नलगे; संपुष्टीं हे लोक
आणुनि तो, निजशिरीं ओढिती अनर्थ भलते देख !

लहान---मोठें मज न कळे,
साधु---अधम हें द्वयहि गळे,
दूर---जवळ हा भाव पळे;
सर्वच मोठे---साधु---जवळ, त्या सकलीं मी भरुनी राहें ! कोण मला वठणीला आणूं शकतों तें मी पाहें !


हलवा करितां तिळावर जसे कण चढती पाकाचे,
अहंस्फूर्तिच्या केन्द्राभंवतें वेष्टन तेंवि जडाचें;
आंत समचि निर्गुण तिलक, वरी सदृश सगुण तो पाक,
परि अन्यां बोंचाया घरितो कांटे कीं प्रत्येंक !
अशी स्थिती ही असे जनीं !

कलह कसा जाइल मिटुनी ?
चिंता वागे हीच मनीं.
शान्तीचें साम्राज्य स्थापूं बघत काळ जो आहे,
प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई 
आहे !

प्रस्तुत 'नवा शिपाई' ही केशवसुतांची कविता सुधारणावादी, सामाजिक जाणिवेची कविता आहे.
ही कविता ज्या काळामध्ये लिहिली तो काळ लक्षात घेणे गरजेचे आहे. इंग्रजी सत्तेचा अंमल भारतामध्ये होता. त्यामुळे इंग्रजी भाषेचा प्रभाव पडणं साहजिक आहे. आधुनिक जीवनमूल्ये इंग्रजी साहित्यामधून घेऊन भारावलेली पहिली पिढी त्यामध्ये कवी केशवसुत आहेत. निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर आहेत. लोकहितवादी आहेत. कथा, कादंबरीकार हरि नारायण आपटे आहेत.
'नवा शिपाई' ही कविता विश्वबंधुत्व, समता आणि शांतीचे साम्राज्य मानवतावादाच्या मूलभूत प्रेरणावर आधारलेली कविता आहे. केशवसुत स्वतः नवा शिपाई संबोधतात.
 "नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई" म्हणजे
आधुनिक विचार मूल्य अंगीकारलेला, नवीन विचारसरणी असलेला, नव्या युगाचा, नव्या विचारधारेचा प्रतिनिधी, धाडसी आणि जाज्वल्य आत्मा असलेला युवक, तरुण होय. जो जुन्या रूढींना आव्हान देतो.
 कोण मला वाठणीला आणू शकतो ते मी पाहे"
 "मला कोणी आवर घालू शकतं, मला रोखू शकतं का – ते मी पाहतो!"
या ओळीत स्वाभिमान, आत्मविश्वास आणि विद्रोही वृत्ती आहे.
ही कविता पुराणमतवादी समाजव्यवस्थेवर टोकाची टीका करणारी आहे.
या ओळीत एक क्रांतिकारी वृत्तीचा, नव्या विचारांनी भारलेला तरुण बोलतो आहे. तो जुने नियम, रूढी, बंधनं, भेदभाव झुगारून देण्यास सज्ज आहे. "माझ्यात ती ताकद आहे, आणि मला कोणी थांबवू शकत नाही" – अशी गर्जना आहे.
ही कविता स्वातंत्र्यपूर्वकाळातील, पण विचार मात्र आजही ज्वलंत आणि प्रेरणादायी आहेत.
ही ओळ म्हणजे नवचैतन्याचा नाद आहे, जिथे शिपाई म्हणजे विचारांचा योद्धा आहे!
"ब्राह्मण नाही हिंदूही नाही, न मी एक पंथाचा
तेच पतीत जे आखडिती ती प्रदेश साकल्याचा
मानवतावादी विचार कवी पेरतो. विश्वबंधुत्वाची मांडणी कवी या ठिकाणी करतो. जात, धर्म, पंथ व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन सर्व माझेच आहेत ही भावना कवी व्यक्त करतो. मी ब्राह्मण नाही, हिंदूही नाही. या ठिकाणी ब्राह्मण हा शब्द समूहा पुरता (विविध जाती) येतो. मी कोणत्याही जातीचा नाही. मी कोणत्याही धर्माचा नाही. मी कोणत्याही पंथाचा नाही. मी संपूर्ण मानवतेचा आहे. वसुधैव कुटुम्बकम, हे विश्वची माझे घर ही भावना कवी व्यक्त करतो.
जे कोणी मला विशिष्ट जात, धर्म, पंथ यामध्ये समाविष्ट करतील ते पापी ठरतील. माझी व्याप्ती ही मर्यादित नाही. जे कोणी मला आखडीत आहेत. ते संकुचित विचाराचे आहेत. 
पुढे कवी म्हणतो, 
खादाड असे माझी भूक;
चतकोरानें मला न सुख;
कूपांतिल मी नच मंडूक;
मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे !
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !
प्रस्थापित जात, धर्म, पंथ, वर्ण मला दोन चार लोकांचे मत परिवर्तन करायचे नाही तर संपूर्ण विश्वातील मानवाचे परिवर्तन कवीला करावयाचे आहे.
ही कविता बंडखोर वृत्ती, नव्या विचारांचा आविष्कार व जुने-पुराणे बंधनं झुगारून देण्याची मानसिकता व्यक्त करते. चला ओळीनुसार भावार्थ पाहूया—


"नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें, कोण मला वठणीला आणू शकतो तें मी पाहें !"
👉 कवी सांगतो की तो नवीन युगाचा, नव्या विचारांचा योद्धा आहे. त्याला कोणीही जुनी परंपरा, रूढी, बंधनं वठणीला आणू शकत नाहीत.

"ब्राह्मण नाहीं, हिंदुहि नाहीं, न मी एक पंथाचा, तेच पतित कीं जे आखडिती प्रदेश साकल्याचा !"
👉 तो कोणत्याही जाती-पंथाशी बांधलेला नाही. जो मनुष्य समाजाला बंधनांत ठेवतो, विचारांना रोखतो तोच खरा पतित आहे, असं कवी म्हणतो.

"खादाड असे माझी भूक, चतकोरानें मला न सुख;"
👉 त्याची भूक म्हणजे फक्त पोटभर अन्नाची नाही, तर ज्ञान, अनुभव, प्रगती यांची अखंड भूक आहे. थोडक्यात समाधान होणारी ती नाही.

"कूपातिल मी नच मंडूक;"
👉 तो मर्यादित चौकटीत, जुन्या विचारांत, एका ठिकाणी अडकून बसलेला 'कूपमंडूक' नाही.

"मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे !"
👉 त्याच्या जीवनावर, विचारांवर कोणतेही बंधन (कुंपण) येणे त्याला अजिबात सहन होत नाही.

"कोण मला वठणीला आणू शकतो तें मी पाहें !"
👉 शेवटी तो पुन्हा ठामपणे सांगतो – त्याला कोणीही वश करू शकत नाही.
थोडक्यात,
कवी स्वतःला नव्या युगाचा धाडसी सैनिक मानतो. तो कोणत्याही जाती-पंथाच्या चौकटीत बांधलेला नाही. त्याला ज्ञान व प्रगतीची अखंड भूक आहे. तो अरुंद विचारांच्या चौकटीत बसणारा नाही. बंधनं, परंपरा, जुने कुंपण त्याला सहन होत नाही. त्यामुळे समाजातील कोणत्याही शक्तीला त्याला वठणीला आणता येणार नाही, हीच त्याची बंडखोर घोषणा आहे.
प्रस्तुत कविता बंडखोर पण एकात्म भावनेचा विचार मांडते. यात कवी स्वतःला "नव्या युगाचा शिपाई" म्हणतो आणि जगाकडे पाहण्याचा त्याचा व्यापक, निर्भेळ, मुक्त दृष्टिकोन दाखवतो. 

"जिकडे जावें तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत;"
👉 संपूर्ण विश्व कवीला आपलंच घर वाटतं. जगातील प्रत्येक जीव त्याचा भाऊ-बहिण आहे.

"कोठेही जा-पायांखालीं तृणावृता भू दिसते, कोठेही जा-डोईवरतें दिसतें नीलांबर तें;"
👉 जिथे जाईल तिथे त्याला एकच पृथ्वी, एकच आकाश दिसते. एकात्मता व समानता हा भाव यातून प्रकटतो.

"सांवलींत गोजिरीं मुलें, उन्हांत दिसती गोड फुलें, बघतां मन हर्षन डुलें,
ती माझीं, मी त्यांचा, एकच ओघ अम्हांतुनी वाहे !"
👉 बालकांची निरागसता, फुलांची गोडी पाहून कवीच्या मनात आनंद भरतो. तो स्वतःला आणि सृष्टीला वेगळं मानत नाही; सगळ्यांतून एकच जीवनशक्ती वाहतेय, असं त्याला जाणवतं.

"पूजितसें मीं कवणाला तर मी पूजीं अपुल्याला, आपल्यामधें विश्व पाहुनी पूजीं मी विश्वाला;"
👉 कवी बाहेरच्या देवाला न पूजता, स्वतःतील आणि प्रत्येक प्राण्यातील विश्वाला पूजतो. त्याला 'मी' आणि 'तू' यात फरक वाटत नाही.

"'मी' हा शब्दच मजला नलगे; संपुष्टीं हे लोक आणुनी तो, निजशिरी ओढिती अनर्थ भलते देख !"
👉 कवीला अहंकाराचा 'मी' हा शब्द नकोसा वाटतो. लोक 'मी' 'माझं' याच्या पलीकडे जात नाहीत, त्यामुळे समाजात अनर्थ घडतो.

"लहान-मोठें मज न कळे, साधु-अधम हैं द्वयहि गळे, दूर-जवळ हा भाव पळे;
सर्वच मोठें-साधु जवळ, त्या सकलीं मी भरुंनी राहें !"
👉 कवीच्या नजरेत लहान-मोठं, साधू-अधम, जवळ-दूर असा फरकच नाही. सगळेच त्याला आपले वाटतात.

"हलवा करितां तिळावरी जसे कण चढती पाकाचे, अहंस्फूर्तिच्या केंद्राभवतें वेष्टन तेंवि जडाचें;"
👉 जसं तिळाला साखरेचा पाक चढवला की बाहेरून सुंदर गोड थर दिसतो पण आत तो तिळाच असतो, तसंच माणसाच्या अंतरात्म्याचा निर्गुण सत्यरूप आणि बाहेरचं सगुण रूप वेगळं दिसतं.

"आंत समचि निर्गुण तिलक, वरी सदृश सगुण तो पाक, परी अन्यां बोंचाया धरीती कांटे कीं प्रत्येक !"
👉 आत सगळ्यांत सारखाच निर्गुण आत्मा आहे, बाहेर मात्र रूपं-भेद दिसतात. पण लोक एकमेकांना वेगळं समजून टोचतात, भेदभाव करतात.
सारांशाने 
हा उतारा विश्वबंधुत्वाचा आणि आत्मज्ञानाचा संदेश देतो. कवी म्हणतो —

माझं खरं घर म्हणजे संपूर्ण विश्व आहे.

सृष्टीतील प्रत्येक प्राणी, फुलं, मुलं, माणसं — हे सारे माझेच आहेत.

देव म्हणजे कुठे बाहेर नाही, तर माझ्यात आणि सर्वांमध्ये आहे.

'मी-तु', लहान-मोठं, श्रेष्ठ-कनिष्ठ हे भेद तो मानत नाही.

मुळात सर्व जीवांच्या आत एकच आत्मा आहे, बाहेर रूपं वेगळी दिसतात.
म्हणून तो स्वतःला नव्या युगाचा, नव्या विचारांचा शिपाई म्हणतो, ज्याला कोणतेही बंधन, जाती-पंथाचे भेद, किंवा अहंकार वश करू शकत नाही.
"अशी स्थिती ही असे जनीं ! कलह कसा जाइल मिटुनी ? चिंता वाटे हीच मनीं."
👉 जगात सतत भांडणं, वाद, कलह सुरू आहेत. समाजात भेदभाव, अन्याय, संघर्ष यामुळे शांतता नाही. कवीच्या मनात एकच प्रश्न आहे — हा कलह कसा संपणार?

"शांतीचे साम्राज्य स्थापूं बघत काळ जो आहे, प्रेषित त्याचा, नव्या दमाचा शूर शिपाई आहे!"
👉 पण काळ पुढे जात आहे, बदल घडतो आहे. या बदलत्या काळाचा हेतू म्हणजे जगात शांतीचं साम्राज्य प्रस्थापित करणे. त्या शांतीच्या कार्यासाठी जो नवा विचार घेऊन लढतो, जुनी बंधनं तोडतो, तोच या युगाचा शूर शिपाई आहे.

कवी सांगतो की जगात वाद, भांडणं, कलह आहेत. त्यातून बाहेर पडून शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. आजचा नवा काळ हा शांतीचं साम्राज्य उभारण्यासाठी येत आहे, आणि त्या कार्याचा सैनिक म्हणजेच "नव्या दमाचा शूर शिपाई" होय.
अशाप्रकारे कवी केशवसुत यांनी प्रस्तुत नवा शिपाई कवितेतून सामाजिक जाणीव व्यक्त करणाऱ्या माणुसकीची पताका खांद्यावर घेऊन निघालेल्या समतेच्या शिलेदाराचा  प्रवास कवितेतून चित्रीत केलेला आहे.
आहे, पाहे 
पंथाचा, साकल्याचा,
भूक, सुख 
मुले, फुले, डुले 
लोक, देख
विश्वाला, आपुल्याला
कळे,गळे, पळे 
राहे, पाहे
पाकाचे, जडाचे 
जनी, मनी यमकादि शब्दांची सुरेख रचना कवीने केलेली असून त्यामुळे कविता नादवती, ओघवती व गेय स्वरूपाची बनते.
एक प्रेरणा गीत वाटावे अशी सुरेख रचना कवी केशवसुत यांची आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता, मानवता आदि मूल्यांचे दर्शन प्रस्तुत रचनेतून घडते.








संदर्भ - 
1. Marathi vishwakosh.org/36425/केशवसुत - लेखक रा.श्री. जोग 
2. दैनिक प्रभात मधील 20 मार्च 2022 चा आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसुत -डॉ. गणेश काकांडीकर यांचा लेख
3.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शीगवाला / नारायण सुर्वे

क्या लिखतो रे पोरा ! नाही चाचा -- काही हर्फ जुळवतो म्हणता, म्हणता दाऊदचाचा खोलीत शिरतो गोंडेवली तुर्की टोपी काढून गळ्याखालचा घाम पुसून तो ...