अफ़ीम लालपरी खावी
मुबलक कंट्री प्यावी
मर्डर करावा, झोपलेल्यांची कत्तल करावी
पोरीबाळीम्शी सइंद्रिय चाळे करावे
म्हातारी म्हनू नये,तरनी म्हणू नये
कवळी म्हणू नये,सर्वांना पासले पाडावे
व्यासपिठावर समग्र बलात्कार घडवून आणावे
येशुच्या,पैगंबराच्या, बुद्धाच्या विष्णुच्या वंशजांना फ़ाशी द्यावेमाणसाने
देवले मशिदी शिल्पे म्युझियम कुस्करून टाकावे
हे सारे विश्वव्यापी गळूप्रमाणे फुगू द्यावे
अनामवेळी फुटू द्यावे ,रिचू द्यावे.
नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये
काळा गोरा म्हणू नये
तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शुद्र असे हिणवू नये
अभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी माणून
त्यांच्या कुशीत गुण्यागोविंद्याने राहावे
चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वांनी कांडून खावा
माणसावरच सुक्त रचावे
माणसाचेच गाणे गावे माणसाने.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा