शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

आनंदीबाई शिर्के-परिचय



लेखिका, बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के या त्यांच्या ‘सांजवात’ या आत्मचरित्रामुळे प्रसिद्ध झाल्या. त्यांचा जन्म ३ जून १८९२ रोजी झाला. आनंदीबाईंनी ‘सांजवात’या पुस्तकातून जुन्या काळातील स्त्रीजीवनाचं वास्तव आणि प्रांजळ चित्रण केलं आहे. एकत्र कुटुंबपद्धती, मुलींवर आणि स्त्रियांवर असलेली बंधनं, समाजातल्या रूढी, अशा अनेक गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे.


आनंदीबाईंचं माहेरचं नाव अनसूया होतं. त्यांचे वडील पुण्यातले. पण त्यांनी बडोदे संस्थानात सयाजीराव गायकवाडांकडे नोकरी घेतली व ते तिथे राहायला गेले. आनंदीबाई तेव्हा तशा लहान होत्या. १९१० मध्ये मासिक मनोरंजनमध्ये कु. आनंदी या नावानं एक कथा छापून आली. अनेकांचं या नव्या नावाने लक्ष वेधून घेतलं. कथेचं नाव होतं ‘शारदाबाईंचे संसारचित्र’ या नावातच सारं काही समजतं.मात्र १९१२ मध्ये ‘मराठा मित्र’ ने याच लेखिकेची ‘बेगम दिलआरा’ ही एक मोगल काळातील प्रेमकथा छापली. आणि या लेखिकेला खूप मान्यता मिळवून दिली. प्रसिद्ध लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी संपादकांकडे विचारणा केली. ‘या कथेचे रचनाकौशल्य, पात्रांचे स्वभाव रेखाटन इतके वाखाणण्यासारखे आहे, एखाद्या पुरुष लेखकानेच टोपण नावाने ही कथा लिहिली नाही ना?’ आणि मग आनंदीबाई लिहीतच राहिल्या. सर्व महत्त्वाच्या आणि सामाजिक भान असणा-या पत्रांमधून लेखन करत राहिल्या. शिकणा-या, नोकरी करू पाहणा-या, अर्थार्जनानं येणा-या स्वातंत्र्याची चव चाखू पाहणा-या स्त्रियांची चित्रं, त्यांचे प्रश्न आनंदीबाईंच्या कथांमधून उमटायला लागले. प्रत्यक्ष आयुष्यातही आनंदी एक धाडसी, कणखर, आधुनिक विचारांची तरुणी होती. घरातच त्यांच्यातलं वेगळेपण आणि तेज जाणवू लागलं होतं. परिचाचरिकेचं प्रशिक्षण घेऊन, तोच व्यवसाय पत्करणार आणि वडिलांना हातभार लावणार असा निश्चय करून त्या एकविसाव्या वर्षापर्यंत विवाहापासून दूर राहिल्या. त्या काळात ही बंडखोरीच होती. आपला परिचारिकेचा व्यवसाय निष्ठेने सुरू करून आनंदीबाईंनी लेखनालाही प्रारंभ केला.
आनंदीबाईंचा विवाह म्हणजे त्या काळात लेखिका आणि संपादक यांचे भावबंध जुळून प्रेमविवाह होण्याचं हे दुर्मीळ उदाहरण आहे. पण शिवराम शिर्के हे मराठा मित्रचे कार्यकारी संपादक होते. कोकणातील खानदानी मराठा. ते विचारांनी पुरोगामी, पण देशावरल्या मराठा मुलीशी लग्न ठरवल्याबद्दल शिर्के यांच्या कुटुंबाला त्यावेळी फार त्रासातून जावं लागलं. आनंदीबाई आणि शिवरामपंत दोघांनीही खूप संयमानं अनेक गोष्टी सहन केल्या. वडील लवकर निवृत्ती घेऊन मुंबईला आल्यानंतर सारेजण मुंबईत राहिले. मुलींची लग्नं उरकणं हा वडिलांसमोरचा एककलमी कार्यक्रम होता. विवाहाच्या संदर्भात लिहिताना आनंदीबाईंनी मराठा समाजाच्या एकूण मानसिकतेवर प्रकाश टाकला आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या, घराण्याच्या जुनाट परंपरांच्या अभिमानापुढे इतर हितकर बाबींकडे दुर्लक्ष करण्याया या समाजाच्या प्रवृत्तीवर त्यांनी बोट ठेवलं आहे. आनंदीबाईंना शिकण्याची आवड होती, पण उत्तमप्रकारे शिक्षण घेणं त्यांना परिस्थितीमुळे जमलं नाही. शिकता न आल्याने नोकरी मिळवणं कठीण बनलं. नर्सिंग शिकून ते काम करता येईल असं त्यांना वाटत होतं, पण या गोष्टीला घरातून विरोध झाला. पुस्तकांची सोबत आणि वाचनाची आवड मात्र त्यांनी मनापासून जोपासली. वाचनातूनच त्यांना लिहायची प्रेरणा मिळाली. नर्सिंगला जाता आलं नाही, तरी त्या चंद्राबाई नावाच्या सुईणीबरोबर जाऊन बाळंतपणाच्या केसेस बघत. त्या कथालेखन करत आणि लेखनामुळे त्यांचा परिचय ‘मराठामित्र’चे सहसंपादक शिवराम शिर्के यांच्याशी झाला. परिचयाचं रूपांतर पुढे प्रेमात आणि त्यानंतर लग्नात झालं. दोघेही मराठा समाजातले असले तरी शिर्के हे कोकणस्थ मराठा आणि शिंदे देशस्थ मराठा असा फरक असल्यामुळे माहेरून या लग्नाला विरोध झाला. कारण त्याकाळी असे विवाह होत नसत. लग्नाची ही गोष्ट सांगताना आनंदीबाईंनी मराठा समाजातील बंदिस्त व झापडबंद रूढींकडे निर्देश केला आहे. या सा-या लिखाणात कमालीचा मोकळेपणा आहे.
विवाहोत्तर जीवनाबद्दल लिहिताना आपल्या सहजीवनातील अनेक तपशील त्या देतात. त्या स्वतः अत्यंत थेट बोलणा-या अन् परखड स्वभावाच्या होत्या, तर पती शिवराम शिर्के स्वभावाने नरम, सरळपणे सगळ्या गोष्टीकडे बघणारे. दुस-याला नावं न ठेवता आपल्या मार्गाने जाणारे. संसारातले अनेक बरेवाईट प्रसंग यामुळे निभावले गेले. दुस-यामुळे स्वतःला नुकसानीत जायची पाळी आली तरी शिर्के काही न बोलता शांतपणे वागत, त्यामुळे आनंदीबाई चिडत. एकमेकावरील प्रेमाने आणि विश्वासाने त्यांचा संसार खूपच उत्तम झाला.
आनंदीबाई लिखाण करता करता, कौटुंबिक वर्तुळाच्या पलीकडे गेल्याच होत्या. पुढे तर त्या समाजकारण व राजकारणातही सक्रिय बनल्या हा सारा अनुभव त्यांच्या जीवनाला एक नवं भान देणारा ठरला. सतत स्थलांतर करतच त्यांचा संसार झाला. पुणं, मुंबई, सातारा, खानदेश अशा विविध ठिकाणी नवं घर मांडण्याचा आणि ते चालवण्याचा खटाटोप आनंदीबाई हिमतीने करत. जळगावला राहत असताना स्कूल बोर्डावर सदस्य म्हणून त्या गेल्या आणि त्यांना यामुळे सभेत बोलण्याचा सराव झाला. १९३५ साली जळगावला माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यसंमेलन झालं तेव्हा त्यांची निवड स्वागताध्यक्ष म्हणून झाली होती. साहित्यक्षेत्रात त्यांचा अनेक मोठ्या लेखकांशी परिचय झाला. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांना आपली मुलगीच मानत असत. मा.आनंदीबाई शिर्के यांचे ३१ ऑक्टोबर १९८६ रोजी निधन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...