गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

स्त्रीवादी साहित्य स्वरूप व परंपरा

स्त्रीवादी मराठी साहित्य


मराठी साहित्यात साधारणतः १९६० नंतरच्या दशकांत स्त्रीवादी साहित्य जाणीवपूर्वक लिहिले जाऊ लागले आणि सत्तर-ऐंशीच्या व नंतरच्या दशकांतही स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह काव्य, कथा, कादंबरी अशा प्रकारांत जोमाने विकसित होऊ लागला. मात्र तत्पूर्वीही स्त्रीकेंद्री साहित्याची निर्मिती अगदी प्राचीन काळापासून मौखिक वा लिखित स्वरूपात होत होती, असे दिसून येते.
स्त्रियांच्या साहित्याचे मूळ प्राचीन काळापर्यंत जाऊन पोहोचते. स्त्री आपल्याशीच किंवा आपल्यासारख्याच दुसरीशी चाललेल्या संवादातून‘बाई असण्याचा ’, ‘ बाईपणाचा ’ अर्थ व्यक्त करीत आली आहे. मराठी लोकगीतां त हा स्त्रीत्वाचा स्वर सतत ऐकू येतो. अन्याय, बंधने, शिक्षा, दंड, तक्रार, शोषण, पुरुषांकडून मिळणारी अन्यायकारक व अपमानास्पद वागणूक, सततची अवहेलना व उपेक्षा, अपाय, इजा, आपल्याकडून चूक वा अपराध घडेल का ह्याची स्त्रीला वाटणारी धास्ती इ. स्त्रियांच्या अनु-भवविश्वाच्या कक्षेतील अशा अनेक भावना आणि तथ्ये त्यांनी लोकवाङ्मयातून शब्दांकित केलेली दिसतात. समाजाने दुर्लक्षित केलेले हे वाङ्मय स्त्रीवादी समीक्षकांनी शोधून त्यावर नवा प्रकाश टाकला आहे. मराठीत तारा भवाळकर, कुमुद पावडे, सरोजिनी बाबर इत्यादींनी लोकगीतांचे संशोधन केले आहे.
महाराष्ट्रातील  महदंबा,  मुक्ताबाई,  जनाबाई इत्यादींनी तसेच एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ताराबाई शिंदे,  पंडिता रमाबाई,  लक्ष्मीबाई टिळक इ. लेखिकांनी ललित व वैचारिक पातळीवर स्त्री-पुरुष विषमतेचे, पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेचे, तसेच स्त्रियांवरील अन्याय, जुलूम, शोषण व त्यांतून स्त्रियांना भोगावी लागणारी दुःखे, वेदना यांचे  प्रभावी चित्रण केले.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ताराबाई शिंदे यांनी स्त्रीपुरुषतुलना ह्या ग्रंथात पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रियांच्या होत असलेल्या  शोषणाविरुद्ध लिहून, स्त्रीशोषणाचे विश्लेषण करणारी सैद्धांतिक मांडणी केली. मालतीबाई बेडेकर म्हणजेच विभावरी शिरूरकर यांच्या लिखाणातही ( हिंदोळ्यावर, १९३४ — कादंबरी ) पुरुषाकडून स्त्रीच्या  शारीरिक व मानसिक पातळीवर होत असलेल्या शोषणाची जाणीव व्यक्त झाली आहे. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘ भरली घागर ’ कवितेत स्त्री-पुरुष भेदावर भाष्य आहे, तर स्मृतिचित्रे ( ४ भाग;१९३४,१९३५, १९३६ ) मध्ये विनोदाच्या, उपरोधाच्या अंगाने स्त्री-पुरुष विषमतेचे चित्रण आहे. व्हर्जिनिया वुल्फचा सिद्धांत — स्त्रियांनी उपरोध, विनोद ही शस्त्रे वापरून आपल्या व्यथा,शोषण,अन्याय यांना वाचा फोडावी — इथे मराठीत प्रत्यक्षात आला आहे. अलीकडच्या काळात मंगला गोडबोले यांच्या लिखाणातही पुरुषप्रधान व्यवस्थेतील रूढी, परंपरांचा निषेध करताना विनोद, उपरोध यांचा वापर केला आहे.
विसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीवादी साहित्यात कमल देसाई, गौरी देशपांडे, शांता गोखले, कविता महाजन, प्रिया तेंडुलकर,  सानिया ( सुनंदा कुलकर्णी ), मेघना पेठे, नीरजा यांच्या कथा कादंबर्‍यांनी मोलाची भर घातली आहे. कमल देसाईंच्या काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई (१९७५) या कादंबरीत प्राचीन मिथ्यकथांना नवे स्त्रीवादी अर्थ दिले आहेत. काळा सूर्य या कादंबरीची नायिका शेवटी गावातील पुरातन मंदिर तोडून टाकते आणि स्वतःही मरते. हे गिल्बर्ट-ग्यूबरच्या ‘ मॅडवुमन ’ प्रतिमेचे मराठीतील उदाहरण म्हणता येईल. अरुणा ढेरे, गौरी देशपांडे, श्यामला वनारसे यांनी त्यांच्या साहित्यकृतींतही प्राचीन पुराणकथांचे स्त्रीवादी दृष्टि-कोणातून नवे अन्वयार्थ लावले आहेत. गौरी देशपांडे यांच्या कथा--कादंबर्‍यांत स्वतंत्र, मुक्त, प्रगल्भ स्त्रीची अनेक रूपे आढळतात. स्त्रीवादी दृष्टिकोणातून स्त्रियांचे अनेक प्रश्न व जाणिवा यांची  अभिव्यक्ती, पुरुषसत्ताक व्यवस्था व पुरुषी मानसिकता यांची उपरोधपूर्ण टिंगलटवाळी, करिअरला प्राधान्य देणार्‍या स्त्रीच्या समस्या व व्यथा यांचे प्रभावी चित्रण ही त्यांच्या स्त्रीवादी साहित्याची ठळक वैशिष्ट्ये होत.
शांता गोखले यांच्या रीटा वेलिणकर या कादंबरीची मानसशास्त्रीय तसेच समाजशास्त्रीय स्त्रीवादी भूमिकेतून चिकित्सा करता येते. स्त्रीवादातील ‘ भगिनीभाव ’ या संकल्पनेचा पुरस्कार करणारी ही कादंबरी आहे. आशा बगे यांची भूमी ही कादंबरी, तसेच प्रिया तेंडुलकरांच्या कथा ( ज्याचा त्याचा प्रश्न व जन्मलेल्या प्रत्येकाला (१९९१) हे कथासंग्रह ) यांचे मूल्यमापन भारतीय स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून करता येते. कविता महाजन यांची ब्र ही कादंबरी भारतीय व समाजशास्त्रीय अशा द्विविध स्त्रीवादी दृष्टिकोणांतून अभ्यासता येते. मेघना पेठे यांच्या लिखाणात ( हंस अकेला — कथासंग्रह वनातिचरामि ही कादंबरी ) मुक्त जीवनपद्धती, बिनधास्त जीवनशैली यांचा पुरस्कार आढळतो. नीरजा ह्या अलीकडच्या स्त्रीवादी साहित्यप्रवाहातील एक प्रमुख व महत्त्वाच्या कवयित्री व कथाकार ( ओल हरवलेली माती — कथासंग्रह ) असून, स्त्रीवादी जाणिवांचे विविध पैलू त्यांनी वास्तववादी, चिंतनशील पद्धतीने व्यक्त केले आहेत.
साठोत्तरी कालखंडात, १९७०—८० च्या दशकांत व नंतरच्या काळातही काव्यनिर्मिती करणार्‍या अनेक कवयित्रींनी स्त्रीवादी काव्याचे दालन समृद्ध केले आहे. त्यांतील काही प्रमुख कवयित्री अशा : अनुराधा पाटील, रजनी परुळेकर, मलिका अमर शेख, प्रभा गणोरकर, अरुणा ढेरे, नीरजा, प्रज्ञा लोखंडे, कविता महाजन, आसावरी काकडे, सिसिलिया कार्व्हालो इत्यादी. स्त्रीत्वाचे, स्त्रीवादी जाणिवेचे, स्त्रीच्या विशिष्ट अनुभव-विश्वाचे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे, भिन्न भिन्न स्वरूपाचे चित्रण त्यांच्या कवितांत आढळते. व्यक्तिनिष्ठ तसेच सामाजिक-सांस्कृतिक वास्तवाचे थेट चित्रण करणार्‍या या कविता स्त्रीत्वाचा आत्मभानयुक्त स्वर आळवणार्‍या आहेत. बाईचे सामर्थ्य व अनेकविध क्षमतांच्या शक्यता सूचित करणार्‍या भविष्यवेधी कविता काही कवयित्रींनी लिहिल्या आहेत. बाईतील अपार करुणा, तिची सर्जनशीलता, नवनिर्मितीची क्षमता ही तिची बलस्थाने अनेक कवितांतून व्यक्त झाली आहेत. १९८०—९० च्या दशकांत स्त्रीवादी जाणिवेच्या काव्याचा प्रवाह लक्षणीय होता. स्त्रीकेंद्री काव्यलेखनाचे प्रमाण उत्तरोत्तर वाढतच गेले.
स्त्रियांच्या आत्मकथनांनी स्त्रीवादी साहित्यात मोलाची भर घातली आहे. उदा., सुनीता देशपांडे यांचे आहे मनोहर तरी (१९९०), कमल पाध्ये यांचे बंध अनुबंध ही आत्मकथने उल्लेखनीय आहेत.
दलित स्त्रियांची आत्मकथने ही स्त्रीवादी साहित्यातील एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. बेबी कांबळे ( जिणे आमचे ), कुमुद पावडे ( अंतःस्फोट ), शांताबाई कांबळे ( माज्या जलमाची चित्तरकथा ), मुक्ता सर्वगौड ( मिटलेली कवाडे ), ऊर्मिला पवार ( आयदान ), सिंधुताई सपकाळ ( मी वनवासी ) इत्यादींचे स्त्रीवादी साहित्याच्या संदर्भात महत्त्वाचे योगदान आहे. भारतीय व समाजशास्त्रीय अशा दुहेरी स्त्रीवादी भूमिकांतून त्यांचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे.
संदर्भ : 1. Buck, Claire, Ed. Bloomsbury Guide to Women’s Literature, London, 1992.
2. Gilbert, Sandra; Gubar, Susan, The Norton Anthology of Literature by Women, New York, 1985.
3. Moi,Toril, Sexual / Textual Politics : Feminist Literary Theory, Methuen, 1985.
4. Tharu, Susie; K. Lalita, Eds. Women Writing in India : 600 B. C. to the Present,Vol. I & II, New York, 1990; 1993.
५. नाईक, शोभा, भारतीय संदर्भातून स्त्रीवाद, मुंबई, २००७.
६. बोव्हार, सीमॉन द; अनु. गोखले, करुणा, द सेकंड सेक्स, पुणे, २०१२ .
७. भागवत, विद्युत, स्त्रीजन्माची वाटचाल, पुणे, २ ००४.
८. मेश्राम, केशव, संपा. वाङ्मयीन प्रवृत्ती : तत्त्वशोध  ड्ढडॉ. दादा गोरे गौरवग्रंथ  पुणे, २००७.
९. वरखेडे, मंगला, संपा. स्त्रीवादी समीक्षा : संकल्पना व उपयोजन, धुळे, १९९९.
१०. सारडा, शंकर, स्त्रीवादी कादंबर्‍या, पुणे, १९९३.
लेखक : श्री. दे. इनामदार ;  विद्युत भागवत
माहिती स्रोत :  मराठी विश्वकोश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शरद baviskar- भुरा

भूरा