मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

मधुकर केचे

*चित्रकथा 23
मी दहावीत असताना वर्ग वाचनालय पेटीचा प्रमुख होतो. आम्हाला 'अवांतर वाचना'चा विषय असावयाचा. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उत्कृष्ट पुस्तके वाचून त्याचा अभ्यास करावयाचा व त्यावरील  संभाषण किंवा लेखन करावयाचे... त्याला वर्गशिक्षक वर्षअखेरीस वही तपासून 'गुण' द्यावयाचे.... इंदिरा संतांची 'मेंदी' हा काव्यसंग्रह मी त्या वेळी वाचला व माझ्यावर शब्दार्थांची , अनुभूति, व निसर्गाच्या सौंदर्यची मोहिनी पडली. त्यानंतर महाविद्यालयात मधुकर केचेंचा काव्यसंग्रह 'दिंडी गेले पुढे' ने मी तसाच मोहून गेलो होतो. गोविंदाग्रज,  कुसुमाग्रज, भा. रा. तांबे यांनी ही मला मोहमयी केले होते. यापैकी काही कवींना आपण कधीकाळी भेटू शकू अशी पुसटशी ही शंका मला  नव्हती. परंतु कुसुमाग्रज, वसंत बापट, विंदा करंदीकर, शांता शेळके ,सुरेश भट,आणि मधुकर केचे यांच्याशी झालेली नंतरच्या काळातील प्रगाढ मैत्रीने माझे काव्यजीवनच मुळी हरखून गेले. मी 1966-80 च्या दरम्यान अनेक वेळा अमरावतीस बहिणीकडे गेलो की मधुकर केचेंच्या घरी हटकून जाई. मी व केचे गप्पागोष्टिंचा डाव टाकीत असू व तासनतास कवी आणि कविता यांवर बोलत असू. त्यांच्या 'दिंडी गेली पुढे'नी मी पुरता भारावून गेलो होतो. तुकारामाच्या अभंगांची अवीट गोडी अत्यंत लालित्यपूर्ण रितीने केच्यांनी आत्मसात करून आपल्या अभंगातून उतरविली. केच्यांच्या मनावर त्यावेळी तुकारामाचा जबरदस्त प्रभाव होता. त्यांच्या अभंग सदृश्य रचनेत त्यांनी तात्कालीन जीवनाचे भावोत्कट चित्रण उभे केले होते.
"टाळ मृदंग रंगत, राहो तुक्याच्या अभंग,
गोड आतून हाकेचा, नको दर्शनाने भंग"
या आत्मरंगात समर्पित झालेल्या त्यांच्या कवितेने तर मी जणू माखूनच गेलो होतो. 'देवचिया दारी, उभा क्षणभरी, तेणे मुक्ती धारी, साधीयेल्या' या रचनेत तर आत्मीय सुखाची परमावधी मी त्या काळी अनुभवली होती. ..केचे अगोदर ललित लेखक होते. राष्ट्रसंत तुकडोजी व गाडगे महाराजांचे चरित्रे त्यांनी अत्यंत प्रवाही भाषाशैलीत लिहून सर्वमान्य केली होती. त्यानंतर त्यांचे आलेले 'वऱ्हाडी मंडळी' या पुस्तकाने वऱ्हाडातील व्यक्तींचे यथायोग्य चित्रणपद्धतीने तर वाचक वर्ग स्मिमितच झाला होता. त्यातील एखाद्याचे चरित्र वाचून त्यांना भेटावयास गेलेली देशावरची माणसंही मला नंतरच्या काळात भेटली. त्यांच्या पुनवेचा थेंब, आसवांचा ठेवा आणि त्यानंतरच्या अंधाराच्या दारी या कविता संग्रहांनी तर मराठी काव्यविश्वाला एक नवा आयामच मिळाला होता. केचेंनी लघुकथाही लिहिल्या. 'आखर अंगण'मध्ये त्या प्रसिद्ध झाल्या. महात्मा गांधींच्या सेवाग्रामचे प्रवासवर्णन तर मी स्वतः लक्ष घालून किर्लोस्करचा सहसंपादक असताना त्या मासिकातून प्रकाशित केल्याचे मला आठवते. असे हे मधुकर केचे माझे चांगले सच्छिल मित्र कसे झाले ते मलाही कळले नाही. बार्शीच्या साहित्य संमेलनात (1980)आम्ही दोघेही एकत्र होतो. खूप जणांना भेटायचे, बोलायचे, थट्टामस्करी करत कांद्याची भजी तोंडात टाकायचे...हा कार्यक्रम आम्ही एकत्र राबविला..पुल देशपांडे ,बाबासाहेब पुरंदरे ,दुर्गा भागवत,पु.भा. भावे आणि सध्याची राजकीय स्थिती आणि साहित्यिकांची शेती यांच्यावर आमचा नर्मविनोद कायम चाले. त्यानी सांगितलेला  पुलंचा एक किस्सा तर  अजून माझ्या लक्षात आहे .तो किस्सा असा : प्रसिद्ध गायिका माणिकताई यांचा विवाह ,अमर वर्मा नावाच्या सद्गृहस्थाशी ठरल्याची बातमी जेव्हा पुलंना कळली, तेव्हा पुल उद्गारले, “ माणिकताईंनी तर वर्मावरच धाव घातला”..बार्शीचे हे २/३ दिवस तर अविस्मरणीयच !.. एकदा असाच अमरावतीला गेलो असताना त्यांच्या मनात काय आले कोणास ठाऊक, मला म्हणाले, "मुथा, आपण इतक्यांदा भेटलो.. बोललो.. पण आपला फोटोच  नाही... चला ,आपण फोटो काढून घेऊ या" असे म्हणत त्यांनी मला एका फोटो स्टुडिओत नेले व तेथे छायाचित्र काढले. ते हे चित्र. . केचे १९९३ मध्ये देवाघरी गेले..त्या वेळी मी पुण्याला होतो .बातमी कळताच मी तडक  अमरावतीला  गेलो. मुक्ता वहिनींचे सांत्वन मी काय व कसे करणार? सरळस्वभावी,समाजहितैषी,सौंदर्यगामी व बुद्धीगम्य वैचारिक प्रणालीचा स्विकारकेलेल्या केचेंच्या आठवणी मनात जागवत मी माघारी फिरलो . काव्यप्रवृत्तिला जपणारे त्यांचे अलवार मन सदा विचारबोध करीत असे.साहित्य हे जीवन जगण्याची एक अमोघ शैली व शक्ति आहे,असै त्यांचे मत हौते.2007 मध्ये  त्यांच्या साहित्यावर अमरावती विद्यापीठात पीएच्.डी. झाल्याचे कळले,व मलाच आश्चर्य वाटले कारण ,त्याच वर्षी माझ्या साहित्यावरही पुणे विद्यापीठामध्ये पीएच् .डी .झाली होती . याला म्हणतात निखळ मनस्वी मैत्री.! . त्या नंतरच्या काळातही मी  अमरावतीला गेलो की केच्यांच्या घरी जाणे चुकले नाही. मुक्ता वहिनी व त्यांची मुले अावर्जून वास्तपुस्त करतात. त्यांच्या आतिथ्याने व केचेंच्या दिलखुलास आठवणीने भारावूनच मी माघारी वळतो... त्यालाही आता बरीच वर्षे झाली...एकदा  अमरावतीस पुन्हा जाईन म्हणतो...

मधुकर केच्यांचे 'वेगळे कुटुंब'

Updated: 18 Sep 2011, 12:43 AM

ललित लेखन करताना केचे स्वत:ला विसरून कितीतरी पातळ्यांवर समोरच्या व्यक्तीला, त्याच्या एकूण अवकाशाला समजून घेऊन लेखन करतात...

>> श्रीकांत देशमुख

ललित लेखन करताना केचे स्वत:ला विसरून कितीतरी पातळ्यांवर समोरच्या व्यक्तीला, त्याच्या एकूण अवकाशाला समजून घेऊन लेखन करतात...............

मराठी भाषेतील लघुनिबंधांचा इतिहास जेमतेम पाच-सहा दशकाचा मानला जातो. आताशा ललित लेख हे या प्रकाराचे प्रस्थापित झालेले नाव. मराठीत ना. ग. गोरे, इरावतीबाई, करंदीकर, दुर्गाबाई, कुसुमावती, घाटे, भावे असे सुरुवातीच्या काळात ललितलेखन करणारे खूप महत्त्वाचे लेखक होते. वाचक आणि लेखक यांच्यातला कलात्मक सुखसंवाद म्हणून हलकाफुलका, वेळप्रसंगी अंतर्मुख करणारा हा वाङ्मयप्रकार मला तरी आवडतो.

अलीकडच्या काळातील प्रकाश नारायण संत, महेश एलकुंचवार, श्रीनिवास कुलकणीर्, अशोक कोतवाल, दासू वैद्य यांनी केलेलं ललित लेखन असंच खिळवून ठेवणारं. या साऱ्या मंडळीत मधुकर केचे हे आणखी एक माझ्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचं नाव. केच्यांचं लेखन आवडणारा मर्यादित का होईना वाचकवर्ग अजूनही टिकून आहे. मधुकर केच्यांचे लेखन गावाबाजूच्या टेकडीवर बसून साध्यासरळ गोष्टी साध्यासरळ शब्दांत सांगाव्या तसे. उत्तम दर्जाचा ललित लेखक आणि लेखन कोणते याविषयी 'मौनराग'मध्ये 'परिशिष्टातील राग ललित' या लेखात महेश एलकुंचवार यांनी केलेली मांडणी प्रत्येक लेखक, कलावंताने मन:पूर्वक वाचावी अशी आहे. अनुभवाचे अस्सलपण आणि आशय फारसा नसला की माणसे कृतक लिहू लागतात, या एलकुंचवारांच्या विधानाची प्रचिती देणारे लेखन खूपदा आपण वाचतो. अशावेळी केच्यांचे ललित लेखन वाचावे आणि त्यातील अभिजात अस्सलपणासोबतच अनुभवाला मोठे करणारे लेखकपणही समजून घ्यावे, इतके ते महत्त्वाचे आहे.

१९६०-६१च्या दरम्यानच्या मढेर्करोत्तर काळात संतपरंपरेशी अनुवांशिक नाते सांगणारी गंभीर कविता केच्यांनी दिली. दुदैर्वाने या कवितेकडे आणि त्यांच्या एकूणच लेखनाकडे अनेकांचे जावे तेवढे लक्ष गेले नाही. 'वेगळे कुटुंब', 'आखर आंगण', 'पालखीच्या संगे' ही केच्यांची छोटेखानी ललित लेखांची पुस्तकं. १९६५ साली काढलेल्या 'वेगळे कुटुंब'ची पहिल्या आवृत्तीनंतर दुसरी आवृत्ती निघाली नाही असे कळते. माझ्याकडल्या प्रतीची पानं वाचता-वाचता सुटी झाली, काही तुकडेही पडले म्हणून खूप अस्वस्थतेच्या काळात मनाला आधार देणारे जवळ काही चांगले असावे म्हणून त्याचे झेरॉक्स मी माझ्यापुरते करून ठेवलेय. त्यामुळं त्यातल्या पानांचं वय तात्पुरतं तरी झाकलं गेलं.

एकूण बारा लेखांचा, एकशेतीस पानांचा हा ललित लेखसंग्रह. 'वेगळे कुटुंब' हा सेवाग्रामच्या गांधी आश्रमावरचा, परिवारावरचा अतिशय देखणा लेख. सिंग नावाचे एक गृहस्थ, प्रो. भन्साळी, चंदप्रकाशजी, आर्यनायकम्, शांताबेन अशा अनेकांची ओळख हा लेख वाचताना होते. गांधींमध्ये विलीन होऊनही यातला प्रत्येक माणूस गांधींपेक्षा वेगळा आणि न खुरटलेला वाटतो. खरं म्हणजे नुस्ते म. गांधींना वाचून, ऐकून गांधी आणि गांधीवाद कधी समजणार नाही. बापूसोबत रहाणारे त्यांचे कफल्लक, सर्वस्व अर्पण केलेले सहकारी ही देखील फार मोठी शक्ती होती याचा प्रत्यय हा लेख वाचताना होतो. या संग्रहात बहुतेक व्यक्तिचित्रेच आहेत. 'श्री गाडगेबाबा' हा लेख तर बाबांवरची एखादी कादंबरी वाचल्यानंतर येणारे शहाणपण देणारा लेख आहे. बाबांचं जगणं, तत्त्वज्ञान, त्यांच्यात बुडालेला वऱ्हाड, कीर्तनाची शैली या साऱ्यांची केच्यांनी करून दिलेली ओळखही बाबांच्या कीर्तनाच्या शैलीसारखीच. या लेखाचा शेवट वाचून माझ्या तर डोळ्यात पाणी आलं. वाचून येवढं अस्वस्थ व्हायला मला आजही आवडतं.

'श्री आडकुजी महाराज' हा तुकडोजींच्या गुरूवरचा लेख. कर्मयोग आणि भक्तियोगाचे मिश्रण तुकडोजींमध्ये कुठून आले याची खूप साधीसरळ मांडणी केच्यांनी केलीय. वाया गेलेल्या मागच्या पिढीचे प्रतिनिधी असलेले तुकडोजींचे वडील बंडोजी, त्यांच्या विचित्र वागण्याची संगती केच्यांनी त्यांना, त्यांच्या दारिद्याला समजून घेऊन लावली आहे. लहानपणी मुलाला, बायकोला देशोधडी लावणारा हा म्हातारा मरताना मात्र तुकडोजी येईपर्यंत जीव सोडत नाही. धर्मानंद कोसंबी या प्रकांडपंडितावर प्रेम करणारे लोक सुदैवाने आजही आहेत. कोसंबी हे 'मरायला' गांधी आश्रमात आले. सेवाग्राम आश्रमातले कोसंबींचे येणे, राहणे आणि मरणे आपणही अनुभवून जातो, असे केच्यांचे हे लेखन. 'दादाजी' हा त्यांच्या वडिलांवरचा लेख. दादाजी घरी येत नसत पण त्यांचे अस्तित्व साऱ्या घरावर राही. गाडगेबाबांच्या लेखा-प्रमाणेच दादाजींचा मृत्यूही अस्वस्थ करणारा आहे.

एखाद्या कलावंताला त्याच्या मनस्वीपणासह कसं समजून घ्यावं याचा प्रत्यय केच्यांचा, 'ओघावेगळा सुरेश भट' हा लेख वाचून येतो. भट आणि केचे हे समकालीन. समकालीन कवी-लेखकावर कसे लिहावे याचा वस्तुपाठ म्हणजे हा लेख. डोमाकाका, पंजाबराव देशमुख, पी. के. देशमुख, सौ. कुसुमावती देशपांडे, माझी माय ही सारीच व्यक्तिचित्रे मुळातून पुन्हा पुन्हा वाचावी अशी आहेत. ललित लेखन करताना केचे स्वत:ला विसरून कितीतरी पातळ्यांवर समोरच्या व्यक्तीला, त्याच्या एकूण अवकाशाला समजून घेऊन लेखन करतात. अतिशय साध्या शब्दांतून केलेली मांडणी, वऱ्हाडी भाषेचा, वागण्याचा गोडवा आणि थेटपणा या साऱ्यांचा अतिशय देखणा आणि नैसगिर्क प्रत्यय देणारे केच्यांचे ललित लेखन, आलेल्या अनुभवाबद्दल एलकुंचवारांच्या भाषेत कृतज्ञता व्यक्त करणारे. नम्र होणारे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रज्ञा दया पवार - परिचय

प्रज्ञा दया पवार (जन्म ११ फेब्रुवारी, १९६६) यांनी सुरुवातीचे लेखन प्रज्ञा लोखंडे नावाने केले आहे. या मराठी कवयित्री आणि लेखिका आहेत. पाक्षिक...