बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

कार्ल मार्क्स समजून घेताना…


कार्ल मार्क्स समजून घेताना…




आजवर या जगावर अनेक विचारवंत, कलाकार, राज्यकर्ते, लेखक इत्यादींनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे, चांगला किंवा वाईट प्रभाव टाकला. त्यातूनच आजचा समाज घडला. आपल्या समाजाच्या सद्यस्थितीस कारणीभूत असलेले कित्येक विचारवंत आपल्याच नव्हे तर इतिहासाच्या देखील विस्मृतीत गेले आहेत. काही व्यक्ती असतात ज्या या कालपटलावर आपल्या विचारांनी स्वतःच एक अढळ स्थान निर्माण करतात. त्यातलाच एक विचारवंत म्हणजे कार्ल मार्क्स!
आजच्या जगावर ‘न भूतो, न भविष्यती’ असा प्रभाव टाकणार्‍या मार्क्सला तटस्थपणे समजून घेणं खूप आवश्यक आहे. आजचे तथाकथित लेखक, विचारवंत एक तर मार्क्सच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत किंवा त्याच्या द्वेषात अंध तरी आहेत. त्यामुळे आजच्या जगात कालबाह्य ठरलेल्या उजव्या-डाव्या विचारसरणीच्या परीघाबाहेरून त्याचा उहापोह करणे अत्यावश्यक आहे. मार्क्सला समजून घेण्यासाठी त्याच्या विचारांचा कालसापेक्ष विचार केला गेला पाहिजे. ज्या काळात त्याने त्याचे विचार मांडले त्या काळातील सामाजिक, राजकीय, भौगोलिक, आर्थिक परिस्थितींचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.
मार्क्सचा सुरुवातीचा काळ
कोणाही व्यक्तीची वैचारिक जडण-घडण समजून घेताना त्याचा जीवनप्रवास, त्याच्यावर असलेला विविध विचारवंतांचा प्रभाव, सदरहू व्यक्तीचे असलेले समाजाबाबतचे आकलन इत्यादी अनेक गोष्टींचा सविस्तर अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.
कार्ल मार्क्सचा जन्म 5 मे 1818 रोजी जर्मनीमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मार्क्सचं जवळपास सर्वच शिक्षण जर्मनीमध्येच झालं. महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच त्याने फ्रेंच राज्यक्रांती, बेल्जिअन राज्यक्रांती, पोलंडचा उठाव इत्यादींचा सखोल अभ्यास केला. पदवीनंतर त्याने वडिलांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ‘बॉन विद्यापीठात’ प्रवेश घेतला. तेथेच त्याची त्याच्या भावी बायकोशी ‘जेनी वोन वेस्टफालन’ हिच्याशी ओळख झाली. पुढे बर्लिन विद्यापीठातून त्याने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. याच काळात तो हेगेलच्या विचारप्रवाहात सामील झाला. हेगेलच्या विचारांचा त्याने अत्यंत बारकाईने अभ्यास केला. दरम्यानच्या काळात त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.
पुढे मार्क्सने लोकशाही, समाजवादी, भांडवलशाही, निसर्ग, इतिहास, आर्थिक व सामाजिक तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. त्याच्या संशोधनाबद्दल जेना विद्यापीठाने त्याला पहिली डॉक्टरेट प्रदान केली. याच काळात तो एका स्थानिक वृत्तपत्राचा मुख्य संपादक म्हणून काम पाहत होता. या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून सामान्यांचे, कष्टकरी समाजाचे प्रश्‍न तो हिरीरीने सर्वांसमोर मांडून अल्पावधीतच नावारूपाला आला. सुरुवातीच्या काळात लोकशाही मार्गाने क्रांतीची भाषा करणारे त्याचे अग्रलेख हळूहळू विखारी रूप घेऊ लागले आहेत हे ध्यानात येताच तत्कालीन सरकारने त्याच्या वृत्तपत्रावर बंदी आणली. त्याच्या सर्व लेखांवर, भाषणांवर सरकारी अधिकारी कडक लक्ष ठेवून असल्यामुळे त्याला जर्मनीत राहून चळवळ उभी करणं अशक्य झालं होतं. जून 1843 मध्ये मार्क्सने जेनीसोबत विवाह करून जर्मनीला रामराम केला व फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरीसमध्ये स्थायिक झाला. तेथेच एका नियतकालिकासाठी काम करू लागला.
संपादक म्हणून काम पाहत असताना मार्क्सची ओळख ‘फ्रेडरिक एंगल्स’ याच्याशी झाली, जो आयुष्यभरासाठी त्याचा वैचारिक सहकारी बनून राहिला. त्यानंतर पॅरिसमध्ये मार्क्स आणि एंगल्सच्या वारंवार भेटी आणि चर्चा घडू लागल्या. कामगारांच्या भावना भडकविण्याच्या आरोपाखाली जर्मन सरकारच्या दबावामुळे मार्क्सची पॅरीसमधून हकालपट्टी केली. नंतर तो परिवारासोबत आणि एंगल्ससोबत ब्रुसेल्स इथं स्थायिक झाला. तिथूनच त्यांनी मिळून इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास केला. सन 1846 साली ब्रुसेल्समध्येच त्यांनी पहिल्या साम्यवादी समितीची स्थापना केली. त्यानंतर इंग्लंडवरून कामगार हक्कांसाठी काम करणार्‍या एका संघटनेने मार्क्स आणि एंगल्सला इंग्लडला येण्याचे आमंत्रण दिले; जे त्यांनी स्वीकारलं. पुढे त्यांनी त्या संघटनेचं नाव बदलून ‘कम्युनिस्ट लीग’ असं ठेवलं.
दरम्यानच्या काळात युरोपमध्ये उदारमतवादी लोकांच्या वर्तुळात मार्क्सच्या कम्युनिझमबद्दल बरीच उत्सुकता वाढली होती; म्हणून त्याने सन 1848 मध्ये एंगल्सच्या बरोबरीने ‘कम्युनिस्ट मनीफिस्टो’ प्रकाशित केला. ज्यात साम्यवादाच्या मूळ विचारसरणीची तत्त्वे विषद केली आहेत.
जुलमी भांडवलशाहीने ग्रासलेल्या युरोपच्या कामगारांना मार्क्सच्या विचारांमध्ये एक आशेचा किरण दिसू लागला. मार्क्सला युरोपच्या कानाकोपर्‍यातून व्याख्यानासाठी बोलावलं जाऊ लागलं. अनेक कारखान्यांमध्ये कामगार संघटना सक्रीय होऊ लागल्या. कामगार हक्कांसाठी आंदोलने करू लागले. काही ठिकाणी सशस्त्र आंदोलने देखील झाली. दरम्यानच्या काळात त्याला त्याच्या लिखाणामुळे बर्‍याच कोर्टाच्या वार्‍या घडल्या होत्या. मार्क्सने विज्ञान, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, इतिहास इत्यादी शाखांचा सखोल अभ्यास केला होता. 14 मार्च 1883 रोजी त्याचं निधन झालं. हा झाला मार्क्सचा एकंदर जीवनप्रवास. आता मार्क्सकालीन सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती काय होती याचा अभ्यास केल्यानंतर मार्क्सची भूमिका समजून घेता येईल.
त्याकाळात राजसत्ता, अर्थसत्ता आणि न्यायसत्ता ही मूठभर लोकांच्या हाती एकवटलेली होती. सामान्य जनता या सगळ्या कुचकामी, मस्तवाल समाजव्यवस्थेत भरडून निघत होती. श्रीमंतांसाठी वेगळे कायदे असत. कामाचा योग्य मोबदला देखील मिळत नसे. त्याचबरोबर राजसत्ता सतत होणार्‍या परकीय आक्रमणामुळे अस्थिर देखील असत. त्यामुळे समाजाचे अनन्वित हाल होत असत. नंतरच्या काळात इंग्लडमध्ये औद्योगिक क्रांतीची बीजं रोवली गेली. माणसाचं काम हलकं करणारी यंत्रं आली, कामाचा वेग वाढून देशाची उत्पादकता वाढीस लागेल असे अंदाज बांधले जाऊ लागले; पण औद्योगिक क्रांती हीदेखील सामान्य माणसाला मृगजळ बनून राहणार होती. हे एक विदारक सत्य होतं, कारण आधीच धनदांडगे असलेल्या सामंतादी लोकांकडेच कारखानदारी आली. पर्यायाने पैसा त्यांच्याकडेच एकवटला.
मार्क्सच्या जन्माअगोदरच इंग्लडमध्ये सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीचं लोण युरोपभर पसरलं होतं. मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालाला मागणी होती. तेवढ्याच मोठ्या प्रमाणात कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी कामगारांची आवश्यकता होती. शेतीतून मिळणारे उत्पन्न आजच्याप्रमाणे तेव्हाही बेभरवशी होतं. त्याचबरोबर आजच्यापेक्षा अधिक कष्टप्रद देखील होतं. नवीन पिढीला शेतीत रस नव्हता. शाश्वत आणि नियमित अर्थार्जनाच्या अपेक्षेने आणि शहराच्या जीवनशैलीला भुलून अनेक युवक शहरात स्थलांतरित झाले. शहरात कारखान्यात कामगारांची आवश्यकता तर होतीच. अशा अनेक कारणांनी झपाट्याने शहरीकरण झाले. कामगारांची संख्या वाढू लागली. कारखान्यांचं उत्पन्न झपाट्याने वाढलं. खेड्यातील लोकांनी मोठ्या प्रमाणात शहरी भागात स्थलांतर केल्यामुळे रोजगाराचा तुटवडा जाणवू लागला. गरजेपेक्षा अधिक मजूर उपलब्ध झाल्यामुळे तत्कालीन कारखानदारांची मुजोरी वाढली. कामगारांचे वेतन मनमानीने ठरविण्यात येत असे. दिलेल्या तुटपुंज्या वेतनात कामगारांकडून अतिरिक्त काम करून घेण्यात येई. अतिशय तुटपुंज्या अर्थार्जनामुळे कामगारांची परिस्थिती अतिशयच हलाखीची झाली होती. कसल्याही निचर्‍याची व्यवस्था नसलेल्या वस्त्यात राहून कामगारांचा व त्यांच्या परिवाराच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला होता. त्याचबरोबर त्यांची मूलंदेखील शिक्षणापासून वंचित राहत व पुढे चालून त्याच कारखान्यात त्यांना काम करावे लागत असे.
अशा अनेक समस्यांना कामगारवर्गाला सामोरं जावं लागत असे. कामगारांचे प्रश्‍न जाणून घेण्यात, त्यांना सोडविण्यात कोणाचेही स्वारस्य नव्हते. ते असण्याचे काही कारणदेखील नव्हते. कामगार हे फक्त काम करण्यासाठीच असतात अशीच तत्कालीन समाजाची धारणा होती. त्यातूनच त्यांच्या मनात असंतोषाची बीजं पेरली गेली. या असंतोषाला कोणतेही वैचारिक, आर्थिक, नैतिक, सामाजिक पाठबळ नव्हते म्हणून या संघर्षाची ठिणगी पडण्यासाठी शतकाहून अधिक काळ जावा लागला. कालांतराने कामगारांच्या मनात संघर्षाची, क्रांतीची भावना कुठे तरी पेट घेत होती.
याच काळात मार्क्स इतिहास, लोकशाही आणि समाजशास्त्राचा अभ्यास करत होता. समाजाचा अभ्यास करताना त्याने कामगार, मध्यमवर्ग आणि भांडवलदार यांचा सखोल अभ्यास केला. कारखानदारांचं अर्थशास्त्र अभ्यासल्यावर कामगारांची होणारी आर्थिक पिळवणूक त्याच्या ध्यानात आली. त्याने त्यावर ‘दास कॅपिटल’ या त्याच्या बहुचर्चित ग्रंथात सविस्तर मांडणी केली. त्याने सुरुवातीला कामगारांच्या हक्कांसाठी समाजवादाचा पुरस्कार केला. तत्कालीन समाजवादी नेत्यांच्या कचखाऊपणामुळे अथवा भांडवलशाही धार्जिणेपणामुळे समाजवादाचा उदोउदो करून देखील काही हाती लागत नव्हतं हे मार्क्सच्या ध्यानात आलं.
कामगारांच्या भल्यासाठी काहीतरी कठोर पाऊल उचलावं लागणार याची मार्क्सला जाणीव झाली. त्याने त्याच्या वैचारिक सहकारी फ्रेडरिक एंगल्सबरोबर साम्यवादाचा प्रबंध लिहिला, जो वर्गसंघर्षावर आधारित होता. मार्क्सच्या भांडवलशाही विरोधी विचारांमुळे तत्कालीन फ्रान्स, जर्मन, बेल्जिअन इत्यादी देशांच्या सरकारांनी त्याला निष्काशित केल होतं आणि मृत्युसमयी मार्क्सकडे कोणत्याही देशाचे नागरिकत्व नव्हते. कामगारांना अपेक्षित असलेली किंवा शक्य असलेली क्रांती फक्त बंदुकीच्या गोळीतूनच मिळू शकणार होती. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तत्कालीन कारखानदारांकडे वर्षानुवर्षे चालत आलेली राजेशाही, सामंतशाही त्यातून उत्पन्न झालेला माज. स्वतः उच्च असण्याचा अहंगंड व सगळे जगच आपल्याला काहीतरी देणं लागतं अशी निर्माण झालेली भावना. अशा लोकांकडून सनदशीर मार्गाने आपली कधीच नसलेली गोष्ट नैतिकतेच्या आधारावर मागून घेणं अशक्य होतं. त्यासाठी एक क्रांतिकारी लढा उभारणं आवश्यक होतं.
सुरुवातीच्या काळात मार्क्सने दोन्ही वर्गांचा त्यांच्या आर्थिक आणि मानसिक अवस्थांचा अभ्यास केल्यानंतर त्याला समानता आणण्यासाठी वर्गसंघर्षाखेरीज पर्याय दिसत नव्हता. त्याने कामगारांच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी एक वैचारिक अधिष्ठान बनवलं. दरम्यानच्या काळात विविध वर्तमानपत्रातून, नियतकालिकांमधून, विविध व्याख्यानांमधून आपले विचार जगासमोर सातत्याने मांडत होता. मार्क्सच्या विचारांनी प्रेरित होऊन ठिकठिकाणी कामगार संघटना अस्तित्वात येऊ लागल्या. न्याय्य मागण्या ते मालकांच्या पुढे मांडू लागले. हीच मार्क्सच्या कामाची आद्य फलश्रुती म्हणता येईल. मार्क्सचे लेख वाचताना एक गोष्ट सातत्याने लक्षात येते ती म्हणजे मार्क्सला समता अपेक्षित आहे! परंतु त्याकाळात (जेव्हा आपण औद्योगिक क्रांतीच्या नंतरचा काळ विचारात घेतो) त्याला अपेक्षित असलेली समता शांततापूर्ण मार्गाने आणणे शक्य नव्हते. म्हणून त्याने हिंसेचे समर्थन केले. मार्क्स हयात असताना इंग्लंड, फ्रान्समध्ये काही ठिकाणी शांततापूर्ण व काही ठिकाणी हिंसक कामगार आंदोलने झाली; परंतु मार्क्सच्या हयातीत त्याच्या स्वप्नातील संघटीत कामगार क्रांतीचा लढा उभारणं मार्क्सला शक्य झालं नाही.
संपूर्ण जगाला दखल घ्यावी लागली अशी पहिलीसंघटीत कामगार चळवळ रशियामध्ये उभी राहिली. ‘रशियन राज्यक्रांती’. जी 1917 सालात घडली. म्हणजे मार्क्सच्या मृत्युपश्चात जवळ पास 30-32 वर्षांनी. मार्क्सने इंग्लडमध्ये साम्यवादी क्रांती घडवून आणण्याचे प्रयत्न केले असून देखील कामगारक्रांतीचा वनवा रशियामध्येच का पेटला याचा विचार करणे आवश्यक आहे. रशियात साम्यवादी क्रांती झाली पण ती मार्क्सच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन झालेली लेनिनवादी क्रांती होती. जी पुढे ट्रोटस्कीच्या निष्कासनानंतर स्टालिन प्रणीत हुकुमशाहीमध्ये परावर्तीत झाली आणि पुढे साम्यवादी रशियाचा जो काही प्रवास आहे तो सर्वश्रुत आहे. कामगार हक्कांच्या वल्गना करत, कामगारांना अच्छे दिनचे आमिष दाखवून, क्रांतीच्या खडतर मार्गाने सत्तेवर आलेल्या साम्यवादाने जगाला किंवा रशियाला काय दिले याच्यापेक्षा कामगारांना काय दिले याचा विचार करणे आवश्यक आहे. क्रांतीनंतर कामगारांना औटघटकेचं सुख नक्कीच मिळालं पण परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ म्हणण्यापेक्षा ‘आगीतून फुफाट्यात’ आल्यासारखी झाली.
कामगारांना समोर ठेवून आपलं उभं आयुष्य त्यांच्या कल्याणाचा विचार करण्यात घालविणारा मार्क्स सुदैवाने तेव्हा हयात नव्हता. अन्यथा मार्क्स त्याच्या विचारांची होळी आणि कामगारांचे हाल कदाचित पाहू शकला नसता; परंतु कामगारांच्या या संघटीत लढ्याने कामगारही देशाचा अविभाज्य आणि महत्त्वाचा घटक व प्रसंगी तोदेखील सत्तापालट घडविण्यास कारणीभूत ठरू शकतो हे जगाला दाखवून दिलं. त्यानंतरच्या जागतिकीकरणाच्या काळात कामगार कायदे अस्तित्वात आले. लोकशाहीने त्यांना समान अधिकार दिले. आजच्या कामगाराला समाजात बरोबरीचं स्थान मिळालं आहे म्हणून आता मार्क्स प्रणीत साम्यवाद व त्यातला वर्गसंघर्ष कालबाह्य झाला आहे.
फक्त रशिया मधलीच नाही तर इतर ठिकाणच्या साम्यवादी क्रांतीची देखील अशीच दूरवस्था होत गेली. म्हणजे मार्क्सचा कागदावर आदर्शवादी वाटणारा विचार जिथं कुठं व्यावहारिक जीवनात अमलात आणला त्या ठिकाणची परिस्थिती आणखीनच खराब होत गेली, असा इतिहास आहे. पुढे चीनमध्ये माओने तर त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं व त्याच्याच विचारातून सुजलाम सुफलाम भारताच्या जंगलामध्ये नक्षलवाद नावाच्या लालराक्षसाने जन्म घेतला. जो आजवर देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सलणारी भळभळती जखम बनून आहे.
मार्क्सचे विचार व्यावहारिक जीवनात का टिकून राहू शकले नाहीत याचं अनेक महत्त्वाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे हातात सत्ता असल्यानंतरच्या मानवी वृत्तीचे आकलन करण्यात मार्क्स सपशेल अपयशी ठरला व सत्ता पालटाचे कोणतेही सूत्र मांडणे त्याला महत्त्वाचे वाटले नाही. एकंदर काय तर मार्क्सचे विचार कागदावर कितीही क्रांतिकारी भासले तरी ते व्यावहारिक जीवनात काळाच्या कसोटीवर व मानवी प्रवृत्तीपुढे टिकू शकले नाहीत हे उघड सत्य आहे.
मार्क्स आणि एकविसावे शतक
मार्क्सचा एकंदर विचारच वर्गसंघर्षावर आधारित आहे. मार्क्सच्या स्वप्नातील साम्यवाद येण्यासाठी समाजात असंतोष असणे अत्यंत गरजेचे आहे व त्याचबरोबर प्रस्थापित व्यवस्था खिळखिळी असायला हवी. अन्यथा साम्यवादी क्रांती करणे अशक्य आहे. ज्या कामगारांचा मसीहा बनून मार्क्स आला होता ते कामगार आज संविधानाने दिलेल्या लोकशाहीमध्ये कामगार कायद्यांच्या संरक्षणाखाली सुखी आहेत. त्यांना कोणत्याही मृगजळाची आता गरज उरलेली नाही. मार्क्सवाद आज केवळ कागदावर शिल्लक आहे. तसे म्हणायला 5 देशांमध्ये साम्यवाद मोडक्या तोडक्या अवस्थेत तग धरून आहे.
एक गोष्ट आपण नेहमी ध्यानात ठेवायला हवी की लोकशाहीला केवळ लोकशाहीच पर्याय ठरू शकते आणि लोकशाहीतच मानवाच्या स्वातंत्र्याची शाश्वती आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जादवपूर विद्यापीठ इत्यादी ठिकाणी माओवाद्यांनी देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप असूनही आज ते देशभर मोकळे फिरू शकतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एवढं मोठं उदाहरण केवळ लोकशाहीमध्येच असू शकतं. साम्यवादी देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या होणार्‍या गळचेपीवर तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग देखील मौन बाळगून असतो.
आज भारतातील कम्युनिस्टदेखील त्यांचं कम्युनिस्ट पण विसरून लोकशाहीच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. यावरून आपल्याला आपण अनुभवत असलेल्या लोकशाहीच्या सौंदर्याची कल्पना येऊ शकेल.
 अक्षय बिक्कड, लातूर
8975332523

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...