केशवसुत
जन्म : ७ ऑक्टोबर १८६६
मृत्यू : ७ नोव्हेंबर १९०५
आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी. पूर्ण नाव कृष्णाची केशव दामले. काव्यरत्नावली ह्या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून ‘केशवसूत’ या टोपण-नावाचा स्वीकार केला. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुड ह्या गावी. शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठिकाणी. शिक्षणकालातच १८८० मध्ये त्यांचा विवाह झाला. मॅट्रिकनंतर (१८८९) मुंबईला १८९७ पर्यंत निरनिराळ्या हंगामी नोकऱ्या केल्या. पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले. आरंभी भडगावच्या नगरपालिकेच्या शाळेत दुय्यम शिक्षकाची नोकरी केली. १९०१ पासून फैजपूरला मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९०४ मध्ये धारवाडच्या सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून बदली झाली. १९०५ साली हुबळीला गेले असताना प्लेगने त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागून आठच दिवसांनी त्यांची पत्नीही मरण पावली.
केशवसुतांनी विद्यार्थिदशेतच काव्यलेखनास आरंभ केला असला, तरी त्यांचा मुख्य काव्यरचनाकाल १८८५ ते १९०५ हाच होय. या काळातील त्यांच्या सु. १३५ कविता आज उपलब्ध आहेत. नागपुरास असताना रेव्ह. टिळक व कवी वसंत यांचा सहवास त्यांना लाभला होता. काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. या प्रयत्नात प्रारंभीच्या संस्कृत काव्याचा आदर्श अल्पकालीन ठरला व पूर्वकालीन मराठी काव्य प्रभावशून्य ठरले.परंतु इंग्रजीतील स्वच्छंदतावादी मनोवृत्तीच्या वर्ड्स्वर्थ, शेली आणि कीट्स यांसारख्या कवींचे काव्य मात्र त्यांना प्रेरक व अनुकरणीय वाटले. इंग्रजी अभ्यासक्रमातून व वि. मो. महाजनींनी विविधज्ञानविस्तारातून प्रकाशित केलेल्या भाषांतरांवरून इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्य त्यांस काहीसे परिचित झाले होते. त्या काव्याच्या चिंतन मननातून केशवसुतांनी आत्मलेखनात्मक स्फुट भावकविता लिहिली व मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्माविष्काराचे नवे व क्रांतिकारक वळण दिले. त्यांच्या काव्यात व्यक्तिगत स्नेहसंबंध, कवी व कवित्व, स्त्रीपुरुषांतील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ (सक्षात्कारी) अनुभूती अशा विविध विषयांवरील भावानुभवांचा आविष्कार आढळतो. एका दृष्टीने स्वच्छंदतावादी मनोवृत्तीचाच विविध रूपांनी झालेला हा आविष्कार आहे. ह्या मनोवृत्तीचा आविष्कार मराठी काव्यक्षेत्रात निश्चितच क्रांतिकारक ठरला; म्हणूनच केशवसुतांच्या, संख्येने अल्प असलेल्या प्रत्येक प्रकारच्या काव्यरचनेला नंतरच्या काळात स्वतंत्र परंपरा लाभू शकली.
नवीन काव्याबरोबरच काव्यविषयक नवा दृष्टिकोन व नवी अभिरुची निर्माण करण्याची जबाबदारी नव्या कवींवर पडते. केशवसुतांनी अशा जबाबदारीने लिहिलेल्या कवितांपैकी, ‘स्फूर्ति’ (१८९६), ‘कवितेचे प्रयोजन’ (१८९९), ‘आम्ही कोण?’ (१९०१) आणि ‘प्रतिभा’ (१९०४) या महत्त्वाच्या आहेत. व्यापक मानवी जीवनाच्या संदर्भात कवी व कवित्व यांच्या कार्याची आदर्शवादी भूमिका केशवसुतांनी मांडलेली असल्यामुळे त्या भूमिकेत चिरंतन प्रेरकता जाणवते. त्यांच्या निसर्गविषयक कवितांवर वर्ड्स्वर्थ व एमर्सन यांच्या विचारांचा परिणाम झालेला दिसतो. सृष्टीतील सौदर्य काव्याला प्रेरक ठरते व तीत मानवी जीवनातील विषमतेचा अभाव असल्याने निसर्गसहवास सुखद ठरतो, अशा दृष्टीने केशवसुत निसर्गाकडे बघतात. ‘भृंग’ (१८९०), ‘पुष्पाप्रत’ (१८९२) व ‘फुलपांखरूं’ (१९००) या त्यांच्या काही महत्त्वाच्या निसर्गकविता होत. प्रेमविषयक आत्मनिवेदन करणाऱ्या कविताही केशवसुतांनी लिहिल्या. क्रांतिकारक सामाजिक विचार ओजस्वीपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या प्रसिद्ध कविता म्हणजे, ‘तुतारी’ (१८९३), ‘नवा शिपाई’ (१८९८) व ‘गोफण केली छान’ (१९०५) या होत. त्यांच्या सामाजिक विचारसरणीची मुख्य तत्त्वे स्वातंत्र्य, समता, बंधुता व विशाल मानवतावाद ही आहेत. विशेष म्हणजे पृथ्वीला ‘सुरलोकसाम्य’ प्राप्त करून देण्याचे एक महान स्वप्न त्यांच्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहिले होते. त्याचाही निर्देश त्यांच्या काही कवितांतून आढळतो. गूढ अनुभूती व तिची नावीन्यपूर्ण अभिव्यक्ती असलेली ‘झपूर्झा’ (१८९३) ही त्यांची कविता विशेष गाजली. त्यांच्या अन्य गूढगुंजनात्मक कवितांत ‘म्हातारी’ (१९०१) व ‘हरपले श्रेय’ (१९०५) यांचा समावेश होतो. शैलीच्या द्दष्टीने केशवसुतांच्या काव्यात लालित्य कमी आहे; पण काहीशी राकट आणि रांगडी अभिव्यक्ती त्यांच्या काव्यप्रकृतीशी सुसंगत ठरते.
केशवसुतांनी काव्याच्या बाह्यांगातही परिवर्तन घडवून आणले. काव्याची खरी प्रकृती कथनाची व वर्णनाची नसून आत्मलेखनाची आहे; असे आत्मलेखन एकेका उत्कट अनुभूतीचे असते व म्हणून ते स्फुट स्वरूपाचे ठरते; अशा स्फुट आविष्कारासाठी गणवृत्तांपेक्षा मात्रावृत्तेच अधिक अनुकूल असतात, हे सर्व त्यांनी दाखवून दिले. इंग्रजी काव्यातील सुनीत हा छंदःप्रकार त्यांनी मराठीत प्रथमच रूढ केला. शिवाय काही नवीन मात्रावृत्तेही त्यांनी प्रचलित केली.
आयुष्याच्या शेवटीशेवटी आपली काव्यशक्ती नष्ट झाल्याची जाणीव त्यांस झाली होती, असे त्यांच्या एका पत्रावरून वाटते. काव्याशिवाय एक गद्य नाटकही त्यांनी लिहिले होते; पण ते अप्रसिद्ध आहे. काही इंग्रजी कविताही त्यांनी रचल्या होत्या.
केशवसुतांचा काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर हरि नारायण आपटे यांनी १९१६ मध्ये प्रकाशित केला. गोविंदाग्रज, बालकवी, रेंदाळकर, सोनाळकर, काव्यविहारी यांसारखे कवी स्वतःला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत. ‘तुतारी-मंडळ’ या नावाचे एक मंडळही स्थापन झाले होते.
केशवसुत हे आधुनिक मराठीतील सर्वांत जास्त वादग्रस्त कवी आहेत. त्यांचे कवित्व, कवीपण, काही दृष्टिकोन, काही कविता, क्रांतिकारकत्व व श्रेष्ठत्व हे सर्वच वादाचे विषय ठरले. एकांगी समीक्षेने पुष्कळदा अशा वादांचा जन्म होतो. ही वादग्रस्तता केशवसुतांच्या श्रेष्ठत्वाचाच एक पुरावा होय. केशवसुतांनंतरच्या गेल्या सत्तर–ऐंशी वर्षांत आधुनिक मराठी काव्यात कितीतरी परिवर्तने व प्रयोग झाले, तथापि केशवसुतांच्या काव्याची प्रेरकता व महत्त्व ही कायमच राहिली.
महाराष्ट शासनातर्फे १९६६ मध्ये केशवसुतांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने केशवसुतांच्या काव्यसंग्रहाच्या हस्तलिखिताची यथामूल आवृत्ती १९६७ मध्ये प्रकाशित केली.
संदर्भ : १. कामत, गजानन; नाडकर्णी, सीताराम; जोशी, सुधाकर, संपा, केशवसुतसमीक्षा, १९०६-१९५६, पुणे, १९६६, पुणे, १९६६.
२. जोग, रा. श्री. केशवसुत काव्यदर्शन, मुंबई, १९४७.
३. दामले, द. मो. सरस्वतीचे लाडके पुत्र, सोलापूर, १९६६.
४. दामले, पं. चि. संपा. केशवसुंत स्मृतिग्रंथ, पुणे, १९५५.
५. पंडित, भ. श्री. केशवसुत : पाच चिंतनिका, अमरावती, १९६१.
६. पंडित, भ. श्री. समग्र केशवसुत, पुणे, १९६४.
७. बेडेकर, दि. के. केशवसुतांची काव्यदृष्टी, मुंबई, १९६६.
८. माडखोलकर, ग. त्र्यं.आधुनिक-कविपंचक, पुणे, १९२१.
लेखक : रा.श्री.जोग
आम्ही कोण?
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी?आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्र्वी या प्रतिभावले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनि आरपार अमुची द्रुष्टी पहाया शके
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्र्वी या प्रतिभावले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनि आरपार अमुची द्रुष्टी पहाया शके
सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया –
सौंदर्यातिशया,अशी वसतसे जादु करांमजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्व आम्ही निके!
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया –
सौंदर्यातिशया,अशी वसतसे जादु करांमजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्व आम्ही निके!
शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!
आम्हांला वगळा-गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा-विकेल कवडीमोलावरी हे जिणे!
आम्हांला वगळा-विकेल कवडीमोलावरी हे जिणे!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा