सोमवार, १५ जुलै, २०१९

ससीक रक्षण - आशय

गद्यपाठ १
ससीकरक्षण
ठळक मुद्दे
लेखक: म्हाइंभट
लीळेतील शिकवण - मुक्या जीवांचे रक्षण, शरण आलेल्यांना अभय, दुसऱ्या माणसाचे मतपरिवर्तन, आपल्या
भूमिकेवर ठाम असणे, अहींसा.
चक्रधर स्वामींचे व्यक्तीमत्त्व - उदार, कनवाळू ,अहिंसक, निर्भय, शरण आलेल्या जीवाला अभय देणारे,
मतपरिवर्तक, सुभाषी
भाषिक वैशिष्ट्ये: साधी, सोपी वाक्ये,छोटी ओघवती वाक्यरचना, यादवकाळातील बोली भाषेचे रूप,मधुर,
चक्रधरांची स्वत:ची शैली,’जी-जी, हां गा’ सारखी साधी संबोधके, एकाचप्रकारच्या विरामचिन्हाचा वापर,
भूतकाळाच्या रुपांसारखी भविष्यकाळाची रूपे उदा.’तरी हा गोसावीं राखीला’,
स्वाध्याय- उजळणी प्रश्न, वैचारिक प्रश्न

प्रस्तावना:

‘ससीकरक्षण’ ही लीळा चक्रधरस्वामींच्या चरित्रातून घेतली आहे ज्याचे नाव ‘लीळाचरत्र’ आहे. लीळा म्हणजे आठवणी.
आठवणींच्या स्वरूपातील चरित्र. चरित्र हे एखाद्या व्यक्तीविषयी दुसऱ्या एका व्यक्तीने लिहीलेले असते. तसे ह्या लीळा
म्हाइंभट ह्या चक्रधरस्वामींच्या शिष्ट्याने ऐकू न,आठवून व इतर शिष्ट्यांकडून गोळाकरून लिहिलेल्या आहेत.
चक्रधरस्वामींच्या निधनानंतर शिष्ट्यमंडळी स्वामींच्या लीळा आठवीत बसत. त्यातूनच पुढे ‘लीळाचरित्राची’ निर्मिती
झाली असे समजले जाते.

आद्यचारित्रकार म्हाइंभट


मराठीतील आद्य गद्य म्हणजे लीळाचरित्र आणि आद्य चारित्रकार म्हणजे म्हाइंभट. म्हाइंभट हा अहमदनगर जिल्ह्यातील शिराळे गावचा.  त्याच्या पत्नीचे नाव देभाइसा. म्हाइंभटाने गणपती आपयो यांच्याजवळ पाच शास्त्रांचे अध्ययन केले. तेलंगणात जाऊन सहावे शास्त्र ही शिकला. त्यामुळे तो गर्विष्ठ बनला. पायात गवताची चाळ आणि हातात दिवा घेऊन तो भर दिवसा हिंडत असे. सर्व लोक पंडित माझ्या दृष्टीने तृणवत आहेत व सुर्यप्रकाशापेक्षा माझा ज्ञानप्रकाश श्रेष्ठ आहे असे तो त्यातून सुचवीत असे. मात्र एकदा डोंबेग्रामी त्यांची व चक्रधर स्वामींची भेट झाली, संस्कृतमधून तत्वचर्चा झडली आणि त्यांनी चक्रधारांच्या पुढे हार मानली. पुढे ते त्यांचे एकनिष्ठ शिष्य बनले. लीळाचरित्र, रिद्धपुरचरित्र या चरित्रग्रंथामुळे त्यांची सर्वत्र ख्याती झाली. लीळाचरित्र हा ग्रंथ त्यांनी पूर्वार्ध व उत्तरार्थ अशा दोन भागात लिहिला. पूर्वार्धात श्री चक्रधर स्वामींच्या एकांतातील भ्रमणकाळातील लीळा आहेत तर स्वामींच्या लौकिक जीवनातील आठवणी संकलित आहेत.  म्हाइंभट यांचे कार्य एखाद्या आजच्या संशोधकाला लाजवेल एवढ्या तोडीचे आहे.


ससीक रक्षण लिळेचा आजच्या भाषेत अर्थ


मध्ययुगात श्री चक्रधर स्वामी नावाचे थोर महात्मा होऊन गेले. "प्राणीमात्रांवर दया करावी, कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये, कोणताही जीव मोठा किंवा छोटा मानू नये." अशी त्यांची शिकवण होती.
एकदा काय झाले, रानात दोन पारध्यांच्या गटात शर्यत लागली. ज्यांची कुत्री ससा धरतील , तो गट शर्यत जिंकेल अशी अट ठरली. मग त्यांनी झुडपातून ससा उठविला. ससा जिवाच्या आकांताने घाबरून जोरात पळू लागला. श्री चक्रधर स्वामी एका मोठ्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेले होते. घाबरलेल्या सशाला त्यांनी पाहिले. ससा त्यांच्या जवळ जाऊन थांबला. श्री चक्रधर स्वामींनी त्याला प्रेमाने कुरूवाळले. ससा त्यांच्या मांडीखाली जाऊन बसला. इतक्यात कुत्री आणि पारधी श्री चक्रधर स्वामींजवळ पोहचले. पारध्यांनी स्वामी चक्रधरांना ससा देण्याची विनंती केली. "जी! जी! ससा सोडवा" पारधी म्हणाले.
" हा ससा मी तुम्हाला देणार नाही" श्री चक्रधर स्वामी म्हणाले.
पारधी शिकारी म्हणाले, "स्वामी हा आमच्या पैजेचा ससा आहे, त्यामुळे आमच्यात मारामाऱ्या होतील , तो ससा आम्हांला द्या"  यावर स्वामी म्हणाले, "शरण आलेल्या कोणत्याही जीवाला जीवन द्यायचे असते. हा ससा रानात राहतो, गवत खातो, ओढ्या नद्यांचे पाणी पितो, त्याला तुम्ही झुडपातून का उठविले? त्याने तुमचे काय बिघडविले? विनाकारण का मारता त्याला?"
श्री चक्रधर स्वामींच्या बोलण्यावर शिकऱ्यांनी विचार केला. त्यांचे मन परिवर्तन झाले. ते म्हणाले, "महाराज, उगच, आता कोणत्याही प्राण्याला आम्ही मारणार नाहीत."
असे म्हणून पारधी निघून गेले. श्री चक्रधर स्वामींना आनंद झाला. त्यांचा चेहरा प्रसन्न दिसू लागला. त्यांनी हलकेच आपली मांडी उचलली आणि सशाला पाहून म्हणाले" महात्मे हो! पळा आता"
मग सशाने एकदम धूम ठोकली.


लीळाचरित्र याविषयी अधीक माहीती येथे वाचा-
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%
9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0
चक्रधरस्वामींविषयी येथे वाचा-
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%
A7%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0

लीळाचरित्र


महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर यांनी लिहिलेले काही वाङ्मय उपलब्ध नाही. परंतु त्यांच्याविषयीच्या आख्यायिका वेळोवेळी उतरून ठेवल्या गेल्या आहेत. या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ म्हणून त्या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. महींद्रबास ऊर्फ म्हाईंभट यांनी हा चरित्रग्रंथ संकलित केला आहे. चक्रधरांच्या उत्तरापंथे गमनानंतर त्यांचे सर्व शिष्य ऋद्धिपूर येथे जमले आणि स्वामींच्या आठवणी-स्मृती-लीळांचे स्मरण करू लागले. यातूनच म्हाईंभटास लीळाचरित्राची प्रेरणा मिळाली. पुढे मग त्याने नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. रचनाकाल १२८३ च्या आसपास. 
लीळाचरित्राच्या विविध उपलब्घ प्रतींमधील लीळांची संख्या कमीजास्त आहे. ९०० पासून १५०० पर्यंत ही संख्या आढळते. एकांक, पूर्वाध व उत्तरार्ध असे लीळाचरित्राचे तीन विभाग करण्यात आले. लीळाचरित्राच्या पूर्वार्धातील व उत्तरार्धातील लीळा अनेक शिष्यांकडून मिळाल्या पण त्यांच्या एकाकी अवस्थेतील लीळा कोणालाच ज्ञात नव्हत्या. महदाईसा या जिज्ञासू शिष्येकडून चक्रधरांच्या पूर्वायुष्यातील लीळा मग म्हाईंभटाने मिळवल्या.
चक्रधरस्वामी आणि महानुभाव संप्रदाय यांची वैविध्यपूर्ण माहिती या चरित्रग्रंथातून व्यक्त झाली आहे. चक्रधरस्वामी हे लीळाचरित्राचे नायक आहेत. त्यांचे बहुगुणी व्यक्तिमत्व यातून साकार झाले आहे. चक्रधर हे एकांतातून लोकांतात कसे कसे आले याची माहिती म्हणजे लीळाचरित्र होय. तत्कालीन राजकीय, सामाजिक व धार्मिक जीवनाचे मार्मिक चित्रण लीळाचरित्रातून सहजच आले आहे. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, चक्रधरांची वचने इत्यादी अनेक बाबी लीळाचरित्रातून साकार झाल्या आहेत. लीळाचरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धतेचा नमुनाच होय. छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये, अलंकृत साधेपणा हे तिचे विशेष होत.
लीळाचरित्र हे चक्रधरांचे चरित्र असले तरी त्यातील अनेक लीळांमघून तेव्हाच्या समाजजीवनाच्या विविध अंगांचे आपोआपच दर्शन घडते. त्यावेळचे भोजनपदार्थ, वस्रविशेष, चालीरिती, करमणुकीचे प्रकार,कायदे, सामाजिक सुरक्षितता, सण, उत्सव इत्यादी सामाजिक जीवनाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक उल्लेख या चरित्रग्रंथातून आले असल्यामुळे तत्कालीन समाजजीवनाच्या व धार्मिक जीवनाच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.
लीळाचरित्रात चक्रधरांचे व्यक्तिचित्र व त्या अनुषंगाने गोंविदप्रभू, महदंबा, नागदेव इत्यादींची रेखाटलेली स्वभावचित्रे लक्षणीय वाटतात. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी आलेले संवाद, वर्णने यामुळे ही चरित्रे एखाद्या कादंबरीप्रमाणे वेधक वाटतात. चक्रधरांच्या काळातील वाक्प्रचार, म्हणी यांचा उपयोग करून भाषेला सजविण्याचा प्रयत्न म्हाईंभटाने केला आहे. साधी, सरळ, सोपी पण आलंकारिक भाषा ही वाङ्मयीन वैशिष्ट्ये या चरित्रग्रंथात पहावयास मिळतात. 

1 टिप्पणी:

Anurag म्हणाले...

ससीक-रक्षण या लिळेतील अहिंसेचे महत्व सांगा?

टिप्पणी पोस्ट करा

भंगु दे काठीन्य माझे - कवी बा.सी.मर्ढेकर

भंगु दे काठीन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे येऊ दे वाणीत माझ्या सुर तुझ्या आवडीचे, राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारांतले गा, अक्षरां आकार त...