मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

राष्ट्रीय सेवा योजना-युवा चळवळ

आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे.

maharashtra-times
   
प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ/ प्रा. रवींद्र अशोक आहिरे
युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होत असताना दिसत आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय.
राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. विशेषत: शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढताना दिसून येते.

डॉ. डी. एस. कोठारी शिक्षण आयोगाने शिक्षणाच्या सर्वच टप्प्यांवर विद्यार्थी समाजसेवेशी जोडला जावा, अशी शिफारस १९६४-६६ दरम्यान केली आणि १९६७ मध्ये राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेत एनसीसीसोबत एनएसएस असावे हे मान्य झाले. त्यानंतर कुलगुरूंच्या परिषदेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वागत होऊन २४ सप्टेंबर १९६९ रोजी महात्मा गांधीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने तेव्हाच शिक्षणमंत्री व्ही. के. आरव्ही राव यांनी देशातील ३७ विद्यापीठांत प्रायोगिक तत्त्वावर राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली. आज देशातील हजारो महाविद्यालये व लक्षावधी विद्यार्थी या योजनेत सहभागी झाले आहेत. २४ सप्टेंबर हा ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ म्हणून साजरा केला जातो.

‘Not me, but you’ माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. आपले उज्ज्वल भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो म्हणून फूल ना फुलाची पाकळी या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवक करीत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्हाप्रमाणे आजचा स्वयंसेवक हा बोधचिन्हाच्या आठ आरेनुसार अष्टौप्रहर समाजसेवेसाठी बांधील आहे व लाल रंग हे तरुणांचे सळसळते रक्त हे राष्ट्र उभारणीसाठी असल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी यासाठी स्वयंसेवक तत्पर व सक्षम व्हावा, यासाठी राष्ट्रीय सेवा योजना नियमित कार्यक्रम व विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर या दोन उपक्रमांद्वारे समाजप्रबोधन करण्याचे कार्य करीत आहे. नियमित कार्यक्रमांद्वारे महापुरुषांचे विचार हे जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमातून घेऊन श्रमदान, युवा सप्ताह, कार्यशाळा, शिबिर, सरकारच्या विविध कार्यक्रमांत सहभागी होतात.

महात्मा गांधींचा ‘खेड्याकडे चला’ हा विचार घेऊन गावांमध्ये विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरांमार्फत निर्मलग्राम, सर्वांगीण व शाश्वत ग्रामविकास, चर खोदणे, रस्ते बांधणी, पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षारोपण, रक्तदान आदी कार्य श्रमदान, पथनाट्य, रॅली, उद््बोधक चर्चा, शिवारफेरी, गावकरी संवाद या माध्यमांतून समाजाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात युवाशक्ती वा ऊर्जास्त्रोत पुरविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करीत आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय, उद्दिष्टे, ब्रीदवाक्य व बोधचिन्ह हे या उपक्रमाचे स्वरूप आणि कार्य स्पष्ट करतात. स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व स्वयंसेवकांमध्ये रुजविण्यात राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे. समाजात सामाजिक जाण देणारा, जनजागृती करणारा, तसेच राष्ट्र व समाजाप्रती जबाबदारीचे कार्य करणारा राष्ट्रीय सेवा योजना हा भारत सरकारचा अभिनव उपक्रम आहे.

अलीकडच्या काळात समाजात वेगवेगळ्या विचित्र घटना घडताना आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत आजचा तरुण कुठे तरी भरकटत जाऊ नये म्हणून राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातून समाजपरिवर्तन करण्याचे कार्य आज राष्ट्रीय सेवा योजनेचा तरुण करीत आहे. पर्यावरणासंबंधी वृक्षारोपण, सीसीटीव्हीचे काम, ग्रीन ऑडिट, आपत्ती व्यवस्थापन, जैवविविधता, निर्माल्य संकलन, जलसाक्षरता, समाजाप्रती कन्यारत्न वाचवा अभियान, आर्थिक, कौटुंबिक व शैक्षणिक सर्वेक्षण आदी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेची ही युवा चळवळ अखंड सुरू राहावी यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार मूलभूत योजनांचा सतत प्रचार व प्रसार या युवा चळवळीच्या माध्यमातून करीत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेची ही युवा चळवळ राष्ट्र व समाजासाठी तत्पर व सक्षम व्हावी, यासाठी तो कवी दिलशादच्या ओळी म्हणत आपला उद्देश मांडतो.

उठे समाज के लिए उठे उठे

जगे स्वराष्ट्र के लिए जगे जगे

स्वयं सजे वसुंधरा संवार दे

स्वयं सजे वसुंधरा संवार दे| 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...