शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

कोरोनाच्या निमित्ताने

जगापुढे एक मोठे संकट कोरोना व्हायरसने निर्माण केलेले आहे. मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. २२ मार्च २०२० पासून आपण सर्व घरात परिवारासोबत बंद आहोत. 'थांबला तो संपला' ही म्हणच अर्थहीन ठरली.'थांबला तो जगला' हा नवीन अर्थ  त्या म्हणीस प्राप्त झाला.
राष्ट्रसंत तुकडोजींचे भजन आहे,
भविकांच्या मेळयात दिसला हरी
धावुनिया सगळ्याची कामे करी
त्याप्रमाणे हा हरी मंदिरी नाही. मंदिरात आहे दगड,  निर्जीव मूर्ती.
 हे देशातील सर्व मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वार, प्रार्थना घरे बंद करावी लागली तेव्हा प्रकर्षाने जाणवले.
हा देव आपणास डॉक्टर्स, नर्स, आरोग्य अधिकारी, शेतकरी,सैनिक, पोलिस, दूधवाले, किराणा दुकानदार, भाजी-फ़ळ विक्रेते, प्रिंट व ईलेक्ट्रॉनिक मीडिया बंधु यांच्यामध्ये दिसला. पुन्हा तो निर्माता निर्गुण निराकार आहे याची प्रचिती आली.
 कवी हा जीवनाचा भाष्यकार असतो हे कवी केशवसुताच्या 'आम्ही कोण' या कवितेत अनुभवलं होतं.
कवी कुसुमाग्रज यांनी यापूर्वीच 'दर्शनाला आलात? या..'
ही कविता लिहिली होती. आज कोविड- १९ संसर्ग आपत्कालीन परिस्थितितील जाणीव त्यांना आधीच झालेली होती. ही कविता  सद्यस्थितिचे नेमके भाष्य करते.
दर्शनाला आलात? या...

पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.

सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर
त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...