सोमवार, २२ जून, २०२०

अभंग परंपरा

अभंग — अभंग शब्दाचा अर्थ अजून स्पष्ट नाहीं आणि अभंगाची पूर्वपीठिका सांपडत नाहीं. प्राकृत पिंगलांत याचें पूर्वस्वरूप दिसत नाहीं. हृदयांतील उत्कट भावना जशीच्या तशीच थोडया शब्दांत व्यक्त करण्यासाठीं सोपें वृत्त तेवढें चांगलें आणि या दृष्टीनें ओवी आणि अभंग यांचें महत्व आहे.
भक्तीमार्गांतील ज्ञानेश्वरादि नेत्यांनीं अभंगवृत्तांतच आपलें हृद्गत ओतलें असून आज हजारों प्रेमळ भगवद्भक्त त्या अभंगांचा टाहो फोडीत आहेत. कमी शिकलेल्या किंबहुना अगदीं अडाणी लोकांनांहि हे अभंग कळण्यासारखे असल्यामुळें ते म्हणतांना त्यांतील अर्थाशी त्यांना पूर्ण समरस होतां येतें.
''अभंग हें वृत्त असें आहे कीं, याला धरबंध अगदीं थोडा आहे. त्याच्या लांबीला तर अगदींच सीमा नाहीं. दोनपासून दोनशें चौकहि एकाच अभंगांत येऊं शकतील. चौक म्हणण्याचें कारण असें कीं, अभंगाच्या एका ओळींत चार चरण असतात व या चार चरणांचा एक चौक होतो. पण या चरणांचा अक्षरांचा, मात्रांचा किंवा गणाचा नीटसा एकहि नियम लागू पडत नाहीं.'' असें महाराष्ट्र-सारस्वतकार अभंगरचनासौकर्य दिग्दर्शित करण्याकरितां लिहितात. पण हें सौकर्यच अभंगाचा सार्वत्रिक प्रसार करण्यास व सामान्य जनांस भक्तीमार्गाकडे ओढण्यास कारणीभूत झालेले आहे; यानेंच मुक्ताबाई-जनाबाईसारख्या अप्रबुद्ध अबलांनां हृदयांतील वैराग्यपर विचार व्यक्त करण्यास संधि दिली व नामदेव तुकोबासारख्या बेताचें शिक्षण असलेल्या ब्राह्मणेतरांनांहि कवित्व करण्याची संधि दिली.
अ भं ग वृ त्ता चे प्र का र.— हे दोन प्रकारचे असतात. लहान व मोठा. चरण चार असून त्यांत अक्षरें तीन पासून आठ पर्यंत असतात. यमक कोणत्या चरणाच्या शेवटीं असावें याविषयीं नियम नाहीं. (विज्ञानेतिहास मराठी वृत्तों पृ. १५४ पहा).
अ भं ग क र्ते मु ख्य क वी, मुकुंदराज: — मराठी भाषेचा आदिकवि ज्ञानदेव कीं मुकुंदराज हा निर्णय ठरेपर्यंत, पहिला अभंगकार यांपैकीं कोण हें ठरवितां येणार नाहीं. मुकुंदराजाचे कांहीं अभंग उपलब्ध आहेत; त्यांतील मराठी वाणी बरीच शुद्ध दिसते व रचनाहि सुबोध आहे.

दृष्टीचें अग्र शून्याचें तें सार।
तेंची दशमद्वार पाही बापा॥
तेथे मधुकर नित्य खेळें आतां।
सूक्ष्म पाहतां अतिलीन॥
लीन होऊनिया मुंगियीये परी।
जिताचि ओवरी प्रासियेली॥
म्हणे मुकुंदराज अवघाचि गोविंद।
गो नामें तो शब्द लीन तेथें॥

मराठीतील पहिली अभंगरचना या दृष्टीनें वरील अभंगाकडे पाहिल्यास स्वभाषाभिमानांत कमीपणा तर मुळींच येत नाहीं; उलट दोनचार शतकांनंतरच्या मराठी भाषेंतील जो हिणकसपणा व फारसी भाषेच्या सहवासानें आलेला गढूळपणा तो त्यांत नाहीं हें पाहून मनाला आनंद होतो. विशेषत: ज्ञानेश्वरींतल्या सारखी क्लिष्ट व कंटाळवाणी भाषा यांत नाहीं. तेव्हां सामान्य लोकांच्याहि आवडीला मुकुंदरायाचे अभंग उतरतील यांत शंका नाहीं. या अभंगकाराविषयीं फारशी ऐतिहासिक माहिती नाहीं. यांचे संस्कृत व मराठी मिळून पाच सहा ग्रंथ उपलब्ध आहेत.
ज्ञानेश्वर :- ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, योगवासिष्ठ, वगैरे ग्रंथांचा कर्ता ज्ञानेश्वर व अभंगकार ज्ञानेश्वर एकच कीं काय असा जो वाद उत्पन्न होतो त्याला कारण ज्ञानेश्वरांच्या नांवानें प्रसिद्ध असलेल्या अभंगांतील भाषेचें अर्वाचील स्वरूप होय. ज्ञानेश्वरींतील भाषा फार जुनी व दुर्बोध आहे; ती वाचणाराला पूर्वाभ्यास अवश्य लागतो; तसें ज्ञानेश्वराच्या अभंगाचें नाहीं. आपणाला अभंगकार ज्ञानेश्वराशीं कर्तव्य असल्यानें वरील वादाकडे या ठिकाणीं लक्ष पुरविणे अनवश्यक होईल. तेव्हां एकदम अभंगावलोकनाला सुरुवात करूं.
ज्ञानेश्वराच्या अभंगाचें विठ्ठलपर, नामपर, उपदेशपर, संतपर, योगपर, सगुणपर, अद्वैतपर, व स्फुट अभंग या प्रकारचें वर्गीकरण करितां येईल. एक हजारापर्यंत अभंग ज्ञानेश्वराचे म्हणून प्रसिद्ध आहे.
विठ्ठलभक्तीमध्यें कवि किती विलिन होतो हें पुढील नांदीसारख्या अभंगांवरून दिसून येईल.
रंगा येई वो ये रंगा येईं वो ये।
विठाई किटाई माझेकृष्णाई कान्हाई ॥ ध्रु.॥
वैकूंठवासिनी वो जगत्रजननी।
तुझा वेधु ये मनीं ॥ १॥
कटीं कर विराजित मुगुट रत्‍नजडित।
पीतांबरू कासिका तैसा येई का धांवत ॥ २॥
विश्वरूप विश्वंभरे। कमळ नयने कमळाकरे वो।
तुझे ध्यान लागो बाप रखुमादेवीवरे वो ॥ ३॥
भक्त ईश्वराला सगुणरूप मानून त्याच्याशीं जो लडिवाळपणा करितो तें पाहून मोठें कौतुक वाटतें.
पांचा दामांचा घोंगडा नेसेन।
उरली मोट ते मी जेवील गे बाईये ॥ १॥
कामारी (दासी) होऊन ।
या गोपाळाचें घर रिघेन गे बाई ये ॥ ध्रु ॥
त्याचा उंबरा उसिसा करीन।
वरि येर झार सारीन गे बाईये ॥ 2॥
निवृत्ति ज्ञानदेव पुसतिल वर्म।
त्यासि कामिण पुरेन गे बाईये॥ ३॥
स्वत:ला ईश्वराची स्त्री किंवा दासी कल्पून लिहिलेले दुसरे पुष्कळ अभंग सांपडतात.
कांही अद्वैतपर अभंग गूढ अर्थाचे आहेत पण चांगले अलंकारिकहि आहेत.

इवलेंसें रोप लावियेलें द्वारीं।
त्याचा वेल गेला गगनावरी॥ १ ॥
मोगरा फुलला मोगरा फुलला।
फुलें वेंचितां वेचितां अति वारु कळियासी आला ॥ ध्रु ॥
मनाचे युगुतीं गुंफिला शेला।
बाप रखुमादेवीवरीं विठ्ठलीं अर्पिला ॥ २ ॥
x            x        +
उजव्या  आंगें भ्रतार व्याली।
डाव्या आंगें कळवळ पाळी॥
x            x        x
पति जन्मला माझे उदरीं। मी जालें तयाची नोवरी॥
 
यांसारखे अभंग मोठे मनोवेधक वाटतात. स्फुट अभंगांत- विरंहिणी, हमामा, घोंगडी, आंधळा, पांगळा गाय, चवाळें, ऋण, पाळणा, कापडी, वर्‍हाड, पाइक, बाळछंद, वासुदेव, डौर, हरिपाठ, मंथन, सौरी, फुगडी व टिपरी या प्रकारचे विषय आहेत. पुढील फुगडी मोठी मौजेची आहे:-
फुगडी फू गे बाई फुगडी फू।
निजब्रह्म तूं गे बाई परब्रह्म तूं ॥ ध्रु ॥
मन चित्त धू । विषयावरी थू ॥ १ ॥
घोंगडी,- काळें ना सांवळें धवळे ना पिवळें।
घोंगडें निराळें लाधलों मी ॥ १॥
मगील रगडें सांडिलें आतां। पंढरीनाथाजवळीं ॥ध्रु॥
नवें नव धड हातां आलें।
दृष्टी पाहे तंव मन हारपलें ॥ २ ॥
सहस्त्रफुली वरी गोंडा थोरू।
धडुतें दानीं रखूमादेवीवरु ॥ ३ ॥
विरहिणीची काय अवस्था होते, तिला चंदनाचीं उटणीं फुलांची शेज व कोकिळकूजित कशीं तापदायक वाटतात हें काव्यांतून जसें वर्णिले असतें तसेंच ज्ञानदेवानें पुढील विरहिणीच्या अभंगांत घातलें आहे.
घनु वाजे धुणधुणा वारा वाजे रुणझुणा।
भवतारकु हा कान्हा वेगीं भेटवा कां ॥ १ ॥
चांदवो चांदणें चापे वो चंदन।
देवकीनंदनें विण नावडे वो ॥ ध्रु.॥
चंदनाची चोळी माझें सर्व अंग पोळी।
कान्हो वनमाळी वेगीं भेटवां कां ॥ २ ॥
सुमनाची सेज सीतळ वो निकी।
वोळे आगी सारिखी वेगीं विझवा कां ॥ ३ ॥
तुम्ही गातसां सुस्वरें ऐकों नेदावीं उत्तरें।
कोकिळे वर्जावें तुम्ही बाइयानो ॥ ४ ॥
दर्पणीं पाहतां रुप न देसे वो आपुलें।
बाप रखुमादेवीवर विठ्ठलें मज ऐसें केलें ॥ ५ ॥
''देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।''
'' संताचे संगती मनोमार्गगती । ''
'' काळवेळ नाम उच्चारिता नाहीं । ''
'' रूप पहातां लोचनीं । ''
या सारखे ज्ञानेश्वराचे अभंग सर्वश्रुत आहेत. ज्ञानेश्वर अभंगरचनेंत नामदेव, तुकारामासारखा प्रख्यात नाहीं पण त्याची बहीण जी मुक्ताबाई हिचे अभंग मात्र चटका लावून सोडण्यासारखे आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी मुक्ताबाई कौमार्यावस्थेंतच वारली असल्यानें एवढया लहान वयांत संसाराचा कांहीं अनुभव नसतां इतकं उत्कृष्ट व हृदयस्पर्शी वाङ्मय प्रसवली ही गोष्ट खरोखरीच महाराष्ट्राला विशेषत: महाराष्ट्र अंगनाजनांना भूषणावह आहे. हिचे '' ताटीचे अभंग '' सुप्रसिद्धच आहेत. एके दिवशीं तिचा भाऊ ज्ञानदेव लोकांच्या टवाळीने खिन्न होऊन अंगणाची ताटी (दार) लावून खोलींत बसला असतां मुक्ताबाई तेथे आली व ताटी उघडण्यास विनवूं लागली:—
मजवरी दया करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
संत जेणे व्हावें । जग बोलणें सोसावे ॥
तरीच आंगीं थोरपण । जया नाहीं अभिमान ॥
थोरपण येथें वसे । तेथ भूतदया असे ॥
रागे भरावे कवणाशीं । आपण ब्रह्म सर्व देशीं ॥
ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
योगी पावन मनाचा । साहे अपराध जनाचा ॥
विश्व झालिया वन्ही । संतमुखें व्हावें पाणी ॥
शब्दशस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश॥
विश्व परब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
लडीवाळ मुक्ताबाई । बीज मुद्दल ठायीं ठायीं ॥
तुम्ही तरोन विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ 
ही मुक्ताबाईची अभंगवाणी किती प्रौढ व भेदक आहे !!

चांगदेव:- यानंतरचा अभंगकार चांगदेव. पण याचे पांच पंचवीसच अभंग कायते उपलब्ध आहेत. पण ते बर्‍यापैकीं आहेत. उदाहरणार्थ:-
बा सखीयं सांगातिणी । कांडू दोघी जणी ॥
बारा सोळा जणी । मिळोनिया ॥
देह हें उखळ । मन हें मुसळ ॥
कांडिले तांदूळ । विवेकाचे ॥
प्रकृति हांडी । आधण ठेविलें ॥
ईंधण जाळीलें । काम क्रोध ॥
मदनाचा कढ । येतो वेळोवेळा ॥
चटू होतो । जवळी सबधीर ॥
अमृताचे ताट । करूनिया चोखट ॥
पाहुणा बरवंट । आत्माराम ॥ 
चांगदेव म्हणे । भली वो मुक्ताबाई ॥
ज्ञानाचिये खूण । दाखविली ॥
नामदेव :- यांच्या काळापर्यंत अभंग हें प्रधान वृत्त नसून केवळ एक सोपें कवितावृत्त म्हणून गणले जाई व म्हणूनच या छंदांत फारसें वाङ्मय उपलब्ध नाहीं. पण नामदेवानें विठ्ठल भक्तीचा आपला संप्रदाय या सुगम छंदाच्या द्वारे प्रसृत करून काव्यरचनेची एक नवीन तर्‍हा उपयोगांत आणिली. नामदेवोत्तर बरीच भक्तिप्रधान कवने अभंगछंदात होती. अभंगवाङमयाचा काल वास्तविक नामदेवापासून तुकारामा पर्यंतचा धरण्यास हरकत नाही.
नामदेव, विसोबा खेचरापासून अभंग करण्याचे शिकला असे दिसते : -
अभंगाची कळा । कांहीं मी नेणत ॥ 
त्वरा केली प्रीत  । केशीराजें    ॥            
अक्षरांची संख्या  । बोलिलों उंदड ॥  
मेरुतो प्रचंड । शर आदीं ॥           
सहा साडेतीन । चरण जाणावे  ॥    
अक्षरें मोजावे  । चौक चारी ॥       
पहिल्या पासूनी । तीसर्‍या पर्यंत  ॥ 
अठरा गणीत । मेज आली  ॥     
चौक चारी आदी । बोलिलो मातृका ॥ 
साविसांची संख्या । शेवटील ॥             
दीड चरणाची । दीर्घ तीं अक्षरें  ॥  
सूक्ष्म विचारें । बोध केले ॥   
नामा म्हणे एक । शून्य दिलें हरी  ॥ 
प्रीतीनें खेचरी । आज्ञा केली ॥  
यांत नामदेवाच्या सहा अक्षरी अभंगाची रचना दिली आहे. नामाने बरीच मोठी अभंगरचना केली आहे :-
“ करीन मी तुझे । शतकोटी अभंग ॥ ... नामा म्हणे ।
नामा म्हणे जरी न होती संपूर्ण । जिव्हा उतरून ठेवीन मी” ॥
ही प्रतिज्ञा जरी पुरी झाली नसली तरी तीवरून त्याचा अभंगरचनेचा सतत व्यवसाय दिसून येतो. तोच एकटा अभंग करीत असे असें नव्हें तर त्याचें सारें घरदार अभंग रचूं लागलें होतें.
पिता दामशेटी ।  अभंग दोन कोटी ॥
भक्तिभावें ताटीं । निवेदी देवा ॥
तीन कोटी अभंग । गोणाईचा वाद ॥
स्वात्मसुखबोध ।  सुखाचा तो ॥
तीन कोटी अभंग । नारोबाची कविता ॥
उगवी स्वात्महिता । दिवस रजनी ॥
तीन कोटी अभंग । विठाचा झगडा ॥
प्रेमरस गोडा । प्रेमाचा तो ॥
महादा आणि गोंदा । अडीच अडीच कोटी ॥
प्रेमरस पोटीं । प्रेमळ तो ॥
एक कोटी अभंग । लक्ष वरती सोळा ॥
प्रेमरस जिव्हाळा । आऊबाईचा ॥
चौर्‍याण्णव लक्ष । रंगाईची वाणी ॥
प्रेमे चक्रपाणी । आळवीले ॥
दोन कोटी अभंग । राजाईची करुणा ॥
प्रेमे नारायणा ।  आळवीले ॥ 
लाडाई गोडाई  ।  येसा साखराई ॥
कवित्व हें पाही ।  दीड दीड कोटी ॥
एक कोटी देव ।  पन्नास लक्ष रुक्मिणी ॥
कोटि दासी जनी ।  साडेबारा ॥
एकूण हत्तर लक्ष ।  चौपन्न कोटी ॥
कविता गोमटी ।  नामयाची ॥
हें अचाट अभंगकर्तृत्व कितपत खरें आहे. याविषयीं येथें चर्चा करण्याचें कारण नाहीं. “ दासी जनी ” हिचा स्वतंत्र उल्लेख करणे अवश्य आहे.
देह जावो अथवा राहो ।  पांडुरंगी द्दढ भावो ॥
चरण न सोडीं सर्वथा ।  तुझी आण पंढरीनाथा ॥
वदनीं तूझें मंगलनाम ।  हृदयीं अखंडित प्रेम ॥
नामा म्हणे केशवराजा ।  केला नेम चालवी माझा ॥
हा अभंग सर्वांच्या तोंडी असतो. यांतील पांडुरंग समागमाची आवड व त्याविषयीं हट्ट पुढिल अभंगात जास्त बळावून,
तूं आकाश मी भूमिका । तूं लिंग मी शाळूंका ॥
तूं समुद्र मी चंद्रिका । स्वयें दोन्ही ॥
तूं वृंदावन मी चिरी ।  तूं तुळशी मी मंजिरी ॥
तूं पावा मी मोहरी ।  स्वयें दोन्ही ॥
तूं चांद मी चांदणी ।  तूं नाग मी पद्मिणी ॥
तूं कृष्ण मी रुक्मिणी ।  स्वयें दोन्ही ॥
तूं नदी मी थडी ।  तूं तारू मी सांगडी ॥
तूं धनुष्य मी भातडी ।  स्वयें दोन्ही ॥
नामा म्हणे पुरुषोत्तमा ।  स्वयें जडलों तुझीया प्रेमा ॥
मी कुडी तूं आत्मा ।  स्वयें दोन्ही ॥”
असे उद्गार निघाले. वरील अभंगातील उपमा किती सुंदर व यथातथ्य आहेत, हें रसिक नसणार्‍यालाहि सहज पटेल.
अभंगवृत्तांत अशी एक मजा आहे की, इतर वृत्तांत बोललेले शब्द जसे कृत्रिम वाटतात व बोलणारा अशा छंदोबद्ध भाषेंत बोलला असेल हे असंभाव्य दिसतें, तसें अभंगात गोंविलेल्या शब्दांबद्दल वाटत नाहीं. कारण मनुष्य जसे बोलतो तसेच शब्द अभंगात उतरतां येतात व त्यामुळें हृदयाला पिळून काढल्यासारखी अभंगाची भाषा या कवींच्या तोंडून निघते. उदाहरणार्थ−
माझी कोण गती सांगा पंढरीनाथा ।
तारीसि अनाथा केव्हां मज ॥
मनापासूनीया सांगा मजप्रती ।
पुसें काकुळती जीवाचिया ॥
न बोलसी कांरे धरीला अबोला ।
कोणासी विठ्ठला शरण जाऊं ॥
कोणासी सांकडे घालावें हें सांग ।
नको धरूं राग दीनावरी ॥
बाळकासी जैसी एकची ते माय ।

तैसे तुझे पाय मजलागीं ||
नामा म्हणे देवा अनाथाच्या नाथा |
कृपाळूवा कांता रखुमाईच्या ||

नामदेवाच्या बायकोचे व आईचे अभंगहि फार ह्दय स्पर्शी आहेत. राजाई आपल्या नवर्‍याची संसारविरक्ति पाहून म्हणते :—

घरधन्यांनी केला गुरू | बाई मी आतां काय करूं ||
असून नाही हा संसारू | चमत्कारू कृपेचा ||
धांव पाव गे मेसाई | कवणाचेंहि न चले काई ||
सत्यपण तूझिये ठायीं | असून नाहीसें करी हें ||
मंत्र घेतलासे जैसा | घरी संताचा  वोळसा ||
वोस पडो या हरिदासां | गेले न येती मागुती ||
काय सांगूं यांच्या रिती | सोसें पायवणी पिती ||
अवघे भांबरभुतें होती | नाचताती आनंदें ||
एकमेकांच्या पडती पायां | लौकिकांतुन गेले वाया ||
म्हणती ये गा पंढरिराया | ब्रह्मानंदें डुल्लती ||
भोळी सासु गोणाबाई | पांढरा स्फटिक व्याली काई ||
त्यानें जोडला शेषशायी | म्हणे राजाई काय करूं ||
यांत हरिदासांचें चित्र कसें हुबेहुब काढलें आहे ! पुन्हां राजाई आपल्या नवर्‍याबद्दल विठोबाजवळ रदबदंली करण्यास रूक्मिणीला काकुळतीनें विनवीत आहे :—
अहो रखुमाबाई विठोबासी सांगा |
भ्रतारासी कां गा वेडें केलें |
वस्त्रपात्र नाही खाया जेवायासी |
नाचे अहर्निशी निर्लज्जसा ||
चवदा मनुष्यें आहेत माझे घरीं |
हिंडती दारोदारी अन्नासाठीं ||
बरा मार्ग तुम्ही उमजोनी सांगा |
नामयाची राजा भली नव्हे ||
नामदेवाप्रमाणे संसाराची फिकीर न बाळगणार्‍या नवर्‍याबद्दल कोणती स्त्री अशा प्रकारें गार्‍हाणें करणार नाही ?
नामदेवाच्या अभंगांची योग्यता फार मोठी आहे. एरवी त्यांना परकीयांच्या धर्मग्रंथांत स्थान मिळालें नसतें. शीखांचा वेदतुल्य आदिग्रंथ–—ग्रंथसाहेब यांत नामदेवाचे अभंग बरेच आलेले आहेत व ते शीख लोक मोठ्या भक्तिभावानें गुरु-मुखीभाषेंतून म्हणत असतात, ते एकून कोणा महाराष्ट्रीयाचें हदय उचंबळून येणार नाही?  आपले शुद्ध मराठी अभंगवृत्त, त्यांतून आपल्या नाम्याचे अभंग व ते शीखांसारख्या राकट लोकांनीं मोठ्या प्रेमानें गावेत, यापेक्षां दुसरी मोठी अभिमानाची गोष्ट ती काय असणार ?

जनाबाई :— ही नामदेवाच्या घरांतील दासी म्हणून समजतात व नामहि हिला “ दासी जनी ” असें उल्लेखितो. नामदेवाच्या कुटुंबांतील इतर मंडळींप्रमाणें हीहि अभंग रचूं लागली. हिचे अभंग सर्व स्त्री-कवयित्रींच्या कवनांहून सरस आहेत. हिची वाणी रसाळ व अत्यंत गोड आहे. जनाबाईचें अभंग अदयापहि भाविक मंडळी मोठ्या प्रेमानें गात असतात.
“ येरे येरे माझ्या रामा | मगमोहन मेघ:श्यामा || ”
हा अभंग गोंधळी तालसुरावर गातांना ऐकून हदय भरून येतें, असा अनुभव पुष्कळांनां असेलच. रवीद्रंनाथांच्या गीतांजलीत ईश्र्वराशीं गुजगोष्टी केलेल्या जशा आढळतात, तशाच प्रकारची ईश्र्वरभक्ति जनीच्या अभंगात आढळते.
कोणे एके दिवशी | विठोबा गेला जनीपाशीं ||
हळूच मागतो खायासी | काय देऊं बा मा तूसी ||
हाती धरून नेला आंत | वाढी पंचामृत भात ||
प्रेमसुखाचा ढेंकर दिला | जनी म्हणे विठो धाला ||
जेवीं जेवीं बा मुरारी | तुज वाढिली शिदोरी || 
कनकाचें ताटी | रत्‍नजडीत ठेविली वाटी ||
ईश्र्वर आपल्याकरितां किती कष्ट घेत आहे, मजुरासारखा राबत आहे, तेव्हां आतां जगून संसार करणें नको, ही भक्ताची कल्पना फार थोड्यांनां शिवली असेल.
आतां पुरे हा संसार | कोठें फेडूं उपकार ||
सांडुनियां थोरपण | करी दळणकांडण ||
नारीरूप होऊनि हरी | माझें न्हाणें धुणें करी |
रानां जाये वेची शेणी | शेखी वाहे हरी पाणी ||
ठाव मागें पायांपाशी | म्हणे नामयाची दासी ||
जनीसारखी चैदाव्या शतकांतली एक शू्द्र स्त्री वेदांतपर अभंग जेव्हां रचिते तेव्हां तो काळ आजच्यापेक्षांहि स्त्रीशिक्षणांत पुढें होता की, काय अशी शंका येऊं लागते !

ना म दे व का ली न अ भं ग का र :—  नामदेवाच्या काळीं संतकवीत ज्यांचे अभंग विशेष लक्षणीय आहेत असे पुरूष म्हणजे विठोबाखेचर, परसा भागवत, चोखामेळा, गोराकुंभार, जगमैत्र नागा, नरहरी सोनार, जोगा परमानंद, वत्सरा इत्यादि होत. विसा खेचर व्यापारी असल्यानें तो साहजिकच नंदभाषेंत अभंगरचना करी, व “ मुळु वदनाचा | आंगळू हाताचा | उदाणू नेत्राचा | स्वामी माझा ” असें म्हणे. नरहरी सोनार प्रथम कट्टा शिवभक्त व विष्णुद्वेष्टा असे;  पण जेव्हां भागवतधर्माची मशाल ज्ञानदेव नामदेवादि संतांनी महाराष्ट्रभर फिरविली तेव्हां नरहरीच्या हदयांत उजेड पडून “ शिव आणि विष्णु | एकचि प्रतिमा | ऐसा ज्याचा प्रेमा | सदोदित || धन्य ते संसारी | नर आणि नारी | वावें हर आणि हरी | उच्चारिती ” || असें बोलूं लागला. या नामदेवकालीन अभंगकारांचे कवित्व फार थोडें उपलब्ध आहे. यांची काव्यरचना भक्तिभावानें ओथंबलेली व सात्विक मनोवृत्ति जागृत करणारी अशी आहे. हे कवि सर्वच श्रेष्ठवर्णाचे होते असें नाहीं. गोरा कुभांर, सांवती  माळ्यासारखे शूद्र, चोखामेळा यासारखे महार अस्खलित अभंग रात्रंदिवस रचीत. चोखा महाराची बायको सुध्दां,
“ पुढें ठेवियलें पान | वाढी कुटुंबी भोजन ||
तुम्हा योग्य नाही देवा | गोड करोनिया घेवा ||
द्रोपदीच्या पाना | भूललेती नारायणा ||
येथें नाही ऐसी परी | बोले चोखयाची नारी || ”
असें सुसंस्कृत वाणीनें देवास बजविते. येथें असे सांगितलें पाहिजे की, अभंगकार स्वत:चे अभंग लिहित नसे. ज्ञानदेवाचे सच्चिदानद बावा, मुक्ताबाईचे ज्ञानदेव, चांगदेवाचे शामा कासार, चोखामेळ्याचे अनंतभट याप्रमाणें एक दुसर्‍याचे अभंग—आख्यानें लिहि.
एकनाथ—ज्ञानदेवानें मराठीचा पाया घातला ही गोष्ट खरी पण तिला व्यवस्थेशीर व सर्वोगसुंदर बनविण्याचे काम एकनाथानें केलें, आपणाला येथे एकनाथाचा एक अभंगकार या दृष्टीनें विचार कर्तव्य आहे. तेव्हां त्याचें इतर कर्तृत्व बाजूला ठेवून अभंग पाहूं. नाथाचे अभंग फारसे नाहीत व प्रख्यातहि नाहीत. मात्र या अभंगावरून एकनाथाची प्रौढ मराठी भाषा चटकन ध्यानांत येते:—
बोधुमानु तया नाहीं माध्यान्ह |
सायंप्रातर नाही तेथें कैचा अस्तमान || 
कर्मचि खुंटले करणेंचि हारपलें |
अस्तमान गेलें अस्तमाना ||
जिकडे पाहें तिकडे उदयोचि दीसे |
पूर्वपश्चिम तेथें कैची भासे ||
एकाजनार्दनी नित्यप्रकाशा |
कर्माकम जाले दिवसा चंद्र तैसा ||
पुढील अभंगात वेदांती व वारकरी एकनाथ द्दष्टीस पडतो.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल |
नांदतो केवळ पांडुरंग ||
भावभक्ति भीमा उदक तें वाहे |
बरवा शोभताहे पाडुरंग ||
दयाक्षमाशान्ति हेचि वाळुवंट |
मिळालासे थाट वैष्णवांचा ||
ज्ञानध्यान पूजा विवेक आनंद |
हाचि वेणुनाद शोभतसे ||
दश इंद्रियांचा एक मेळा केला |
ऐसा गोपाळकाला होत असे || 
देही देग्विली पंढरी जनीं वनीं | 
एकाजनार्दनी वारी करी ||
एकनाथकालीन अभंगकार :— एकनाथकालीन अभंगकार फारसे नाहीत. या काळांत प्रौढ मराठी लिहिण्याची धाटणी पडून आख्याने लिहिण्यांत येऊं लागलीं बहुतेक सर्व आख्यानें ओवीवृत्तांतच आहेत. मृक्तेश्र्वरासारख्या महाकवीनें आपली बहुतेक सर्व आख्यानें ओंवीवृत्तांत सुंदर व अलंकारिक भाषेतच लिहिली. ओवी व अभंग हीं दोन शुद्ध मराठी वृत्तें एकमेकांपासून फारशी निराळीं नाहीत. ओवीवृत अभंगापेक्षां जास्त स्वैर असल्यानें मोठमोठी कथानकें व वर्णनें यांतच रचणें सुलभ व सोयीचें जातें. सोळाव्या शतकांतील-खिस्ती मराठी कवि स्टिफेन्स आपल्या ख्रिस्तपुराणातील ओवीवृत्ताला अभंगच म्हणतो असें आधारार्थ वाक्योद्धार न करतां रामभाऊ जोशी सांगतात ( मराठी भाषेची घटना पृ. २५५ ). त्याच्या अभंगाचा मासला येणेंप्रमाणें:—
जैसी हरळामाजी रत्‍नकुइला | कीं रत्‍नामाजी हिरा निळा ||
तैसी भाषांमाझी चोखळा | भाषा मराठी ||
जैसी पुष्पामाजी पुष्प मोगरी | कीं परिमळांमाजी कस्तुरी ||
तैसी भाषामाजी साजिरी |  मराठिया ||
पाखियांमध्यें मयोरू | वृखियांमध्यें कलपतरू ||
भाषामध्यें मानू थोरू |  मराठियेसी ||
तारांमध्ये बारा राशी | सप्तवारांमध्यें रवी शशी ||
या द्वीपीचिया भाषांमध्ये तैसी मराठिया. ||
एका ख्रिस्ती मनुष्याचें केवढें हें मराठीवरील प्रभुत्व !
त्यानें आपणांपूर्वी होऊन गेलेल्या ज्ञानदेव-नामदेव-एकनाथ यांच्या काव्यांचे दांडगें अध्ययन केलें असलें पाहिजे. या काळांतील दुसरा नांव घेण्यासारखा अभंगकार म्हणजे विष्णुदास नामा. यानें सबंध महाभारतावर ओवी छंदांत रचना केली आहे. अभंग फारच थोडे आढळतात त्यांपैकी पुढील एक आहे :-
कुश्चळ भूमिसी | उगवली तूळसी ||
अपवित्र तियेसी | म्हणूं नये ||
कागविष्टेमाजी | उगवला पिंपळ ||
तयासी अमंगळ म्हणूं नये ||
लोखंडाचा खिळा ||  परिसा लागला ||
मागलीया मोला | मागूं नये ||
दासियाचा पुत्रा | राज्यपद आलें ||
पहिलिया बोला | बोलूं नये ||
विष्णुदास नामा |  विठ्ठलीं मिळाला ||
शिंपी शिंपी त्याला |  म्हणूं नये ||
तुकाराम : — भागवतधमाची पताका अखिल महाराष्ट्रभर, किंबहुना हिंदुस्थानभर फिरविणारा भक्ताग्रणी व महाराष्ट्रांत जो तुकाराम त्याच्याविषयी फार लिहिणें नकोच.त्याच्या संप्रदायाइतका दुसरा मोठा संप्रदाय नाही. त्याचे अभंग हजारों लहानमोठे, सुशिक्षित—अशिक्षित, भाविक—अभाविक गेली तीनशें वर्षे अहोरात्र वोकीत आहेत. मराठी बोलणार्‍याच्या तोडांत कळत-न कळत त्याचा अभंग म्हणी रूपानें येत नाही असें होतच नाही. आपल्या म्हणण्याला आधार म्हणून चटकन् तुकारामाच्या अभंगांतील चरण बायकापोरेंसुध्दां म्हणतात. उदा:—जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे |; सुख पाहता जवापाडे दु:ख पर्वताएवढे | ; आधि होता वाघ्या...मूळ स्वभाव जाईना...इत्यादि.ज्याप्रमाणें जुन्या
मताचे वारकरी याचे अभंग वेदतुल्य मानतात त्याचप्रमाणें प्रौढ सुधारक प्रार्थनासमाजादि कार्यांत तुकारामाची मदत घेत असतात. अभंगाची भाषा घरींदारीं साधारण माणसें बोलतात तीच व्यावहारिक भाषा असल्यानें त्यांतील आशय सहज पटतो.
तुकारामानें वैराग्य, ज्ञान, भक्ती, नीति, वैगैरे अनेक विषयांवर हजारों अभंग रचिले आहेत. त्यांपैकी पांच सहा हजार प्रसिद्ध आहेत. ‘ अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ’ हें खोटें नाही. नामदेव आणि तुकाराम यांमध्यें अग्रस्थान कोणाला द्यावें याविषयी मोठा विचारच पडेल. तथापि तुकारामाचा अखंड चालत आलेला लौकिक व त्याच्या अभंग काव्याला प्राप्त झालेलें थोर महत्त्व हीं लक्षांत आणल्यास अभंगाचा सर्वश्रेष्ठ कवि तुकारामच ठरेल यांत शंका नाहीं. अंत:करणाला जाऊन भिडणारी तुक्याचीं वचनें व त्या वचनांतील सडेतोडपणा नाम्याच्या अभंगाला मागें टाकितो.तुकारामाचा स्पष्टवक्तेपणा कधी कधी सभ्य भाषेची मर्यादा ओलांडून पार दूर जाई.
नाम न वदे ज्याची वाचा | तो लेक दो बापाचा ||
हेचि ओळख तयाची | खूण जाणा अभक्ताची ||
ज्यासी विठ्ठल नाहीं ठावा | त्याचा संग न करावा ||
नाम न म्हणे ज्याचें तोंड | तेंचि धर्मकाचें कुंड ||
तुका म्हणे त्याचे दिवशी | रांड गेली महारापाशीं ||
तुकारामाच्या अभंगाची भाषा बरीच जुनी व सध्यां न समजण्याजोगी आहे. गाथांतून, किंवा पुस्तकांतून आढळणारे अभंग तुकारामाच्या अस्सल भाषेचे नमुने नव्हते. त्यांनां तुकारामशिष्यांनी झिलई दिलेली आहे, म्हणून ते समजण्यास जड जात नाहींत. रा. वि. ल. भावे त्यांनीं “ तुकारामबुवांचा अस्सल गाथा ” प्रसिद्ध केला आहे
( शके १८४१, आर्यभूषण प्रेस ) त्यांतील अभंग वाचण्यास क्लिष्ट वाटतील:-
अषंड मुडतर | सासुरवास करकर || १ ||  धृ ||
याची जाली बोळवण | आतां नेदषों ती सीण || छ ||
बहुतांची दासी | तये घरी सासुरवासी  || २||
तुका म्हणे मुळें |  षंड जाला येका वेळे || ३ || छ || छ ||
बुधीहीना जडां जीवां | नको देवा उपेक्षु ||  १ || धृ ||
परीसावी वीज्ञ्यापणा | आम्हा दासां दीनाची || छ ||
चीतुनीयां आलो पाये | त्यासी काय वंचने || २ ||
तुका म्हणे पुरूशतमा | करी क्षेमा अपराध || ३ ||
ही मात्र खरी तुकारामाची कुळंबाऊ भाषा दिसते. असल्या अस्सल भाषेंतील अभंग आपल्या सुशिक्षित कानांनां रूचणार नाहींत हें खरें. तुकाराम सोसायटी म्हणून पुण्यांत एक संघ होता आणि त्यानें तुकारामाच्या अभंगांत निश्चितपणें त्याचे कोणते हें ठरविण्यासाठीं प्रयत्‍न केला असें म्हणतात. पण त्या प्रयत्‍नाचें फल अगर स्वरूप चवाठ्यावर आलें नाहीं. तुकाराम, प्रचारांत असलेल्या गोष्टीचां आपल्या अभंगात उपयोग करून आपले म्हणणें नीट पटवून देत असे:—
वाघें उपदेशिला कोल्हा | सुखें खाऊं द्यावें मजला ||
अंती मरसी तें न चुके | मजही मारीतोसी भुके ||
येरू म्हणे भला भला | निवा़ड तुझ्या तोंडें झाला ||
देह तंव जाणार | घडेल पर-उपकार ||
येरू म्हणे मनीं | ऐसें जावें समजोनी ||
गांठ पडली ठकाठका | त्यांचा धर्म बोले तुका  ||
एक श्रोता पुराणाच्या वेळी स्फुंदून रडत असे तें पाहून पुराणिकाला वाटे की आपल्या सांगण्याच्या हातोटीमुळें याला प्रेमाचा गहिंवर येतो. एके दिवशीं सहज त्याला प्रश्न करितां, आपल्या नुकत्याच मृत झालेल्या बोकडांत व पुराणिकांत दाढी वगैरेंचें साम्य पाहून आठवण होते व दु:खाचा उमाळा येतो अशी खरी हकीगत त्यानें सांगितली.
वरील गोष्टीवर तुकारामाचा अभंग पुढीलप्रमाणें:—

देषो ( खो ) नी पुराणीकाची दाढी | रडे फुंदे नाक ओढीं || धृ ||
प्रेम ष (ख) रें | दीसे जना ||
भीन ( भिन्न) अंतरी भावना ||छ ||
आवरीतां नावरे | षु (खु) र आठवी नेवरें || २||
बोल न ये मुषा (खा) वाठा | म्हणे होतां ब्यांचा तोटा || ३ ||
दोन्ही सीगें च्यार्‍ही पाये | षु (खु) यां दावी म्हणे हाये || ४||
मना आणितां बोकड | मेला त्याची चरफड || ५ ||
होता भाव पोटी | मुषा (खा) आला तो सेवटी || ६ ||
तुका म्हणे कुडें |  कळी येतें तें रोकडें || ७ ||
तुकारामाच्या अभंगातून तत्कालीन स्थिति चांगली चित्रित केलेली आहे, त्यानें सरसहा सर्व वाईट गोष्टींवर तडाखे ओढले आहेत. (१) गुरू-शिष्यांचे ढोंग, (२) वाटेल त्या देवतांचें पूजन, (३) तीर्थयात्रा, (४) जशास तसें ; (५) अस्पृश्यता इत्यादि समाजव्यंगांवर त्याचे पुढील प्रमाणें अभंग आहेत.
(१) गुरू आला वेशीद्वारी | शिष्य पळतो खिंडारी ||
कशासाठीं झालें येणें | त्यांचे आलें वर्षासन ||
तुका म्हणे चेला | गुरू दोघे नरकाला ||
वर्षासन मागण्याकरितां शिष्यांकडे जाणारे गुरू व ते आले असता दडी मारून बसणारे शिष्य यांत वर्णिले आहेत.
(२) रंडी चंडी शक्ति | मद्य मांसाते भक्षिती ||
बहिरव खंडेराव | रोटी सटी साठीं देव ||
 गणोबा विक्राळ | लाडु मोदकाचा काळ ||
मुंजा म्हैसासुरें | हे तो कोण लेखी पोरे ||
वेताळें फेताळें | जळो त्यांचें तोंड काळे ||
किती निर्भीड उक्ति ही !!
(३)जाउनियां तीर्था काय तुवां केलें | चर्म प्रक्षळिलें वरीवरी ||
अंतरीचें शुद्ध कासयानें झालें | भूषण त्वां केलें आपणया || 
वृंदावन—फळ घोळिलें साकरा | भीतरील थारा मोडेचिना ||
तुका म्हणे नाही शांति क्षमा दया | तोंवरीं कासया फुंदां तुम्ही ||
(४) पाया जाला नारू | तेथें बांधला कापूरू || 
तेथें बिबव्याचें काम | अधमासि तों अधम ||
रूसला गुलाम | धणी करीतो सलाम ||
तेथें चाकराचें काम | अधमासि तो अधम ||
रूसली घरची दासी | धनी समजावी तियेसी ||
तेथें बटकीचें काम | अधमासि तो अधम ||
देव्हार्‍यावरि विंचू आला |  देवपूजा नावडे त्याला ||
तेथें पैजारेचें काम | अधमासि तों अधम ||
तुका म्हणे जाती | जातीसाठी खाती माती || 
( ५ ) महारासी शिवे | कोपे ब्राह्मण तो नव्हे ||
तया प्रायश्चित कांहीं |  देहत्याग करितां नाहीं || नातळे चांडाळ | त्याचा अंतरीं विटाळ ||
ज्याचा संग चित्ती |  तुका म्हणे तो त्या याती ||
ईश्वराच्या ठिकाणीं तुकारामाची असलेली अलोट भक्ति दाखविणारे अभंग अनेक आहेत कांही अभंग तर मोठ्या कळवळ्यानें म्हटलेले दिसतात:
भेटीलागीं जीवा लागलीसे आसापाहे रात्र-दिवस वाट तुझी || 
पूर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन | तैसे माझें मन वाट पाहे ||
दिवाळीच्या मुळा लेंकी आसावलीपाहतसे वाटुली पंढरीची ||
भूकेलिया बाळ अतिशोक करी | वाट पाहे परि माउलीची ||
तुका म्हणे मज लागलीसे भूकाधांवूनी श्री—मुख दावीं देवा ||
यांतील उपमा किती हदयंगम व रोजच्या अनुभवांतल्या आहेत ! कांही अभंगातून मार्मिक विनोद दिसून येतो:—
एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता | तोंड काळें झालें जगामाजी ||
कानडी बायको व मराठा नवरा यांची गंमत पुढील अभंगात दिली आहे:
कानडीनें केला म–हाटा भ्रतार | एकाचें उत्तर एका नये ||
तिनें पाचारिलें हल बा म्हणोना येरू पळे आण जाहली आतां ||
तुकारामाचे अभंग नित्य परिपाठांतले असल्यानें येथें जास्त उदाहरणें देणें अप्रस्तुत होईल, तेव्हां कांही म्हणीप्रमाणें रूढ असलेल्या अभंगाचे चरण देऊन तुकारामाच्या अभंगांचें तात्पुरतें परीक्षण पुरे करूं.

(१) अधिकार तैसा करूं उपदेश. (२) आंधळ्यासि जन अवघेची आंधळे. (३) आलें देवाचिया मना | तेथें कोणाचें चालेना. (४) आपणांसारिखे करिती तात्काळ. (५) आधी होता वाघ्या |   दैवयोगें झाला पाग्या. (६) उंच वाढला एरंड. (७) कन्या सासुर्‍यासि जाये |  मागें परतोनी पाहे. (८) जे का रंजले गांजले |त्यांसि म्हणे जो आपुले. (९) जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. (१०) जन हें सुखाचें दिल्या घेतल्याचें. (११) दया तिचें नांव भूतांचें पाळण. (१२) दया क्षमा शांति |  तेथें देवाची वसति.(१३) नाही निर्मळ जीवन | काय करील साबण. (१४) लिंबाचिया झाडा साकरेचें आळें. (१५) पायींची वहाण पायीं बरी. (१६) बीजा ऐसी फळें. (१७) बोले तैसा चाले. (१८) नवसें कन्या पुत्र होती. | तरी कां करणे लागे पती. (१९) शुद्ध बीजा पोटीं | फळें रसाळ गोमटीं. (२०) सुख पाहतां जवा पाडें | दु:ख पर्वताएवढें. (२१) क्षमा शस्त्र जया नरचिया हातीं. (२२) कोणी निंदा कोणी वंदा. (२३) बरें झालीयाचे अवघे सांगाती. (२४) साकरेच्या गोण्या बैलचिये पाठी. (२५) जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे.
तु का रा म का ली न अ भं ग का र :— निंबराज, सेना न्हावी, मोरया गोसावी, गणेशनाथ, शेख महंमद इत्यादि कवी व तुकारामाचे शिष्य यांचे कांही अभंग आहेत; पण तुकारामाच्या अभंगकर्तृत्वापुढें त्यांची रचना कांहींच नव्हे. सेना न्हावी हा तुकारामाच्या मागील काळचा दिसतो. त्याचे सुमारे १५० ते २०० अभंग उपलब्ध आहेत. वारकरी लोक याचें अभंग प्रेमानें गातात. पुढील अभंग प्रसिद्ध आहे.
आम्ही जातीचे वारीक | काम करणें बारीक ||
गुरू डोळा दर्पण दावूं | भावार्थाचा चिमटा घेऊं ||
ईषामनीषा बगला झाडूं | कामक्रोध नखें काढूं ||
बादशहाचे द्वारीं | सेना न्हावी काम करी ||
शेखमहंमद:— हा मुसलमान जातीचा मराठी कवि असून त्याचे वेदांतपर मराठी ग्रंथ आहेत. मुलाण्याचें काम करतांनां याला उपरति झाली व तेव्हांपासून तो ईश्वरभजन करूं लागला.
मी जातीचा मळीण वंश | संस्कार नेणें मर्‍हाटीस ||
नाहीं पाहिलें शास्त्र पुराणाबोलों नाहीं शिकलों साळसूद वचन असें असतांनासुध्दां याची अभंगवाणी बरी आहे.
कांटे केतकीच्या झाडा | आंत  जन्मला केवडा ||
फणसा अंगें करड काटे ! आंत साखरेचे गोटे ||
ऊंस सर्वौआंगी काळा | आंत अमृतजिव्हाळा ||
नारळ वरी तो कठीण | आंत सांठवे जीवन ||
काळी कस्तुरी दिसती | आंत सुगंध सुटती ||
मधमाशांची घोंगाणी | आंत अमृताची खाणी ||
शेख महंमद विलासी | झाला हरिभक्तीचा रहिवासी ||
याप्रमाणें शेख मंहमद हरिभक्त बनला. याच्या रेणुका तेलीण नांवाच्या भक्तिणीनेंहि कांही अभंग केले आहेत.
निळोबा :- तुकारामाच्या चौदा टाळकरी शिष्यांपैकीं निळोबा हा एक असून त्याचीच कायती कविता प्रसिद्ध आहे. याच्या अभंगांची भाषा अगदी सुलभ व प्रचलित असून त्यांत विचारस्वारस्य अधिक आहे. पुढील अभंगात पांडुरंगाचें वर्णन दिलें आहे तें मोठें काव्यमय वाटेल.
अचळ धरा तैसें पीठ | पायातळीं मिरवे वीट ||
दोन्ही पाउलें समान | जैसे योगीयाचे नयन ||
जानु जंघ ते स्वयंभ | जैसे कर्दळीचे स्तंभ ||
कसीयले पीत वसन | झळके विघुल्लतेसमान ||
शेष बैसला वेटाळा | तैसा कटिबंध मेखळा ||
समुद्र खोलिये विशाळ | तैसें नाभीचें मंडळ ||
तुळशी मंजरिया गळां | जैशा सुटल्या मेघमाळा ||
दिग्गजाचे शुंडादंड | तैसे कटीं कर प्रचंड ||
पूर्णीमेचा उदो केला | तैसा मुखचंद्र शोभला ||
जैशी नक्षत्रें चमकती |  तैसी कुंडलें चमकती ||
सूर्य मिरवें नभमंडळा | तैसा केशराचा टिळा ||
क्षीराव्धीचे चंचल मीन | तैसे नेत्री अवलोकन ||
जैसें मेरूचें शिखर | तैसा माथां मुगुट स्थिर ||
इंदु प्रकाशें वेढिला | तैसा क्षीरोदकें वेष्टिला ||
तृप्तीलागी चातकपक्षी | निळा तैसा ध्यान लक्षी ||
रामदास :— रामदासस्वामी व त्यांच्या संप्रदायांतील मंडळी यांनीहि पुष्कळ स्फुट अभंग रचिले आहेत. सुखाचे सांगाती सर्वही मीळती | ; साधू-संगे साधू भोंदू-संगें भोंदु; बाळक जाणेना मातेसी |  ; ऐसे कैसें रे सोवळें | ; वाजे पाऊल आपुलें |  ; इत्यादि समर्थांचे अभंग रोजच्या पाठांतले आहेत.
आतां कोठें धरूं भाव |  बहुसाल झाले देव ||
एकाहुनी एक थोर | मुख्य पूजा पारंपर ||
माझे कुळींचीं दैवतें | सांगो जातां असंख्यातें ||
रामदास देव एक | येर सर्वही मायिक ||
हा अभंग अनेक देवांना कंटाळून म्हटलेला दिसतो. “ अन्न पंचकां ” तील अभंग रामदासांचेच दिसतात.
उ त्त र  का ली न  अ भं ग का र:— तुकारामनंतरच्या म्हणजे १८ व्या शतकांत कांहीं थोडे अभंगकार होऊन गेले. त्यांत दिनकर गोसावी, शिवदिन केसरी परंपरा, महीपति, शहामुनी हे कवि जरा प्रख्यात असे होते. म्हणून त्यांच्या अभंगांकडे वळूं. महाराष्ट्र कवींमध्यें बहुतेकांनी अभंग केले आहेत. पण अभंगाविषयी प्रख्यात असे नामदेव, तुकारामासारखे कवी थोडेच, तेव्हां सर्वांचा परामर्ष येथें आपणांस घेता येणार नाहीं ; म्हणून कांही निवडक अभंगकारांवरच लिहावें लागणार. दिनकर गोसावी समर्थ शिष्य असून त्यांचे बहिणाजी असें दुसरें नांव आहे. “ स्वानुभव दिनकर ” हा ग्रंथ यांचाच आहे. यांचे चार पांचशे अभंग उपलब्ध आहेत. शिवदिन हे नाथपंथी स्वामी असून यांची गुरूशिष्य परंपरा मोठी आहे; बहुतेक गुरूंची कविता, ( विशेषत:अभंग ) संशोधिली गेली आहे. या गुरुपरंपरेंतील गुप्‍तनाथ ही एक बालविधवा ब्राह्मण स्त्री असून हिच्या अभंगाची वही डॉ. विल्सन साहेबांस सापडली होती‚ त्यांतील एक अभंग असा:—
माता पिता त्राता अरि पुत्र भ्राता |
गुरूवीण आतां नाही दुजा ||
पशुपक्ष याती गुरूरूप भासती |
ऐशी ज्याची स्थिति तोचि जाणें ||
वृक्षवल्ली पाही अणुरेणु तेही |
गुरूविण नाहीं रितें कोठें ||
ऐसा गुरूराज भज पूर्णव्यापक |
गुप्त बोले रंक राज सम ||
शिवदिनाचा पुत्र नरहरि हाहि अभंग करी.
महाराष्ट्र काव्यांत महीपतीची रजना विपुल व हदयंगम अशी आहे. याचा भक्तिविजय ग्रंथ प्रसिद्ध आहे. यानें बहुतेक संताचीं चरित्रें लिहिली. त्यापैकी जी कांही अभंग वृत्तांत आहेत  ती येणेंप्रमाणें:−
नांव चरित्र अभंग
  नामदेव  चरित्र६२
  हरिपाळचरित्र५८
  कमाल चरित्र६७
  नरसिंह मेहता चरित्र५२
  राका कुंभारचरित्र४७
  जगमित्र नागाचरित्र६३
 माणकोजी बोधले चरित्र६७
 संतोबा पवारचरित्र१०२
 चोखामेळाचरित्र४७
इतर फुटकळ अभंग बरेच आहेत . त्यांपैकी सुमारें ४० स्फुट अभंग रा. शाळिग्राम यांनी संपादन केले आहेत. इतर पद्यांप्रमाणें महिपतीचे अभंगहि प्रेमरसानें परिपूर्ण आहेत.
उपेक्षितां माये कोठें जावें तान्हें |
सांगावें गार्‍हाणें कोणापाशीं ||
पितयानें कन्या विकली वृद्धासी |
आडवा तयासी न ये कोणीं ||
रायें लुटविलें आपुलें नगर |
वर्जिता साचार नाहीं कोणी. ||
तैसें देवा तुम्ही मोकलियावरी |
आमुचा कैवारी कोण आहे ||
महिपती म्हणे करितो विचार |
सत्कीर्ति साचार वाढे जेणें ||
सिध्दांतबोधाचा कर्ता शहामुनि यानेंहि कांही अभंग केले आहेत असें दिसतें. त्याच्या शिष्यांचे “ गुरू किल्लीचे अभंग ” प्रश्नोत्तर रूपांत आहेत.
मोरोपंत:- यांची बहुतेक काव्यरचना आर्यावृत्तांत असली तरी त्यांनी इतर वृत्तांचाहि मधून मधून स्वीकार केलेला आहे. त्यामध्यें अभंग येत असून त्यांचें “ सीता गीत ” या वृत्तांतच आहे. या आख्यानांत १७० अभंग अगदी सोप्या भाषेंत लिहिलेले आहेत.
लक्ष्मण भावोजी मागें पुढें स्वामी |
मज आहे धामी ऐसें वाटें ||
न बाधोचि मज उष्ण क्षुधा तृषा |
तुह्मापाशी मृषा न बोलावें ||
जेव्हां कांही वाटें चालतां मी मागें |
मुरडोनि मागें विलोकीती ||
बाई काय सांगो स्वामीची ती द्दष्टी |
अमृताची वृष्टी मज होय ||
अर्वाचीन कवी अभंगवृत्तांत फारशी रचना करीत नाहीत. मात्र कांही आपलें म्हणणें मान्य होण्यासाठीं तुकारामासारखे अभंग करून शेवटी ‘ तुका म्हणे ’ असें दडपून देतात. अभंगाचा दर्जा धार्मिक वाङ्‌मयांत श्रेष्ठ मानला जात असला तरी महाराष्ट्रकाव्यांत त्याला मोठेसें महत्व अर्वाचीन सुशिक्षित देत नाहीत याचें कारण ते भक्तिपर आहेत हें होय. अभंगवाङ्‌मयांचा अभ्यास कोणी पंडित फारसे करीत असतील असें वाटत नाहीं.
[ सं द र्भ ग्रं थ—भावे-तुकाराम बुवांचा अस्सल गाथा. आजगांवकर-महाराष्ट्र-कविचरित्र.म्याकनिकल-साम्स ऑफ मराठा सेंट्स. गोडबोले-नवनीत. ज्ञानेश्वराच्या अभंगांची गाथा. तुकारामाच्या अभंगांची गाथा. वागळे-महाराष्ट्र काव्यमकरन्द. भावे-महाराष्ट्रसारस्वत. रानडे-राईज ऑफ दि मराठा पॉवर. रा. भि. जोशी–मराठी भाषेची घटना. महाराष्ट्रसाहित्यमासिक, वर्ष तीन अंक ११. प्रो. पटवर्धन—विल्सन फायलॉलॉजिकल लेक्चर्स (फर्ग्यूसन कॉलेज मँगँझीन.). भांडारकर−वैष्णविझम, शैविझम अँड मायनर रिलिजियस सिस्टिम्स. विल्सन−प्रिफेस टु मोल्सवर्थ्स मराठी डिक्शनरी. किकेड-टेल्स ऑफ दि सेंटस् ऑफ पंढरपुर. महाराष्ट्र वाङ्‌मयसूचि—उचंर पहा. ]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शरद baviskar- भुरा

भूरा