बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

आईची आठवण- माधव जूलियन

 प्रेमस्वरूप आई - माधव ज्युलियन ....एक धांडोळा ...



प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !

माधव ज्यूलियन

बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?


नाही जगात झाली आबाळ या जिवाची,

तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.

चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,

आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.


ही भूक पोरक्याची होई न शांत आई,

पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही.

वाटे इथून जावे, तूझ्यापुढे निजावे,

नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !


वक्षी तुझ्या परि हे केव्हा स्थिरेल डोके,

देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?

घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,

खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !


आईची महती सांगणारी ही कविता आहे प्रसिद्ध कवी माधव ज्यूलियन यांची. आईची गाथा आपल्या कवितेतून अनेकांनी गायली आहे, प्रत्येक कवीने आपल्या प्रतिभाशक्तीचा वापर करून आपले भाव व्यक्त केले आहेत. 'आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी' ही कवी यशवंतांची कविता असो वा 'आई म्हणजे काय असते' ही फ.मु.शिंदे यांची कविता असो किंवा 'ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होता..' ही कवी ग्रेस यांची कविता असो, 'आई'ची थोरवी शब्दबद्ध असलेल्या सकळ कविता सर्व वयाच्या, सर्व वर्गाच्या अन सर्व प्रांतातील लोकांना या कविता भावल्या. आजही या कवितांचा वाचकवर्ग या कवितांना आठवून हळवा होतो. आपल्या मनातील भावनाच कवी मांडतात अशी यामागची भावना रसिक वाचकांमध्ये असते. माधव ज्युलियन यांच्या या कवितेस आता पाचेक दशके उलटून गेलीत पण ही कविता आजही अनेकांना तोंडपाठ आहे ! यातील आशय अन शब्दांची निवड एकमेकाशी इतके एकरूप झाले की ही कविता माधवरावांची ओळख बनून गेली.


'बालपण देगा देवा' असं संतांपासून सामान्यांपर्यंत सर्वांना वाटत असते, त्यातील एक सहज स्वाभाविक कारण आईच्या प्रेमाच्या ओढीत दडलेले आहे. आई शैशवापासून ते वृद्धत्वापर्यंत सर्वांनाच हवीहवीशी असते. मात्र एक वेळ अशी येते की तिच्यापासून आपण दुरावतो. कारण काहीही असो, आपले घरदार सोडून कधी बाहेर जावे लागले तर सर्वात आधी आठवण येते आईचीच ! 'आईची आठवण झाली नाही' असं सांगणारा माणूस कधी कुणी पाहिला नाही. या कवितेत माधवरावांनी आईपासून विरक्त झालेल्या एका मुलाच्या मनातले आर्त भाव व्यक्त केले आहेत. जगातील कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील प्रेमाचे प्रथम स्वरूप आईचेच असते, म्हणून ते प्रेमस्वरूप आई या शब्दाने कवितेची सुरुवात करतात. मायेचा, वात्सल्याचा जगातला सर्वात मोठा सागर हा आईच्या रूपाने प्रत्येकास जन्मदत्त भेटीत प्राप्त होतो. म्हणून ते पुढे म्हणतात, वात्सल्यसिंधू आई !   


आई जर सोबतीस असेल तर कधीच आबाळ वा परवड होत नाही, मात्र तीच आई आपल्यासवे नसेल तर


जगातली सर्व सुखे असूनही तिची उणीव भासतेच. अशा 'आईस कोणत्या समरप्रसंगी आठवावे ?'असा प्रश्न कुणलाच पडत नाही कारण आई जेंव्हा नसते तेंव्हा साधीसोपी अडचण देखील यक्षप्रश्न बनून समोर उभी राहते. म्हणून माधवराव लिहितात की, "बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?". कारण आई सोबत असली की कुठला प्रश्न उरत नाही अन आई जेंव्हा नसते तेंव्हा कशाचेच उत्तर हाती लागत नाही !

अशा आईची अनेक लक्षावधी रूपे आपल्या प्रत्येकाच्या मनात असतात, अगदी पाळण्यात घातल्यापासून ते घराबाहेर पडताना निरोपासाठी डोळ्यात आलेले पाणी लपवत हात हलवणारी आई असो वा पाठीवर थरथरता हात ठेवून आभाळभर आशीर्वाद देणारी आई असो वा आपल्या आजारपणात आपल्या बिछान्यात अहोरात्र बसून राहणारी आई असो वा आपल्या परीक्षा सुरु असताना आपल्याबरोबर भल्या पहाटे उठून जागी राहणारी आई असो किंवा घरकाम करताना व देवघरातल्या देव्हारयात फुले वाहताना एकाच तन्मयतेने रमणारी आई असो किंवा स्वतः उपाशी राहून आपल्या पिलांना सुखाचे घास भरवणारी आई असो वा माहेरचे उंबरठे टाळून आयुष्यभर मुलांच्या कल्याणासाठी सासरी राहून आपला चंदनदेह झिझवणारी आई अशा अनेक प्रतिमा डोळ्यापुढे येतात. म्हणून कवी म्हणतात की आईची नेमकी कोणती एक विशिष्ठ प्रतिमा मनःचक्षुपुढे येत नाही. अन त्यामुळेच की काय आई हवी हा हेका मन जीवनाच्या अंतापर्यंत कोणीच सोडत नाही. कारण आईच्या मायेची शिदोरीच अशी असते की ती उरतही नाही अन पुरतही नाही.


अशा भावविभोर परिस्थितीत जर अन्य कुणा मातेला तिच्या मुलांवर माया प्रेम करताना पाहिले तर आईच्या आठवणीनी डोळ्यात अश्रू दाटून येणं साहजिक आहे. अशा वेळेस मनात विचार येतात की आपण इथून तडक निघून जावं अन थेट आईच्या कुशीत डोकं टेकवून तिचा हात आपल्या मस्तकी धरावा. कारण आईच्या कुशीत जे सुख आहे ते जगाच्या पाठीवर कधी कुणी देऊ शकणार नाही अन त्याची सर अन्य कुणाला कधी येणार नाही. कितीही पोरका माणूस देखील अन्य कुणाच्या आईच्या कुशीत शिरला तरी त्याला तिथं जी माया प्रेम मिळते ती अवर्णनीय असते. कारण आपण आईच्या कुशीत असताना ती प्रसन्नहास्यवदनाने आपल्याकडे डोळे भरून पाहत असते अन आपण तिला चित्ती साठवत जातो. हे स्वर्गीय सुख घेण्यासाठी आईच्या कुशीतच मस्तक टेकवावे लागते.


मन जेंव्हा अधिक अस्थिर होते, व्यवहारी जगातील तिमिर तांडवात आपले वारू भरकटते तेंव्हा आपण अधीर होतो, बेचैन होतो, सैरभैर होऊन जातो. अशा प्रसंगी आईच्या छातीवर अल्वारपणे माथा टेकला की तिच्या हृदयातील शांत स्पंदनांचा जणू ती झुला झुलवते अन त्यावर आपण नकळत हिंदोळे घेतो. मग मनातले कुंद आभाळ तिथं निवळते. अशा आईची सर कुणाला येऊ शकत नाही, मनात तिच्या सहवासाची इच्छा अधुरी राहते, मन भरत नाही. तेंव्हा माधवराव म्हणतात की, :"आई तू पुन्हा जन्म घे अन मीही पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घेईन. (तेंव्हा कुठे तुझ्या प्रेमाची तहान कदाचित पूर्ण होऊ शकेल).

माधव ज्यूलियन कवितेच्या शेवटी देवालाच विनवणी करतात की, 'आपल्या जीवनात ही एकच अपेक्षा मनी राहिली आहे अन मनातली ही आस खरी ठरवण्याचे काम आता देवाने करावे !"


अत्यंत साध्या सोप्या तरल शब्दांत प्रत्येक पंक्तीगणिक कवी माधव ज्युलियन आईच्या प्रेमाची महती सांगताना तिच्या विरहावस्थेत येणारे भाव कथन करतात. अन वाचणारा त्यात आपल्या जीवनातील क्षण शोधू लागतो, आपल्या आईला आठवू लागतो. आपल्या आईची मूर्ती आपल्या डोळ्यापुढे तरळत राहते अन आपल्या नकळत आपले डोळे ओले होतात. हे या कवितेचे सर्वोच्च यश म्हणावे लागेल. साहित्यिक परीमाणातील यशापयशाच्या मापददंडापेक्षा रसिक वाचकांच्या पसंतीस उतरून साहित्यिक मुल्ये जपण्याचे काम या कवितेने मोठ्या सहजतेने साध्य केले आहे. 


‘प्रेमस्वरूप आई’ या कवितेने अजरामर झालेले, मराठी कवितेच्या प्रसारासाठी स्थापन झालेल्या ‘रविकिरण’ मंडळातील लोकप्रिय कवी, उर्दू-फारसीचे अभ्यासक आणि गझल या काव्यप्रकाराची मराठी वाङ्मयामध्ये समर्थपणे भर घालणारे ज्येष्ठ कवी माधव ज्यूलियन उर्फ साहित्यिक माधवराव पटवर्धन हे मराठी साहित्यातील पहिल्या डी. लिट. पदवीचे मानकरी होते. मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी प्रा. माधव त्रिंबक पटवर्धन यांना ‘छंदोरचना’ या ग्रंथाबद्दल डी. लिट. पदवी देण्याचा निर्णय घेतला. ग्रंथाला डॉक्टरेट देण्याची ही मराठीतील पहिली घटना होती. त्याबरोबरच मराठी वाङ्मयाला हा बहुमान मिळवून देणारे माधव ज्यूलियन हे पहिलेच साहित्यिक ठरले आहेत. विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात माधव ज्यूलियन यांना डी. लिट. प्रदान करण्यात आली. या बहुमानानंतर अवघ्या काही महिन्यांतच म्हणजेच २९ नोव्हेंबर १९३९ रोजी माधव ज्यूलियन यांचे निधन झाले. पुढे महाराष्ट्र साहित्य परिषदेने संस्थेच्या सभागृहाचे माधवराव पटवर्धन सभागृह असे नामकरण करून माधव ज्यूलियन यांच्या वाङ्मयीन कार्याची स्मृती जतन केली.


माधवरावांची ओळख श्रेष्ठ मराठी कवी, कोशकार, छंद:शास्त्राचे व्यासंगी,  साहित्य विमर्शक आणि मराठी 


भाषा शुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कृतें, प्रचारक अशी बहुआयामी आहे.  काव्य रचनेसाठी त्यांनी घेतलेल्या ‘माधव जूलियन्’ ह्या टोपण नावातील ‘जूलियन्’ हे नाव, सुप्रसिद्ध इंग्रज कादंबरीकर्त्री मारी कोरले हिच्या गॉड्स गुडमॅन ह्या  कादंबरीतील ‘जूलियन् ॲडर्ली’ ह्या  उत्कट मनोवृत्तीच्या, सौंदर्यपूजक आणि स्वच्छंद कवीच्या व्यक्तिरेखे वरून त्यांनी घेतले आणि आपल्या ‘माधव’ या नावाला जोडले. माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले असा लोकोपवादही प्रसिद्ध आहे. माधवराव पटवर्धन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी बडोदा येथे  त्यांच्या आजोळी झाला. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय व बहुमान माधवराव पटवर्धनांना जातो. माधव ज्युलियनांनी "दित्जू", "मा.जू." आणि "एम्‌.जूलियन" या नावांनीही लेखन केले असून, पैकी काही लिखाण इंग्रजीतही आहे. कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन त्यांनी केले आहे. 'प्रेम कोणीही करेना', 'मराठी असे आमुची मायबोली', 'कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी', 'अनाम वीराची समाधी', 'शिवप्रताप', 'जीव तुझा लोभला माझ्यावरी रे शोभना' या त्यांच्या अन्य काहीलोकप्रिय कविता होत.


पुणे जिल्ह्यातील आवळस या गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक इंग्रजी शिक्षण त्यांनी बडोदे, अहमदाबाद आणि मुंबई येथे पूर्ण केले (१९०९). बडोदे कॉलेजातून १९१६ मध्ये बी. ए. झाल्यानंतर बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई हायस्कूल मध्ये वर्षभर त्यानी अध्यापन केले. १९१८ मध्ये मुंबईच्या एल्‌फिन्स्टन महाविद्यालयातून फार्सी आणि इंग्रजी हे विषय घेऊन ते  एम्. ए. झाले. जून १९१८ ते ऑक्टोबर १९२५ ह्या  कालखंडात पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि ‘फर्ग्युसन महाविदयालय  ह्या  शिक्षण संस्थांतून त्यांनी अध्यापन केले. न्यू इंग्लिश स्कूलचे ते काही काळ उपप्रमुखही होते. १९१९ मध्ये ह्या  संस्थेचेते आजीव सदस्यही झाले. १९२१ मध्ये कवी श्री. बा. रानडे ह्यांच्याशी यांचा निकटचा परिचय झाला. श्री. बा. रानडे, गिरीश, यशवंत इ. कवींबरोबर, माधवरावही रविकिरण मंडळ ह्या कवि मंडळाचे संस्थापक सदस्य होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी तीव्र मतभेद झाल्या मुळे त्या संस्थेचा त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चा काही काळ मनस्ताप आणि खडतर परिस्थिती ह्यांना तोंड देत त्यांनी काढला; अनिकेत, व्यवसायहीन अवस्थेतही त्यांना राहावे लागले . पुढे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये काही काळ शिक्षक म्हणून राहिल्यानंतर, १९२८ मध्ये कोल्हापूरच्या राजाराम महाविदयालयात फासींचे प्राध्यापक म्हणून त्यांना नेमणूक मिळाली. त्याच वर्षी त्यांचा विवाहही झाला.


माधवरावांच्या काव्य लेखनाला पूर्ववयात त्यांच्या बडोदे येथील वास्तव्यातच आरंभ झाला. बडोदे येथील


त्यांच्या पूर्व वयातील वास्तव्यात काव्य प्रेमी मित्रांचा,  तसेच कवी चंद्रशेखरांचा सहवास त्यांना लाभला. कविमन हे कसे रसिक आणि संस्कारक्षम असते, ह्याचा अनुभव चंद्रशेखरांच्या सहवासात त्यांना मिळाला. निर्दोष व अर्थानुकूल काव्य रचनेचे भान, माधवरावांना चंद्रशेखरांकडून मिळाले. पुण्यास आल्यानंतर त्यांच्या काव्यलेखना लागती आली. रविकिरण मंडळाच्या किरण (१९२३), मधु-माधव (१९२४) आदी सामूहिक प्रकाशनांतून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या. ख्यातनाम फार्सी कवी उमर खय्याम ह्याच्या रुबायांचा माधवरावांनी केलेला मराठी अनुवाद १९२९ मध्ये प्रसिद्ध झाला (उमर खय्यामकृत रुबाया ). उमर खय्यामच्या रुबाया त्यांनी तीन वेळा अनुवादिल्या. उमर खय्यामकृत रुबाया त्यांनी मूळ फार्सी रुबायांवरुनच अनुवादिल्या (एकूण५२४). त्यानंतर एडवर्ड फिट्सलेरल्डने उमरखय्यामच्या रुबायांचे केलेले इंग्रजी रुपांतर 'द्राक्षकन्या' ह्या  नावाने त्यांनी अनुवादिले.‘मधुलहरी’ हे रुबायांचे, त्यांनी केलेले तिसरे भाषांतर. रुबायांच्या फिट्सजेहल्डकृत भाषांतराच्या चौथ्या आवृत्ती वरून हे भाषांतर माधवरावांनी केले होते. 'विरहतरंग' आणि 'सुधारक' ही त्यांची सामाजिक खंडकाव्ये त्यांनी रुबायाच्या केलेल्या पहिल्या अनुवादापूर्वी च प्रकाशित झालेली होती. 'नकुलालंकार' हे त्यांनी लिहिलेले आणखी एक खंडकाव्य. त्यांनी लिहिलेल्या गझल त्यांच्या 'गज्जलांजली'तून  आणि सुनीते 'तुटलेलेदुवे' (१९३८) ह्या  त्यांच्या संग्रहातून संगृहीतआहेत. 'तुटलेले दुवे' ह्या  संग्रहातील सुनीतांतून एक कथासूत्र गुंफण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. 'स्वप्नरंजन'  हा त्यांच्या स्फुट कवितांचा संग्रह. उपर्युक्त ‘मधुलहरी’ व माधरावांच्या अन्य काही कवितामधुलहरी व इतर कविता ह्या  नावाने १९४० मध्ये पुस्तक रूपाने प्रकाशित झाल्या.


माधवराव हे मूलतः  कवी होते. काव्य हाच त्यांच्या समग्रवाङ्‍मय निर्मितीचा केंद्र बिंदू होता; तसेच प्रयोगशीलता हा त्यांच्या काव्यात्म व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा घटक होता. काव्याच्या संदर्भात त्यांनी अनेक प्रयोग केले. प्रयोगशीलते च्या दृष्टीने केशवसुत आणि मर्ढेकर ह्या  दोन युगप्रवर्तक कवींच्या मधील एकमेव दुवा म्हणून माधवरावांचे नाव गौरवाने घेतले जाते. केशवसुती काव्य कल्पनेचे विस्तरण करून मराठी काव्य कल्पने वर एक नवे अंतर्बाह्य संस्करण करण्याचे श्रेय ही त्यांना दिले जाते. त्यांच्या काही कवितांतून मर्ढेकर प्रतिमा सृष्टीची चाहूल लागते. गझल हा काव्य प्रकार मराठीत रुजवण्याचे पहिले श्रेयही त्यांचेच. स्वातंत्र, प्रेम आणि शांती ही मूल्ये त्यांनी आयुष्यभर जोपासली आणि त्यांच्या काव्यातही त्यांचे प्रत्यंतर येते. प्रीती हा त्यांच्या कवितेचा महत्त्वाचा विषय असून प्रेम भावनेच्या अनेक तरल छटा तीत व्यक्त झाल्या आहेत. फार्सी प्रेमकाव्याचा प्रभावही तीवर आहे.


काव्य निर्मिती प्रमाणेच माधवरावांनी काव्य समीक्षा आणि काव्य विचार ही केला. आधुनिक मराठी कवी आणि कविताह्यांच्या संदर्भात त्यांनी आपले समीक्षात्मक लेखन मुख्यतः केले; तिच्यातील न्यूनाधिक्य त्यांच्या दृष्टिकोणातून दाखवून दिले. आधुनिक मराठी कविता बरीचशी परपुष्ट आणि अनुकरण शील आहे, असे त्यांचे मत होते. आधुनिक मराठी कवितेवर त्यांनी इंग्रजीतूनही लेखन केले. चिकित्सकपणा आणि रसग्राही वृत्ती ह्यांचा समतोल समीक्षकाने सांभाळला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी ‘काव्यचिकित्सा’ ही लेखमालाही लिहिली. रसव्यवस्था आणि वाङ्‍मयानंद मीमांसा ह्या विषयांवरही त्यांनी लेखन केले. काव्यविहार व काव्यचिकित्सा हे त्यांचे कविकाव्य विषयक लेखसंग्रह आहेत.


माधवरावांचा फार्सी–मराठीकोश १९२५ मध्ये प्रसिद्ध झाला. तो करताना तौलनिक आणि ऐतिहासिक दृष्टीचा अवलंब त्यांनी केला होता. त्यांची परिश्रम शीलता, सावधानता व सूक्ष्म अभ्यासह्यांचा प्रत्यय ह्या कोशातून येतो. ऐतिहासिक कागद पत्रांच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचे साधन ह्या कोशामुळे उपलब्ध झाले. त्यानंतर दोनच वर्षांनी पद्यरचना शास्त्रावरील छंदोरचना हा त्याचा ग्रंथ प्रसिद्ध झाला . छंद:प्रकार कसे परिणत होत आले, ह्याचे विवेचन करावे आणि छंद:शास्त्राची पुनर्घटना करावी अशा हेतूने हा ग्रंथ त्यांनी लिहिला. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय, हा सिद्धांत त्यांनी ह्या ग्रंथात मांडला. तसेच पद्यरचनाही वृत्तजाति छंद:स्वरूप अशी त्रिविध आहे, हे त्यांनी संशोधन पूर्वक दाखवून दिले. ह्या ग्रंथाची दुसरी परिवर्धित आवृत्ती (१९३७) माधवरावांनी डी. लिट्. ही पदवी मिळविण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडे सादर केली आणि १९३८ मध्ये ही पदवी त्यांना प्राप्त झाली. ह्या ग्रंथाने मराठी पद्यरचनाशास्त्राचा पाया घातला. छंदोरचनेचाच विषय घेऊन त्यांनी पद्यप्रकाश लिहिले. शिक्षक आणि विद्यार्थी ह्याच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.


कवितांच्या व्यतिरिक्त पटवर्धनांनी भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कार करणार्‍या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ सन १९२५ साली सुरु केली आणि त्यांची भूमिका ज्यांना पटली त्यांनीही ती चळवळ पुढे चालविली. या विषयावर अनेक वादविवाद झाले अणि हळुहळू भाषाशूद्धीचे तत्त्व लोकांना पटू लागले. भाषाशुद्धीचे सर्वच पुरस्कर्ते सावरकरांचे अनुयायी होते असे नाही. माधव ज्यूलियन हे पूर्वी भाषाशुद्धीचे विरोधक होते. पण आंधळा विरोध करण्याऐवजी या विषयाचा अभ्यास करुनच तिचे खंडन करावे या हेतूने त्यांनी भाषाशुद्धीचा अभ्यास केला. पण अभ्यास केल्यावर तेच भाषाशुद्धीचे

कट्टर समर्थक बनले ! ते इतके की पूर्वी ते आपल्या कवितांमध्ये फारसी शब्दांची खैरात करत असत. ह्या कविता त्यांनी पुन्हा शुद्ध स्वरूपात लिहून काढल्या ! भाषा शुद्धीचे प्रखर पुरस्कर्ते म्हणूनही ते प्रसिद्ध झाले . त्यासाठी पुढे त्यांनी महाराष्ट्राबाहेरही अनेक व्याख्याने दिली. लेखही लिहिले, भाषाशुद्धिविवेक (१९३८) ह्या ग्रंथात त्यांचे हे लेख संगृहीत आहेत. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. ‘परकीय शब्द न वापरणे, जुन्या मराठी शब्दांचा आठव ठेवून पुरस्कार करणे आणि नव्या नडी स्वावलंबनाने कष्टून भागवणे’ हा आपला संकल्प त्यानी भाषाशुद्धिविवेका च्या प्रस्तावनेत व्यक्त केला. त्यांच्या प्रकाशित साहित्या मध्ये स्फुट गझला, खंडकाव्य दीर्घकाव्य, काव्यसंग्रह, अनुवादितलेख, संशोधनात्मक व भाषांतरीत वाङ्मय प्रकारांचा समावेश आहे.


१९३३ साली नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे जूलियन अध्यक्ष होते, तर १९३४ रोजी बडोदे येथे झालेल्या साहित्य संमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष तर १९३६ मध्ये जळगाव येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद माधव जूलियन यांनी भुषवलं. आचार्य अत्र्यांचा "झेंडूची फुले" हा काव्यसंग्रह माधव ज्यूलियन व रविकिरण मंडळाचे इतर सदस्य ह्यांच्या हलक्या फुलक्या प्रेमकवितांचे विडंबन आहे. माधव ज्युलियन यांच्या सर्व कवितांचे संकलन व संपादन प्रा. रा.श्री. जोग, डॉ. द.न. गोखले, डॉ. सु.रा. चुनेकर यांनी 'समग्र माधव ज्यूलियन' या नावाने केले आहे. माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे  या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत.एका विशिष्ठ वयात माधवरावांच्या कवितांच्या प्रेमात पडलेला रसिक वाचक दुर्मिळच म्हणावा लागेल. तत्कालीन इतर दिग्गज कवींच्या साहित्यनिर्मितीहून वेगळे आणि नवे काव्यलेखन माधवरावांनी केले आणि मराठी कवितेच्या शब्दभांडारात मौलिक भर घातली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लेखन कौशल्य

Monday 4 December 2017 भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता हो...