घटस्थापना आज घरोघरी होईल,
नऊ दिवस देवीची पूजा होईल,
ओटी भरतील, आरती करतील,
पण उंबऱ्याबाहेर तीच तुझी किंमत काय ?
याचा विचार कर जरा बाई...
मंदिरात तुला देवी म्हणतील,
पण घरात तुला माणूस तरी मानतील का ?
तुझ्या पोटातली देवी नको म्हणतील,
आणि मंडपातल्या देवीला साडी नेसवतील,
हा कसला न्याय गं बाई ?
सावधान बायांनो...
उपवास तुझा, नवस तुझा,
कष्ट तुझे, व्रत तुझे,
आशीर्वाद मात्र त्यांच्या नावाचा ?
तुझ्या नशिबाची दोरी दुसऱ्याच्या हातात,
कधी सोडवणार स्वतःच्या हाताने ?
आज नऊ दिवस तुझ्याच नावाचा गजर होईल,
उद्या दहाव्या दिवशी विसर्जन कोणाचे होईल ?
देवीचे की तुझ्या स्वप्नांचे ?
विचार कर...
सावधान बायांनो, आता देवी बनून नको,
माणूस म्हणून जगायला शिका,
ओटी भरण्याआधी,
पोट भरण्याचा हक्क मागा,
पाया पडण्याआधी,
समानतेचा मान मागा...
ज्या दिवशी घरातली बाई
घरातल्या देवीइतकीच सुरक्षित असेल,
ज्या दिवशी तिच्या 'नाही' ला
देवीच्या कौलाइतकेच महत्व असेल,
त्या दिवशी खरी घटस्थापना होईल.
नाहीतर हे नऊ दिवस फक्त नाटक आहे,
आणि तुम्ही त्या नाटकातल्या बाहुल्या...
*सावधान बायांनो, सावधान...*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा