गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

गोडवा मराठी भाषेचा

माझा मराठीची बोलू कौतुके।

गोडवा मराठी भाषेचा

मायमराठी आणि इंग्रजी

मराठी मातृभाषा असणाऱ्या मराठी भाषिक लोकांना एकूणच मराठी बद्दल प्रेम व अभिमान कमी आहे हे वास्तव आहे. विशेषतः इंग्रजीला इतके मानाचे स्थान खुद्द इंग्लंड मध्ये नसेल जितके महाराष्ट्रात आहे. मागची पिढी काही अंशी मराठी शाळांमधून शिकली तरी हल्ली आपला पाल्य मराठी शाळेत पाठवणे अप्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले आहे.  सध्या मराठी शाळांना अत्यंत वाईट दिवस आहेत. मराठी शाळांना विध्यार्थी मिळणे दिवसेंदिवस दुरापास्त होत चालले आहे. मराठी शाळांतील अनेक तुकड्या, वर्ग बंद पडून शिक्षक अतिरिक्त ठरत सरप्लस करून घरी बसवले जात आहेत. अनेक शाळा विद्यार्थाअभावी बंद पडत आहेत. मराठी भाषा हा मुद्दा बनवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांची मुले आणि ते स्वत: देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच शिकलेले असतात. मराठी शाळांमध्ये दुय्यम प्रतीचे आणि निकृष्ट दर्जाचे शिक्षण मिळते हा सार्वत्रिक समज रूढ झाला आहे.

शाळांमध्ये जेव्हा जागा भरतीसाठी मुलाखती असतात तेव्हा मराठी विषयाच्या शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील अत्यंत तुच्छतेचा असतो. संस्थापक शिक्षकांना शाळेत नोकरी देऊन त्यांच्यावर जे थोर उपकार करतात त्या उपकाराची परतफेड म्हणून शिक्षकांना डोनेशन द्यावे लागते. जर तुमचा विषय इंग्रजी असेल तर तुमची डोनेशनची रक्कम चालू ' बाजारभावाप्रमाणे ' १२ लाख ते १५ लाख असू शकते. जर तुमचा विषय गणित असेल तर तुमचे डोनेशन १० लाख ते १२ लाख असू शकते. मात्र जर तुमचा विषय मराठी असेल तर तुमच्या डोनेशनची बोली १५ लाखांच्या पुढे सुरु होते. ती २० लाख किंवा अधिकही असू शकते.

तुम्ही जर इंग्रजीत संभाषण करू शकत असाल तर तुम्ही उच्चविद्याविभूषित असणार यात कोणालाही संशय वाटत नाही. इंग्रजी बोलू शकणाऱ्या लोकांमध्ये इंग्रजी न जमणाऱ्या लोकांबद्दल एक कुत्सित भावना आढळते. भाषा आणि शिक्षण याविषयी अनेक गैरसमज आढळतात ते या सर्व सामाजिक वास्तवाच्या मुळाशी आहेत.

पहिला आणि सर्वात मोठा गैरसमज आहे की इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. वस्तुत: जगातील अनेकानेक देश असे आहेत जिथे औषधाला देखील इंग्रजी भाषा आढळत नाही. त्यांचे सर्व शैक्षणिक व्यवहार आणि सामाजिक सोपस्कार सुखनैव सुरु असतात. यामध्ये अनेक विकसनशील आणि विकसित देश समाविष्ट आहेत. सोबत एक नकाशा जोडत आहे त्यावरून जगाच्या किती मोठ्या भागात इंग्रजी नाममात्र आहे व किती भागात तिचे अस्तित्वदेखील नाही हे स्पष्ट होईल. अगदी इंग्लंडच्या शेजारील फ्रांस, इटली इ. युरोपीय  राष्ट्रातसुध्दा  तुम्हाला इंग्रजीत पत्ता विचारला तरी कोणी सांगणे मुश्कील असते.  इंग्रजी ही जागतिक भाषा नसून ती इंग्लंड अमेरिका आणि इंग्लंड अमेरिका धार्जिणी असणाऱ्या भांडवलशाही पुरस्कर्त्या मानसिक गुलाम देशांची भाषा आहे.

दुसरा मोठा गैरसमज म्हणजे अनेक वैज्ञानिक क्लिष्ट संकल्पना मराठीतून शिकवणे किंवा समजावणे कठीण आहे. अनेक वैज्ञानिक पारिभाषिक संकल्पनांना सुयोग्य मराठी पर्यायी शब्द नाहीत. त्यामुळे मराठीतून संपूर्ण शिक्षण शक्य नाही. हे मत असणारे मायमराठीचे पुत्रच मराठीचा सर्वाधिक अपमान करत असतात. चीन आणि जपान या दोन पौर्वात्य देशांची विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील प्रगती थक्क करणारी आहे. आणि या दोन्ही देशात अथ ते इति संपूर्ण शिक्षण मातृभाषेतून दिले जाते. मातृभाषेतून शिक्षण दिल्याने अनेक पायाभूत संकल्पना पक्क्या होण्यास प्रचंड मदत होते हे सर्व भाषातज्ञानी ठासून सांगितलेले वास्तव असताना आपण जाणून बुजून इंग्रजी प्रेमापोटी मातृभाषेला पायदळी तुडवत आहोत. सर्व वैज्ञानिक संकल्पनांना पर्यायी ताकदवान शब्द शोधणे जर जपानी भाषेत शक्य होते, चीनी भाषेत शक्य होते तर ते मराठीत का अशक्य असावे?

“माझा मऱ्हाटाची बोलू कवतुके, परी अमृताही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन " अस म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांचा वारसा मराठी भाषा हरवून बसली आहे का ?

मराठी ही आपली राजभाषा करून सर्व राजकीय व्यवहार मराठी भाषेत चालवण्याचा आदेश देणाऱ्या, मराठीवरील फारशी अरबी उर्दू भाषेचे आक्रमण रोखण्यासाठी व भाषाशुद्धी करण्यासाठी राजव्यवहारकोष हा ग्रंथ सिद्ध करवून घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात मराठी उपरी झाली आहे, इंग्रजी आणि हिंदीच्या आक्रमणापुढे हतबल झाली आहे हेच खरे.

मराठी भाषादिन आणि मराठी भाषा चिरायू होवो !!
©सुहास भुसे


मराठी भाषेचा प्रवास

आज मराठी भाषा दिन. त्यानिमित्त ...
दरी-खोर्‍यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी...मी मराठी!
कोणत्याही मराठी भाषकाला स्फुरण चढेल या ओळीतून. अशा मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला. मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा आहे. जवळजवळ 1500 वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला. प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली. येथील सह्याद्री, सातपुडासारख्या डोंगररांगा, गड व किल्ले, दर्‍याखोर्‍यांचा परिसर म्हणजेच महाराष्ट्र भूमी. या भूमीपेक्षाही अधिक राकट, कणखर असा मराठी माणूस.
इ. सन 500-700 वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. हे वाक्य शके 905 मधील असून 'श्री चामुण्डेराये करविले' असे आहे. त्यानंतर मुकुंदराज व ज्ञानेश्र्वर हे सर्वमान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात. शके 1110 मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. ज्ञानेश्र्वरांनी 'परि अृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन।' अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले आहे. भगवद्‌गीता सर्वसामान्यांना समजावी, यासाठी ज्ञानेश्र्वरी वा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन मराठीत केले. त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लीळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ होय. तेव्हापासून पद्यलेखनाची परंपरा सुरू झाली. महानुभावपंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथातील दृष्टांतावरून मराठीची गतिमानता, सहजसौंदर्य, नादमाधुर्य, गोडवा दिसून येतो. संत एकनाथांनी 'भागवत' ग्रंथाची रचना करून मराठीत भर घातली. यातील बोलीभाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह, छोटी छोटी लयबद्ध वाक्ये यामुळे 13 व्या शतकातील मराठी भाषा आजच्या वाचकालाही तितकीच आपलीशी वाटते.
कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात. या बदलाचे एक कारण म्हणजे मराठी मातीत राज्य केलेल निरनिराळ्या सत्ता होय. त्यापैकी 1250 ते 1350 या काळातील यादवी सत्ता, 1600 ते 1700 या काळातील शिवरायांचीसत्ता, 1700 ते 1818 पेशवाई सत्ता आणि 1818 पासून इंग्रजी सत्ता. यामुळे प्रत्येक काळात मराठी भाषेवर याचे परिणाम दिसून येतात. काळाप्रमाणेच स्थलानुसार मराठी भाषा बदलत गेली. त्यातूनच मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वर्‍हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे पोटप्रकार पडत गेले.
शिवछत्रपतींच्या काळात फारशी भाषेचा प्रभाव मराठीवर झालेला दिसून येतो. त्या काळात राजकीय पत्रव्यहार, बखरी लिहिणसाठी मराठीचा वापर केलेला दिसून येतो. या पत्रांचा समावेश 'मराठी रुमाल' किंवा 'पेशव दफ्तर' या सारख्या संग्रहातून करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'आज्ञापत्रात' मराठी भाषेची बदललेली शैली दिसून येते. तसेच यावरून तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीचा प्रभाव भाषेवर पडत असतो, हे सिद्ध होते.
पेशवेकाळात मराठी भाषेवर संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसते. या कालखंडात संस्कृत काव्याचे अनुकरण करणारी पंडिती कविता लिहिल्या गेल्या. यातील कथाभाग, अलंकारिकता, अभिजात भाषावैभव या विशेषामुंळे पंडिती कवितेने मराठीला समृद्ध केले आहे. उदा. रघुनाथ पंडित यांनी रामदास वर्णन, गजेंद्र मोक्ष, दमयंती, स्वयंवर अशी अजरामर काव्ये लिहिली. यानंतरच्या काळात लोकजीवनाशी व लोककलांशी जवळीक साधणारी शाहिरी कविता आकाराला आली. भक्तीपासून ते शृंगारापर्यंतचे अनेक अनुभव खास मराठमोळ्या शैलीत साकार करणार्‍या शाहिरांच्या कविता हे मराठी कवितेचे एक भूषण आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पोवाडा हा प्रकार होय.
यानंतर पेशवाईच्या अस्ताबरोबरच इंग्रजी भाषेच्या सत्तेत मराठी भाषेची संरचना काही प्रमाणात बदलली. इंग्रजांनी महाराष्ट्रात आपली सत्ता स्थापन केली. त्यामुळे इंग्रजी साहितच्या प्रभावामुळे मराठीत निबंध, कादंबरी, लघुकथा, शोकात्मिका असे अनेक नवे साहित्यप्रकार मराठीतून लिहिले जाऊ लागले. 'केशवसुत' हे या आधुनिक कवितेचे प्रवर्तक होते. आधुनिक कवितेमध्ये कवींच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांचा भावनांचा आविष्कार दिसून येतो. कवीचे भोवतालच्या जीवनाशी असलेले संबंधही महत्त्वाचे ठरत असल्याने सामाजिक जाणिवेने मराठी कवितेला नवे वळण देण्याचे कार्य मर्ढेकरांच्या कवितेने 1940-45च्या काळात केले. मानवी जीवनातील असंगतता, मल्यांची पडझड, एकाकीपणा या कवितेतून व्यक्त होताना दिसतो.
मराठी भाषेतील पद्य साहित्या आणि गद्य साहित्य हे भाषेच्या शास्त्रशुद्ध व्याकरणामुळे साकार झाले. आधुनिक काळातील महात्मा फुले यांचा 'शेतकर्‍यांचा आसूड' हा ग्रंथ इंग्रजांच्या काळातील नवीन बदल दाखवतो. यामध्ये इंग्रजी सत्तेमुळे शेतकरंचे झालेले हाल, नवीन शैलीने रेखाटले आहे. तनंतर वि. वा. शिरवाडकर, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी, कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, ना. सि. फडके यांसारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी मनामनातून जागृत ठेवली. आज सामाजिकशास्त्रे, तत्त्वज्ञान, चित्रकला, साहित्य, संगीत, नाटक यासारख्या कलांचे समीक्षा-विचार मराठीत मूळ धरू लागले आहेत. तर एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे मूळ मराठी भाषा बदलत आहे. दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंर्दय, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे.
प्रा. डॉ. वंदना भानप

गोडवा मराठी भाषेचा...


 'माझी मराठीची बोलू कवतिके 
परी अमृतातें ही पैजेसी जींके 
ऐसी अक्षरें चि रसिके 
मेळवीन'
   मराठी भाषेचा गौरव करताना संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला अमृताची उपमा देताना या ओवीचा वापर केला आहे . अमृत म्हणजे कधीही न मरणारा मराठी भाषा ही प्रत्येक अ- मृत म्हणजेच जिवंत प्राण्याला सहज समजेल प्रत्येक मानवाला मराठी भाषेची गोडी वाटेल अशी भाषा आहे .
   मराठी भाषेच्या सन्मानार्थ जगभरातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी भाषा दिन साजरी करण्याची प्रथा सुरू झाली.
   मराठी भाषा आपल्यासाठी  फक्त एक भाषा नसून ममतेचे वाचण्याचे बोल आहेत.  जसे आईचे बोल हे तिच्या बाळासाठी प्रेमळ असतात,  प्रसंगी बाळाच्या भवितव्यासाठी ते शब्द कठोरही बनतात तशीच ही मराठी भाषा आहे . हळुवार , गोड,  लाघवी आणि प्रसंगी वज्राहून कठीण शब्दाने वार करणारी जेथे फक्त शब्द सगळं काम करतात कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही ,अशी ही मराठी भाषा आहे.
  'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी'  या कवितेच्या ओळींचा विचार केला तर खरंच आजच्या घडीला मराठी भाषेची अवस्था चांगली आहे असे आपल्या पैकी किती जण म्हणू शकतील. मराठीचा गोडवा गातांना आपल्या मनातल्या भावना सच्चेपणाने आपल्यापर्यंत पोहोचतात का ?
   मराठी भाषेचं शिक्षण देणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तो कितपत योग्य आहे ? मराठी भाषा टिकवायची असेल तर नक्की कुठला दृष्टिकोन हवा ? या सर्व प्रश्नांवर विचार करणे गरजेचे आहे . 'मोडेन पण वाकणार नाही' हा आपला मराठी बाणा  परंतु वेळेप्रसंगी एखादा वाईट प्रसंग उद्भवला तर कोणातरी समोर वाकल्याशिवाय पर्याय उरत नाही . मग त्यातून न्यूनगंड निर्माण होतो आणि या न्यूनगंडामुळे मराठी बाणा  कमकुवत व्हायला लागतो.
        आपल्याच मातृभाषेपासून आपण दुरावत आहोत.  भाषेच्या शुद्धतेला आपणच अशुद्ध करत आहोत.  एकीकडे इंग्रजी भाषा शिकवण्याचं आव्हान आणि त्याचबरोबर आपल्या भाषेचा प्रचार वापर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागते .मराठी भाषेचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचाही मोठं आव्हान सध्या आपल्यासमोर आहे .
    आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. हे युग  संपर्क क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते . अशा वेळी आपणच आपल्या बोलण्यात जास्तीत जास्त मराठी भाषेचे शब्द वापरले तर भाषेच्या संवर्धनासाठी एक अल्प कृती आपल्याकडून होऊ शकते. खरं तर आज मराठी भाषेच्या संवर्धनाचे वेगवेगळे मार्ग आहेत. संगणकीय तंत्रज्ञानही मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान मराठी भाषेत येत आहे. या सगळ्याला उभारी देण्याचे काम आपणा सर्वांचे आहे.  मराठी भाषेचा अभिमान आणि तिची जोपासना करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यायला हवी.  भाषेच्या विविध बोली जोपासणे आणि वाढवनेही तितकेच गरजेचे आहे. मराठीचे संवर्धन करण्याकरिता प्रत्येक बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे. मराठी विरुद्ध इंग्रजी असा वाद घालत न बसता मोकळ्या मनाने मराठी भाषेचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.  मराठी भाषा बोलणारे लोक फक्त महाराष्ट्रातच राहतात असं नाही,  तर महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यात म्हणजेच कर्नाटक, गोवा, गुजरात,  छत्तीसगड, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांतही राहतात. मराठी भाषेचा गोडवा इतरही राज्यांत पसरलेला आहे तरीही मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढाई का करावी लागते ? मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा त्याकरिता लढा द्यावा लागतो, अशी अवस्था तरी का निर्माण व्हावी ?
    मराठी भाषा खरोखरच समर्थ व्हायची  असेल तर तिच्याविषयीचा मराठी भाषिक समाजाचा दृष्टिकोन बदलायला हवा. मराठी भाषिकांची वृत्ती आधुनिक व्हायला हवी. मराठी आपली मातृभाषा आहे,  फक्त याच नजरेने मराठीकडे न बघता तिच्या अंतरंगात आपल्याला डोकावून बघता येईल का?  हा प्रयत्न आपण करायला हवा.
     मराठी साहित्य, वृत्तपत्रे, लोककला, नाटक, चित्रपट या माध्यमातून मराठी भाषा  चांगली लोकप्रिय होत आहे. हिंदी सिनेमांमध्ये, दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये मराठी शब्दांचा वापर केला जात आहे, मराठी चित्रपटाचा दर्जा उंचावत आहे.  चाकोरीबाहेर जाऊन बोलीभाषेतल्या चित्रपटांची निर्मिती होत आहे.  रटाळवाणे कथानक सोडून समाजाच्या विविध अंगांचा अभ्यास करून मराठी सिनेसृष्टी नवी उभारी घेत आहे.  सैराट, दुनियादारी, नटसम्राट, काकस्पर्श, दशक्रिया, गुलाबजाम अशा अनेक चित्रपटांच्या कथानकावरून  मराठी भाषेची प्रचिती सर्वांना आली आहे.
 मराठी भाषेचा  हाच गोडवा कायम राखण्यासाठी निव्वळ  गौरवाच्या भूमिकेतून तिच्याकडे न बघता उद्याच्या जबाबदारीसाठी ती समृद्ध कशी करता येईल याचा स्वच्छ विचार व्हायला हवा.
 संत तुकारामांनी म्हणूनच 'शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन'  असे म्हटले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी भाषेची पावित्र्यता  व प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे.

माझा मराठीची बोलू कौतुके। 
परि अमृतातेहि पैजासी जिंके। 
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

असे मराठीचे भाषेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केले आहे.तर सुरेश भट यांनी आपल्या काव्यपंक्तीतून मराठीचा गोडवा पुढीलप्रमाणे गायला आहे. 

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक ऐकतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी  

कविश्रेष्ठ कुसूमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी  सर्व जगभर मराठी बांधवाकडून मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि गोवा राज्याची राजभाषा असणारी मराठी भाषा जगभरातील सुमारे नऊ कोटी लोकांची मातृभाषा आहे.अगदी प्राचीन कालखंडापासून वेगवेगळ्या ग्रंथात,शिलालेखात मराठीचा उल्लेख आढळतो.सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात(अंदाजे इ.स.पू.२२०-इ.स.२१८)मराठी भाषेची साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली.सतरावा सातवाहन राजा हाल याचे "गाथासप्तशती" हे प्राकृत भाषेतील महाकाव्य मराठी साहित्याला मोठी देणगी आहे.

देवगिरीच्या यादवांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला.याच कालखंडात मुकुंदराजनी विवेकसिंधु(शके १११०) या काव्य ग्रंथाची,तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी(शके १२१२) या ग्रंथाची रचना केली.

मराठी भाषा वाढविण्याचे खरे श्रेय छत्रपती शिवरायांना आहे.त्यांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला.वारकरी संप्रदाय,महानुभाव संप्रदाय आदि अनेक संप्रदायांनी मराठी साहित्यात आपल्या भक्तीपर काव्याची मोलाची भर घातली आहे.

विसाव्या,एकविसाव्या शतकातील अनेक थोर लेखक,कवींनी आपल्या शब्दसामर्थ्यामधून मराठी भाषा समृध्द केली आहे.महाराष्ट्र शासनाने राज्य मराठी विकास संस्थेमार्फत मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न चालू केले आहेत त्याबद्दल शासनाचे आभार.पण सर्वसामान्य मराठी जनांनी आपल्या रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला तर या भाषेच्या प्रसारात मदत होईल.इंग्रजीऐवजी मराठी बोलल्याने ज्यांना कमीपणा वाटतो ते मुर्खांच्या नंदनवनात वावरत असतात.आपली मातृभाषाच सर्व भाषेमध्ये श्रेष्ठ असते.आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत पाठविणे आजकालच्या पालकांना कमीपणाचे वाटते.आपणच आपल्या भाषेबद्दल असा दुजाभाव ठेवला तर इतरांनी मराठीचे कौतुक गावे असे आपण कोणत्या तोंडानी म्हणावे.?





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...