बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

मराठी भाषा निमित्ताने...

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने.
" मोबाईलला भ्रमणध्वनी  किंवा लिफ्ट ला उदवाहन  किंवा कोरिडॉर ला छन्नमार्ग हा काय वेडेपणा आहे, जे मूळ इंग्रजी शब्द प्रचलित आहेत ते का वापरल्याने काय बिघडतं ? " असं विचारल्यावर डॉ. प्रकाश परब यांनी दिलेले उत्तर फार मार्मिक आणि विचार करायला लावणारे होते.  मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. परब हे वझे केळकर महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख असुन ते महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्यही आहेत.  ते म्हणाले की कोणत्याही भाषेत प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द असणं फार महत्वाचं आहे. तो सगळे वापरतीलच असं नाही परंतु जर कोणाला तो वापरायचा असेल तर त्याची गैरसोय होता कामा नये. यासाठीच परिभाषा कोश असतात.  फ्रान्स सारख्या देशात तेथील शासन त्यांची भाषा वापरण्याबाबत फार आग्रही असतं. कर्नाटकसारख्या राज्यातही कन्नड भाषेसाठी वेगळं मंडळ असुन त्याला वैधानिक अधिकार दिलेले आहेत आणि एकदा का "चलता है, त्याने काय फरक पडतो" असा दृष्टिकोन स्विकारला की " भाषेचा र्‍हास  " सुरु होतो.  व्यापार, तंत्रज्ञान, नवीन शोध यातुन भाषेत नवीन शब्दांची भर पडत असते. संगणकाचा शोध लागला आणि मग त्याच्याशी निगडीत हजारो शब्द इंग्रजी भाषेत रुढ झाले. यामुळेच इंग्रजी भाषा अधिकाधिक समृध्द होत आहे. याउलट आपण मातृभाषा सोडुन इंग्रजीची कास धरल्याने  आपली माय मराठी मात्र वेगाने मागे पडत चालली आहे. मराठी शाळा मृत्युपंथाला लागल्या आहेत. गेल्या अनेक दशकात जगाच्या पातळीवर दखल घेतली जाईल असं एकही संशोधन, साहित्य आपण निर्माण करु शकलेलो नाही याचं कारण आपण मातृभाषेत शिक्षण घेत नाही हे देखिल आहे. खरंतर शब्दांचा प्रवास व्यवहारातुन परिभाषा कोशात व्हायला हवा पण आपल्याकडे उलटी परिस्थिती आहे.  डॉ. परब अत्यंत कळकळीने मुद्दे मांडत होते.
 हे सगळं ऎकत असताना माझ्या असं लक्षात आलं की  रोजच्या व्यवहारात बोलताना आपल्या नकळत प्रचंड इंग्रजी शब्दांचा वापर करत असतो. ज्याला पर्यायच नाहीत असे शब्द सोडुन देऊ परंतु ही पुढील काही वाक्यं पहा. मला टेन्शन आलंय, पेपर डिफिकल्ट गेला, आजचा पेपर वाचला का ?, तुझा अ‍ॅड्रेस पाठव, तू कोणत्या कॉलेजमधे जातोस, मी कन्फ्युज झालो, आपल्याकडे रिसोर्सेस भरपूर आहेत, आज टेंप्रेचर खुप आहे, येताना खुप ट्रॅफिक लागलं, ड्रायव्हर आला का ? आज मुड ठीक नाहीय, त्याला डिप्रेशन आलंय, त्याचा बीपी वाढला, मला डायबिटीस आहे.  आता यातल्या प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठीत खूप चांगले पर्याय आहेत. तरीही आपण अगदी सहज या इंग्रजी शब्दांना आपलंस केलंय. आज चाळीशी पार केलेल्या आणि मराठीतुन दहावी उत्तीर्ण झालेल्या माझ्या पिढीतल्या लोकांच्याही तोंडी ही भाषा रुजलीय. आता इंग्रजीतुनच शिकणार्‍या मुलांच्या मराठी विषयी बोलायलाच नको. या मुलांचं दुर्दैव असं की त्यांचं मराठी कच्चं आहेच परंतु इंग्रजीही समृध्द नाही. अशी धेडगुजरी अवस्था झालीय या पिढीची.
 माझे आजी आजोबा केवळ मराठीच बोलायचे. तेव्हा बाथरुम म्हणजे न्हाणीघर किंवा मोरी होतं. किचन म्हणजे स्वयंपाकघर होतं. शर्ट म्हणजे सदरा होता. आई बाबांच्या पिढीत हळुहळु इंग्रजीने घुसखोरी सुरु केली. आणि आता तर कर्करोगाप्रमाणे तिने मराठीला ग्रासलं आहे.  बेस्ट ने प्रवास करत असताना एकदा वाहकाला ( कंडक्टर ला वाहकच म्हणतात ना !)  नेहमीच्या " गव्हर्नमेंट कॉलनी " ऎवजी " एक शासकीय वसाहत द्या" असं सांगितल्यावर तो माझ्याकडे भूत पाहिल्यासारखा बघायला लागला आणि मग हसुन म्हणाला " लईच शुध्द बोलता राव तुम्ही ". तो हसला कारण १०० टक्के मराठी माणसं असणार्‍या त्या बस मधे गव्हर्नमेंट कॉलनीला शासकीय वसाहत म्हणणारा मी एकटाच होतो. सगळेच तसं म्हणत असते तर तसं झालं नसतं. हे फार अवघड आहे का तर नक्कीच नाही. लोकलमधे दोन अनोळखी मराठी माणसं बोलताना हिंदीत सुरुवात का करतात. आपल्याच राज्यात आपली मराठी बोलायला आणि त्याबद्दल आग्रही रहायला आपल्याला कसली लाज वाटते ? चार मराठी माणसं आणि आयुष्यभर मुंबईत राहणारा त्यांचा एक हिंदी भाषिक मित्र भेटले की पाचही हिंदी का बोलतात ? त्या चार जणांना का वाटत नाही की सगळं आयुष्य मुंबईत घालवलेल्या  त्या मित्राला मराठी का येऊ नये ?
 आपल्या दैंनदिन बोलण्यात अकारण येणार्‍या इंग्रजी शब्दांकडे लक्ष द्यायला हवं. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आवर्जुन मराठीचा शब्दांचा वापर करायला हवा. तुम्हाला वाटतं तितकं हे सोप्पं नाही. तुमच्या बोलण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की अनेकदा एक वाक्यही तुम्ही शुध्द मराठीत बोलु शकणार नाहीत. आणि " मी पदव्युत्तर शिक्षण घेतोय" किंवा " न्याहरीला काय घेणार " किंवा " मी येता जातानाचं तिकिट आरक्षित केलंय " किंवा " माझा पायमोजा कुठे आहे" किंवा " मी कार्यालयात चाललोय" किंवा " त्याने सुंदर गोलंदाजी केली " " अंतिम सामना कधी आहे" " त्याने चार षटकार ठोकले " " तो छायाचित्रकार आहे " असं बोलल्यावर समोरचे तुम्हाला वेड्यात काढतील, हसतीलही. आणि ते सगळे मराठीच असतील. कारण आपणच आपल्या मराठीवर ही वेळ आणली आहे. पण हे शब्द जर आपण व्यवहारात वापरले नाहीत तर येत्या काही काळात यासारखे अनेक शब्द केवळ पुस्तक आणि शब्दकोशातच उरतील. खरं तर नवे नवे शब्द आपण मराठीत रुजवायला हवेत. याउलट आपल्या मराठीतले शब्द आपण विसरत चाललो आहोत. मायमराठी टिकावी असं वाटतं असेल तर आपणही थोडा वेडेपणा करायला काय हरकत आहे. असे कुठले शब्द तुम्हाला आढळतात जे सहज मराठीत उपलब्ध असुनही आपण सर्रास इंग्रजीत वापरतो ? उद्या २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांची जन्मतिथी. आपण मराठी भाषा दिन म्हणुन साजरी करतो. या निमित्ताने जास्तीत जास्त मराठीतच बोलण्याचा संकल्प करायला काय हरकत आहे ?
प्रशांत साजणीकर.
२६/०२/२०१९.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...