शुक्रवार, १ मार्च, २०१९

परीक्षेस सामोरे जाताना...

शिक्षकांनी ‘अक्षरात सुधारणा कर’ असे बजावल्यानंतर आलेल्या ताणामुळे १६ वर्षांचा अनिरुद्ध घर सोडून गेला किंवा शांत, मनस्वी सुभाष परीक्षेचा अभ्यास न झाल्यामुळे आत्महत्या करतो, अशी उदाहरणे सध्या समाजात वेळोवेळी समोर येऊ लागली आहेत. शिक्षणक्षेत्राशी निगडित या घटना कोणत्याही संवेदनशील पालक किंवा शिक्षकांना हादरवून सोडू शकतात. मात्र अशा घटनांनी हादरून जाण्यापेक्षा विद्यार्थ्यांवर इतक्या टोकाचा ताण येणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. खरं तर ही गोष्ट  फार कठीण नाही. अगदी छोटय़ा छोटय़ा कृतींतून, वर्तनातून विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होऊ शकेल. या गोष्टी पुढीलप्रमाणे.
  • निरोगी व समतोल दृष्टिकोन- मुले मोकळ्या मनाने अभ्यासाला सामोरी गेली तर नक्की फरक पडेल. अभ्यास ही दामटून करायची गोष्ट नाही. तो बँकेतल्या ठेवीप्रमाणे आहे. आपण मनापासून अभ्यास केला तर भविष्यात आपल्याला याचा मोठा फायदा होईल, ही गोष्ट मुलांना पटवून देता आली पाहिजे.
  • नकारात्मक विचार टाळा- बऱ्याचदा आपण नापास होऊ ही भीतीच मुलांना खाऊन टाकते आणि त्यांचे अभ्यासावरून लक्ष उडते. अशा वेळी त्यांच्यातील नकारात्मक विचार दूर करणे महत्त्वाचे आहे.
  • तुलना करू नका- सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्पर्धा टाळणे अशक्य आहे. मात्र यामुळे मुलांमध्ये एकतर न्यूनगंड येतो किंवा ती अतिआक्रमक होतात. त्यामुळे आपल्या पाल्याची इतरांशी तुलना करणे टाळले पाहिजे.
  • अभ्यासाच्या जागेची निवड- अभ्यास करण्यासाठीची जागा निश्चित असावी. ती खूप आरामदायी असू नये. मात्र आवश्यक गोष्टी तेथे उपलब्ध असल्या पाहिजेत. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी (कॉम्प्युटर, गेम) या जागेपासून दूर असाव्यात.
  • भावनिक समस्या समजूतदारपणे हाताळा- किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक व मानसिक बदलांची प्रक्रिया वेगाने सुरू असते. अशा वेळी त्यांच्यात अस्वस्थताही वाढते. त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. लैंगिक आकर्षण, त्याबद्दलच्या गैरसमजुती, प्रसारमाध्यमांतून मिळणारी चुकीची माहिती यामुळे त्यांचा गोंधळ उडू शकतो. मात्र यावर स्वत:च्या मनाशी संवाद साधून ‘हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ आहे’ हे समजावता आले की, अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येते.
अभ्यासाचे समायोजन
  • वर्गात शिकताना महत्त्वाच्या मुद्दय़ांची नोंद करण्याची सवय करून घ्या. दिवसभरात एकदा तरी त्याची उजळणी करा. ऐकलेले स्मरणात राहते.
  • पाठांतर करताना फक्त बोलून पाठ करू नका. बरीचशी मुले सुरुवात विसरतात तर काही मुलांना शेवट आठवत नाही. आपल्या सवयीचे निरीक्षण करून त्यानुसार योजना ठरवा.
  • परीक्षा जवळ आली की विद्यार्थी सकाळी लवकर उठून किंवा रात्री जागून अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे तुम्हाला झेपेल व आवश्यक वाटेल तसे वेळापत्रक बनवा आणि ते पाळा.
  • तुम्ही वेळेच्या आधी तुमचा अभ्यास पूर्ण करत असाल तर बक्षीस म्हणून तुमच्या आवडीची कोणतीही एक गोष्ट थोडावेळ करा- उदा. मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारणे किंवा आवडती टीव्ही मालिका पाहणे.
  • जेव्हा समवयस्क एकमेकांशी चर्चा करतात तेव्हा आपण एकमेकांना जास्त चांगले समजावून सांगू शकतो. एकमेकांना चुका सुधारून देऊ शकतो व विषयाची चांगली उजळणी होऊ शकते.
ताणाचे नियोजन आवश्यक
अनावश्यक सामानाचे ओझे नसेल तर प्रवास सुखाचा व आनंददायी होतो. तसेच ताणाचे आहे. अनावश्यक ताण घेतला नाही तर अभ्यास अधिक चांगल्या तऱ्हेने करता येतो. त्यामुळे ताणाचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी दोन तंत्रे आत्मसात केली पाहिजेत.
स्विच ऑन-ऑफ तंत्र
काही वर्षांपूर्वी एक मुलगा माझ्याकडे आला. त्याचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. त्याला बोलते केल्यावर लक्षात आले की, तो जेव्हा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या मनात मुलींबद्दलचे विचार येत. त्यामुळे त्याचे अभ्यासावरील लक्ष उडायचे व तो अस्वस्थ व्हायचा. तरुण वयात या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसल्याने असे होणे साहजिकच आहे.
जेव्हा तुम्ही एखादा विचार दाबून ठेवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तो अधिक उफाळून येतो. त्यापेक्षा विचारांना चूक किंवा बरोबर न ठरवता, ते फक्त येऊ द्यायचे आणि थोडय़ा वेळाने स्वत:ला थांबवायचे. सुरुवातीला थोडय़ा थोडय़ा वेळाने विचार पुन्हा भरकटू शकतात. मात्र पुढे सवय झाली की यावर व्यवस्थित नियंत्रण मिळवता येते.
भावनिक विरेचन
तुम्हाला ज्या गोष्टींचा ताण येईल, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी खेळा, गप्पा मारा, मन मोकळे करा. या कृतीने तुमच्या मनावरील ताण हलका होईल.

अनिता र. दाभोलर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भंगु दे काठीन्य माझे - कवी बा.सी.मर्ढेकर

भंगु दे काठीन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे येऊ दे वाणीत माझ्या सुर तुझ्या आवडीचे, राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारांतले गा, अक्षरां आकार त...