Wednesday, March 6, 2019
राज्यकर्त्यांच्या तावडीत घुसमटतेय मराठी भाषा
राज्यकर्त्यांच्या तावडीत घुसमटतेय मराठी भाषा-
-प्रा.हरी नरके,समन्वयक, अभिजात मराठी भाषा समिती
पंधरा वर्षांपुर्वी तमीळ भाषेला अभिजात दर्जा दिला गेला. त्यानंतर संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम आणि उडीया यांनाही तो मिळाला. मराठीला हा दर्जा द्यावा अशी साहित्य अकादमीनं एकमतानं केलेली लेखी शिफारस मोदी सरकारनं दुर्लक्षित केलीय. राज्य सरकारही त्याबाबत संपुर्ण उदासिन आहे. मराठी भाषा,साहित्य, संस्कृती, शिक्षण हे सारेच विषय गेली ५ वर्षे विनोदाचे विषय बनवले गेलेत. राज्यकर्त्यांच्या तावडीत सापडलेली मराठी तर अक्षरश: गुदरतेय. राज्यातल्या प्रमुख चारही पक्षांचं मराठीप्रेम पुतणा मावशीचं आहे. मराठी भाषेचं स्वतंत्र विद्यापीठ, मराठीचं २५ वर्षांचं धोरण, मराठी सक्तीचा कायदा आणि अभिजात दर्जा या चारही बाबतीत खात्याचे मंत्री विनोद तावडे हे कृतीशून्य नी बोलघेवडे ठरलेले आहेत. खरंतर झेपत नसेल तर त्यांनी पायउतार व्हायला हवं.
माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. माणसाचं ते जीवसृष्ठीतील आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे.लाखो वर्षांच्या मानवी स्मृती भाषेच्या माध्यमातून जतन केल्या गेलेल्या आहेत.
त्यानं साहित्य, संस्कृती, कला, तत्वज्ञान यांची निर्मिती केली. माणसं संस्कृतीची जनुकं एका पिढीकडून दुसर्या पिढीकडं पोचवत असतात.
माणूस मातृभाषेतून विचार करतो. मातृभाषा ही एकप्रकारे माणसाच्या अस्तित्वाला विचारांचा प्राणवायू पुरवत असते. ते त्याचे ओळखपत्र असते. मातृभाषा ही माणसाची अस्मिता आणि अस्तित्वखूण असते.शहरी, महानगरी मराठी माणूस बहुभाषिक आहे. रोजगार, उद्योग, व्यापार, आर्थिक प्रगतीसाठी त्यानं बहुभाषिकतेची कास धरलेली आहे. पोटासाठी त्यानं इतर भाषा शिकायला कोणाचाच विरोध नाही. परंतु मराठी ही हलकी भाषा आहे, डाऊन मार्केट आहे म्हणुन त्याला तिची लाज वाटत असेल तर मात्र ती शरमेची बाब आहे. इंग्रजीतून, हिंदीतून बोलण्याला आज सार्वजनिक जीवनात विशेष प्रतिष्ठा आहे. समोरच्या माणसाला मराठी येत नसेल तर त्याच्याशी त्याला समजेल अशा भाषेत बोलयला काहीच हरकत नाही. पण मराठी माणूस बोलायला सुरूवातच मुळात हिंदी किंवा इंग्रजीतून करतो. त्यामुळे अनेकदा बराच वेळ बोलल्यानंतर लक्षात येते की दोघेही मराठीच असूनही ते उगीचच हिंदी किंवा इंग्रजीतून बोलत होते.मराठी माणसाला मराठीची लाज वाटते.
१९०७ साली ग्रियरसनने भारतीय भाषांचे सखोल सर्व्हेक्षण केले. तो म्हणतो की जी भाषा रोजगार देते तीच जगते. जी भाषा रोजगारक्षम नसते ती मरते. नष्ट होते. इंग्रजी आणि हिंदीच्या तुलनेत मराठीची रोजगार देण्याची क्षमता कमी आहे असं मराठी माणसाला मनोमन वाटतं, त्यामुळं तो आपल्या मुलाला मराठी माध्यमात घालायला तयार नसतो. मराठी मरणार अशी काळजी राजवाड्यांनी शतकापुर्वीच व्यक्त केली होती.बोलीभाषांची विविधता हे मराठीचं खरं वैभव असून, त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. मराठीला ५२ बोलीभाषा आहेत. जिला जास्त ओढे ती नदी मोठी, याच न्यायाने मराठीला रसद पुरवणार्या या सर्व बोली महत्वाच्या आहेत. या सर्वच बोलीभाषांतील साहित्य खूप सकस आहे. बहिणाबाई, उद्धव शेळके, रंगनाथ पठारे, व्यंकटेश माडगूळकर, प्र. ई. सोनकांबळे, बा. भ. बोरकर, नामदेव ढसाळ आदींमुळे मराठी समृद्ध झालेली आहे. दलित साहित्यानं मराठीला सामाजिक दस्तऎवज देऊन तिला खुप श्रीमंत केलेलं आहे.
"एक होता कावळा नी एक होती चिमणी..." ही प्रत्येक मराठी घरात आजही सांगितली जाणारी गोष्ट आहे. ती पहिल्यांदा ग्रंथात लिहिली गेली ८०० वर्षांपुर्वी. लिळाचरित्रात धानाई नावाच्या हट्टी मुलीला श्री चक्रधरांनी ती सांगितली असली तरी ती त्याआधी हजारबाराशे वर्षे मराठी लोकजीवनात सांगितली जात होती. ती विलक्षण लोकप्रिय होती.
तमिळ भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात "संगम साहित्याचा" मोठा वाटा आहे. हे साहित्य २३०० वर्षे जुने आहे. कावेरी नदीवर धरण बांधले जात असल्याचा प्रसंग त्यात आला आहे. या धरणाच्या कामासाठी जगभरातून तज्ञ मागवण्यात आलेले होते. महाराष्ट्रातील मराठी गवंडी मोठे कुशल असल्याचे वर्णन त्यात आले आहे.
इसवी सनाच्या २ र्या शतकात वररूचीने "प्राकृतप्रकाश " हा व्याकरण ग्रंथ लिहिला. त्यात त्याने शौरसेनी, मागधी, पैशाची व महाराष्ट्री या प्राकृत भाषांचे व्याकरण सिद्ध केले. आधीचे सगळे नियम सांगून झाल्यानंतर शेवटचा नियम सांगताना तो म्हणतो, " शेषं महाराष्ट्रीवत." यावरून देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रचलित असलेल्या सगळ्या भाषांना मराठीचे नियम लागू पडत होते. यातून मराठीची प्रतिष्ठा, मान्यता आणि श्रेष्ठता स्पष्ट होते.
संस्कृत महाकवी कालिदास आणि शूद्रक यांच्या "शाकुंतल" आणि "मृच्छकटिक" या नाटकांमध्ये अनेक संवाद मराठीत आहेत. महाभारत या जगप्रसिद्ध महाकाव्यात अनेक मराठी शब्द आलेले आहेत. यज्ञाच्या वेळी पंडीतांना मराठीत बोलायला बंदी घालण्यात आल्याची नोंद भागवत यांनी दाखवून दिलेली आहे. संस्कृत ही धर्मभाषा असली तरी हे पंडीत खाजगीत मराठीत बोलत असत हे यातून उघड होते. संत एकनाथांनी "संस्कृत वाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासोनी झाली?" असे संतप्त उद्गार काढले होते. "विंचू चावला..." ही एकनाथांची भारूडांची मराठी आजची अस्सल मराठी असूनही ते तिला प्राकृत म्हणतात कारण महाराष्ट्री प्राकृत हीच मराठी आहे. रघुनाथराव गोडबोले यांनी १८६३ साली प्रकाशित केलेल्या मराठी शब्दकोशाला "महाराष्ट्रीय भाषेचा" कोश म्हटले आहे, ते यामुळेच.
जुन्या काळात धर्मग्रंथांची भाषा होती संस्कृत. पण तिचा जन्म झाला वैदीक भाषेपासून आणि वैदीकची आई होती वैदीकपुर्व बोली भाषा. हार्वर्ड विद्यापिठाचे डॉ. मायकेल विट्झेल यांनी आपल्या "ट्रेसिंग दि वैदीक डायलेक्ट्स" या ग्रंथात हे दाखवून दिले आहे. तेव्हा संस्कृत ही सर्व भाषांची मूळ भाषा होती ही माहिती खरी नाही. पाणिनीने जेव्हा या भाषेचे व्याकरण लिहिले तेव्हा तो तिला "छंद" भाषा म्हणतो. महाराष्ट्री प्राकृत किंवा महारठ्ठी या नावाने दोन-अडीच हजार वर्षांपुर्वी प्रचलित, लोकप्रिय व मान्यताप्राप्त असलेली भाषा ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे म.म. राजारामशास्त्री भागवत, विदुषी दुर्गा भागवत यांचे आजोबा, यांनी १८८५ सालीच दाखवून दिले होते. त्यांचा "मराठ्यासंबंधी चार उद्गार" हा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचावा. त्यांचा "मराठीची विचिकित्सा" हाही ग्रंथ महत्वाचा आहे. १९२७ साली ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास दोन खंडात लिहिला. त्यात त्यांनी मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले आहे.
मुल लहान असताना, रांगत असताना पीएच.डी. करू शकेल का? नाही.
मग कोणतीही भाषा बालवयातच "ज्ञानेश्वरी, लिळाचरित्र आणि विवेकसिंधू" यांसारखे जागतिक दर्जाचे श्रेष्ठ ग्रंथ कसे प्रसवू शकेल? आठशे वर्षांपुर्वी मराठीत हे ग्रंथ लिहिले गेले तेव्हा मराठी बालभाषा नव्हती, तर ती एक परिपक्व झालेली समृद्ध भाषा होती.संत ज्ञानेश्वर मराठीची गोडी अमृताहूनही जास्त असल्याचे प्रतिपादन कोणाला उद्देशून करीत होते?
ज्ञाननिर्मिती, साहित्य, विचार, तत्वज्ञान आणि संस्कृतीची त्याआधीची फार मोठी परंपरा मराठीला होती.
मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ आहे, " गाहा सत्तसई " { गाथा सप्तसती} गाथा म्हणजे कविता. सातशे लोककवितांचा संग्रह म्हणजे हा ग्रंथ होय. पैठणच्या हाल या सातवाहन राजाने सुमारे दोन हजार वर्षांपुर्वी पन्नास कवींच्या या कविता संकलित केल्या.सातवाहनांची राजभाषा मराठी असल्याने त्यांचे जिथे जिथे राज्य होते, तिथे तिथे या ग्रंथाची हस्तलिखिते मिळालेली आहेत. सातवाहनांचे संपुर्ण भारतावर तर राज्य होतेच परंतु पार अफगाणिस्तानपर्यंत राजभाषा मराठीची पताका फडकत होती.गाथा सप्तसती, पादलिप्त, हरिभद्राची समरादित्याची कथा, उद्योतन सुरीची कुवलयमाला, चक्रधरांचे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, एकनाथांची भारूडे, माझा प्रवास, गावगाडा, धग, कोसला, बनगरवाडी, बॅरिस्टर अनिरूद्ध धोपेश्वरकर, गोलपिठा, शांतता कोर्ट चालू आहे, हे ग्रंथ इतके चिरेबंदी आहेत की मराठीची श्रेष्ठता स्वयंस्पष्ट आहे. फुले-आंबेडकर, टिळक - आगरकर, राजवाडे-केतकर, राजारामशास्त्री भागवत, प्रबोधनकार ठाकरे यांचे वैचारिक लेखन श्रेष्ठ प्रतीचे आहे.
मराठीला अभिजात दर्जा मिळणं म्हणजे मराठीच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे. त्यामुळे मराठी माणसाचा न्यूनगंड कमी होईल. मराठी शिकवण्याची सोय देशातील 450 विद्यापीठांमध्ये होईल. मराठीच्या समग्र विकासासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी 500 कोटी रुपये मिळतील. मराठी शाळा, शिक्षण, शिक्षक यांची दर्जावाढ, वाचन संस्कृती वाढणे, ग्रंथालये संवर्धित केली जाणे, मराठी पुस्तके स्वस्तात मिळणे, मराठी मुलामुलींना अधिकाधिक रोजगार मिळणे यासाठी या दर्जामुळे खुप मदत होईल.
मराठीचे गोमटे व्हायला अभिजात दर्जा गती देईल.
राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना दुर्गा भागवतांनी म्हटले आहे, की जुनी माहाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. मराठी संस्कृतोद्भव नाही. ती संस्कृतपेक्षा जुनी भाषा आहे. नात्याने ती संस्कृतची मावशी आहे.
गाथा सप्तसतीतील मराठी, जे महाराष्ट्री प्राकृत या नावाने ओळखले गेले, हरिभद्र, भद्रबाहू, उद्योतन सुरी आदींचे लेखन आणि चक्रधर, ज्ञानेश्वर, चोखा, चोंभा, सावतामहाराज, नामदेव, संत बहिणाबाई, एकनाथ, बखरी, ते फुले-आंबेडकर, अण्णाभाऊ, लोकहितवादी, आगरकर, रानडे, टिळक, विष्णुभट गोडशे, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरूजी, बेडेकर, भाऊ पाध्ये, नेमाडॆ, ढसाळ, कोलटकर, चित्रे, यांच्या साहित्याची महत्ता आणि त्यांचे "जैविक नाते" महत्वाचे आहे.
अभिजात मराठी भाषा म्हणजे श्रेष्ठ मराठी भाषा. खांद्यावर मायमराठीची पताका घेतलेल्या साडेबारा कोटींची ती "भाषांमाजी भाषा साजिरी आहे." संत एकनाथ म्हणतात, ती चोरांपासून जन्मलेली नाही. ती कष्टकर्यांची-ज्ञानवंतांची भाषा आहे. ही श्रमाची-घामाची, निर्मितीची भाषा आहे. मराठी ज्ञानभाषा आहे. धर्मभाषा आहे. अक्षरभाषा आहे. अजरामर भाषा आहे. जगातील सर्व भाषा मेल्या आणि अवघ्या चार जगल्या तरी मराठी जगणार आहे.स्वत:चे राज्य आणि श्रेष्ठ साहित्य असलेली मराठी ही जगातली चौथ्या क्रमांकाची राज्य भाषा आहे. मराठीतले कोश वांड्मय तर जगातले दुसर्या क्रमांकाचे कोश वांड्मय आहे.
आपण दक्षिण भारतात गेलो की तिथली सगळी माणसं त्यांच्या मातृभाषेबद्दल आग्रही असलेली दिसतात. तमीळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम हे सगळेच लोक आपापल्या मातृभाषेचा अभिमान बाळगतात. या बहुतेक सर्व राज्यांनी शिक्षण, साहित्य, संस्कृती, कला आदी क्षेत्रात फार मोठी भरारी घेतलेली आहे. मानव विकास निर्देशांकात ही राज्यं पुढं आहेत. हे सारे आपले शेजारी असूनही आपण त्यांच्याकडून मातृभाषाप्रेम मात्र शिकायला तयार नाही. तिथल्या सरकारांनी स्थानिक भाषेच्या सक्तीबाबत अतिशय कडक पावलं उचललेली आहेत. इंग्रजी आणि हिंदीच्या आक्रमणाचा प्रश्न त्यांनाही भेडसावतो आहे. पण त्यांनी त्यावर कशी मात केलीय हे आपण त्यांच्याकडून समजून घ्यायला हवं. तिथं भाषिक मतबॅंक, व्होटबॅंक असल्यानं राज्यकर्त्यांना ठाम आणि कडक भुमिका घ्यावीच लागते.
एखादी भाषा मरते तेव्हा एक संस्कृती संपते. तिच्या निर्मिती आणि संवर्धनासाठी शेकडो वर्षे लाखो लोक राबलेले असतात.
मराठी शाळांचा दर्जा चांगला नसतो अशी टिका केली जाते. मराठी शाळांचा दर्जा वाढवायला हवा याबाबत दुमत नाही. परंतु काही मोजक्या ईंग्रजी शाळा सोडल्या तर उरलेल्या शाळांना दर्जा सुमार असतो. पण संस्कृतीकरणाचा सिद्धांत सांगतो, सामान्य लोक अभिजनांचं, महाजनांचं अनुकरण करीत असतात. महाराष्ट्रात ज्या दिवशी बुद्धीजिवी मध्यम आणि उच्च मध्यम वर्गानं मराठीचं बोट सोडलं, त्यादिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला.
सावरकरांची क्षमा मागून सांगायचं झालं तर, ते जणू म्हणताहेत, "सागरा प्राण तळमळला, ने मजशी ने इंग्रजी शाळेला."
ज्यांनी ज्ञाननिर्मिती केली, देश समृद्ध केला असे बहुतेक सर्वजण मातृभाषेतून शिकलेले आहेत. परममहासंगणक बनवणारे विजय भटकर, मोबाईलची क्रांती घडवून आणणारे सत्यनारायण गंगाराम पित्रोदा, महान शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, वसंत गोवारीकर, माधव गाडगीळ, ज्ञानपीठ विजेते खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा, नेमाडे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी सावंत, तेंडूलकर, सुर्वे, एलकुंचवार, यशस्वी सनदी अधिकारी शरद जोशी, माधव गोडबोले, माधव चितळे, स.गो.बर्वे, राम प्रधान, ज्ञानेश्वर मुळे ते भूषण गगरानी हे सारेच मातृभाषेतून शिकलेले आहेत.
-प्रा.हरी नरके
harinarke@gmail.com
लेखक अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक आहेत.
http://epaperlokmat.in/main-editions/Mumbai%20Main%20/-1/8
लोकमत,पुणे, संपादकीय पृष्ठ, गुरूवार, दि. ७ मार्च २०१९
1 टिप्पणी:
Early language Marathi = right
टिप्पणी पोस्ट करा