रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - जीवन परिचय


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), बाबासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री, बौद्ध धर्म पुनरुत्थानक आणि स्वातंत्र भारताचे जनक होते. याशिवाय बहुआयामी असलेले डॉ. आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, बॅरिस्टर, जलतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, अस्पृश्य, कामगार व स्त्रियांच्या अधिकारांचे पुरस्कर्ते होते.


आंबेडकर हे एक प्रतिभावंत विद्यार्थी होते. सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या, कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातील संशोधनासाठीचे एक विद्वान म्हणून प्रतिष्ठित झाले.
आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि भारताच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
१९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील एक उच्च उपाधी प्रदान केली. इ.स. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीसह जगभरातील कोट्यवधी शोषित, पीडित, क्रांतीकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांचा जन्मदिवस आंबेडकर जयंती सुद्धा दरवर्षी भारतासह जगभरात साजरी केली जाते. इ.स. २०१२ मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय (द ग्रेटेस्ट इंडियन) या सर्वेक्षणात बाबासाहेब आंबेडकर विजयी ठरले आहे. तर इ.स. २०१४ साली कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात शिकलेल्या एकूण विद्यार्थांमधून पहिल्या १०० बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात बुद्धिमान विद्यार्थी (फर्स्ट कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम) म्हणून घोषित केले आहे.

उच्च शिक्षण

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आपले उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, बॉन विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या संस्थांमधून घेतले आहे. त्यांनी इ.स. १९१२ मध्ये बी.ए., इ.स. १९१५मध्ये दोन वेळा एम.ए., इ.स. १९१७ मध्ये पी.एचडी., इ.स. १९२१ मध्ये एम.एस्‌‍सी., इ.स. १९२२ मध्ये बार-ॲट-लॉ, इ.स. १९२३ मध्ये डी.एस्सी., इ.स. १९५२ मध्ये एल्‌एल.डी., इ.स. १९५३ मध्ये डी.लिट् आणि इतर अशा अनेक पदव्या मिळवल्या.
बाबासाहेब आंबेडकर परदेशात अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएचडी) मिळवणारे पहिले भारतीय होते. याशिवाय संपूर्ण दक्षिण आशियातून दोन वेळा डॉक्टरेट (पीएचडी व डी.एससी.) मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. बाबासाहेब त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक बुद्धिमान व सर्वाधिक उच्च विभूषित भारतीय व्यक्ती होते.

मुंबई विद्यापीठ

भीमराव आंबेडकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकून नोव्हेंबर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची परीक्षा दिली. जानेवारी १९१३ मध्ये ते बी.ए. च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तत्पूर्वी जानेवारी १९०८ पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्‍नांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रु. २५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती.
मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला.

कोलंबिया विद्यापीठ

महाराज बडोदा संस्थान त्यांच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. महाराज सयाजीराव गायकवाड भीमरावांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वावर प्रसन्न होते. महाराजांनी, भीमरावांना होकार दिल्यामुळे ४ एप्रिल १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी दिनांक १८ एप्रिल १९१३ रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती.
त्यानंतर बोटीने प्रवास करून भीमराव आंबेडकर २० जुलै १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पोहचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र शाखेत त्यांनी १९१३ ते १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला. त्यांनी या विद्याभ्यासाकरता प्रमुख विषय अर्थशास्त्र व इतर विषय म्हणून समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले.
न्यूयॉर्कमध्ये सुरुवातीस ते कोलंबिया विद्यापीठाच्या धईले हॉलमध्ये राहिले आणि नंतर रस्ता नं. ११४ वरील कॉस्मोपॉलिटन क्लब, न्यूयॉर्क पश्चिम ५६४ इथे राहिले, कारण इथे काही भारतीय विद्यार्थी रहात होते. तसेच सातारा हायस्कूलमधील त्यांचा एक वर्गमित्र सुद्धा तेथेच होता.

लंडनमधील सन्मान

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलीटिकल सायन्समध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा स्थापला गेला आहे. आणि त्याठिकाणी पुतळा असणारे ते प्रथम भारतीय आहेत.
ग्रेज इनमध्येही आंबेडकरांचे तैलचित्र लावण्यात आले आहे. या संस्थेत तैलचित्र असणारे ते एकमेव भारतीय आहेत. ६ डिसेंबर २०१६ रोजी ग्रेज-इन, लंडनमध्ये बाबासाहेबांचे नवीन तैलचित्र लावण्यात आले. ग्रेज-इन हे ब्रिटनच्या चार कोर्ट् ऑफ लंडनपैकी एक असून येथे १९२२ मध्ये बाबासाहेबांनी ‘बॅरिस्टर अॅट लॉ’ कायद्याची पदवी दिला गेली होती. येथे १२ तैलचित्र आहेत, त्यापैकी १० प्रसिद्ध ब्रिटिश न्यायधीशांची आहेत, १ आयरीश न्यायधीशाचे आहे आणि १२ वे तैलचित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. बाबासाहेबांचे हे तैलचित्र हेझल मोर्गन या ब्रिटिश महिलेने तयार केलेले आहे.
डॉ. आंबेडकर राहत असलेल्या युनायटेड किंग्डमच्या वायव्य लंडनमधील १० किंग हेनरी मार्गावर असलेल्या वास्तुला महाराष्ट्र सरकारद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बनवले गेले असून याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक १४ नोव्हेंबर २०१५ रोजी करण्यात आले. हे स्मारक तीन मजली असून क्षेत्रफळ २०५० चौरस फुट आहे. या वास्तुवर ‘सामाजिक न्यायाचे भारतीय पुरस्कर्ते, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५०), यांनी १९२१-२२ मध्ये येथे वास्तव्य केले’ अशी अक्षरे कोरलेली आहेत.

वकीली

ऑक्टोबर इ.स. १९२६ मध्येआंबेडकरांनी काही महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता ब्राह्मण तीन गैर-ब्राह्मण नेते के. बी. बागडे, केशवराव जेधे आणि दिनकरराव जावळकर यांच्यावर ब्राह्मणांनी देश उद्ध्वस्त केला अशा आशयाची पत्रके लिहिली होती म्हणून त्या तिघावर खटला भरण्यात आला होता. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल. बी. भोपटकर होते.आंबेडकरांनी आपला खटला अतिशय विश्वासाने लढला, अतिशय प्रशंसनीय बचाव केला आणि खटला जिंकला.

अस्पृश्यतेचा विरोध

बाबासाहेबांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९ बाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकरांनी मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली.

मनुस्मृतीचे दहन मनुस्मृतिकाराची चूक

शूद्रावर कशा प्रकारचे अन्याय ब्राह्मणी हिंदू वाङमयाने वा शास्त्राने केलेले आहेत, ते थोडक्यात खाली दिलेले आहेत. स्मृतिकाराने अस्पृश्यांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख करावा लागेल.
1. समाजात शुद्राचे स्थान सर्वांच्या पायदळी असावे.
2. शुद्र अपवित्र असल्यामुळे कोणतेच धार्मिक पवित्र कार्य त्याची उपस्थितीत करू नये.
3.इतर वर्गाप्रमाणे त्याला मान देऊ नये.
4. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या जीवासारखी शूद्राच्या जीवास एका कवडीची पण किंमत नाही.
5. कसल्याच प्रकारची नुकसान भरपाई न देता शुद्राचा जीव घेण्यास कसलीच आडकाठी असू नये.
6. शुद्राने शिक्षण घेऊ नये. त्यांना शिक्षण देणे हे पाप आहे.
7. शुद्राने कसल्याच प्रकारची संपत्ती कमविण्याचा हक्क नाही. जर ब्राह्मणास आवश्यक असेल तर ते शुद्रांची कमविलेली संपत्ती घ्यावी.
8. सरकार दरबारी शुद्रास नोकरीस ठेवू नये. वरिष्ठ वर्गाची सेवाचाकरी हेच शुद्राचे मुख्य कर्तव्य आहे. हाच त्याचा धर्म आहे आणि त्यातच त्यांची मुक्ती आहे.
9. उच्चवर्णियांनी शुद्राशी आंतरजातीय विवाह करू नयेत. शुद्राची स्त्री रखेल म्हणून ते ठेवू शकतात.
10. उच्चवर्णीय स्त्रीस शुद्राने नुसता स्पर्श जरी केला तरी, त्यास जबर शिया करावी. शुद्राचा जन्म गुलामगिरीत होतो आणि त्याने गुलामगिरीतच मरावे.

मनुस्मृती दहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत. काही हिंदूंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे. हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदूंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो. मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले. मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे. म्हणून मनुस्मृतीचे २५ डिसेंबर इ.स. १९२७ रोजी समारंभपूर्वक जाहीरपणे दहन केले.
ही घटना म्हणजे सनातनी हिंदू धर्माला बसलेला धक्का होता. या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली. मनुस्मृती दहनापूर्वी डॉ. आंबेडकरांनी लोकांसमोर भाषण केले.
मनुस्मृती दहनभूमीसाठी एक ६ इंच खोल खड्डा आणि एक अर्धा फुट चौरस खड्यात चंदनाच्या लाकडांची तुकडे टाकून भरण्यात आली होती. सभेतील मंडपाच्या चारही कोपऱ्यांवर तीन खांबांवर फलक (बॅनर) बसविले होते. ज्यावर “मनुस्मृतीची दहनभूमी”, अस्पृश्यता नष्ट करा आणि ‘ब्राह्मणवाद गाडा’ असा मजकूर होता.
२५ डिसेंबर १९२७ च्या संध्याकाळी सभेत आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर, नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अस्पृश्य सहकारी पी.एन. राजभोज यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सरणावर मनुस्मृती ठेऊन तिचे दहन करण्यात आले. हे काम आंबेडकर आणि ब्राह्मण सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच पाच सहा इतर दलित सहकाऱ्यांनी पूर्ण केले. मंडपात केवळ मोहनदास करमचंद गांधी यांचाही एकच फोटो होता.
३ फेब्रुवारी इ.स. १९८८ ला बहिष्कृत भारत या त्यांच्या वृत्तपत्रात त्यांनी या विषयावर सांगितले की, मनुस्मृतीच्या वाचनाने त्यांची खात्री पटली आहे कि त्यांनी सामाजिक समतेच्या विचाराचा दूरवर पुरस्कार केलेला नाही.
१९३८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत स्वत: बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनाच्या प्रतीकात्मक स्वरूपावर जोर देऊन म्हटले होते, ‘‘ते एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदूंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही.
मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वत: समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!’’
तेव्हापासून दरवर्षी ‘२५ डिसेंबर’ हा दिवस मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो.

मंदिर सत्याग्रह अंबादेवी मंदिर सत्याग्रह

अमरावती येथील प्राचीन ‘अंबादेवी मंदिरात’ प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ जून इ.स. १९२७ रोजी सुरू झाला. देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता. या मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन दिले.

पर्वती मंदिर सत्याग्रह

अमरावती नंतर पुण्यातील ‘पर्वती टेकडीवरील मंदिर’ अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम एम जोशी, ना ग गोरे, र के खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून अर्ज फेटाळला. यानंतर सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां ना राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. या सर्वांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पुणे पर्वती सत्याग्रह सुरू केला. यात शिवराम कांबळे, एम एम जोशी, ना ग गोरे, र के खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां ना राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेक स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता.

काळाराम मंदिर सत्याग्रह

काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता. या सत्याग्रहात स्त्रीयांचा सहभाग होता आणि 1934 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सत्याग्रह मागे घेण्यात आला
(विकिपीडिया मधून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लेखन कौशल्य

Monday 4 December 2017 भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता हो...