बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या.
संत जनाबाई
जन्मअंदाजे इ.स. १२५८
गंगाखेड
मृत्यूअंदाजे इ.स. १३५०
राष्ट्रीयत्वभारतीय
नागरिकत्वभारतीय
वडीलदमा
आईकरुंड

जीवन

जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्यागातात.

बालपण

परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. तिच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत.

आयुष्य

संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.
‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.[१]
संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंगसकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ति मिळाली होती.
संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या. (इ.स. १३५०)
संतांनी विठोबाला ‘माउली’ असे म्हंटले आहे, अर्थातच ही संतमंडळी त्याची आवडती ‘लेकरे’ झाली. अशा या लेकुरवाळ्या विठ्ठलाचे वर्णन खाली दिलेल्या अभंगात केले आहे. त्यात संत जनाबाईंनी हे वर्णन केले असल्यामुळे त्यांच्या काळामधले निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, गोरा कुंभार, चोखा मेळा, जीवा, बंका आणि नामदेव यांचे उल्लेख या अभंगात आहेत. संत एकनाथ आणि संत तुकाराम हे त्यानंतरच्या शतकांमध्ये होऊन गेले. या अभंगाच्या शेवटी ‘जनी म्हणे’ असे लिहिले असले तरी ‘नामयाची जनी’ अशी त्यांची नेहेमीसारखी सही नाही. कदाचित “संत जनाबाईंनी असा विचार केला असेल” अशी कल्पना करून हा अभंग आणखी कोणी तरी लिहिला असेल.
विठु माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा ।।
निवृत्‍ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी ।।१।।
पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्‍ताबाई सुंदर ।।२।।
गोराकुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी ।।३।।
बंका कडेवरी, नामा करांगुली धरी ।।४।।
जनी म्हणे गोपाळा, करी भक्‍तांचा सोहळा ।।५।।

जनाबाईंवरील पुस्तके/व्हीडिओ/चित्रपट

  • ओंकाराची रेख जना (चरित्रवजा कादंबरी; लेखिका - मंजुश्री गोखले)
  • संत जनाबाई (लेखन - संत जनाबाई शिक्षण संस्था; प्रकाशन - डायमंड पब्लिकेशन्स)
  • संत जनाबाई (सुहासिनी इर्लेकर|डाॅ. सुहासिनी यशवंत इर्लेकर]]; पुस्तक आणि त्याची पीडीएफ आवृत्ती; महाराष्ट्र सरकार प्रकाशन)
  • संत जनाबाई चरित्र (बालसाहित्य; लेखक - प्रा. बाळकृष्ण लळीत)
  • संत जनाबाई जीवन चरित्र (व्हीडिओ; दिग्विजय बाबर)
  • संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट; लेखन, दिगदर्शन - राजू फुलकर)
  • संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट (१९४९); दिग्दर्शक - गोविंद बी. घाणेकर; प्रमुख भूमिका - हंसा वाडकर)
  • संत जनाबाई अभंग गाथा (संपादक - नितीन सावंत)
  • संत जनाबाई - अभंग संग्रह १ ([१])
  • संत जनाबाई - अभंग संग्रह २ ([२])

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...