सोमवार, २ सप्टेंबर, २०१९

ज्ञानेश्वरांची विराणी

ज्ञानेश्वरांची विराणी



ज्ञानेश्वरांची विराणी ही तिच्या भावजाणीवांचा आलेख रेखाटते; त्यामुळे या विराण्या विरहभाव झाल्यामुळे बदलत जाणाऱ्या तिच्या जाणीवांच्या प्रवासाचे रेखाटन होते. तिच्या मनात जागलेल्या या भाव भावनांचा परिणाम तिच्या भोवतालच्या निसर्गावर कसा होतो, तिची चराचर सृष्टीकडे पाहण्याची नजर का बदलते, याचे वेधक चित्रण ज्ञानेश्वर करतात. त्यामुळे त्यांच्या विराण्या या केवळ व्यक्तिनिष्ठ अथवा विरही स्त्रीपुरत्याच मर्यादित राहत नाहीत. त्या संपूर्ण सृष्टीतील चैतन्यासह असलेला व्यापक अनुभव व्यक्त करतात.

घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा ।
भवतारकु हा कान्हा । वेगी भेटवा कां ॥ १ ॥
चांदवो वो चांदणे । चापेवो चंदनु ।
देवकी नंदनु । विण नावडे वो ॥ २ ॥
चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी ।
कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा गा ॥ ३ ॥
सुमनाची सेज । सीतळ वो निकी ।
पोळी आगीसारिखी । वेगीं विझवा गा ॥ ४ ॥
तुम्ही गातसां सुस्वरे । ऐकोनि द्यावी उत्तरे ।
कोकिळें वर्जावें । तुम्ही बाइयांनो ॥ ५ ॥
दर्पणी पाहातां । रुप न दिसे वो आपुलें ।
बापरखुमादेविवर विठ्ठलें । मज ऐसे केलें ॥ ६ 
वरील अभंगातही माउली विरहाग्नीच्या दाहाचे वर्णन करीत म्हणत आहे: ‘ढगांचा गडगडाट आणि त्याच्या बरोबर थंडगार वाऱ्याची झुळूक जाणविली, (आणि ज्याप्रमाणे अशा वातावरणात मयूराला मयूरीची तीव्र ओढ वाटते त्याचप्रमाणे मला वाटून) आता मला या जगाचे सर्वदुःख हरण करणारा कान्हा लवकर भेटवा (१). या देवकीनंदन गोपाळाविण मला ना रात्रीचे चांदणे शीतल वाटत आहे ना चंदनाचा लेप (२). चंदनाची चोळी करुन मला घातली तरी माझे सर्व अंग जळल्यासारखे होत आहे. तो दाह आता सहवेनासा होऊन यावर जो एकच उपाय आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे दर्शन ते मला घडवा (३). अगदी गोड सुवासिक फुलांच्या शय्येवर जरी मी झोपले तरी मला विस्तवावर पडल्यासारखे होत आहे. आता हा विरहाग्नी त्वरीत विझवा (४). मैत्रिणींनो, तुम्ही आपल्याच जीवनगाण्यात मग्न आहात परंतु माझे करुणास्वर ऐकून माझ्यासाठी काहीतरी करा. सख्यांनो, आता माझ्यासाठी तरी तुम्ही ऐहीक सुखाला त्यागा (म्हणजे भगवान तुम्हांकडे येईल आणि मग त्याला तुम्ही माझ्याकडे आणू शकाल!) (५). श्री विठ्ठलकृपेने मी कोण आहे, कुठे आहे, कशी आहे याचे सर्व भान सुटलेले आहे. स्वतःचे रुप पहायचा प्रयत्‍न केला तरी त्यात मला यश मिळत नाही (तेव्हा आता माझ्याकडून भगवंतप्राप्तीचे प्रयत्‍न होतील ही आशाच नाही. म्हणून सख्यांनो आता मला फक्‍त तुमचाच आधार आहे.) लता  मंगेशकर यांच्या आर्त स्वरस्पर्शामुळे ही विराणी अधिक गहिरी झाली आणि तोच आर्त भाव रसिकांच्या मनात आजही घर करून राहिलेला आहे. मुळात संत कवींनी केलेल्या अभंग रचना या भावकविता आहे. विराण्यासुद्धा; पण ज्ञानेश्वरांच्या खेरीज इतर संत कवींच्या विराण्यांना भावगीताच्या माध्यमातून घरोघरी पोहोचण्याचे भाग्य क्वचितच लाभले. संतांनी रचलेल्या विराण्यांचे वाचन भावकवितेसारखे केले, तर त्यांचे कोणते वेगळे विशेष जाणवतात, हे पाहण्याची गरज आहे. या संत कवींनी विराण्यांमधून मांडलेली स्त्री प्रतिमा नेमकी कोणत्या प्रकारची आहे? या सर्व संत कवींना स्त्री होऊन तिचे हृदगत का मांडावेसे वाटले? संत कवींच्या विराण्या वाचताना हे सर्व प्रश्न समोर येतात.
विराण्यांची रचना भावकवितेसारखी आहे. या रचनांमध्ये जाणवणारा एक 'मी' म्हणजे विरही स्त्री आहे आणि 'तू' म्हणजे तिच्या मनातली विरहभाव आहे. हा 'तू' तिच्या ('मी'च्या) बोलण्याचा मुख्य विषय आहे. या 'मी' आणि 'तू'च्या संवादामधून विराणीची रचना आकार घेते; पण ही या रचनेची एक बाजू आहे.
या रचनेची दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे संत कवींचे मन. भाव जागविणाऱ्या काव्यरचनेतील तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे विरही 'मी' आणि तिचा मनोभाव यांना बोलते करणारे, त्या दोघांचा अनुभव घेणारे रचनाकार संत कवीचे मन. हा विराणीच्या रचनेतील महत्त्वपूर्ण धागा आहे. हे कवीमन कवितेतील (अभंग रचनेतील) 'मी' आणि 'तू'चे कधी तटस्थपणे, तर कधी त्या दोघांशी एकरूप होऊन कवितेतील अनुभव व्यक्त करते. विरहाची जाणीव असलेले स्त्रीमन आणि तिचे मनोगत मांडणारा संत कवी, अशी स्त्री-पुरुषांची जोडी विराणीतील अनुभवामध्ये कार्यरत असल्याचे दिसते. या दोघांना परस्परांची नैसर्गिक ओढ आहे. आकर्षण आहे.
मानवी संस्कृतीच्या विकासामध्ये स्त्री-पुरुष यांच्यातील शारीरिक आकर्षणाप्रमाणेच त्यातील मनोमीलनाला महत्त्व प्राप्त झाले. स्त्री-पुरुष यांच्यातील कामप्रेरणेमध्ये असलेला मनाचा सहभाग, मानवी संस्कृतीच्या विकासातील महत्त्वाचे पाऊल आहे. शारीर आकर्षणासह, शरीराला ओलांडून जाणाऱ्या आणि त्यापलीकडे मनाला व्यापून उरलेल्या प्रेमभावनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्त्री-पुरुषांच्या बाबतीत जगण्याची प्रेरणा, जगण्याची इच्छा, जगण्यातील गोडी, रस निर्माण करण्याची जबरदस्त शक्ती या प्रेम भावनेमध्ये आहे. संतांनी रचलेल्या विराण्यांमध्ये विरहातून व्यक्त होणारा प्रेमभाव जगण्याचे मुख्य कारण, प्रयोजन होते. विरहभावनेचा विस्तार आणि विकास संतांच्या काव्यरचनेतून उलगडत जातो.
विरह भावनेचा विस्तार करण्यामध्ये रचनेतील विरही स्त्रीरूपी 'मी' आणि अनुभव विषय झालेला 'तू' या दोघांकडे पाहणारे रचनाकार कवीचे मन, हा महत्त्वाचा धागा आहे. रचनेतील 'मी' आणि 'तू' यांच्यातील भावभावनांचा अनुभव कल्पकतेने, रसिकतेने व्यक्त करतो. हा तिसरा 'मी' विरहातून व्यक्त होणाऱ्या रतिभावाचे, शृंगाराचे वर्णन प्रत्यक्षातील शारीर स्तर ओलांडून, एका नव्या रूपात व्यक्त करतो. प्रत्यक्ष अनुभवाला ओलांडून जाणाऱ्या, प्रत्यक्षाला नवे रूप देणाऱ्या कल्पकतेमुळे विराणीमध्ये भावसौंदर्य व्यक्त होते. विराणीतील भावसौंदर्याचा प्रत्यय देण्याची-घेण्याची प्रत्येक संत कवीची सौंदर्यदृष्टी आणि भावजाणीव वेगवेगळी आहे. प्रत्येक संत कवीच्या वैशिष्ट्यपूर्ण भावप्रकृतीची, भावधर्माची ओळख त्यांच्या विराण्यांमधून होते.
ज्ञानेश्वरांनी एक विराणीत 'मी'ने श्रीरंग भेटीचा अनुभव व्यक्त केला आहे. श्रीरंग भेटीचा अनुभव कथन करणाऱ्या तिने सुरुवातीला 'आपलेनि भारे श्रीरंगी डोलत गेले,' अशी मोहून टाकणारी मनाची स्थिती सांगितली आहे. तिच्या मनाची ही श्रीरंगवश झालेली, भारलेली, भारले जाण्याची अवस्था म्हणजे विराणीतील 'तू' आहे.
या भारावलेल्या तिला श्रीरंग भेटीचा प्रत्यय येतो. त्याचे वर्णन 'तव अवचित पाचारिले पाठीमोरे', असे येते. श्रीरंगाने तिला अवचित, अचानक बोलाविले; पण हे बोलावणे पाठीमागून घडते. म्हणजे श्रीरंगाने तिला केवळ हाक मारली, आवाज दिलेला आहे. त्याच्या वाणीचा परिणाम तिच्या चित्तावर होतो. त्याचे वर्णन ज्ञानेश्वर करतात ते असे, 'चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले.' येथे श्रीकृष्णाच्या संभाषण भेटीचा परिणाम तिच्या अवघ्या जगण्यावर होतो. तिचे अवघे अस्तित्वच नव्हे, तर तिच्यातील जीवनरस स्वत:कडे खेचून नेण्याची, तिच्या चित्त-चैतन्याचे हरण होण्याची जादू श्रीरंगाच्या संवाद भेटीमधून घडते. ज्ञानेश्वर कल्पकतेने, रसिकतेने ईश्वर भेटीच्या अनुभवाला जीवनचैतन्याचे, जगण्याच्या इच्छेचे नवे रूप देतात. 'चैतन्य चोरिले' या शब्दांतून भक्तीमधून व्यक्त होणारा प्रेमभाव 'पॅशन' होऊन गेल्याचे दिसते. भक्तीतील भावसौंदर्य हीच जगण्याची इच्छा, प्रेरणा, प्रयोजन झाल्यामुळे तिच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. हा बदल म्हणजे 'अवघे पारुषले दीनदेहे'. तिच्या देह-मनात झालेला बदल किंबहुना तिचे देह-मन तिचे राहत नाही. ते तिचे तिलाच परके होते आणि तिच्या देह-मनाचा पुरता ताबा विठोबाने घेतल्यामुळे 'ती' म्हणते, 'विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा.'
ज्ञानेश्वरांच्या या विराणीमध्ये भावस्थितीत होणारे छोटे छोटे बदल टिपले आहेत. प्रेमभाराने भारावलेली, मोहवश झालेली 'ती' हळूहळू, क्रमाक्रमाने बदलत जाते. तिच्या मनातील स्थित्यंतराचे, भावविकासाचे चित्र ज्ञानेश्वर रेखाटतात. ते केवळ मनातील चित्र होऊन राहू नये याची काळजीही ज्ञानेश्वरांनी घेतली आहे. म्हणूनच वाणीचा, वाचेचा, आवाजाचा, संवाद भेटीचा मनावरील असर, प्रभाव, संस्कार ज्ञानेश्वर दर्शवितात. काया-वाचा-मने प्रेमभारित झालेल्या तिच्यातील चैतन्यरसाचे हरण विठोबा करतो आणि म्हणून तिचा देह तिला नव्याने, नव्या रूपात परत प्राप्त होतो. तिचा देह तिलाच परका होतो; पण विठ्ठलमय झालेला तिचा देह तिला नव्याने गवसतो. प्राप्त होतो. तिला स्वत:चीच नवी ओळख होते. विठोबाने 'चैतन्य चोरी' केल्यामुळे काय काय घडते याचा देहभाव परिवर्तनाचा प्रवास ज्ञानेश्वर अगदी मोजक्या शब्दांमधून व्यक्त करतात. म्हणूनच ज्ञानेश्वरांच्या विराण्या या भक्तिभावामध्ये होणाऱ्या उत्क्रांतीची भावकहाणी सांगतात, असे म्हणता येईल.
'घनु वाजे घुणघुणा' ही ज्ञानेश्वरांची प्रसिद्ध विराणी. या विराणीमध्ये अर्थातच आर्त भावकवितेमध्ये ज्ञानेश्वरांची कल्पकता, रसिकता वेगळ्या उच्च शिखरावर पोहोचली आहे. वाऱ्याचे मंद वाहणेही तिला त्रासदायक वाटते. येथे ज्ञानेश्वर वाऱ्याची गती, नादगुणाचा, आवाजाचा कानाला-श्रुती संवेदनेला येणारा अनुभव व्यक्त करतात. या श्रुती संवेदनेमुळे विचलीत होणारे आणि म्हणून सुखसंवेदनेतूनही पुन्हा वियोगी होणारे तिचे मन मागणे करते ते,
भवतारकु हा कान्हा।
वेगी भेटवा का।
आता तिच्या मागणीतील उत्कटता, तातडीची निकड 'वेगी' या विशेषणातून समजते. सहनशक्तीचा अंत होण्याच्या स्थितीत असलेले तिचे मन भावकोमल झाले आहे; परंतु भावविवश झालेले नाही. म्हणूनच तिच्या विरही मनाला भोवतालच्या चराचरातील - निसर्गाच्या चैतन्याची जाणीव आहे; परंतु तिचे मन हरिरत झालेले आहे. या हरिरत भावतंद्रीचा भंग करणारी कोणतीच गोष्ट आता तिला नको नकोशी झालेली आहे.
पुढे ज्ञानेश्वर दृश्य संवेदनेची जाणीव व्यक्त करतात. तिच्या मनाला चंद्र, चांदणीचे दर्शन आणि त्यातील शीतलता आवडेनाशी होते; कारण आता तिच्या मनाला 'कान्हो वनमाळी'च्या भेटीचा ध्यास लागलेला आहे. म्हणूनच फुलांची मऊ, दाट शेज तिच्या शरीर आणि मनाला पोळते. येथे ज्ञानेश्वर दृष्टीचा विषय झालेल्या चंद्र-चांदण्याचा तिच्यावरील परिणाम सांगून झाल्यावर, तिच्या बदललेल्या स्पर्श संवेदनेबद्दल बोलतात. त्यानंतर पुन्हा तिच्या श्रवण - श्रुती संवेदनेबद्दल बोलतात. तिला आता कोकिळेचे सुस्वर कानाला गोड वाटत नाहीत. येथे श्रुती संवेदनेपासून सुरू झालेला तिच्या पंचेंद्रियांच्या बदलत्या जाणीवेचा प्रवास एका अर्थाने पूर्ण होतो आणि आता ज्ञानेंद्रियांकडून तिची दृष्टी अंतरंगाकडे, मनातील जगाकडे वळते. त्यावेळी तिला मनाच्या आरशात स्वत:चे रूप, चेहरा दिसतच नाही. पांडुरंगाशी एकरूप झालेले तिचे मन स्वत:च्या अंतरंगात त्याचे रूप पाहते आणि म्हणून,
दर्पणी पाहता। रूप न दिसे आपुले।
अशी वेगळीच अनुभूती तिला येते.
या विराणीत ती आपली निरिच्छादेखील उत्कट प्रेमानेच व्यक्त करते. या बाह्य जगतातील सुंदर गोष्टींमध्ये सौंदर्य आहे, आनंदही आहे. त्यातील आनंद ती नाकारत नाहीस. म्हणूनच सुमनाची शीतल शेज, रुणझुणणारा वारा यांतील माधुर्य ती रसिकतेने सांगते; पण त्या साऱ्या आनंद देणाऱ्या जगापाशी थांबावे, रमावे असे तिला वाटत नाही. म्हणूनच या सृष्टी सौंदर्याकडून अधिक खोलवर संस्कार करणाऱ्या आनंदकंदाकडे, भावसौंदर्याकडे तिचे मन आकर्षित होते. आनंद, सौंदर्याचे मूळ स्थान असलेले तिचे मन, अंतरंग शाश्वत, निरंतर आनंदाचा शोध घेण्यासाठी आसुसले आहे. या शाश्वत आनंदाचा प्रत्यय तिला,
बापरखुमादेवीवर विठ्ठले।
मज ऐसे केले।
यातून येतो.
ज्ञानेश्वरांची विराणी ही तिच्या भावजाणीवांचा आलेख रेखाटते. तिच्या भावजाणीवा हळूहळू बदलत जातात. तिच्या भावसंक्रमणाचे कथन ज्ञानेश्वर करतात. त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या विराण्या या विरहभाव झाल्यामुळे बदलत जाणाऱ्या तिच्या जाणीवांच्या प्रवासाचे रेखाटन होते. तिच्या मनात जागलेल्या या भाव भावनांचा परिणाम तिच्या भोवतालच्या निसर्गावर कसा होतो, तिची चराचर सृष्टीकडे पाहण्याची नजर का बदलते, याचे वेधक चित्रण ज्ञानेश्वर करतात. त्यामुळे त्यांच्या विराण्या या केवळ व्यक्तिनिष्ठ अथवा विरही स्त्रीपुरत्याच मर्यादित राहत नाहीत. त्या संपूर्ण सृष्टीतील चैतन्यासह असलेला व्यापक अनुभव व्यक्त करतात.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वरांसह सर्व संत कवींच्या विरहिणीच्या मनातील रतिभाव, प्रेमभाव अखेरीस पांडुरंगाच्या भेटीमध्ये विसर्जित होतो. या भाव विसर्जनातून तिला तिची नवी ओळखखूण सापडते. शृंगार रसातून शांत रसाकडे घेऊन जाणारा भावप्रवास सर्व संतांच्या विराण्यांमधून अनुभवास येतो. त्यामुळे या विराण्या देह-मनाच्या एकरूपतेमधून जागणारे प्रेम आणि त्यातून तिला प्राप्त होणारी निरामय शांतता, हाच संस्कार रसिक वाचकाच्या मनावर कोरतात. या साऱ्याच फलश्रुतीमुळे वाचक-भक्त-रसिक यांना घेऊन जाण्यासाठी ज्ञानेश्वरांसह सर्व संतांनी स्त्री होऊन तिचे आत्मरूप रेखाटले असावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लेखन कौशल्य

Monday 4 December 2017 भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता हो...