शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

दिनमित्रकार मुकुंदराव पाटील

 मुकुंदराव पाटील: ग्रामीण पत्रकारितेचा आद्य तपस्वी

फक्त दुसरीपर्यंत शिक्षण असूनही ते इंग्रजी आणि मराठी वाचायला शिकले. आपली सगळी विद्या आणि कौशल्ये त्यांनी स्वतःच्या बळावर सेल्फ लर्निंगनं मिळवली होती. सत्यशोधक समाजात सगळ्यात मूलगामी काम करून देश हादरवून टाकणाऱ्या आणि इंग्लंडच्या राजपुत्राची चौकात फलक दाखवून काढणाऱ्या कृष्णराव भालेकरांचा हा दुसरा पोरगा. नाव मुकुंदराव. जन्म २० डिसेंबर १८८५. 

भालेकरांच्या बहिणीचा म्हणजेच काशीबाई सखाराम क्षीरसागर पाटील यांचा एकुलता एक पोरगा गणपतराव पाटील. वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. गणपतरावांना मुलबाळ नव्हतं. आपल्या बहिणीला आधार म्हणून कृष्णराव भालेकरांनी ७ ऑगस्ट १८९३ रोजी आपल्या सात वर्षांच्या पोराला तिच्या पदरात दिलं. मुकुंदराव भालेकर आता मुकुंदराव पाटील झाले.

फक्त दुसरी इयत्ता शिकलेला हा इसम भारतात ग्रामीण पत्रकारितेची पायाभरणी करणारा माणूस होता. शेतकऱ्यांच्या हक्कांना वाचा फोडणारा आणि समाजाच्या रूढींना हादरे देणारा लेखक होता. शेतीचा इतिहास लिहून त्यांनी शेती देशोधडीला लागायची कारणे शोधली. शेतकऱ्यांची स्थिती काँग्रेसच्या राजकारणाने सुधारणार नाही हे ओळखून त्यांनी शेतीप्रश्नाचा सविस्तर अभ्यास केला. 

१९०६ साली अहमदनगरला नवीन थेटर बांधायचं काम सुरू होतं. ‘बागडे’ नावाच्या या थेटरचं बांधकाम मुकुंदराव बघत होते. त्यामुळे नगर भागात त्यांचं राहणं झालं. वाचायच्या आवडीमुळे त्यांची ओळख रेव्हरंड टिळक आणि बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्याशी झाली. तेव्हा त्यांनी घरच्या घरी इंग्रजी लिहायचा आणि वाचायचा सराव सुरू केला. या कामाची त्यांना इतकी सवय झाली होती की “रोज काहीतरी लिहिल्या आणि वाचल्याशिवाय मला चैनच पडत नाही” असं त्यांनी एका पत्रात लिहिलं होतं. इथंच त्यांची भेट मँचेस्टर युनिव्हर्सिटीहून परतलेल्या मराठा समाजातील दलितांसाठी काम करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी झाली. 

सत्यशोधक समाजाची अनेक मुखपत्रे जोतीराव फुलेंच्या काळात सुरू होती. पण नंतरच्या काळात ही पत्रे हळूहळू बंद पडत गेली. मुकुंदरावांना गावातील लोकांच्या जनजागृतीसाठी पत्राची गरज होती. ‘दीनमित्र’ म्हणजे गरिबांचा दोस्त या नावाचा पेपर सुरू होता. हे पत्र नंतर काळाच्या ओघात बंद झाले. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी २३ नोव्हेंबर १९१० रोजी हा पेपर पुनरुज्जीवित केला. त्यांनी वडिलांना हे पत्र किमान १२ वर्षे चालवण्याचे आश्वासन दिले होते. पण पुढची ६० वर्षे पेन हातात धरायला जमत होता तोपर्यंत त्यांनी ‘दीनमित्र’ कोणताही गॅप न पडू देता प्रकाशित केला.

मुकुंदरावांनी आपल्या लेखनातून ग्रामीण भागातील माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्या काळची सगळी पत्रे-नेते-परिषदा-ठराव तद्दन शहरी असत. एकाच शहरात ४० वर्ग-किलोमीटरच्या अंतरात लोकांचे क्रांती आणि राजकारण असे उद्योग चालत. आपल्याला वाटते तेच समाजाचे मागणे आहे आणि आपणच समाजाचे नेते आहोत असा थाट या लोकांचा असायचा. अशा शहरी लोकांना आपली पातळी दाखवण्यात ‘दीनमित्र’ अग्रेसर होता. 

‘केसरी’सारख्या देशभरात गाजावाजा असणाऱ्या पेपरमधील चुका, फाजील विधाने यांचा समाचार ते ‘सारासार विचार’ या आपल्या सदरात घेत असत. एकदा ‘केसरी’ने बाळ टिळक संपादक असताना ४ जुलै १९१७ च्या अंकात दादाभाई नौरोजी यांचे निधन झाल्याची बातमी छापली. त्याबरोबर एक मोठा श्रद्धांजलीचा लेखही छापला. नौरोजी इंग्लंडमध्ये निवडणूक लढवून खासदार झाले होते, त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा जीव होता. पुण्यात अचानक शोककळा पसरली. पण नौरोजी जिवंत आहेत हे समजून घेण्याची तसदीही पुण्यातल्या जागरूक नागरिकांनी घेतली नाही. शेवटी ‘दीनमित्र’ने या फेक न्यूजचा समाचार घेतला. “केसरी पत्र आणि त्यातील मजकूर ब्रह्मदेवांची लेखणी समजणाऱ्यांनी ही घोडचूक पाहून सावध व्हावे” असा टोला लावला. टिळकांच्या राजकारणावर त्यांनी मुद्देसूद आणि ग्रामीण शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार करत वेळोवेळी टीका केली आहे. “चातुर्वण्याची पुन्हा स्थापना झाली पाहिजे असे म्हणणारे राष्ट्रउन्नतीच्या कार्यास कवडीच्याही उपयोगाचे नाहीत” असं धाडसाने म्हणणारे समग्र भारतातील ते एकमेव संपादक असावेत.

मुकुंदराव शहरातील तज्ञ, ज्येष्ठ जाणकार आणि विश्लेषक बनून राहिले नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांची जागृती करण्यासाठी गावागावात जाऊन प्रयत्न केले. “शेतकऱ्यांना दारिद्र्याचा रोग लागला आहे. त्याच्यावर उपाय केला नाही तर आपली पुढची पिढी कुत्र्यामांजरापेक्षाही नीच स्थितीत खिदबू खिदबू मरेल” इतक्या तळतळाटाने लिहिणारा पत्रकार वैयक्तिक पातळीवर इतकं दुःख अनुभवल्याशिवाय हे लिहू धजणार नाही.

त्यांनी रूढीवादी, देवळा-बामनांना दान देणारा शेतकरी पाहिला होता. या शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या पत्रातून आवाज उठवला. त्यांच्या लिखाणात उगाच उरबडवेगिरी नव्हती. विनोदबुद्धी वापरून सुम्बडीत काटा काढायचं कसब त्यांच्या लेखणीला साधलं होतं. आपल्या धारदार पण फिरकी घेणाऱ्या लिखाणातून त्यांनी असे उद्योग करणाऱ्या लोकांची बिनपाण्याने केली. त्याचबरोबर मराठा जातीच्या पुढाऱ्यांनी फक्त ब्राह्मणविरोधासाठी सत्यशोधक समाजाचा वापर करू पाहिला. त्यावेळी त्यांचाही समाचार मुकुंदरावांनी घेतला. “आपल्या जातीतील दोष जो परखडपणे सांगतो तोच खरा सत्यशोधक” अशी भूमिका त्यांनी घेतली.

कऱ्हाडला १ जानेवारी १९२० रोजी सत्यशोधक समाजाची नववी परिषद भरली. त्याचे अध्यक्षस्थान मुकुंदराव पाटलांना देण्यात आले होते. शाहू महाराजांनी त्यांना या कामी मोलाची मदत केली. आपल्या कामात मोठ्या माणसांना नेहमी सहभागी करून त्यांच्या मदतीने आणि सहकार्याने लोकांचं कल्याण साधण्याची ही हातोटी सत्यशोधक समाजाची खासियत होती. १९२४ साली ब्रिटिश सरकारने त्यांच्या कामाचं महत्व ओळखून त्यांना ‘रावसाहेब’ हा किताब दिला. मोहनदास गांधींच्या राजकारणाशी ते सहमत नव्हते. तरीही गांधींची हत्या झाल्यानंतर त्यांनी या किताबाचा त्याग केला आणि आपली ‘रावसाहेब’ उपाधी ब्रिटनला पाठवून दिली.

१५ मार्च १९२५ साली महार परिषद पाथर्डी येथे भरली. त्याचे अध्यक्षपद मुकुंदरावांना देण्यात आले. त्यात त्यांनी फक्त शिक्षण या गोष्टीवर जोर दिला. मंदिर प्रवेश आणि सत्याग्रह असल्या मार्गांनी अस्पृश्यांचे कल्याण होणार नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती.  १९२५ साली तरवडी येथे मातंग परिषद तसेच १९२६ सालची भिल्ल परिषद त्यांनी भरवली. यातून शिक्षणाचा प्रसार आणि आर्थिक स्वावलंबन एवढी दोन उद्दिष्टे त्यांनी ठेवली होती.

शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी सात उपाय सुचवले. यालाच मुकुंदरावांची सप्तसूत्री म्हटले जाते. याच्यात शेतकऱ्यांची स्थिती सुधारायची असेल तर त्यांनी काय केले पाहिजे याचा वस्तुपाठ आहे. शेतकरी संघटनेपासून ते आद्य शेतकरी नेत्यांनी केलेल्या मागण्या आणि काढलेल्या योजना या सगळ्यांची बीजे त्यांच्या लेखनात सापडतात. शेतकऱ्यांच्या पोरांचं शिक्षण आणि शेतकऱ्यांची एकजूट हे त्यातील सगळ्यात मुख्य मुद्दे होते.

आज बलुतेदारी आणि त्या व्यवस्थेचे गुण गाणारे मोठे लोक, साहित्यिक भेटतात. या माणसाने त्या काळात “बलुतेदारी पद्धत मुळातच चुकीची आहे. प्रत्येक जातीच्या माणसाला वडिलोपार्जित कामं सोडून आपल्या आवडीचा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. सगळ्या जातीतील मुलांना शिक्षण देऊन कमी कष्टात जास्त उत्पादन कसे मिळते हे प्रशिक्षण दिलं पाहिजे” असे मत मांडले. माणूस हा प्राणी काबाडकष्ट करण्यासाठी नसतो तर आपल्या बुद्धिमत्ता आणि कल्पकतेने निसर्गाला आपल्यासाठी काम करायला लावतो हीच मांडणी ते करतात. जातीपाती तोडण्यापासून ते आर्थिक सक्षमीकरण करण्यापर्यंत सगळ्या विचारांची पाळेमुळे मुकुंदरावांच्या भूमिकेत आढळतात. सत्यशोधक माणसांना आपण गांभीर्याने घेतले नाही म्हणून आपण अजून याच मुद्द्यांवर चाचपडत बसलो आहोत.

लोखंडाचा फाळ नांगराला लावल्यावर जमीन कोपते अशी अंधश्रद्धा शेतकऱ्यांमध्ये पसरली होती. आपल्या आज्यापंज्याने केलं तर बरोब्बरच असणार असं शेतकरी म्हणायचे. यावर “ज्या आज्याला सत्यनारायण माहीत नव्हता त्याचा पोरगा वडिलांची चाल सोडून सत्यनारायण का घालतो? अशा वेळी तुम्ही आपल्या परंपरा बदलून ब्राह्मणी परंपरा स्वीकारता आणि वैज्ञानिक गोष्टी नाकारता” असा त्यांचा आक्षेप होता.


शेतकऱ्यांसाठी लिहिणारे आणि इंग्रजीत थयथयाट करणारे एनजीओवाले लय पत्रकार आपल्या ओळखीत आहेत. पण इतका क्रांतिकारी विचार मांडून तेवढ्याच ताकदीचं काम ग्राउंडवर करणारा मुकुंदराव पाटलांसारखा दुसरा पत्रकार निपजल्याचे आमच्या बघण्यात नाही.

​महात्मा फुले यांचे विचार तळागाळातील माणसापर्यंत पोहचविण्याचे महान कार्य दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी केले. समाजात असलेली जातीयता, अस्पृश्यता, निरक्षरता जाबी म्हणून त्यांनी आपल्या दीनमित्र वृत्तपत्राच्या माध्यमातून जनजागृती केली. १९१० रोजी सुरू झालेली दीनमित्र ​​वृत्तपत्र १९६७ पर्यंत ५७ वर्षे त्यांनी चालविने स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक परिस्थितीचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून दीनमित्र अंकाच्या सर्व फाईल्स पाहिल्यावर लक्षात येते. तर स्वातंत्र्यानंतरचा २२ वर्षाचा काळ दीनमित्र ने पाहून बहुजनांच्या सामाजिक परिस्थितीला प्रकाश टाकला आहे. महात्मा फुल्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसारासाठी दीनमित्राने बजावलेली कामगिरी अतिशय मोलाची आहे. मुकुंदराव पाटील यांनी आपल्या वृत्तपत्रातून कुलकर्णी वतनाबद्दल सातत्याने लिहून ते रद्द करण्याची मागणी केली. या संदर्भात कुलकर्णी हा शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करतो या संदर्भात ‘कुलकर्णी लीलामृत’ नावाचे खंडकाव्य लिहिले. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. त्याचा परिणाम असा झाला की, विधीमंडळात चर्चा झाली आणि कुलकर्णी वतनदारी बंद होऊन तलाठी नेमण्यात आले. शेतकऱ्यांच्या बाजुची फार मोठी लढाई मुकुंदरावांनी जिंकली. त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी मुकुंदरावांचे ऋणी राहायला पाहिजे. मुकंदराव पाटील केवळ संपादक नव्हते तर ते चांगले वक्ते, सिद्धहस्त लेखक होते. निद्रीत अवस्थेत असलेल्या बहुजन समाजाला जागे करून सनातन्याविरुद्ध आवाज उठविण्याचे पाठबळ दीनमित्राने दिले. भारतातील पहिले ग्रामीण पत्रकार म्हणून मुकुंदराव पाटील वांच्या नावाची दखल माध्यम क्षेत्रातील तज्ञांनी घेतली आहे. तरवडी ता.नेवासा येथे मुकुंदराव पाटील यांचे सर्व साहित्य दीनमित्र अंकाच्या फायली, पत्रव्यवहार आदी महत्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहे. अभ्यासकांना सत्यशोधकी साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून तरवडी येथे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून मुकुंदरावांची अनेक

पुस्तके प्रसिध्द केली आहेत. तसेच पुरोगामी व परिवर्तनपर साहित्यास दरवर्षी पुरस्कार दिले जात आहेत.


​सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांचे वाडमय

​दीनमित्र (साप्ताहीक) इ. स. १९१० ते १९६७

१)वैचारीक

* हिंदू आणि ब्राम्हण * विठोबाची शिकवण

* विचार किरण भाग १ ते १० * पेशवाईतील मौजा

शास्त्रोक्त गप्पा

* पुराणातील गंमती * देवाची परिषद

२)काव्य

* कुळकर्णी लीलामृत

* शेटजी प्रताप * देशभक्त लीलासार

* सुबोध श्लोक

३)कथा-दीनमित्र, किर्लोस्कर, मनोहर,

बालबोधमेवा इ. मासिकातून सुमारे ५० कथा

४)नाटक – * राक्षसगण * हेडमिस्ट्रेट 

५)चित्रपटकथा- पतीचा पाठलाग


६)कादंबरी

* होळीची पोळी

* चंद्रलोकीची बिलक्षण

* तोबातोबा

*बदहाशास्त्री परान्ने * राष्ट्रीय तारूण्य

७)आग्रलेख २०५०

८) आसुडाचे फटके १०,००० ९) सारासार विचार ७५००

१०) अध्यक्षीय भाषण:

कन्हाड, मुंबई,कोल्हापूर या ठिकाणी झालेली

सत्यशोधक समाज परिषद व कर्जत, नेवासा, पुणतांबा, मढी येथील भाषणे.

११)प्रसंग कथा सुमारे ४५०

संदर्भ - गूगल searchकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शरद baviskar- भुरा

भूरा