रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

वर्णनात्मक व समाजभाषाविज्ञान

वर्णनात्मक व समाजभाषाविज्ञान

अभ्यासपत्रिकेची उद्दिष्टे

१. भाषाविज्ञानाची संकल्पना समजून घेता येईल.

२. वर्णनात्मक व समाज भाषा विज्ञानाचा परिचय होईल.

३. स्वानिमविचार समजून घेता येईल.

४. रूपविचार समजून घेता येईल.

५. वाक्यविचाराचे स्वरूप समजून घेता येईल.

६. अर्थविचाराचे स्वरूप समजावून घेता येईल.

७. वर्णनात्मक व समाजभाषा विज्ञानाचे महत्त्व लक्षात येईल.

८. भाषेच्या अंत:सूत्राचा अभ्यास होईल.


भाषाविज्ञान : संकल्पना

मानवी भाषेविषयीची एक नवी जाणीव विसाव्या शतकात निर्माण झालेली आहे हे खरे; परंतु यापूर्वी भाषेविषयी विचार किंवा त्याचा अभ्यास होत नव्हता असे मात्र नव्हे. भाषा हा मानवाच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मानवी जीवनामध्ये पायाभूत असणारा जो संपर्क व्यवहार आहे त्याचे प्रमुख माध्यम भाषा आहे. त्यामुळे प्रत्येक समाजामध्ये भाषेचा उगम तिचे स्वरूपाविषयी काही कल्पना, संकेत, जाणिवा, रूढ असणे अपरिहार्य आहे. भाषांचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करताना श्रेष्ठ-कनिष्ठ, तर्कशुद्ध- तर्कदृष्ट, विशुद्ध- अपभ्रष्ट इत्यादी ढोबळ मूल्यमापनात्मक कल्पना बाजूला साराव्या लागतात. भाषा विज्ञानामध्ये अशा नियमक अथवा आदेशात्मक दृष्टिकोनाला स्थान नाही भाषेचा प्रत्येक नमुना भाषा वैज्ञानिकाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. एक नमुन्याचे म्हणजेच भाषा प्रत्यक्षात कशी वापरली जाते याची वस्तुनिष्ठ पद्धतीने काटेकोर वर्णन देणे हे त्याचे कार्य असते. एकूण भाषिक व्यापाराचा विचार केल्यास नेहमीच्या व्यवहारातील बोली व मौखिक नमुन्यांना केंद्रवर्ती स्थान मिळणे अपरिहार्य आहे. आधुनिक भाषाविज्ञानाचा अभ्यास मूल्यमापनात्मक कल्पनावर आधारलेला नाही. भाषा प्रत्यक्षात कशी वापरली जाते याचे तटस्थपणे वस्तुनिष्ठपणे इतर भाषांची चष्मे न वापरता पूर्वग्रहविरहित वर्णन करणे हे या अभ्यासाचे उद्दिष्ट आहे.


भाषेचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणाऱ्या ज्ञान शाखेला भाषाविज्ञान (Linguistics) असे म्हणतात. भाषाविज्ञानात भाषाच्या घटकांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक भाषा ही व्यामिश्र स्वरूपाच्या ज्ञानाने आणि क्षमताने घडलेली असते. भाषेमागील व्यामिश्र स्वरूपाचे ज्ञान मिळवणे, भाषेच्या क्षमतांचा शोध घेणे म्हणजे भाषा वैज्ञानिक अभ्यास करणे होय. भाषाविज्ञानात भाषा म्हणजे काय? भाषेचे गुणधर्म कोणते? भाषेची संरचना कशी असते? भाषा कशी आत्मसात केली जाते? भाषानिर्मिती व भाषा आकलण्यात बोधन पातळीवर घडणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप कोणते? संदेश निर्मितीसाठी भाषेचा उपयोग कसा केला जातो? भाषा कशा बदलतात? भाषा-भाषा मध्ये समान काय असते? असे विविध प्रश्न उद्भवत असतात. अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भाषेबाबतची ज्ञानशाखा कार्य करते. भाषा व्यवहाराचे निरीक्षण करणे, त्यांचे विश्लेषण करणे त्यावरून काही सिद्धांत मांडणे, नियम- तत्व शोधून काढणे हे भाषाविज्ञानात घडत असते. थोडक्यात भाषाविज्ञान म्हणजे भाषेचा सर्वांकष व दृष्टिकोनातून केलेला अभ्यास होय. भाषाविज्ञानाचे क्षेत्र अनेक वैज्ञानिकांनी मोठे केले. त्यात सोस्यूर(Saussure), ब्लूमफिल्ड (Blumfield), बोआस (Boas),सपीर (Sapir), हॉकेट(Hocket),  चॉम्स्की (Chomsky) अशा अनेक वैज्ञानिकांचा उल्लेख करावा लागेल. ऐतिहासिक भाषा विज्ञान आणि वर्णनात्मक भाषा विज्ञानाच्या दोन अभ्यास परंपरा आपल्याला दिसतात.

भाषाविज्ञान : व्याख्या - भाषेचा वैज्ञानिक दृष्टीने केलेला अभ्यास म्हणजे भाषा विज्ञान होय. भाषा हा भाषा विज्ञानाच्या अभ्यासाचा विषय आहे. अशोक केळकर यांनी भाषा विज्ञानाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. "भाषेचा भाषा म्हणून वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणारी जी एक नवीन ज्ञान शाखा सोस्यूर, ब्ल्यूमफिल्ड इत्यादींच्यामुळे प्रस्थापित झाली ती लिंग्विस्टिक्स किंवा भाषाविज्ञान." या भाषाविज्ञानाविषयी काही गैरसमज प्रचलित होते. भाषाविज्ञान म्हणजे व्याकरण, भाषाविज्ञान म्हणजे साहित्याचा अभ्यास. भाषा विज्ञान म्हणजे लिखित भाषेचा अभ्यास इत्यादी. आता असे गैरसमज फारसे आढळत नाहीत. तरी मित्रांनो, व्याकरण म्हणजे भाषाविज्ञान नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे. व्याकरण हा भाषा विज्ञानाचा एक भाग ठरतो. भाषाविज्ञान हे व्याकरणापेक्षा अधिक व्यापक क्षेत्र होय. भाषाविज्ञानात केल्या जाणारा भाषेचा अभ्यास म्हणजे केवळ लिखित भाषेचा अभ्यास नव्हे. भाषेच्या बोली रूपाचा अभ्यास करणे हे देखील भाषाविज्ञानात महत्त्वाचे मानले जाते. तेव्हा भाषाविज्ञान म्हणजे लिखित व औपचारिक भाषेच्या अभ्यासाचे विज्ञान म्हणायला हवे. भाषाविज्ञान म्हणजे साहित्याचा अभ्यास असा समज रुढ होण्यासाठी भाषेचा वापर साहित्याच्या क्षेत्रात होतो हे एक कारण होते. मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की, साहित्याखेरीज इतर अनेक क्षेत्रात भाषेचा वापर होत असतो. साहित्य हे भाषेच्या अनेक रूपापैकी एक ठरते. साहित्यापलीकडे भाषेची जी वेगवेगळी क्षेत्रे असतात त्यांचा अभ्यास भाषा विज्ञानाच्या कक्षेत येतो. त्याचप्रमाणे जात, व्यवसाय, लिंग यानुसार होणाऱ्या भाषेतील बदलांचा म्हणजेच भाषा भेदांचा अभ्यास भाषाविज्ञानाच्या कक्षेत येतो. थोडक्यात, भाषाविज्ञान हे एक प्रकारे व्यापक अभ्यास क्षेत्र आहे. ध्वनींच्या निर्मितीपासून तर भाषा भेदापर्यंत भाषेची वेगवेगळी अंगे भाषा विज्ञानाच्या कक्षेत येतात.

भाषाविज्ञानाचे स्वरूप - 

मित्रांनो, भाषाविज्ञानात भाषेचा विविध दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. या अभ्यासाचे स्वरूप वर्णनात्मक, ऐतिहासिक तौलनिक, उपयोजित असे आढळून येईल. आधुनिक भाषाविज्ञान भाषेच्या वर्तमानकालीन रूपाला महत्त्व देते.  यात भाषेच्या औच्चारिक नमुन्यांचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर आधुनिक भाषाविज्ञान भाषा ही एक संरचना आहे असे म्हणून भाषेचा वस्तुनिष्ठ अभ्यास करते. भाषेच्या संरचनेमागील नियमव्यवस्था, तत्वे शोधून काढण्याचे काम भाषाविज्ञानात सुरू असते. थोडक्यात, भाषेमागील रचनाविज्ञान स्पष्ट करण्याचे काम आधुनिक भाषाविज्ञानात सुरू असते.

भाषेच्या इतिहासाचा अभ्यासही भाषा विज्ञानाच्या कक्षेत येतो. तो ऐतिहासिक लिखित भाषिक रूपांचा असतो. असा अभ्यास करताना भाषाभाषांमधील तुलनेचा उपयोग करण्यात येतो. यातून भाषेच्या परिवर्तनाविषयी सिद्धांत मांडले जातात. ग्रीमचा सिद्धांत, व्हेरनरचा सिद्धांत ऐतिहासिक भाषा विज्ञानात प्रसिद्धच आहे.  तौलनिक दृष्टिकोनातून भाषेच्या परिवर्तनाचा जसा मागोवा घेण्यात येतो, तसेच भाषाभाषांमधील साम्य-भेद शोधून त्यांच्या साह्याने भाषांचे कुलनिष्ठ वर्गीकरण केले जाते.


अलीकडच्या काळात आधुनिक मानव्यविद्या समाजविज्ञान किंवा अन्य शाखामधील विषयाच्या सहाय्याने भाषाभ्यासातील नवे दृष्टिकोन विकसित झालेले आहेत. भाषाविज्ञानाच्या विविध जोड शाखा आता दिसतात. त्यातून भाषा विज्ञानाचा अभ्यास विविधांगी झालेला आहे.

भाषेचा वापर जीवनाच्या विविध क्षेत्रात सुरू असतो. व्यावहारिक क्षेत्रातील भाषेच्या वेगवेगळ्या गरजांसाठी भाषा विज्ञानाच्या साह्याने सामग्री पुरविणे, त्यासाठी भाषिक कौशल्य प्रदान करणे हे देखील भाषा विज्ञानाचे क्षेत्र आहे.


भाषा आणि साहित्य यांचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे भाषाविज्ञानाचे केवळ भाषेचा अभ्यास करून चालत नाही. भाषा विज्ञानाच्या सहाय्याने साहित्याच्या भाषिक विश्लेषणाला चालना देणे, त्यासाठी आवश्यक संकल्पनात्मक चौकट आणि विश्लेषण पद्धती साहित्याला पुरविणे यांचीही आवश्यकता भासते. थोडक्यात, भाषा विज्ञानात मानवी जीवनातील भाषेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. भाषेच्या सर्वांगीण अभ्यासाला भाषाविज्ञानात चालना मिळालेली दिसते. आज भाषाविज्ञानातील अभ्यास केवळ भाषेच्या प्रांतापुरता मर्यादित राहिलेला दिसत नाही तर त्याचा विस्तार अन्य ज्ञानक्षेत्रातील विषयाच्या सहाय्याने व्यापक झालेला आहे.

भाषाविज्ञान : उदय आणि विकास

मानवी भाषेचा स्वतंत्रपणे विचार करणारी ज्ञान शाखा म्हणून भाषाविज्ञानाचा जन्म अलीकडचा असला तरी व्याकरण, व्युत्पत्ती इत्यादी भाषेच्या विशिष्ट अंगांचा पद्धतीशी विचार प्राचीन काळापासून झालेला दिसतो. भारतीय, ग्रीक, चिनी, अरबी संस्कृतीतून भाषा विचाराची परंपरा प्राचीन काळी आढळते. भारतामध्ये वैदिक कालखंडापासून भाषा विचार दिसतो. प्रतिशाखांमध्ये वेदांमधील ध्वनी उच्चारांचा विचार झालेला आहे. शिक्षा ग्रंथात ध्वनींचे उच्चारण आणि वर्गीकरण, आघात, संधी इत्यादीचा विचार आढळतो. ब्राह्मणके, अरण्यके, उपनिषदे या ग्रंथातून तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने विचार झालेला दिसतो. इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात पाणिनीने लिहिलेल्या 'आष्टाध्यायी' या ग्रंथात संस्कृत भाषेच्या व्याकरणाची मांडणी झालेली आहे. प्राकृत भाषांच्या व्याकरणाचाही विचार झालेला दिसतो. पश्चिमेकडे प्राचीन ग्रीकांनी भाषा विश्लेषण केले. सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल यांनी उच्चारण प्रक्रिया, लिंगविचार इत्यादी संबंधित विवेचन कधी व्याकरणाच्या अंगाने तर कधी काव्यशास्त्राच्या अंगाने केलेले आहे. लॅटिनची व्याकरणे रचल्या गेली.  प्रबोधन काळात युरोपीय लोक व्यापारांच्या, धर्मप्रसाराच्या निमित्ताने देशोदेशी फिरू लागले. या काळात त्यांनी जगातल्या भाषांची अनुकरणात्मक व्याकरणे तयार केली. मध्ययुगातील भाषा विचाराला अनेक बाबतीत मर्यादा प्राप्त झालेल्या होत्या. 


अठराव्या शतकात पाश्चात्य भाषाभ्यासाला एक नवी दिशा प्राप्त झाली. विल्यम जोन्स (१७४६ - १७९४) या ब्रिटिश अधिकाऱ्याने/ अभ्यासकाराने संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन या भाषांमध्ये कमालीचे साम्य असून त्या एकाच भाषेपासून उद्भवल्या असाव्यात असा विचार प्रथम मांडला होता. या गृहीतकाचा शोध घ्यायचा तर त्यासाठी भाषांचे तथ्यनिष्ठ ऐतिहासिक संशोधन होणे आणि त्याला भाषांच्या तुलनात्मक अभ्यासाची जोड मिळणे आवश्यक होते. या गरजेतून ऐतिहासिक आणि तौलनिक भाषाविज्ञानाच्या अभ्यासाला सुरुवात झाली.

ऐतिहासिक भाषा विज्ञानात भाषांमध्ये कालक्रमाने घडत गेलेल्या परिवर्तनाचा अभ्यास करण्यात आला. ऐतिहासिक अभ्यासाला भाषाभाषांची तुलनात्मक अभ्यासाची जोड देण्यात आली. त्यामुळे ऐतिहासिक आणि तौलनिक भाषा विज्ञानाची पद्धती आकाराला आली. सुरुवातीला ही शाखा कम्पेरेटिव्ह फिनोलॉजी या नावाने ओळखली जायची. नंतर भाषाविज्ञान हे स्वतंत्र ज्ञानशाखा आहे. फिलोलॉजीची उपशाखा नाही हे माहीत झाल्यावर हे नाव मागे पडले. ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या अभ्यासातून भाषाकुले निश्चित करण्यात आली. ग्रीम (१७८५- १८६३) यांनी ध्वनी परिवर्तनाचे नियम शोधून काढले.

व्हेरनर(१८४६-१८९६),  यांनी ध्वनी परिवर्तनाचे नियम शोधून काढले. अशा रितीने ऐतिहासिक भाषाविज्ञानाचा विकास होत राहिला. फ्रांझ, बॉप, श्लेगेल, रास्क, व्हिटनी, मॅक्समुल्लर बुगमान, कोल्डवेल, ग्रिअर्सन, ग्रासमन हे या परंपरेतील महत्त्वाचे अभ्यासक. पुढे भाषेच्या ऐतिहासिक पद्धतीने केलेल्या अभ्यासाची लोकप्रियता आणि प्रभाव इतका वाढला की, हर्मान पॉल सारख्या वैज्ञानिकाला असे वाटू लागले की, ऐतिहासिक भाषा विज्ञानाशिवाय भाषा विज्ञानात दुसरे काही असू शकत नाही. विसाव्या शतकाच्या आरंभी या भाषा वैज्ञानिकाने मांडलेल्या विचारांमुळे भाषा विज्ञानातील अभ्यासाची दिशा बदलून गेली. ऐतिहासिक दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या अभ्यासातील मर्यादा पुढे आल्या व हा अभ्यास मागे पडत गेला. सोस्यूरच्या विवेचनातून वर्णनात्मक पद्धतीने करण्यात येणारा अभ्यास रूढ झाला. वर्णनात्मक भाषा विज्ञानाला आधुनिक भाषाविज्ञान म्हटल्या जाते. वर्णनात्मक भाषा विज्ञानाची मुहूर्तमेढ फर्दिना द सोस्यूर या फ्रेंच स्वीस विद्वानाच्या विचारातून झाली. सोस्यूरने इतिहास निरपेक्ष भाषाविश्लेषण ही भाषा विज्ञानाची कोनशिला आहे असे मत मांडले. कोणतीही भाषा ही स्वयंस्पष्ट असते असे सांगून भाषा ही एक रचना आहे. भाषा ही चिन्हव्यवस्था आहे. भाषा ही सामाजिक संस्था आहे इत्यादी विचार मांडून भाषेच्या रचनाधीष्टतेकडे लक्ष वेधले. भाषा आणि भाषण यातील भेद मांडून भाषण म्हणजे औच्चारिक भाषेच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त करून दिले. भाषेच्या वर्तमानकालीन रूपांचा, त्यामागील व्यवस्थेचा अभ्यास महत्त्वाचा ठरू लागला अशा रीतीने भाषेच्या वर्णनात्मक अभ्यासाला चालना मिळाली. ब्लूमफिल्ड, चॉम्सकी इत्यादी भाषा वैज्ञानिकांनी हे क्षेत्र पुढे नेले. प्राग प्रणाली/ संप्रदाय अमेरिकन संरचनावादी संप्रदाय, ब्रिटिश संरचनावादी संप्रदाय डॅनिश संरचनावादी संप्रदाय इत्यादी वेगवेगळे संप्रदाय वर्णनात्मक भाषा विज्ञानात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे ठरले.

थोडक्यात, भाषाविज्ञानाचा प्रारंभ अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात दिसून येतो. एकोणिसाव्या शतकात भाषाविज्ञान खऱ्या अर्थाने भरात आलेले होते. या टप्प्यावर ऐतिहासिक, तौलनिक भाषाविज्ञान विकसित झाले. भाषाविज्ञानातील या दृष्टीकोनात विसाव्या शतकात बदल होऊन आधुनिक भाषाविज्ञानाचा प्रारंभ झाला. आधुनिक भाषाविज्ञानात वर्णनात्मक भाषाविज्ञानाचा पाया रचला गेला. आज भाषा विज्ञानाचा अनेक अंगाने विस्तार झालेला दिसून येतो.


वर्णनात्मक : भाषाविज्ञानाचे स्वरूप

वर्णनात्मक भाषा विज्ञान ही शाखा विसाव्या शतकाच्या आरंभी उदयाला आली. १९२० नंतर भाषा अभ्यास क्षेत्रावर या शाखेचा एवढा प्रभाव पडला की त्यामुळे १९ व्या शतकात प्रभावी ठरलेल्या ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे महत्त्व कमी होऊ लागले.  इतकेच नव्हे तर ऐतिहासिक अभ्यासाच्या वैज्ञानिकतेबद्दल शंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या. अतिशय थोड्या कालावधीत वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा ज्ञान क्षेत्रात दबदबा निर्माण होण्याचे कारण म्हणजे या अभ्यास पद्धतीला असलेला वैज्ञानिक पाया आणि या पद्धतीतील काटेकोरपणा होय.

वर्णनात्मक भाषाविज्ञानाला आधुनिक भाषाविज्ञान असेही म्हटले जाते. वर्णनात्मक अभ्यास पद्धतीची सुरुवात फर्दिना द सोस्यूर यांनी केली. बोलल्या जाणारी भाषा वर्णनात्मक भाषा विज्ञानात केंद्रस्थानी असते. या पद्धतीत भाषेच्या औपचारिक नमुन्यांचा अभ्यास करून भाषाविषयक निरीक्षणे नोंदविल्या जातात. औपचारिक नमुन्यातील व्यक्तीस अपेक्ष गुणधर्म बाजूला काढून भाषेची स्वनव्यवस्था, पदव्यवस्था व वाक्यव्यवस्था यांचे परस्पर संबंध शोधले जातात. स्वनविज्ञान(Phonetics), स्वनिम विचार(Phonology), रुपिमविचार(Morphology), वाक्यविचार(Synetex), अर्थविचार (Semantics) इत्यादी वर्णनात्मक भाषाविज्ञानातील गाभाशाखा होत.वर्णनात्मक भाषा विज्ञानात भाषेच्या वर्तमानातील रूपाचा अभ्यास होतो. या अभ्यास पद्धतीमध्ये एककालिक आणि कालक्रमिक भाषिक स्थितीचे विश्लेषण केले जाते. या पद्धतीमध्ये कोणताही एक कालबिंदू निश्चित करून त्या ठिकाणच्या भाषेच्या स्थितीचे वर्णन केले जाते. भाषेचा एका विशिष्ट टप्प्यावरील रूपाचा अभ्यास करून भाषेच्या रचनातत्वावर वर्णनात्मक भाषा विज्ञान प्रकाश टाकते. हा अभ्यास एककालिक असतो. पुढील उपशाखातून वर्णनात्मक भाषाविज्ञानातून अभ्यास चाललेला असतो.

वर्णनात्मक भाषाविज्ञानाची व्याप्ती


स्वनविचार (Phonetics) - मानवी मुखावाटे निर्माण होणाऱ्या ध्वनींचा (स्वनांचा) भाषानिरपेक्ष दृष्टिकोनातून केलेला अभ्यास.

स्वानिमविचार (Phonology/Pgonemics) - मानवी मुखावाटे निर्माण होणाऱ्या व भाषेत स्थान असलेल्या ध्वनींचा म्हणजेच स्वनांचा भाषासापेक्ष अभ्यास.

रुपिमविचार (Morphology) - शब्दांच्या रचनांचा अभ्यास.

वाक्यविचार (Syntax) - वाक्यरचनांचा अभ्यास

अर्थविचार (Semantics) - अर्थप्रक्रियेचा अभ्यास

वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धतीमध्ये अभ्यासकाचे काही संप्रदाय आहेत. भाषेतील घटकांचा त्यांच्या कार्यावरून अभ्यास करणारा प्राग संप्रदाय, भाषिक नमुन्यांचा तार्किक पद्धतीने विचार करणारा कोपनहेगन संप्रदाय आणि औपचारिक नमुन्यांचा अभ्यास करून भाषिक संरचनांचा शोध घेणारा अमेरिकन संरचनावादी संप्रदाय हे यातील काही महत्त्वाचे संप्रदाय होत.  यापैकी अमेरिकन संरचनावाद्यांचा विशेष बोलबाला झालेला आहे.


वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा विकास

  विसाव्या शतकाच्या आरंभी भाषाभ्यासात अमुलाग्र बदल झाले. ऐतिहासिक भाषा अभ्यासाची जागा वर्णनात्मक अभ्यासाने घेतली. लिंग्विस्टिक्स हा शब्द या नव्या शाखेला लावण्यात येऊ लागला. या परिवर्तनाचे श्रेय सोस्यूर या स्वीस भाषा वैज्ञानिकाला जाते. त्याचे Course de linguistique generale हे पुस्तक १९१६ साली प्रसिद्ध झाले आणि भाषाविज्ञानात नवे युग अवतरले.

सोस्यूरने ऐतिहासिक आणि वर्णनात्मक भाषाविज्ञानातील फरक प्रथमच स्पष्टपणे दाखवून दिला. सोस्यूरने भाषेकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. भाषेचा अभ्यास केवळ इतिहासाचा म्हणजे कालक्रमिक दृष्टिकोनातून न करता विशिष्ट काळी, विशिष्ट प्रदेशात तिचे जे स्थिर रूप उपलब्ध असते ते स्पष्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत हे सोस्यूरने सांगितले. त्यासाठी भाषा व्यवहाराची मदत घेतली पाहिजे. भाषा व्यवहारामागील सर्व भाषकांना समान अशी जी भाषाव्यवस्था, तिचे वर्णन करणे हे भाषाभ्यासाचे उद्दिष्ट असले पाहिजे हे त्याने स्पष्ट केले. भाषा हे ध्वनीरूप घटकांनी साकार होणारे एक चिन्हव्यवस्था असून तिच्यातील चिन्हे ही पूर्णतः यादृच्छिक स्वरूपाची आहेत इत्यादी नाविन्यपूर्ण विचार सोस्यूरने मांडले. त्यांच्या विचाराच्या प्रकाशात आधुनिक अभ्यासाची वाटचाल सुरू झाली आणि वर्णनात्मक भाषा विज्ञान विकसित होत गेले. 

१९३० ते १९४० या दरम्यान भाषांच्या दोन्ही विचारावर काम झाले. १९४० ते १९५० पर्यंत पदविचारावर काम झाले. १९५० नंतर वाक्यविचाराकडे लक्ष वेधले गेले. प्रथमोस्थित संघटक पद्धतीने वाक्याचे विश्लेषण करून त्यांच्या रचनावर प्रकाश टाकला जाऊ लागला. वाक्यविचारानंतर अर्थविचाराचा विकास झाला.

आज वर्णनात्मक भाषा विज्ञानात विविध संप्रदाय निर्माण झालेले आहेत. प्राग संप्रदाय, कोपेनहेगेन संप्रदाय, अमेरिकन संप्रदाय इत्यादी. या सर्वांमध्ये प्रभावी ठरलेली अभ्यास शाखा म्हणजे संरचनावादी शाखा ही शाखा अमेरिकेत प्रथम उदयाला आली. प्रसिद्ध भाषा वैज्ञानिक ब्लूमफिल्ड हा तिचा प्रणेता होता. त्याचे १९३३ साली प्रसिद्ध झालेले Language हे पुस्तक या संप्रदायास दिशा देणारे ठरले.

आधुनिक भाषाविज्ञान म्हणजे संरचनावादी भाषा विज्ञान असेच समीकरण या काळात रूढ झाले. ब्लूमफिल्ड हा वर्तनवादी मनोविज्ञानाचा अभ्यासक होता. भाषा ही एक प्रकारचे वर्तनच असून तिचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करता येतो असे ब्लूमफिल्डचे मत होते. भाषेची व्यवस्था अनेक घटउपघटकांच्या भिन्न भिन्न स्तरावरील संरचनांनी बनलेली असते असे मानून संरचनावाद्यांनी तिच्या संरचना स्पष्ट करण्यासाठी विशिष्ट वर्णन पद्धतीचा अवलंब केला. भाषा ही भौतिक घटना असून तिचे विश्लेषण, वर्गीकरण इत्यादी प्रकारांनी अभ्यास करता येतो असा त्यांचा विश्वास होता. प्रत्यक्ष भाषण व्यवहाराचे नमुने गोळा करून त्यांचे विश्लेषण करून प्रथम त्या भाषेची स्वानिम व्यवस्था निश्चित करता यायची. त्यानंतर त्या भाषेचे लघुत्तम सार्थ घटक किंवा रुपिम निश्चित करून त्यांच्या लहान मोठ्या रूपबंधाद्वारे त्या भाषेचे व्याकरण स्पष्ट करायचे असे एक तंत्र त्यांनी विकसित केले. या तंत्राचा उपयोग करून जगातल्या कुठल्याही भाषेचे वस्तुनिष्ठ पद्धतीने वर्णनात्मक व्याकरण लिहिता येऊ लागले. ख्रिस्ती धर्माच्या प्रसारकांना जगभरातील विविध भाषांतून बायबलचे भाषांतर करायचे होते. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैनिकांना निरनिराळ्या भागात राहून स्थानिक भाषा शिकण्याची पाळी आली. ब्लूमफिल्ड प्रणित संरचनावादी पद्धतीने तयार झालेली भाषेची झटपट व्याकरणे या लोकांच्या गरजा भागवायला उपयोगी पडू लागली. त्यामुळे या पद्धतीचा खूप बोलबाला झाला. भौतिकशास्त्रांच्या तंत्राचा पाया त्यामुळे आलेला काटेकोरपणा व सफाई सार्वजनिक उपयोग क्षमता ही या अभ्यास पद्धतीची वैशिष्ट्ये होती. त्यामुळे तिला अपूर्व यश मिळाले. तरी या पद्धतीवरही अनेक आक्षेप घेण्यात आले.

संरचना वाद्यांच्या यांत्रिक पद्धतीच्या भाषा वर्णनाविरुद्ध असंतोष वाढीला लागला १९५७ साली अमेरिकन भाषा वैज्ञानिक नोम चॉमस्कीचे सीट्रॅक्टिक स्ट्रक्चर्स हे पुस्तक प्रसिद्ध झाले. चॉमस्कीची विचारसरणी संरचनावादाच्या प्रतिक्रियेतून निर्माण झाली. त्याने संरचनावादी पद्धतीतील उणीवांकडे लक्ष वेधले. संरचनावादाने अर्थविचाराकडे दुर्लक्ष केले होते.  चॉमस्कीने वाक्य हा भाषा अभ्यासाचा मूल घटक म्हणून अर्थाचा अनुरोधाने वाक्याचे विश्लेषण करण्याची पद्धती स्वीकारली. त्याने मांडलेल्या रचनातंत्र प्रक्रियेमुळे वाक्यविचार आणि अर्थविचार या दोन विभागांना वर्णनात्मक अभ्यासात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. अर्थविचाराला मिळालेल्या महत्त्वामुळे भाषेचा अभ्यास, भाषा व्यवहार आणि समाज व्यवहार यांच्याशी जोडून केला जाऊ लागला.

भाषा अभ्यासाच्या वाटचालीमध्ये रविवार २ फेब्रुवारी १७८६ रोजी सर विल्यम जोन्झ यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीच्या तिसऱ्या वार्षिक अधिवेशनामध्ये दिलेले व्याख्यान भाषाभ्यासाची नवी परंपरा निर्माण करणारे ठरले. यांनी या व्याख्यानामध्ये मांडलेल्या विचारातून भाषांच्या ऐतिहासिक अभ्यासाला प्रारंभ झाला. कालांतराने या अभ्यास पद्धतीची निकड म्हणून तौलनिक भाषाभ्यासाची जोड देण्यात आली. १९ व्या शतकामध्ये या अभ्यास पद्धतीला भाषाभ्यासाची मूलभूत पद्धती मानल्या जात होती. फर्दीना द  सोस्यूर हे या अभ्यास पद्धतीची भाषाभ्यास करणारे व्यासंगी अभ्यासक होते. त्यांना या अभ्यास पद्धतीमधील मर्यादा जाणवायला लागल्या. त्यातून त्यांनी भाषाभ्यासासंदर्भात नवे विचार मांडायला सुरुवात केली. या प्रक्रियेतून त्यांनी मांडलेले नवे विचार आणि भाषांकडे पाहण्याची दिलेली नवी दृष्टी आधुनिक भाषाविज्ञानामध्ये केंद्रवर्ती राहिली.

सोस्युर यांनी आपल्या विचारांमध्ये 'रूप', 'व्यवस्था', आणि 'संरचना' या अमूर्त संकल्पनांना मध्यवर्ती स्थान दिले. भाषेकडे पाहण्याचा ऐतिहासिक दृष्टिकोन टाळून त्यांनी भाषेच्या एककालिक स्थितीवर आपले लक्ष केंद्रित केले आणि या स्थितीत भाषेची संरचना कल्पून या संरचनेचे विश्लेषण देण्यावर भर दिला. त्यांच्या या नव्या दृष्टीमुळे भाषाभ्यासाची दिशा बदलून गेली. आधुनिक भाषा विज्ञानाचा विकास सोस्यूर यांनी घालून दिलेल्या पायावर झाला. त्यांनी भाषाभ्यासात केलेले भाषिक वर्तन (Parole) आणि भाषा व्यवस्था (Langue) किंवा भाषा (Language)आणि भाषण (Speech) हे भेद आधुनिक भाषा विज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण ठरले. इतर कोणत्याही शास्त्राच्या तुलनेत भाषा विज्ञान आणि जी प्रगती साधली; त्यांच्या मुळाशी सोस्यूर यांच्या विचारांचे योगदान आहे सोस्यूर आणि सोस्युरच्या प्रभावाने विकसित झालेल्या युरोपीयन आणि अमेरिकन संरचनावादी भाषा अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून भाषा अभ्यासाच्या विविध शाखा विकसित झाल्या.

सोस्यूर यांनी भाषिक वर्तन हा भेद कल्पिला असला तरी, त्यांनी केवळ भाषिक व्यवस्थेलाच आपला अभ्यास विषय केला. सोस्यूर आणि त्यानंतरच्या संरचनावादी भाषा अभ्यासकांनीही ज्या भाषिक वर्तनामधून भाषेची व्यवस्था मिळते त्या व्यवस्थेवर आपले लक्ष केंद्रित केले. कोणत्याही विशिष्ट कालखंडामध्ये भाषा स्थिर मानून तिचे वर्णन करता येते; हा विचार सोस्यूर यांनी रुजविला. पाणी नेणे आष्टाध्यायी या आपल्या ग्रंथामध्ये भाषा विश्लेषणासाठी वापरलेल्या पद्धतीचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रभाव आधुनिक संरचनावादी भाषा अभ्यास पडलेला आढळतो म्हणूनच पाणिनीने 'अष्टाध्यायी' या आपल्या ग्रंथामध्ये भाषाविश्लेषणासाठी वापरलेल्या पद्धतीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव आधुनिक संरचनावादी भाषाभ्यासावर पडलेला आढळतो. म्हणूनच पाणिनीच्या भाषा विश्लेषणाशी आजचे संरचनावादी भाषाविज्ञान नाते सांगते. वर्तनवादी मनोविज्ञानाचा अभ्यासक असलेला अमेरिकन भाषा वैज्ञानिक लेनर्ड ब्लूमफिल्ड याने भाषा हे एक प्रकारचे वर्तन असून तिचा शास्त्रीय अभ्यास करता येतो असे मत मांडले. आपल्या या मतानुसार नैसर्गिक शास्त्रांचा अभ्यास या संरचनावादी पद्धतीने होतो; त्याच पद्धतीने भाषेचाही अभ्यास करता येतो हे त्यांने दाखवून दिले.

साधारणतः १९३० ते १९५५ हा काळ संरचनावादी भाषा अभ्यासाचा काळ म्हणून ओळखला जातो. अमेरिकन भाषा वैज्ञानिक ब्ल्यूमफिल्ड हाच या अभ्यास पद्धतीचा प्रणिता आहे. वर्णविषयाचे विविध स्तर उलगडून दाखविणे, प्रत्येक स्तरावरील घटक स्पष्ट करणे, त्या घटकांचे अंत:संबंध स्पष्ट करून; या संबंधावर आधारलेली व्यवस्था स्पष्ट करणे अशा प्रकारच्या अभ्यासाला संरचनात्मक अभ्यास म्हणतात. भाषेच्या अभ्यासात ही पद्धती ब्लूमफिल्ड आणि त्यानंतर बर्नार्ड ब्लॉक, जॉर्ज ट्रेगर, झीलिंग हे, युजिन नायडा, मार्टिन जू, सलॉन बेल्झ, चार्लझ हॉकेट या अभ्यासकांनी वापरली. अमेरिकेमध्ये विस्तार पावलेली ही भाषा अभ्यासाची पद्धत असल्याने या अभ्यासाला संरचनावादी किंवा अमेरिकन संरचनावादी अभ्यासाची पद्धत म्हणून ओळखली जाते. स्वनविज्ञान, स्वनिमव्यवस्था, रुपिमव्यवस्था, वाक्यव्यवस्था आणि अर्थविन्यास असे पाच तर कल्पून ब्ल्यूमफिल्डने भाषाभ्यास केला. तथापि अर्थाचे क्षेत्र त्या व्यामिश्र आणि गुंतागुंतीचे असल्याने या क्षेत्राचा शास्त्रीय अभ्यास अशक्य आहे हे लक्षात आल्यानंतर आपल्या भाषा विचारातून त्याने 'अर्थ' स्तराला बाजूला ठेवले.

स्वनविचार

जगातील प्रत्येक मानव समूह विचारांचे व भावनांचे आदान-प्रदान करण्यासाठी ध्वनीयुक्त भाषेचा वापर करतो. मागील घटकांमध्ये आपण भाषाविज्ञान संकल्पना भाषा विज्ञानाचे स्वरूप व वर्णनात्मक भाषाविज्ञान विकास विस्ताराचा विचार आपण केला या घटकात आपण भाषेच्या वर्णनात्मक अभ्यास करणार आहोत. वर्णनात्मक भाषा विज्ञानात भाषेच्या स्वरूपाचा वस्तुनिष्ठ अभ्यास होतो. या पद्धतीला एककालिक अभ्यास पद्धती असेही म्हणतात. सोस्युर या भाषावैज्ञानिकाने सर्वप्रथम भाषा अभ्यासाचा एकेकालिक आणि कालक्रमिक असा भेद सांगून आधुनिक भाषाविज्ञानाचा पाया घातला. कोणत्याही एका विशिष्ट कालखंडातील भाषेचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे वर्णनात्मक भाषाभ्यास होईल. या पद्धतीत भाषेचा अभ्यास करताना भाषेच्या विश्लेषणाला महत्त्व दिले जाते. मूल्यमापन केले जात नाही. वर्णनात्मक पद्धतीत एकाच भाषेच्या एकाच काळातील भाषेचा अभ्यास केला जातो. एकाच कालखंडातील भिन्न वा निरनिराळ्या काळातील भाषांची तुलना या पद्धतीत केली जात नाही. वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धतीमध्ये भाषेचे प्रमाण व लिखित रूपे अभ्यासली जात नाहीत तर भाषेच्या मौखिक म्हणजे व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या रूपांना प्राधान्य दिले जाते. सहाजिकच भाषेच्या उच्चारण प्रक्रियेला या पद्धतीत अधिक महत्त्व असते. भाषा ही परिवर्तनशील असली तरी ती विशिष्ट कालखंड स्थिर असते असे मानून तिचा अभ्यास केला जातो.

वर्णनात्मक पद्धतीने भाषेचा अभ्यास करताना आपल्याला सर्वप्रथम मानवी वागिंद्रियाची रचना व कार्य समजून घ्यावी लागतात. उच्चारणाच्या प्रक्रियेत मानवी वागिंद्रियातील ओठांपासून ते फुफुसापर्यंतचे अवयव सहभागी असतात. भाषेत वापरल्या जाणाऱ्या स्वनांचे उच्चारण त्या स्वरांचे गुणधर्म निश्चित करावे लागतात. स्वनांमध्ये स्वर आणि व्यंजन असे वर्गीकरण करून त्यांचे प्रयत्नावर आधारित उच्चार, स्थानानुसार, प्राणतत्त्वानुसार घोषानुसार वर्गीकरण केल्या जाते हा अभ्यास भाषा निरपेक्ष असतो.

वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धतीमध्ये भाषेच्या स्वन, स्वनिम, वाक्य आणि अर्थविन्यास या घटकांचा अभ्यास केला जातो. स्वनिम, रुपिम आणि वाक्य यांचा भाषासापेक्ष अभ्यास करावा लागतो. स्वनिम हा भाषेतील महत्त्वाचा घटक असल्याने भाषेचे नमुने गोळा करून अल्पतम ध्वनियुग्माच्या साह्याने स्वनिम निश्चित केले जातात. त्यावरून त्या-त्या भाषेची स्वनिम व्यवस्था सांगता येते. या पद्धतीत प्रत्यक्ष निरीक्षणाला आणि व्यवहारिक रूपांना प्राधान्य दिले जाते. परंपरेने चालत आलेले परंतु भाषेचे वापरात नसलेल्या स्वनिमांचा विचार केला जात नाही. उदा. मराठीच्या स्वरमालेतील ल व ऋ स्वर वापरले जात नाही. त्यामुळे यांचा विचार वर्णनात्मक पद्धतीत संभावत नाही. भाषेच्या स्वनिम निश्चितीनंतर रूपिमांचा अभ्यास केला जातो. भाषेतील सार्थ लघुत्तम रूप म्हणजे रुपिम होय. रुपिका-रुपिमां- रुपिकांतर या क्रमाने रुपविचार केला जातो. रूपदृष्ट्या भिन्न परंतु अर्थदृष्ट्या समान असणाऱ्या रूपिकांच्या समूहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संबोधास रुपिम असे म्हटले जाते.उदा. देऊळ आणि देवळ. 

रुपिमांचे  आशयसूचक आणि कार्यसूचक रूपिम असे प्रकार करता येतात. रुपिमांमधून शब्द आणि शब्दांच्या सानुक्रम रचनेमधून वाक्य बनते. भाषेच्या वर्णनात्मक अभ्यासात वाक्याची रचना प्रथमोपस्थित संघटकाच्या सहाय्याने समजून घेता येते.

सुरुवातीस स्वनविचार, रूपविचार आणि वाक्यविचार एवढ्यापुरताच सीमित असलेल्या वर्णनात्मक भाषा अभ्यासात पुढे अर्थविचाराचाही समावेश होऊ लागला. भाषा ही संवादाचे माध्यम असल्याने अर्थाला विशेष महत्त्व आहे. अर्थ हा घटक मानवी जीवनाचा एक भाग असल्याने जीवनातील सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य संदर्भाचा परिणाम अर्थावर होत असतो. अर्थाचे स्वरूप स्थलकालसापेक्ष असू शकते. त्यामुळे अर्थनिष्पत्तीची व्याप्ती निश्चित करता येत नाही. तरीही अर्थाचे स्वरूप वर्णनात्मक पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत घटकांमध्ये केला आहे.

भाषेचे स्वरूप

भाषा ही मानवी भावभावनांच्या आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे प्रमुख माध्यम आहे. भाषेशिवाय मानवी जीवनाचा कोणताही व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. मानवाच्या सर्व प्रकारच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांचे आदान प्रदान भाषेच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे भाषा ही मानवी जीवन विकासातील अपरिहार्य बाब बनली आहे अशा भाषेचे स्वरूप समजून घेतल्याशिवाय भाषेचे महत्त्व कळू शकणार नाही. मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे उपजत सामर्थ्य असते. लहान मूल त्याच्या कानावर पडलेल्या ध्वनीचे अनुकरण करत करत भाषा संपादन करीत असते. भाषा संपादनाच्या संदर्भात भाषा वैज्ञानिकांनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. उदा. मानवी अपत्याला बकरीच्या कळपात ठेवल्यास ते मुल केवळ बकरीचाच आवाज काढू शकते किंवा मराठी भाषकाच्या अपत्यास तेलगू भाषक परिवारात ठेवल्यास ते मूल तेलगू भाषा संपादन करते म्हणजेच भाषा संपादनाची प्रक्रिया ही श्रवणानुकरणातूनच सिद्ध होते. मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे जे सामर्थ्य असते त्याला 'भाषिक क्षमता' असे म्हणतात. मानवेत्तर प्राण्यांच्या मेंदूमध्ये ही भाषिक क्षमता नसल्याने ते विशिष्ट ध्वनीच्या पलीकडे आवाज काढू शकत नाहीत. या भाषिक क्षमतेच्या बळावर मानवी मूल वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत आपली मार्तृभाषा संपादन करीत असते.

भाषा ही आपल्या दैनंदिन व्यवहारात वापरली जात असल्याने ती आपल्याला सोपी वाटते. परंतु या भाषेच्या अंतरंगात शिरल्यावर तिची गुंतागुंत निदर्शनास येते. शिवाय भाषा ही परिवर्तनशील असल्याने तिच्या उच्चारणात नेहमीसाठी काहींना काही बदल संभवत असतो. त्यामुळे एखाद्या भाषेला विशिष्ट मापदंड लावून मोजता येत नाही. भाषा ध्वनींनी बनलेली असते. मानवी भाषेत या ध्वनीच्या सानुक्रम रचना वापरल्या जातात. भाषेत सुटेसुटे ध्वनी वापरले जात नाहीत. तर त्यांच्या रचना वापरल्या जातात. या सानुक्रम रचनांच्या मागे अर्थसंकेत असतात. उदा. 'वड' या रचनेमध्ये व+अ+ड+अ असे छा ध्वनी समाविष्ट होत आहेत. परंतु ही रचना सानुक्रम नसल्याने अर्थहीन आहे. अशा रचना भाषिक व्यवहारात वापरल्या जात नाहीत. भाषेतील सानुक्रम रचनाच्या मागे जे अर्थसंकेत असतात ते रूढी-परंपरेने ठरलेले असतात. वडाला वडच का म्हणायचे पिंपळ का म्हणू नये याची कोणतेही उत्तर आपण देऊ शकत नाही. भाषा ही एक संकेत प्रणाली आहे ज्या सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणातून भाषेचा प्रवास सुरू असतो त्या पर्यावरणाचे परंपराचे संकेत भाषा स्वीकारत असते. उदा. आजच्या संगणकीय युगात आपण संगणकीय प्रणालीशी संबंधित असणारे अनेक शब्द घडवलेले आहेत.

भाषिक संप्रेषण

भाषिक संप्रेषणात वक्ता आणि श्रोता असे दोन घटक समाविष्ट असतात. वक्त्यांच्या मनातील आशय ऐकणाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचणे व त्याला समजणे याला 'भाषिक संप्रेषण' असे म्हणतात. संप्रेषण या शब्दासाठी संज्ञापन, विनिमय, संदेशन, संवाद असे पर्यायी शब्द वापरता येतात. मानवी भाषेत सुमारे 30 ते 70 ध्वनिघटक (स्वर व व्यंजने)  असतात. या दोन्ही घटकांच्या सानुक्रम कालरचना आणि त्या मागील संकेतप्रणाली निजभाषकाला ज्ञात असते. या सामग्रीच्या बळावर आपण भाषिक संप्रेषण साधू शकतो. मातृभाषा आत्मसात केल्यावर आपण सहजपणे ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो. बोलणारा आणि ऐकणारा या दोघांनाही भाषेतील अर्थसंकेत माहीत असल्याशिवाय भाषिक विनिमय होऊ शकत नाही. उदा. बोलणारा कन्नड भाषेतून संभाषण करीत आहे. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे ध्वनी ऐकणाऱ्यापर्यंत जाऊनही पोहोचतात. परंतु ऐकणाऱ्यास त्या ध्वनीची संकेत प्रणाली ज्ञात नसेल तर तेथे भाषिक संप्रेषण होऊ शकत नाही. म्हणून वक्त्यांच्या मनातील आशय ऐकणाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचणे याला जेवढे महत्त्व आहे. तेवढेच तो  ऐकणाऱ्या आशय समजणे यालाही महत्त्व आहे ही प्रक्रिया पुढीलप्रमाणे दाखवता येईल.

                भाषिक संप्रेषण 

बोलणारा (वक्ता)            ऐकणारा(श्रोता)

आशय - संकेतीकरण- ध्वनिनिर्मिती - ध्वनिग्रहण - विसंकेतिकर - आशय

बोलणाऱ्याच्या मनात असे असतो तो बोलणे आधी मनातल्या मनात त्या आशयाचे संकेतीकरण करतो एकदा त्याला नेमके काय म्हणायचे आहे हे निश्चित झाले की तो ध्वनी निर्मिती करतो. म्हणजे बोलतो ऐकणाऱ्यापर्यंत ध्वनी जाऊन पोहोचतात. सर्वप्रथम तो ध्वनी ग्रहण करतो नंतर ध्वनी रचना मागील अर्थसंकेत ऐकणारा उलगडून घेतो. तेव्हा त्याला बोलणाऱ्याच्या मनातील आशय कळतो. बोलणाऱ्याची प्रक्रिया आशायाकडून ध्वनी निर्मितीकडे जात असते. तर ऐकणाऱ्याची प्रक्रिया ध्वनीग्रहणाकडून आशयाकडे जात असते.

थोडक्यात, भाषा ही सानुक्रम ध्वनी रचनांच्या सांकेतीकरणावर आधारलेली संप्रेषण प्रणाली आहे. जगातील प्रत्येक भाषेला तिची अंगभूत नियम व्यवस्था असते. त्याप्रमाणे त्या त्या भाषेचा व्यवहार सुरू असतो. शब्दसिद्धी, वाक्यरचना कशी करायची तर त्याच्या जागी कोणते शब्द वापरायचे सर्वनामांचे प्रयोग कसे करायचे? काळाचे प्रयोग कसे करायचे? इत्यादी बाबतीत त्या त्या भाषेची एक विशिष्ट व्यवस्था असते.

भाषेची लक्षणे

माणूस जस जसा उत्क्रांत होत गेला तस तशी भाषा ही विकसित होत गेली भाषेचा शोध ही मानवी उत्क्रांतीची महत्त्वपूर्ण उपलब्ध मानावी लागेल माणूस हा सुरुवातीपासूनच समूहाने राहणारा प्राणी असल्याने प्रत्येक समूहाची भाषा ही वेगवेगळी असते जगातील कोणत्याही दोन भाषा एक दुसरी सारखे नसतात प्रत्येक भाषेची स्वतंत्र व्यवस्था असते असे असले तरी सर्व भाषांच्या स्वरूपात आणि कार्यात काही सारखेपणा आढळतो यासारखेपणाच्या आधारे काही समान लक्षणे ठरविता येतात हा हॉकेट या भाषा वैज्ञानिकांनी भाषेची पुढील सात लक्षणे सांगितले आहेत.

१. द्वि-स्तरीय रचना

मानवी भाषेत सामान्यत:३० ते ७० मुलध्वनी असतात. सानुक्रम रचना करून या मर्यादित ध्वनीच्या आधारे अमर्यादित शब्दाची निर्मिती आपण करू शकतो. यास भाषेची दुहेरी संरचना असे म्हणतात. भाषिक रचनेतील प्रमुख दोन स्तर पुढीलप्रमाणे

१. असेचा प्रथम स्तर- मूळ ध्वनीचा मर्यादित साठा

२. दुसरा स्तर - मूळ ध्वनीच्या स्वतंत्र वेगवेगळ्या रचना सानुक्रम तयार करून त्यातून निर्माण होणारा अर्थ.

उदा. मराठीतील 'स' आणि 'र' या दोन मूलध्वनींच्या पुढीलप्रमाणे अर्थपूर्ण रचना करता येतात.

स+र - सर

र+स - रस

र+स+र+स - रसरस

स+र+स+र- सरसर

स+र+स - सरस

२. यादृच्छिकता (योगायोग)

सर्व भाषा यादृच्छिकतेचे तत्व पाळताना दिसतात. यादृच्छिकता म्हणजे शब्द आणि त्या शब्दाने सुचित होणारा अर्थ यात कुठल्याही अर्थाअर्थी किंवा कार्यकारण संबंध नसणे. झाडाला झाडच का म्हणायचे? घर का म्हणू नये यामागील निश्चित कार्यकारण संबंध सांगता येत नाही. शब्द व अर्थ यांचे नाते हे केवळ परंपरेवर अवलंबून असते. ज्याने कोणी झाडाला झाड म्हटले तेव्हापासूनच म्हणजेच परंपरा संकेत व रुढीने हा अर्थ घेतला गेला आणि याला समाजाची मान्यता मिळाली. यादृच्छिकतेत जुने भाषिक संकेत टाळून नवीन भाषिक संकेत, संदेश तयार करता येतात किंवा त्यात नवीन सुधारणा घडवून आणता येते. त्यामुळेच भाषाभाषांमध्ये असणारा वैशिष्ट्यपूर्ण फरक आपल्या लवकर लक्षात येतो. तो केवळ या भाषेतील यादृच्छिक लक्षणांमुळेच. या लक्षणांमुळेच जगातील प्रत्येक भाषा ही दुसऱ्या भाषेपेक्षा वेगळी ठरते.

३.निर्मितीशीलता

आपण पूर्वी कधीही ऐकलेला नाही किंवा उच्चारण्याचा प्रयत्नही केलेला नाही असा एखादा नवा शब्दप्रयोग किंवा भाषिक वाक्यरचना आपण तयार करू शकतो. भाषेच्या संवाद प्रक्रियेत नवनवीन शब्द आणि रचना घडत राहतात आवश्यकतेनुसार माणूस आपल्या भाषिक कौशल्याचा वापर करून नवीन भाषिक प्रयोग करू शकतो हे सोय केवळ मानवी भाषेत शक्य आहे मानवी तर प्राण्यांच्या भाषेत ही निर्मितीशीलता नसते भाषेच्या या निर्मितीसाठी मुळे भाषेची विनिमय क्षमता अमर्याद झाली आहे. भाषेच्या या लक्षणामुळेच भाषा समृद्ध झाली व भाषेचा विकास झाला असे आपण नेहमी म्हणतो.

४. अदलाबदल

मानवी भाषेत बोलणारा व ऐकणाऱ्याचे आदान-प्रदान किंवा अदलाबदल ही शक्य होते. एकमेकांच्या भाषिक संरचना एकमेकांना समजल्यास माणूस आपल्या भाषेच्या आधारे दुसरी भाषा आत्मसात करू शकतो. मानवी भाषेत बोलणारा आणि ऐकण्याच्या भाषिक रूपाचे आदान प्रदान करून किंवा अदलाबदल करून नवीन भाषिक कौशल्य आत्मसात करतो. त्या अदलाबदल या लक्षणामुळे मानवी भाषा अधिकाधिक समृद्ध होत आहेत.

५. विशिष्टता

एका मर्यादित भाषिक रचनेतून मोठा अर्थ सूचित करण्याचे सामर्थ्य फक्त मानवी भाषेतच असते आणि यालाच भाषेचा विशिष्टपणा असे म्हणता येते.

कोणतीही भाषिक क्रिया ही दुसऱ्याला काहीतरी सुचविण्यासाठी सांगण्यासाठी केलेली असते. 'जेवण तयार झालं बरं!' असे गृहिणीने उच्चारलेले वाक्य कानावर आल्यानंतर पुढीलप्रमाणे वेगवेगळे अर्थ आपल्याला सुचित होतात.

१. जेवण करण्यासाठी हात स्वच्छ पाण्याने धुवावे.

२. स्वयंपाक करून झालेला आहे.

३. ताटे वाढून झाली.

४. जेवणाला या

असे विविध अर्थ आपल्याला सूचित होतात. या भाषेतील गुणधर्मामुळे वेळ, श्रम, कष्ट याची बचत होते. त्याचबरोबर मानवाच्या कार्यशक्तीतही वाढ होते आणि भाषिक संदेशन प्रक्रियाही सहज आणि प्रभावी होते.

६. स्थलकालातीतता

भाषा ही स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून आपला भाषिक विनिमय साधू शकते एखादी गोष्ट समोर नसताना सुद्धा तिच्यावर आपण भाष्य करू शकतो स्थल काला तिथे त्याच्या या लक्षणांमुळे माणूस आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकतो.

उदा. वर्डस्वर्थच्या 'डेफोडिल्स' या कवितेतील 'डेफोडिल्स' हे पिवळ्या रंगाचे फुल आपण पाहिलेले नसते तरीही आपण ते फुल शब्द सामर्थ्याने मनापुढे उभे करतो. अशी स्थळकालीकता  मानवेत्तर प्राण्यांच्या भाषेत नसते.

७. सांस्कृतिक संक्रमण

भाषेमुळे मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक संक्रमण घडत असते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भाषिक विनिमयातून संस्कृतीचे स्थलांतर व कालांतर घडत असते. त्यामुळे संस्कृतीचे संक्रमण व संवर्धन होत असते. या भाषेच्या खास क्षमता आहेत. मानवी संस्कृती जसजशी विकसित होत जाते तसतशी काळाच्या ओघात अनेक नवनवीन शब्दाची भर पडत असते. विज्ञानातील विविध शोध, सांस्कृतिक वातावरणात झालेले बदल, जागतिकीकरणातून आलेली मॉल संस्कृती, याबरोबर संगणक, मोबाईल ई-मेल, एस.एम.एस., लॅपटॉप इत्यादी अनेक संकल्पनात्मक शब्दप्रयोग भाषेत सहज रूढ होताना आढळतात. मानवाने मिळविलेल्या ज्ञानाचे जतन हे भाषेद्वारे केले जाते आणि हेच ज्ञान सांस्कृतिक संक्रमणाद्वारे समृद्ध करता येते. हेच ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढी भाषेद्वारे संक्रमित होत असते.

वरील विवेचनावरून भाषेचे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतात 

१. भाषा ही एक पद्धत आहे. मोजक्या मूळ ध्वनीच्या सामर्थ्यावर भाषा ही आकारला येते. त्या मोजक्या मर्यादित मूळध्वनींचा वापर सानुक्रम पद्धतीने केलेला असतो. 

२.भाषा ही यादृच्छिक ध्वनी संकेतावर आधारलेली असते आणि हे दोन्ही संकेत रुढीने व परंपरेने निश्चित केलेले असतात. ३. भाषेचा मूळ आशयाशी घनिष्ठ संबंध असतो. शब्द व त्या शब्दाचा मूळ अर्थ यांच्यात अंतरिक संबंध असतो. शब्द उच्चारल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ लगेच आपल्या मनात उत्पन्न होतो.

४.  भाषेचे उच्चारण हे मौखिक असते, म्हणजे भाषिक ध्वनीचे उच्चारण हे सलग सानुक्रमे होत असते. ज्या क्रमाने ध्वनीचे उच्चारण होते त्याच क्रमाने आपण हे दोन्ही ग्रहण करतो. म्हणून भाषेचे स्वरूप हे मौखिक असते.

५. भाषेची रचना ही वैधर्मयुक्त असते. 

६. भाषा ही ध्वनींनी बनलेली असते. भाषेत असे असंख्य ध्वनी असतात. ७.भाषा ही प्रतिकात्मक ध्वनी संकेतावर आधारलेली असते.

८. भाषा ही रुढी व परंपरेने आकाराला आलेली असते.

९. भाषेला इतिहास असतो.

१०. भाषा ही परिवर्तनशील असते 

११. भाषेचे स्वरूप रेखिक असते.

भाषाभ्यासाची अंगे


स्वनविज्ञान : संकल्पना

 २.१ स्वनविज्ञान संकल्पना

 २.३ वागिंद्रियाची रचना व कार्य

  २.४ स्वनांचे वर्गीकरणकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...