रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे योगदान

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे योगदान
प्रा.डॉ. प्रल्हाद दत्तराव भोपे,
सहयोगी प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख 
श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी
मो. क्र. ९९२२७९४१६४

प्रस्तावना 
संत परंपरेतील क्रांतिकारक व केवळ संतच नाही तर राष्ट्रसंत या उपाधीस सार्थ करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. जेव्हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा चळवळीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रीय स्वरूपाच्या कार्याची दखल घेतल्याशिवाय इतिहास लेखन आंशिकरित्या एकांगी राहील त्या दृष्टीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा स्वातंत्र्य चळवळीविषयी असलेला संबंध संक्षिपाने घेण्याचा प्रस्तुत प्रयत्न या शोधनिबंधात करण्याचे योजले आहे.
जन्मापासूनच अवलिया असलेला माणिक हा विश्वाच्या कल्याणासाठीच होता. अधीच देश कार्यासाठी यावलीतील प्रत्येक कुटुंबात राष्ट्रभक्त निर्माण झालेले होते. शहिदांची यावली असे त्या जन्मभूमीस म्हटले जात असे. ब्रिटिशांची जुलमी राजवट होती. परकीय शत्रूबाबत भारतीय मनात विदर्भातील ग्रामीण जन- मनात क्रांतीचे पुल्लिंग राष्ट्रसंत यांनी पेटविण्याचे कार्य केले. कोणत्याही एकाच गावचा व घरचा नसलेला हा बालक बालपणीच बाहेर पडला. काही काळ त्यांनी रामटेक, चिमूर सारख्या अरण्य वेष्टित भागात योगसाधनेत व तपश्चर्येत घालविला. अडाणी व आदिवासी लोकांची सेवा करून देवबाबा या नावाने लोकांचे प्रेम त्यांनी संपादन केले. त्यातूनच त्यांच्या पुढील जीवनाची दिशा कार्याची रेखा विकसित होत गेली. १०४२ च्या महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्यात एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून खेड्यापाड्यातील लोकांच्या मनात स्वराज्य विषयीचे अस्मितेचे बीज पेरण्याचे काम त्यांनी केले होते. "चिमूर परिसरात लोकांनी महाराजांना स्वदेशीचे व सुतकताईचे प्रयोग करताना पाहिले होते. सुत कताई करून महात्मा गांधीजींच्या पूर्वी महाराजांनी स्वयंप्रेरणेने तकलीतून स्वराज्याच्या पदचिन्हाची रुणझुण ऐकायला येणार याची बालवयातच जाणीव करून दिली होती"१. 
१०३० पासून भारताच्या इतिहासाची पृष्ठे निराळ्या तऱ्हेने रंगविली जाऊ लागली. तत्पूर्वी महाराजांनी मध्यप्रदेश व त्यांच्या बाहेरदेखील प्रवास केला. तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारत भ्रमण केले व आपल्या भजनांची छाप जनमनावर पाडली. मध्य प्रांत, वऱ्हाडच्या सुखवस्तू व विलास वृत्तीच्या बहुजन समाजाला तमाशासारख्या छंदाकंदातून 'लागू प्रभू छंद मनाला' अशी मधुर भजने ऐकून बाहेर आणले.२
तुकडोजींनी इ.स. १९२३ साली चिमूरला 'भजनी मंडळ' स्थापन करून पूर्वीच्या बाल समाजाला विशिष्ट रूप आणले. ही संघटनेची पूर्व चिन्हे होती. समान संघटना, सुत, चरखा, खादी यांचा संबंध लावून १९३० च्या चळवळीत धरपकडीत तुरुंगात जायची पाळीही महाराजांवर आलेली होती, पण ती टळली. महाराज जंगल सत्याग्रहात आपली भजने म्हणत. विशीच्या वयात महाराजांना तुरुंगात जाण्याची पाळी येणे, खादीवर जोर असणे आणि गुलामशाहीची चीड असलेली गीते जनमाणसात स्थान कमावून बसणे ही बाब त्यांच्यातील देशप्रेमाचेच द्वोतक होती. राष्ट्र उत्थानासाठी समाज सुधारणाही आवश्यक आहेत हे लक्षात घेऊन अवलिया जीवन जगणारे राष्ट्रसंत आदर्श व टापटीपीचे जीवन ते जगू लागले.
भजनातून जनजागृती 
तुकडोजींनी प्रबोधनाचे व जनजागृतीचे माध्यम म्हणून भजने रचून ती धार्मिक माध्यमातून प्रभात फेऱ्या, वृत्तोत्सव, एक्के, सप्ते, चातुर्मास याद्वारे रूढ केली. त्यातून लोकसंग्रह घडवला ते जनसमुहाला अंतकरणाच्या ओलाव्याने अंतरिक तळमळीने महाराज सांगत महाराजांनी राष्ट्रीयता व बलसंपन्नता आधी विचार ग्रामीण जनतेला फार मोठ्या प्रमाणात दिले ते आखाडे कृषी प्रदर्शन शंकर पट भरवीत विविध कार्यक्रमातून राष्ट्रीय गीतांची पेरणी त्यांनी केली होती. स्वातंत्र्याच्या चळवळीला गांधींनी शहरात पोहोचविले व शहरी लोकांना स्वातंत्र्याची भाषा शिकविली खेड्यातील लोकांना मराठी मुलखात तरी महाराजांनी स्वातंत्र्याच्या चळवळीची चळवळीचे पायाशुद्ध तत्त्वज्ञान सक्रियपणे दिले त्या तत्त्वज्ञानाची भाषा खेळताना गवसली नसेल पण चळवळीचा आत्मा मात्र त्यांच्या हाती गवसला गेला व हे महान कार्य महाराजांमुळे घडले.३
पराधीनतेचे दुःख
भारताच्या पराधीनतेचे दुःख महाराजांना बचत होते. पारतंत्र्याचे दुष्परिणाम व त्यामुळे होणारी जाचणूक, गांजणूक उघड्या डोळ्यांनी पहावी लागे. ती पाहून ते तळमळत होते. 'भारत ओस झाला असून असुराने करी धरला' (अनुभव सागर भजनावली पृ. २), 'असुरी राज्य गिळीले' (अनुभव सागर पृ. १५२) याची त्यांना तीव्र खंत वाटे. 'भरत भू दास्यात पडली', 'परवशता पुरी उलटली' व त्यामुळे 'गुलामगिरीच्या कर्कश बेड्या पायी करी पडल्या' आणि परवशतेच्या भरी भारतभू दुःखी जाहली'( पृ. १५० अनुभव सागर) हे त्यांना अगदीच असह्य होत होते.४
त्यांची कविता हे त्यांच्या कार्याचे साधन ठरत होती. तिच्यातील बोधामृतात राष्ट्रीयता घोळून निघत होती. मराठवाड्यातील निजामी राजवटीचाही उल्लेख त्यांच्या भजनातून ते देतात.'एक रावण निघून गेला असला तरी दुसरा झाला हा' (अनुभव सागर भजनावली पृ. १५१) परक्यांनी चहूबाजूनी देश दुर्बल केला व आमचे तन-मन धन धरून नेले. आम्हाला शरीरासकट परतंत्र केले व त्यामुळे बहुपंगू झालेल्या या भारतात स्वात्मता नच उरल्या' बद्दल दुःख होते. शब्दरचनेतही महाराज चतुर होते. दोन्हीकडून भारत नागवला जात असल्याचे त्यांनी 'द्विधा घसले' या शब्दरचनेतून सुचित केले. झोपडीचे का असेना पण स्वातंत्र्य हवे होते कसेही असले तरी आपले ते आपलेच. या भावनेने स्वराज्याच्या आगमनाबद्दल महाराज उत्सुक होते. गुलामगिरीच्या मोरापेक्षा हक्काचा कोंबडा बरा ही त्यांची धारणा होती. आपल्या भजनांच्या माध्यमातून पारतंत्र्यात असलेल्या तरुणांच्या मनात भारतीयांची प्राचीन आदर्श व मूल्य पेरून त्यांच्यात स्फूर्ती निर्माण केली. स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी राष्ट्रसंतांची ही प्रचार पद्धती अविरत सुरू होती. प्राचीन आदर्शामधील वीर वृत्तीचे दाखले देण्यामध्ये त्यांनी औचित्य साधले. शौर्यधैर्याच्या कथा प्रभावी पद्धतीने भारावल्या भाषेत मांडण्याचे महाराजांचे कसब महाराजच जाणोत. गीतेतील दृष्टांत देत तरुणात वीर वृत्तीची जोपासना महाराजांनी केली. एकेकाळी गांजलेल्या मराठ्यांना महाराजांनी शिवछत्रपतीच्या विरोज्वल चारित्र्याची आठवण करून दिली व सांगितले की राष्ट्राचे दास्य नाशवा, मरणे जगणे दोन्ही सारखे आपणा' (अनुभव सागर पृष्ठ २२२) 
भारत हा संत महंतांचा, ऋषीमुनींचा पावन भूमी असलेला देश आहे. या राष्ट्राची समाजाची घडी नीट बसविण्यासाठी संत महांतांनी पुढे आले पाहिजे. त्यांनी मंदिरात केवळ घंटा न वाजविता व ध्वनी धतुरे न करता ते सोडून देऊन भारताची हाक ऐकायला सांगितले. 'भारताचे चालक व ईशाचे बालक तुम्हीच'. अशाप्रकारे देशात कुठेही गेले तरी महाराज लहान सहान संतापासून तर मोठ्या संतापर्यंत सर्वांना भेटून आपली विचारधारा हळूहळू सांगत व पटवून साधून त्यांना राष्ट्रप्रेमी बनवत.
स्वातंत्र्यपूर्व काळात नवयुवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा खटाटोप महाराजांनी केला. राष्ट्रसेवा साधण्यासाठी आंधळी भक्ती मागे टाकून कर्तव्य घोडा सावरावा व व्यसनांना आवरावे असा आवश्यक उपदेश त्यांनी केला. "मुखचंद्र सुखलेल्या हिंदू प्रभूच्या लेकरांना इतिहास पुरुषाचा ठसा याद करायला प्रवृत्त केले. भारताच्या गत वैभवाची जाणीव देऊन 'परदास्यी राहण्यापेक्षा मरण बरे' अशा स्थितीत जगवते तरी कसे? असा प्रश्न विचारला परक्या विरुद्ध बोलणे त्यावेळी महा दुस्कर असतानाही महाराजांनी ते केले. यातून त्यांचा बेडर राष्ट्रवाद निर्भय ध्येयवाद आढळतो.
"परकी सत्ता नष्ट होवो 
झळको स्वतंत्रतेचा दिवा" (अनुभव सागर पृ.१५२)
हे अंतरीचे बोल खोलून दाखवून 'अर्जुनासमवीर व्हा!'(अ. सा.११८), 'भारताचे ग्रहण नेत्री पाहू नका'(अ. सा.११९) 'समरी प्राण देऊन स्वातंत्र्य मिळवा व आपले काव्य बनवा' अशी भावी भारताच्या बाबतची इतिहास रेखा हिंदू लेकरासमोर चित्रित करून दाखविली आणि आपल्या सुख स्वातंत्र्याला जपायला कळकळीने सांगितले. आपल्या भजनाच्या काव्याच्या आधारे एकता संघटन समन्वयांवर भर दिला.
राष्ट्र जागवा
 राष्ट्र जागवा
 जागृत व्हा तरुणांनो 
वीरवृत्तीचा दिवा उजळवा l
 तसे नच झाले तर मरनेच बरे l
राष्ट्र जागविण्यासाठी महाराजांनी बाल, तरुण व स्त्रियांनाही चेतना दिली. क्रांती एका दिवसात होत नाही. त्यासाठी प्रचंड पूर्वतयारी हवी असते. तिच्या मुखाशी ज्वालांचा विस्फोट होण्यासाठी मानसिक, बौद्धिक पृष्ठभूमी बऱ्याच काळापूर्वी प्रयत्नपूर्वक तयार करावी लागते याची जाणीव महाराजांना होती. खेड्यापाड्यातून क्रांतीचे हे तत्त्वज्ञान कार्यरूप करण्यासाठी तुकडोजी महाराज अविरत, अविश्रांत, अथक प्रयत्नशील होते. विदर्भातील खेड्यापाड्यात ब्रिटिश सत्तेबाबत असंतोष निर्माण करण्याचे कार्यही महाराजांच्या प्रभातफेरीने केले. 'चल, उठ भारता आता ही वेळ नसे निजण्याची' ही गर्जना त्यावेळेच्या प्रभात फेरीतून महाराजांनी दिली.
शूरवीर तयार करणारे संतही या महाराष्ट्राच्या भूमीने दिले. समर्थ रामदास स्वामी व जगद्गुरु तुकोबाराय यांनी शिवरायांना त्याकाळी फार मोठे पाठबळ दिले. तीच परंपरा पुढे विदर्भाकडे आली विदर्भात संत निर्माण झाले. वैराग्यमूर्ती गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ही दोन संत चंद्रसूर्याप्रमाणे सदैव तळपत राहतील व इतिहासात आठवणीत राहतील. मोझरी येथे स्थापन त्यांनी केलेले श्री गुरुदेव सेवाश्रम आजही राष्ट्रसेवेचे कार्य निरंतर करीत आहे. सालबर्डी येथे अभूतपूर्व यज्ञ महाराजांनी घडविला. लाखो लोकांचे संघटन घडून आणले. ही ऐतिहासिक घटना घडली. या जनसमुदायामुळेच पुढे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची भेट घडली. महाराजांचे प्रस्थ वाढले. जनता जागृत करण्यासाठी विदर्भात कोणी महाराज जेवन देतो अशी चुकीची माहिती गांधीजींना तरी दिली. गांधीजींनी महाराजांना भेटण्यासाठी चिठ्ठी पाठविली. वर्धा येथील सेवाग्राममध्ये महात्मा गांधीजीचे मौन केवळ महाराजांच्या भजनाने तुटले. एवढी ताकद महाराजांच्या भजनात होती.
 'किस्मत से राम मिला जिसको जिसने ये तीन जगा पायी' या भावपूर्ण भजनाने बापूचे भान हरपून गेले और गावो म्हणून बापूचे मौन सुटले. आप देश के लिए कुछ किजीये असे महात्मा गांधींनी महाराजांना सांगितले. चातुर्मास, सप्ते, एक्के यातून राष्ट्रीय चळवळ महाराजांनी उभी केली. महाराजांच्या आष्टी येथील भजनाने परकीय सत्तेबाबत जनमत तयार झाले.
"झाड जुडेले बंब बनेंगे 
पत्थर सारे बॉम्ब बनेंगे 
भक्त बनेगी सेना नाव लगेगी किनारे 
अब काय कोई धूम मचाते हो आते है नाथ हमारे" 
आष्टी, चिमूर, बेनोडा येथील सत्याग्रह महाराजांच्या कार्याने व भजनाने घडविला. ब्रिटिशांनीही त्यांचा धसका घेतला. महाराजांच्या भजनाने इतिहास घडविला. असा एकमेव संत महाराष्ट्रात निर्माण झाला की जो देशासाठी कारागृहात गेला. देश स्वतंत्र झाल्यावरही राष्ट्रीय कार्य त्यांनी सोडले नाही. "अब तो स्वराज्य आया है अपना गाव सुंदर बनाओ" स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी महाराजांची खंजेरी गावोगाव गर्जू लागली. त्यांनीं विश्वशांती नामसप्ताह संपन्न केला. 'गुरुदेव' मासिक सुरू केले. सामुदायिक प्रार्थनेस बैठक प्राप्त करून दिली. यातून एक संस्था अखिल भारतीय गुरुदेव सेवाश्रम' मोझरी येथे उदयास आले.
"भगवी टोपी शांती सुखाची
 शुभ्र खादीची सदभावाची
 मस्तकी टिळक तो प्रेमाचा 
साधी राहणे उच्च विचारसरणी तुकडोजींची छटा"
साने गुरुजींनी स्वातंत्र्यानंतर पंढरपूरचे मंदिर हरिजनांसाठी खुले नव्हते म्हणून आंदोलन सुरू केले. त्यावेळी साने गुरुजींना त्यांच्या उपोषणाला पहिला पाठिंबा तुकडोजी महाराजांनी दिला. महाराजांनी मदत केली. 
महाराजांची कीर्ती दिल्लीपर्यंत पोहोचली. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद महाराजांच्या भेटीसाठी मोझरीस आले. महाराजांनाही राष्ट्रपती भवनात निमंत्रण देण्यात आले राष्ट्रपती भवनात महाराजांची खंजरी निनादली. राष्ट्रसंत पदवी त्यांच्या कार्यामुळेच डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी महाराजांना दिली. ग्राम सुधारणेचा कार्यक्रमातही लालबहादूर शास्त्री गुलजारी नंदा यांनीही मोझरीला भेटी दिल्या. महाराजांची शिस्त पाहून ते दंग झाले. इ.स. १०५४ साली विदर्भ साहित्य मेळावा गुरुकुंज येथे घेण्यात आला. त्यामध्ये महाराजांची 'ग्रामगीता' प्रकाशित केल्या गेली. या नाविन्यपूर्ण ग्रंथामुळे अनेक खेडे सुधारले. माणसे दुरुस्त व्हायला लागली. ग्रामगीतेच्या आधारे हिवरे बाजार, राळेगणसिद्धी, पाटोदा आदी गावे आदर्श गावे म्हणून जगाच्या नकाशावर आली. तुकडोजी महाराज गावोगाव नशाबंदी, बलिदान बंदी, आखाडा संघटन गोवंश बंदी करण्यासाठी फिरले. भूदान यज्ञ चळवळीतही महत्त्वाचे योगदान महाराजांनी दिले. वर्धा जिल्ह्यात पवनार आश्रम आहे. संत विनोबा भावेंनी भूदान यज्ञ घडविला व या कामे महाराजांनी त्यांना मोलाची मदत केली. महाराज या कामासाठी अकरा दिवस फिरले. महाराजांना अकरा हजार एकर जमीन लोकांनी दिली. ती विनोबांना महाराजांनी दिली. इस १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले; तेव्हा महाराजांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. भारताच्या सैन्यास प्रेरणा देण्यास महाराज सीमेवर धावले. त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण होते. तेही महाराजासमवेत होते. स्वस्थ बसलेल्या भारतीय तरुणांना ते म्हणतात, "अग्नी भडकला युद्धाचा 
तू स्वस्थ होऊन बसे
 रक्त न उसळे तुझे तरुण म्हणावे कसे?"
 दिलबर के लिए दिलदार है 
हम दुश्मन के लिए तलवार है हम 
सैन्यात चैतन्य महाराजांच्या भजनाने निर्माण केले. असा संत की जो देशाच्या रक्षणासाठी रणांगणावर गेला. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी महाराजांचे कार्य लक्षात घेता मोझरीला आल्या. थोर पत्रकार आचार्य अत्रे महाराजांच्या भेटीला येत असत. स्वामी विवेकानंद पहिल्या विश्वधर्म परिषदेसाठी शिकागोला गेले; परंतु दुसरी परिषद जेव्हा जापान येथे भरली तेव्हा भारताचे नेतृत्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केले. मलया, ब्रह्मदेश व जापान या देशांचा दौरा महाराजांनी केला. महाराज अनेक संस्थांशी संबंधित होते. राष्ट्रसंतांनी निर्माण केलेली संस्था ही लोकांसाठी उभारली. संचालक मंडळ त्यांनी निर्माण केले. या संताने मानवतेचे मंदिर बांधले व इतर मंदिर त्यांची आवश्यकता लक्षात घेता बांधली. आयुर्वेद महाविद्यालय, शाळा, डी.एड., बी.एड. तसेच आयुर्वेद रसशाळा त्यांनी स्थापन केली. या सर्वांपासून महाराज अलिप्त राहिले व जनसेवेकडे लक्ष त्यांनी पुरविले. मराठी व हिंदी वाड्मयाच्या इतिहासालाही त्यांच्या वाडमयीन कार्याची दखल घ्यावीच लागते. इयत्ता चार वर्ग शिकलेला हा संत त्याने मराठी व हिंदी साहित्यात उत्कृष्ट व चौफेर लेखन केले. हे वाङ्मय करोडोच्या मुखी जाण्यासाठी आजही गुरुदेव सेवा मंडळाच्या हजारो शाखा कार्यरत आहेत. 
महाराजांच्या वाङ्मयातून देशनिष्ठा, देशभक्ती, देशप्रेम ओतप्रोत पहावयास मिळते.
राष्ट्रीय जागृती हा त्यांच्या जीवनाचा प्रमुख उद्देश होता. राष्ट्रसेवा हा त्यांचा जीवन मार्ग होता. राष्ट्रीय स्वातंत्र्य हा त्यांचा जीवन निर्णय होता, तर राष्ट्रप्रेम हा त्यांचा जीवनक्रम होता. महाराज पारतंत्र्य व स्वातंत्र्य या दोन्ही काळात असल्यामुळे भारत देशाची दोन्ही काळातील अवस्था त्यांनी अनुभवलेली होती. त्यांनी रचलेली मराठी राष्ट्रीय भजनावलतील भजने राष्ट्रगीते आजही भारतातील बंधू भगिनींना राष्ट्रसेवेची वेळोवेळी स्फूर्ती व प्रेरणा देत आहेत. राष्ट्रीय भजनावलीत एकूण ९१ भजने आहेत. महाराजांची असंख्य हिंदी पद रचनाही राष्ट्रभक्तीपर आहे.
 महाराजांनी ग्रामन्नोतीच्या दिव्याबरोबरच वीर वृत्तीचा दिवा उजळण्यास भजनाद्वारे प्रोत्साहित केले आहे. संतांनी या देशातील क्षात्रवृत्ती क्षण केली अशी टीका केली जाते. या टिकेस महाराजांची राष्ट्रीय भजने उत्तर आहेत. 
या भारतात बंधुभाव नित्य वसु दे
 दे वरची असा दे 
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे 
मतभेद नसू दे 
दे वरची असा दे 
हे महाराजांचे देशभक्तीपर गीत स्वातंत्र्योत्तर काळात खूपच लोकप्रिय झाले. शालेय क्रमिक पुस्तकात व विद्यापीठ अभ्यासक्रमात व नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे विद्यापीठ गीत म्हणूनही ते मान्यता पावलेले आहे. 
भारताच्या सुपुत्रांनो उठा 
घ्या राज्य आपुल्या हाती
 भाग्य उदयास आलेले वाढू द्या अंगीच्या रक्ता 
स्वातंत्र्यदेवता आली भारतात सुख द्यायला 
प्यारा हिंदुस्तान है l गोपालो की शान हैl हिंद सदा के लिए आझाद रहेगा l 
जुग जुग जियेगा l
उठा श्रीमंतांनो! अधिकाऱ्यांनो! पंडितांनों सुशिक्षितांनों !साधूजणांनों!
 हाक आणि क्रांतीची! 
अशी कितीतरी क्रांतिकारी देशभक्तीची गीते, भजने अभंग महाराजांची आहेत.
ती भारतीयांच्या मनामनात राष्ट्र प्रेरणा, राष्ट्रभावना जागृत ठेवतात.

संदर्भ ग्रंथ
१. भाऊ मांडवकर, राष्ट्रसंत तुकडोजी आणि स्वातंत्र्याची चळवळ, पान १२
२. उनि, पान १२
३.उनि, पान १६,१७
४. अनुभव सागर भजनावली
५. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन पाचवे स्मरणिका
६. डॉ. बाळासाहेब जाधव व प्रा. प्रल्हाद भोपे (संपादक) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज: व्यक्ती आणि वाड्मय
७. राष्ट्रसंत तुकडोजींचा पोवाडा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुपासी- संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या. संत जनाबाई जन्म अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड मृत्यू अंदाजे इ.स. १३५० राष्ट्रीयत्व...