रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

मराठवाडा मुक्तीसंग्राम समजून घेताना...

मराठवाडा मुक्तीसंग्राम समजून घेताना

मराठवाडा मुक्तीसंग्राम समजून घ्यावा लागतो, जाणावा लागतो, काळ आणि घटनांची संगती लावावी लागते. मुक्ती संग्रामाच्या इतिहासात अन्याय आणि अन्यायाविरुध्द प्रखर संघर्ष पाहायला मिळतो. त्याची गोळाबेरीज करावी लागते. तरच हा इतिहास त्यागाचा, शौर्याचा होता हे अनुभवता येते.

एकीकडे शेकडो वर्षाची राजवट ज्याला आपण दुसऱ्या भाषेत शेकडो वर्षाची गुलामी असही म्हणू शकतो. हा लढा भारत स्वतंत्र झाल्यावर म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ ला सुरु झाला का? असा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तर नाही असे त्याचे उत्तर आहे.

संपूर्ण देशच पारतंत्र्यात होता, त्यामुळे मराठवाडयाचे पारतंत्र्य वेगळे कसे वाटणार? जणू मराठवाडा हा पारतंत्र भारताचा हिस्साच होता. ही भावना निजामी राजवटीतील जनतेमध्ये होती. म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाडयालाही स्वातंत्र्य हवे ही भावना जागृत झाली आणि निजामी राजवटीविरुध्द संघर्ष पेटला. तो लढा १७ सप्टेंबर १९४८ रोजी थांबला. या कालावधीत घडलेल्या संघर्षाला मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हटले जाते.

या संघार्षाचे वेगवेगळे स्वरुप पाहायला मिळतात. एक लढा महात्मा गांधीच्या अहिंसावादी तत्वाने चालला आणि दुसरा सशस्त्र मार्गाने चालला. ज्याला मवाळवादी आणि जहालवादी असेही म्हटले जाते. या दोन्ही मार्गाने चालेल्या लढयाचे हेतू एकच, स्वातंत्र्य. पण मार्ग भिन्न होते. अहिंसावादी विचाराचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. तर सशस्त्र लढा देणाऱ्या क्रांतीविरांचे नेतृत्व हे वेगवेगळे होते. या सशस्त्र क्रांतीच्या विचाराला चालना देणारे केंद्र स्वतंत्र भारत आणि निजाम राजवट यांच्या सिमेवर कॅम्पामधून कार्यरत होते.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास मांडतांना नव्या पिढी समोर एक गोष्ट आवर्जुन सांगायला हवी की, हा लढा केवळ तेरा महिने दोन दिवसाचा असला तीरी गुलामी मात्र शेकडो वर्षाची होती. औरंगजेबाने आदिलशाहीचा पराभव करुन निजाम स्थापित केला. निजाम म्हणजे व्यवस्थापक, पुढे औरंगजेबाचे देहावसान झाले आणि जे निजाम व्यवस्थापक होते ते स्वतःचे राजे झाले. एकूणच काय तर सोळाव्या शतकाच्या आदिलशीच्या पदानंतर निजामशाहीने सतरावे, अठरावे आणि एकोणिसाव्या शतकाच्या ४८ वर्षे उजाडेपर्यंत मराठवाडयावर राज्य केले.. औरंगजेब राजवटीपूर्वीही हा प्रदेश गुलाम होताच. यावरून एका अर्थाने गुलामीचा काळ तुम्हाला मोजता येईल.

मुक्ती संघर्षाचा लढा काळाच्या कसोटीवर अलपकाळ वाटत असला तरी या संघर्षाने काळाच्या उदरातील शेकडो वर्षाच्या गुलामीला झुगारून लावले. त्यामुळे हा लढा स्वाभिमानाचा आणि त्यागाचा होता. गुलामीच्या काळाने लढाऊपणाची उर्मींच मारुन टाकली होती. ती उर्मी जागी करुन राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. याच भावनेसाठी शेकडो लोकांनी बलिदान केले, घरावर तुळशीपत्र ठेवले, जीव दिले आणि जीव घेतले सुध्दा.

गुलामीच्या काळाचे संदर्भ मोजले तर तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की, मराठवाडा हा भारतात सर्वाधिक जास्त गुलाम राहिलेला प्रदेश आहे. मराठवाडयाचे पाच जिल्हे, कर्नाटकाचे तीन जिल्हे आणि तेलंगणाचे तीन जिल्हे एवढेच काय ते निजामाचे राज्य होते असे भूभागावरून मानयता येईल. मात्र निजाम हा जगातील सर्वात श्रीमंत राजा होता, धूर्त आणि धोरणी होता. त्यामुळेच भारताच्या इतर भागात घडलेल्या राजकीय क्रांतीचा निजामशीवर खुपच कमी परिणाम झालेला जाणवतो. मराठवाडयातील जनता इतर राजवटीशी तुला करायचेही कष्ट घेतांना दिसत नव्हती. जणू काही हेच आपले प्राक्तन आहे असे त्यांनी पक्के ठरविले होते..

राजवटी बदलल्या, राजे बदलले पण गुलामीचा कलंक मिटलाच नाही. ही गुलामी अंगात मुरुन गेली. राष्ट्रवादसंपला, स्वाभिमान संपला, गौरवशाली इतिहासाची पाने स्मृतीतून हटवून टाकली. त्या मातीचे काय होणार? पिढी दर पिढी हे चालत आले. त्यामुळे स्वातंत्र्याची उर्मी दाटण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्य लढयाचा॥२॥

आदर्श घ्यावा लागला. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला आणि हैद्राबाद संस्थानातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या. लढाऊ बाणा लोप पावलेला होता, तो जागा झाला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली आणि महात्मा गांधीचा आदर्श घेऊन वेगवेगळया नावाने आंदोलने सुरु झाली. या लढयाने निशस्त्र तरीही निजाम सरकारला हादरवून टाकले. ही एक प्रचंड मोठी, प्रचंड सहनशक्ती असलेले वादळ होते. यासोबतच एक जहालवादी चळवळ सुरु होती. त्याला दुसऱ्या भाषेत सशस्त्र लढा असे म्हटले तरी चालेल. निजाम राजवटीच्या हद्दीबाहेर आणि स्वतंत्र भारताच्या हद्दीमध्ये विविध कॅम्पमधून ही चळवळ कार्यरत होती आणि प्रचंड आक्रमक सुध्दा होती.. जहालवादी आणि मवाळवादी यांचा प्रत्यक्ष परस्पर संबंध कधीच आला नाही. जो आला असेल तो व्यक्तिगत पातळीवर, व्यक्तिगत आस्थेपोटी. या दोन्हीही चळवळीचे योगदान निर्विवाद मोठे होते.

निजाम श्रीमंत आणि चतुर असा मोगलांचा व्यवस्थापक होता. पुढे तोच राजा झाला. प्रशासन व्यवस्था चोख असल्यामुळे अनेक शतके त्यांनी राज्य केले. पेशवाईच्या काळात राक्षस भवनच्या लढाईत निजामाला पेशव्याने पराभूत केले. मात्र चौथाईचा करार करुन पुन्हा एकदा मराठवाडा गुलामीच्या जंजाळात अडकून पडला..

१९४७ ला भारताच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य तळपला आणि त्या प्रकाशात मराठवाडयाने आपल्या मुक्तीच्या मशाली पेटवल्या. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा चौफेर दिशेनी आक्रमक झाला. मवाळवादी आणि जहालवादी अशा दोघांनीही एकाच शत्रूवर वेगवेगळया मार्गाने हल्ले करायला सुरुवात केली. अखेर १७ सप्टेंबर १९४७ रोजी हा प्रदीर्घ काळ चाललेला लढा समाप्त झाला. केवळ मराठवाडा स्वतंत्र झाला एवढया समजुतीने आपण समाधानी पावतो. मात्र शत शतकांची गुलामी नष्ट झाली हे वास्तव आपल्या ध्यानी मनी येत नाही. त्यामुळेच मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास समजून घ्यावा लागतो असे की पहिल्यांदाच नमूद केले आहे.

मवाळवादी गटाने हातात शस्त्र धरली नसली तरीही महात्मा गांधीनी निर्माण करुन दिलेल्या अहिंसावादी मार्गाने हा लढलेला सुध्दा प्रेरणादायीच आहे. कारण या मार्गाने लढल्यामुळे हा लढा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचला. सर्व सामान्य माणूस झोपेतून उठतो तेव्हाच शक्तीशाली, जुलमी सत्तांच्या पोटामध्ये भितीचा गोळा उठत असतो.

या जोडीलाच हिंसा करण्यासाठी नाही तर सत्तेला धाक निर्माण करण्यासाठी ज्यांनी शस्त्र हातात घेतली ते लढे सुध्दा तेवढेच प्रेरणादायी आणि उचित होते. निशस्त्र आणि सशस्त्र या दोन्ही लढयांना अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्यक्ष लढयात लढलेले लोक या एकमेकांच्या मार्गावर कधीच टीका टिप्पणी करतांना आढळत नाहीत. किंबहूना प्रत्येकाचा मार्ग स्वतंत्र होता आणि त्यांना इतरांच्या मार्गावर, मार्गाबद्दल काही तक्रार नव्हती. होता तो आदर

असे असले तरीही अहिंसावादी मार्गाने लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे संदर्भ शासन दरबारी सापडतात. मात्र, सशस्त्र लढयामध्ये सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा नाम उल्लेख एखाद्या दप्तरात मिळेलच याची शाश्वती नाही. उदाहरण घ्यायचे झाले तर क्रांतीवीर काकासाहेब देशमुख यांनी गौताळा अभयारण्यातील ७०-८० खेडयातील तरुणांना घेऊन सशस्त्र लढा दिला, शेकडो रजाकारांना यमसदनी पाठविले. शेकडो पोलिसांनी काकासाहेब देशमुख यांच्या मागावर राहून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कधीही निजाम पोलिसांच्या हाती सापडले नाहीत. त्यांनी केलेल्या अनेक कृती निजाम राजवटीच्या दृष्टीने बेकायदेशीर होत्या. मात्र, त्या तत्कालीन शासन दरबारात दप्तरात सापडतीलच याची खात्री देता येत नाही. असेच दुसरे उदाहरण लातूर जिल्हयातील मातोळा येथील क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचेही देता येते. त्यांना दस्तुरखुद्द तत्कालीन निजाम कलेक्टर मोहमंद हैदर यांनी "Matola Devil on hourse back" अशी पदवी दिली. दत्तोबा भोसले निजामा विरुध्द प्रखर लढा दिला, पण पोलिसांच्या हाती लागलेच नाहीत, सेलूचा हप्ता लुटणे, अपसींगा पोलीस स्टेशन जाळणे, नाईचाकुर पोलीस स्टेशनवर हमला करुन शस्त्रास्त्रे लुटणे, देवताळा येथील शेकडो रजाकार कापले अशा त्यांच्या कितीतरी शौर्याच्या कहाण्या गावोगाव चावडीवर अजुनही सांगितल्या जातात. न्यायालयीन लढाई करण्यासाठी आरोपी पकडला जावा लागतो. संशयावरुन गुन्हा दाखल करणे एवढीच काय ती प्रक्रिया होत असे. या प्रत्यक्ष लढाईचा, संघर्षाचा काळ खुपच कमी होता, त्यातही शेवटच्या दोन वर्षात अचानक वेगाने घडामोडी घडत गेल्या, एकाच वेळी सर्वच भागात अशा घटना घडत गेल्या. सिमेवर स्थापन केलेल्या कॅम्प रचनेतून अनेक गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. उदाहरण सांगायचे तर वैजापूर तालुक्यात स्वातंत्र्य सेनानी विजेंद्र काबरा यांनी सुध्दा अनेक गावे स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती. चिंचोली व मुक्तापूर असेच स्वतंत्र झाल्याच्या घोषणा झाल्या. या सर्व घटना एकमेकांशी संलग्न नव्हत्या. कोणत्याही अर्थाने त्यांचा एकमेकांशी संबंध नव्हता. त्यामुळे त्या स्वतंत्रपणे मांडल्या जातात. काकासाहेब देशमुख असो की, क्रांतीवीर दत्तोबा भोसले असोत त्या सगळयांचे हेतू एकच होते. मात्र, संघर्षाचे मैदान, नेते, व्यक्तिगत विचारधारा हया सुध्दा वेगळया वेगळया होत्या. त्यातही सशस्त्र लढयाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येतं की, ते मुळातच धाडसी आणि आक्रमक असल्यामुळे, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी गुप्तपणे व्हायच्या, घटना घडून गेल्यावर लोकांना कळायची, तशीच ती निजामी पोलिसांना कळायची, त्याची चर्चा नंतर व्हायची.

या संपूर्ण सशस्त्र लढयाला एक नेतृत्व नव्हते. त्याला साधणारा समान दुवा नव्हता. त्यामुळे आपआपल्या ताकतीप्रमाणे ते लढत गेले. या लढयात सुध्दा अनेकांचे बलिदान झाले आहे. केवळ हाती शस्त्र घेतले होते. म्हणून त्यांचे बलिदान व्यर्थ समजण्याचे काहीच कारण नाही.

मुळात रझाकार ही गोष्ट निजाम राजवटीत आधीपासून नव्हती. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनानंतर निजामाला संरक्षणासाठी काहीतरी करण्याची गरज वाटू लागली. मग धर्माच्या नावाने लोक लवकर उभे राहतात, त्यांना पगार द्यावा लागत नाही, ते स्वतःच्या मर्जीप्रमाणे, पण धर्मासाठी लढतात. याच भावनेतून रझाकार अवतरले आणि पुढे संपूर्ण इतिहास घडला.

मराठवाडा शेकडो वर्षे गुलाम होता, मग या मराठवाडयाला इतिहासात काहीच स्थान नाही का? असा प्रश्न नव्या पिढीला पडण्याची शक्यता आहे. त्याचे उत्तर असं आहे, मराठवाडा हा प्रतिष्ठित राजवटींचा प्रदेश आहे. प्रतिष्ठानने आपली ख्याती जगभर नेली होती, देवगिरीचे यादव असेच पराक्रमी होते, सुस्थापित होते. मात्र अनेक शतकाच्या राजवटीनंतर शत्रूच्या दग्या फटक्याने ते पराभूत झाले आणि इतिहासाने त्यांच्या एकूणच राजवटीकडे प्रेरणेने पाहणे सोडून दिले. एवढाच काय तो त्यांचा दैवदुर्विलास म्हणता येईल. या सगळया पार्श्वभूमीवर मुक्तीसंग्राम समजून घ्यावा लागतो. तेव्हा तो नीट समजू शकतो.

या इतिहासात अनेक हुतात्मे होऊन गेले. त्या सर्वांच्या त्यागाचे पोवाडे कोणी गायले नाहीत. म्हणून त्यांचे शौर्य आणि त्यागाचे महत्व कमी होत नाही. अनेकांनी आपले घरदार नष्ट केले. त्याची कोणी नोंद केली नाही म्हणून त्यांच्या योगदानाचे महत्व कमी होत नाही. अशा सर्व पूर्वजांचे आपण या निमित्ताने स्मरण करुया. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...