रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

उपेक्षितांच्या वेदनेचा आशावादी हुंकार - मारोती कसाबांची कविता

उपेक्षितांच्या वेदनेचा आशावादी हुंकार - मारोती कसाबांची कविता 
डॉ. प्रल्हाद भोपे
सहयोगी प्राध्यापक व 
मराठी पदवी व पदव्युत्तर विभागप्रमुख
श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी

साहित्य समाज आणि संस्कृतीमध्ये कविता या वाडमय प्रकाराचा मौलिक वाटा आहे. मानवी जीवन हेच एक काव्य आहे असे म्हटले तर वावगे ठरत नाही. मानवी भावनेला आवाहन करण्याचे कार्य कविता करते तर विविध विचारांना गती देण्याचे कार्य गद्य लेखन करते. कविता हा सर्जनशील व संवेदनशील असा वाडमय प्रकार आहे. सर्वच साहित्य प्रकारात कवितेचा इतिहास हा प्राचीन व सर्वात मोठा आहे. कारण मनुष्याची पहिली अभिव्यक्ती कविता असली पाहिजे. मॅथ्यू अर्नोल्ड तर poetry is the criticism of life म्हणजे "साहित्य जीवन भाषा असते" म्हणतो. २००० नंतरच्या या मराठी काव्य प्रांतांमध्ये आपले योगदान देणारी व उपेक्षितांच्या वेदनेचा हुंकार ठरणारी मानवी जगण्याचे आशावादी सूर मांडणारी कविता म्हणून मराठवाड्यातील उदयन्मुख कवीमध्ये कवी मारोती कसाब यांच्या कवितेचा उल्लेख करावा लागतो. त्यांचा पहिला कवितासंग्रह 'पोरगं शेकत बसलं' इ.स. २००५ साली मुक्तरंग प्रकाशनाने प्रकाशित केला व मराठी कवितेच्या प्रांगणात त्यांचा प्रवेश झाला. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कवितेची प्रमुख प्रेरणा आहे.
आपल्या कवितेविषयी ते म्हणतात की, "कविता ही माझी जीवनसंगिनी, श्वास आणि ध्यास आहे. कळत्या वयापासून तिची मला सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती मला भेटली. परिस्थितीच्या रेट्याने जेव्हा जेव्हा कोलमडलो तेव्हा तिनेच मला आवरले, सावरले हे तिचे थोर उपकार घेऊनच मी जगत आलो.'' त्यांचा तब्बल पंधरा वर्षांनी दुसरा कवितासंग्रह 'रात्रंदिन असे' २०२१ मध्ये गणगोत प्रकाशनने प्रकाशित केला. कोंडलेले श्वास, सततचा दुष्काळ, समाज जीवनातील विसंवाद, बेकारी, राजकारणातील अनैतिकता, देवाच्या दरबारातील शोषण, असत्याचा पराजय आणि सत्याचा विजय, दुःख वेदना, नकार आणि विद्रोह ही त्यांच्या कवितेची बलस्थाने आहेत. प्रस्थापित व्यवस्थेला नकार देणारी त्यांची कविता स्वप्नाळू नसून कठोर वास्तवाला संयतपणे सामोरे जाणारी आहे. ती आत्मशोध घेत आशावादी जीवनाची सजग वाटचाल करणारी आहे. त्यांची कविता २००० नंतरच्या भविष्याची उज्ज्वल स्वप्ने रंगविणाऱ्या कविता आहे. त्यांच्या कवितेचा वेग कमी असला तरी सजगपणे आणि सहजपणे परिवर्तनाच्या दिशेने झेपावणारी त्यांची कविता आहे. मानवी जीवनाचे व्यामिश्र दर्शन ती घडवताना दिसते. संत तुकारामाच्या कवितेशी नाळ जोडणारी त्यांची कविता आहे. समकालीन प्रश्‍नांकडे त्यांची कविता गंभीरपणे पाहत, वर्तमानाचा वेध घेत, इतिहासाचे दाखले देत भविष्यातील संभाव्य धोके ती सांगते. महामानवाच्या विचारांवर उभी असलेली ही कविता परिवर्तनाची दिशा सूचित करते. नवा समताधिष्ठित शोषण विरहित समाज रचनेसाठीकवी आणि कवितेचा आग्रह कायम राहिलेला आहे. कवी हा त्या त्या काळाचा साक्षीदार असतो. जे अनुभवाला आले. प्रखर अनुभव विश्व काव्य विश्व बनते. त्यांच्या कवितेविषयी डॉ. राजकुमार मस्के म्हणतात, "कवी कसाब यांच्या कवितेला कलात्मक सौंदर्य प्राप्त झालेले आहे. कविता चैतन्यशाली व्यक्तिमत्त्वानं 'पोरगं शेकत बसलं' मधील कविता भावगर्भ झालेली आहे. या कवितेला स्वतःची एक लय, स्वतःचाच एक सुंदर आकार आहे." 
विशेष म्हणजे त्यांनी हा कविता संग्रह 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या ध्येयाने प्रेरित उदगीरच्या सीमा भागात ज्ञानगंगा पोहोचविणाऱ्या कै. बापूसाहेब एकंबेकर पाटील कै. पी. जी. पाटील, ॲड. सी. पी. पाटील, मा. अशोकराव पाटील यांच्या कार्याला व किसान शिक्षण प्रसारक मंडळास अर्पण केलेला आहे.
कवी मारुती कसाब् यांचा जन्मच प्रतिकूल परिस्थितीत म्हणजेच दुष्काळामध्ये झालेला होता. गाणे गाण्याचा व कविता करण्याचा वारसा कवी कसाब यांना त्यांच्या आईकडून लहानपणीच मिळाला. चौथीला असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गीत गाणं हा छंद कवीला लागला होता. त्यामुळे ते सर्वांचे आवडते होते. शाळेमध्ये सुद्धा ते सर्व गुरुजींचे आवडते होते. चौथी नंतर ते मामाच्या गावाला शिकायला गेले. त्याच्या मामाकडे गावची गावकी होती. फडे, टोपले गावात विकायचे. सगळ्या देवापुढ शहाडा वाजवायचा. रात्री प्रत्येक घरासमोर जाऊन भाकरी मागायचे. शेतात खळ बलुतं मागायचं. त्यावेळस लोक मात्र गाणं त्यांना म्हणायला लावायचे. सेलूच्या नूतन महाविद्यालयात नंतर अकरावीला प्रवेश त्यांनी घेतला. डॉ.गोपले यांच्या चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला. उफडे फोडणे, पोतराजांची केस कापणे असं सगळी मांगकी सोडण्याचे कार्यक्रम गावोगावी सुरू होते. त्यावेळी गावोगाव अत्याचारही मांगावर सुरू झाले होते. या सर्वांचा प्रभाव कवी वर पडला. लहुजी, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रभावित होऊन कवी चळवळीत सामील होऊ लागले. मोर्चात गाणी म्हणायला घोषणा द्यायला लागले. पुढे लालबावटा, छात्रभारतीचे कामही त्यांनी केले. अशाप्रकारे शिक्षण आणि चळवळ एकाच वेळी त्यांची सुरू होती. चळवळीत काम करत असताना फुले-शाहू-आंबेडकर, कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, इंद्रजीत भालेराव, संतांचे साहित्य त्यांनी वाचलं.
कवी मारुती कसाब यांची पहिली कविता दै. मराठवाड्याच्या चिगूर या पुरवणीत १९९३ साली प्रकाशित झाली. औरंगाबादला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असताना डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. एस. एस. भोसले, डॉ. शरद व्यवहारे, डॉ. सुदाम जाधव, प्रा. अरविंद कुरुंदकर यांच्या सानिध्यात कविता बहरली. 
उच्च शिक्षण झाल्यानंतरही कवीची भटकंती थांबली नाही. मानवत, परभणी, माहूर गेवराई, बीड येथे नोकरीच्या निमित्ताने ते राहिले. त्यामुळे विविध रंगाची ढंगाची माणसं वाचता आली. त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांची कविता खऱ्या अर्थाने जगवली. 
कवी नारायण सुर्वे यांच्या शब्दांमध्ये 
काही पाहिलेले काही साहिलेले आहे 
जसा शब्दात आहे तसा जगात आहे. 
माझ्या जगण्याची गंधवेणा त्यात आहे
मी कामगार आहे, तळपती तलवार आहे सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे."
अशीच नाळ कवी मारुती कसाब यांच्या कवितेची मला दिसते.
पोरगं शेकत बसले या कवितासंग्रहातील कविता त्यांच्या अनुभूती आहेत. त्यांच्या जीवन कथा आहेत. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही अशा तमाम उच्चशिक्षित तरुणाची खंत व्यक्त करणारी त्यांची कविता आहे. .शिकून-सवरूननही स्वप्न पूर्ण होत नाहीत त्यांची खंत कवीला वाटते 
ल्योक शिकून 
सायब व्हईन 
आम्हाला न्हाई
निदान त्याची त्याला 
पोटाला पोटभर खाईन
ही माफक अपेक्षाही पूर्ण होत नाही म्हणून 
आता 
पोरगं शेकत बसलय  
समद्या डिगर्या पेटवून  
निदान
 तेवढीच उब 
माय-बापाच्या थरथरत्या देहाला !
त्यांची कविता साज-शृंगार लेणारी नसून वेदनेचा अंगार लेणारी आहे. प्रयत्न करूनही अडचणीत सापडलेला एक तरुण त्यांच्या कवितेतून सातत्याने दिसतो. त्यांची कविता विश्वात्मकता धारण करते. कारण ती त्यांची कविता केवळ त्यांची राहत नसून सकल अशा अडचण ग्रस्त तरुणांची ती होते. हेच त्यांच्या कवितेचे यश आहे 
केवळ कारकून बनविणाऱ्या शिक्षण पद्धतीवरही कडाडून त्यांची कविता हल्ला करते. कवितेच्या प्रस्तावनेतच सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब म्हणतात की "कवी मारोती कसाब यांची कविता नाचत मुरडत नखरे करीत येत नाही. तिला शृंगार नखरे माहित नाहीत. ती नाटकी नाही ती सरळ सूट आणि बेधडक आहे." संत साहित्याने ही कवी व कवितेची कविता प्रभावित झालेली दिसते.
गुणवत्तेचे पार 
निघाले दिवाळी 
सत्तेचे सोहळे 
चाललेले…
-----------
पंढरपुरात 
बडव्यांचा मौजा 
त्यांच्याच फौजा
विठू भोवती
-------------
राजकारणाने 
धूर्त मोठे झाले 
प्रज्ञावंत राहिले 
झोपडीत…
अशी कितीतरी उदाहरणे कवी देतो. अनुभवास आलेली परिस्थिती, अन्याय, शोषण, अत्याचार 
यामुळे कवीचे मन बेचैन व हतबल झालेले आहे त्यास आलेली अस्वस्थता त्याला स्वस्थ बसू देत नाही व तो लिहिता होतो त्यांच्या सर्वच कविता सामाजिक जाणिवेचे आहेत स्वतः बद्दल बोलताना सामाजिक संदर्भ कवी घेतो. दुष्काळाची होरपळ त्यांची कविता मांडते. आपल्या आई बापाचे कष्ट, आईचे हाल अत्यंत मार्मिक शब्दात व्यक्त करणारी त्यांची कविता आहे. सत्यदर्शन त्यांची कविता घडवते.
जिथे तिथे दिसे
 खोटयांचा बाजार
 खऱ्याची माय 
कोण्या गावा गेली?
अशी सुरुवात करून   
देवळात जत्रा भरली पाप्यांची 
पुण्यवंत दारी…. पेंगुळले
असा प्रवास करीत शेवटी कवी 
सत्य हाच धर्म सांगतो
सत्य एक धर्म 
सत्य एक वर्म
 सत्याचेच मर्म
 सांगतो मी…
लोकसंस्कृतीचा स्पर्श त्यांच्या कवितेला आहे. तो वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेला आहे.ज्या महामानवांनी दलितांच्या आयुष्याला नवी दिशा दिली त्या महामानवांच्या कार्याचा आणि नावाचाही उल्लेख त्यांची कविता करते. ती त्यांची श्रद्धास्थाने आहेत.
लहू-फुले-शाहू
आंबेडकर-आण्णाभाऊ
विचार तयाचे घेऊन 
समतेच्या गावा जाऊ!
महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारी कसाब यांची कविता आहे. ७२चा दुष्काळ, वाढण, पोरगं शेकत बसलय या कविता अस्वस्थ करणाऱ्या आहेत. सात जन्माचे दारिद्र्य आणि भुकीची व्यथा प्रकट करताना कवीच्या अभिव्यक्तीला कधी त्वेषाची धार चढून जाते ते आपल्यालाही कळत नाही.
कवी म्हणतो 
तेव्हा दोस्त हो,
उसळत्या लेखणी बरोबर
आता गंजलेली 
ढोर फाडण्याची जुनी हत्यारही 
पाजळून ठेवायला 
विसरू नका !
अशाप्रकारे संत तुकारामाच्या कवितेप्रमाणे विद्रोहही कसाब यांच्या कवितेमध्ये दिसतो.
कवितेच्या निर्मितीबाबत ते म्हणतात, 
कविता जगवते 
कविता जागवते 
माणसाला माणुसकीपर्यंत 
पोहोचविते कविता!!
'आयुष्याचा चिंतन, कवितेमधून इतकी कुणाची किव करण्याचा व संवेदनशील राहण्याचा जमाना नाही यावर वास्तव चिंतन प्रगट केले आहे.
खरे बोलणारे तोंड शिवून घ्यावे अन्याय-अत्याचार उघड्या डोळ्याने 
पहावे 
आलाच दारावर भिकारी
 तर पुढच्या घरी जाण्याचा 
खुशाल सल्ला द्यावा अन् 
टीव्हीवरील छ्बी पहात 
आपण सुखाचा घास घ्यावा!
या देशात दगडात देव दिसतो पण माणसात देव दिसत नाही माणसाला अजूनही स्वीकारल्या जात नाही या सर्व बाबींची चीड कवीच्या मनामध्ये आहे. कवी म्हणतो, 
आम्ही त्यांचे पाय धरावेत 
आणि त्यांनी सणसणीत लाथ द्यावी 
ढुंगणावर. 
 हीच उफराटी संस्कृती 
नांदे इथे माझ्या बापा…
   कसं सांगू तुला मनुने मारून ठेवलेली मेख ढिली होत नाही अजूनही 
समतेच्या पाण्यानं 
माझ्या बापा !!!
कवी कसाब यांची प्रत्येक कविता जगण्याचं तत्त्वज्ञान मानते. कवितेचे शीर्षकही आशयपूर्ण आहेत. वाचकांची जिज्ञासा जागृत करणारे आहेत. कविता वाचल्याबरोबर कोणालाही सहज समजावी असी सुलभता कवीने जाणीवपूर्वक वापरलेली दिसते. विविसाव्या शतकातील तीव्र सामाजिक जाणिवा व्यक्त करणारे मारुती कसा भी तत्वनिष्ठ शिक्षक उत्तम संशोधक आणि चळवळीचे जाणीव असणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा तब्बल पंधरा वर्षानंतर दुसरा कवितासंग्रह 'रातंदिन असे' हा प्रकाशित झाला. उपेक्षित समाजाच्या करुण वेदनेची कहाणी म्हणजे त्यांच्या कविता होत. तथगत बुद्ध, छत्रपती शिवराय, संत बसवेश्वर, चार्वाक, संत तुकाराम,संत नामदेव संत कबीर, लहु साळवे, अण्णाभाऊ साठे, मुक्ता साळवे यांचे समतेचे विचार त्यांची कविता व्यक्त करते. 'बुद्ध माझा' ही त्यांची कविता बुद्धाचे तत्त्वज्ञान विशद करणारी आहे.
मायेचे माहेर I प्रज्ञेचे सागर I
 करुणा सागर I बुद्ध माझा II
अष्टांग मार्ग हा I बुद्धाने दाविला I
जन्म उद्धरिला I मानवाचा II
तुकाराम एक तत्व आहे. तुकाराम एक विचार आहे. ज्याने ज्याने तो अंगीकारला तो धन्य झाला. हा विचार त्यांची कविता करते. 
तुका ध्यानी धरा I तुका मनी धरा I
रात्रंदिनी स्मरा I तुकाराम II
बुडणार नाही I पुन्हा कधी गाथा I
सावध सर्वथा I होऊया रे II
माय बाई, आदिमाया, कामवाल्या बाया, कुठे जात असलेल्या मुली, प्रिय मुक्ता,स्तनयोनी आदी कविता स्त्री जाणिवेच्या आणि तिच्या त्यागाच्या निदर्शक आहेत. 'तू दुधावरची साय' कवितेतून आई विषयीचा कृतज्ञताभाव ते व्यक्त करतात. जाती संपुष्टात याव्यात आणि सर्वत्र मानवता नांदावी असा आशावाद कवी पेरताना दिसतो.
जाती धर्मापेक्षा I माणूसच मोठा शोई
भेदभाव खोटा I सजिवांत II
नदीच्या जाण्याने सारे गेले ही भावना रसिक वाचकाचे मन गलबलून टाकणारी आहे. गांधी मरत नाहीत तसेच अण्णा तुम्ही वाहत आहे आमच्या नसानसातून ही हमी कवी कसाब 'हमी' कवितेतून देतात. चला चाल करुया, फकिरा पुन्हा येणार आहे! नव्या समताधिष्ठित, शोषण विरहित समाज रचनेस साहाय्यभूत ठरणाऱ्या आहेत.
संदर्भ ग्रंथ
1.'पोरगं शेकत बसलं' - मारोती कसाब
2.'रात्रंदिन असे' - मारोती कसाब


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लेखन कौशल्य

Monday 4 December 2017 भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता हो...