शनिवार, ४ नोव्हेंबर, २०२३

मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!    भारत देशास स्वराज्य मिळाले परंतु सुराज्य निर्माण करण्यास अजूनही आपण असमर्थ ठरतांना दिसतो. खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य आपण निर्माण करु शकलो नाहीत. सद्यकालीन देशातील निवडणुका, होत असलेले राजकारण, लोकप्रतिनिधींचा बेजबाबदारपणा, पैशातून सत्ताकारण व सत्तेतून पैसा कमविणे, मतदार राजाचीही या व्यवस्थेला पोषक असे अनुकरण हया बाबी जगातील सर्वात मोठी मानल्या जाणाऱ्या भारतील लोकशाही समोरील आव्हाने ठरतांना दिसतात. सदरिल परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या साहित्यातून लोकशाहीबाबतचे मांडलेले विचार आजही तेवढेच प्रासंगिक वाटतात. महात्मा गांधी म्हणायचे, ‘आमचे प्रतिनिधी जर लोकशाहीचे खरे पुरस्कर्ते असतील तर ते शुध्द मनाने जनतेचा आवाज समजावून घेवून सर्वांचे खरेखुरे हित करण्याचा प्रयत्न करतील आणि कोणताही अन्याय सहन न करता त्या विरुध्द संघटित आवाज उठविण्याची शक्ती त्यावेळी आमच्यात येईल. त्याचवेळी लोकशाही युग सुरु होईल." आजही आमच्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याची क्षमता सामान्य नागरिकात झालेली दिसत नाही. हे लोकशाहीचे अपयशच आहे. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना मिळालेल्या मतदानाच्या हक्काबाबत विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत कित्येक वर्षापूर्वी मांडलेले आहेत. आधुनिक काळात सर्वसामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्व बिंबवणारा, अस्पृष्यता गाडून टाका असे सांगणारा ग्राम व वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणारा सर्व धर्माकडे समानतेने पाहणारा लोकशाही मूल्यांच्या रूजवणुकीसाठी आपल्या भजन, किर्तनाच्या व साहित्याच्या माध्यमातून उज्वल भारताचे स्वप्न पाहणारे संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होय. महाराज ग्रामगीतेत मतदानाच्या संदर्भात लिहितात की, मतदान कुणाला करणार? “ऐसे ना करावे वर्तन असतील जे इमानदार सेवकजन तेचि द्यावे निवडोन । एकमते सर्वानी।। (ग्रामगीता अ. 10 ओवी 90) आदर्श लोकशाहीच्या दृष्टीने महाराजांचे विचार अत्यंत महत्वाचे आहेत. लोकशाहीच्या पोवाडयात ते लिहितात की, “व्हा सावधान लोकहो! उभारूनि बाहो, देशाचे भवितव्य ठरणार | पुढारी दारोदारी फिरणार तुम्ही मतदान कुणा करणार? होऽऽजी”

      मतदानाचा हक्क आपल्याला संविधानाने दिलेला आहे. समाजात वेगवेगळ्या निवडणुकीत काय घडामोडी घडतात, हे आपण पाहत असतो. प्रशासन पारदर्शी आचारसंहितेचे तंतोतंत पालन करत निवडणुका घेण्याचा प्रयत्न करीत असते. भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानेच आचारसंहिता पाळली व जात, पैसा, बळ, धाक यास आपण बळी पडलो नाही तर योग्य उमेदवार निवडून देऊन या लोकशाहीच्या उभारणीत आपले योगदान ठरेल हे मात्र नक्की.

भगतसिंग, सुखदेव आदींनी आपले जीवन या देशाच्या कामी लावले म्हणून महाराज भजनातून तरूणांना सावध करतात. ज्या भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितले की, "सेवा करन को दास की, तो पर्वा नहीं है जान की" हे सांगताना अर्जुना या कौरवांना सोडू नको असे तरुणांनो या भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका असा सुचक उपदेश आपणांस मिळतो. या देशाच्या अशा नराधमांनी देशास कंगाल बनविले. देशास विविध समस्यांनी ग्रासले. देशास स्वराज्य मिळाले आता सुराज्य होण्यासाठी आपण आपले योग्य मत देऊन देश कार्य करूया स्वराज्याला सुराज्यात परावर्तीत करण्यासाठी लोकशाहीला सफल, यशस्वी बनविण्यासाठी खेडयातील जनतेला तिच्या हक्काची, कर्तव्याची जाणीव लोकभाषेतून करून देण्याचे कार्य प्रत्येक जाणत्या व्यक्तीने आज केले पाहिजे तरच राष्ट्राचे भवितव्य उज्वल होणार आहे. लोकांकडून अशी अपेक्षा महाराजांनी दि.१५ ऑगस्ट १९५३ ला लेखातून व्यक्त केली होती परंतु आजही त्यांची अपेक्षा आपण पूर्ण करू शकलेलो नाही आपण जात, धर्म, पंथ, लिंग, वंश व पक्ष या पलीकडे गेलो नाहीत. महाराज म्हणतात, "मित्रांनों, जनतेला मिळालेले स्वराज्य ही खऱ्या सुराज्य मंदिराची केवळ किल्ली आहे. जनतेला स्वराज्य मिळालेले आहे. आपल्या न्याय इच्छा प्रकट करण्याचे आपला उचित आवाज उठविण्याचे व आपल्या योग्य कार्यकर्त्यांना निवडून पुढे आणावयाचे! हे स्वातंत्र्यच उद्याच्या स्वर्गसमसंसाराचा पाया आहे. याचा उपयोग करून घेतल्यास साऱ्या राष्ट्रात सुखशांतीचे व प्रगतीचे उच्च वातावरण निर्माण होणार आहे. रामराज्याची संकल्पना सामुदायिक इच्छाशक्ती म्हणजेच सरकार अशी भावना दृढविश्वास महाराजांचा होता. नितीमान, त्यागी, मानवधर्मी, उज्वल, चारित्रवान निर्भिड अशा जनसेवकांना पुढे आणणे, त्यांच्या हाती सत्ता देणे यातूनच देश विकसित होईल. तिच खऱ्या अर्थाने लोकशाही असेल अशी भावना महाराजांची होती परंतु आज सर्वात मोठी लोकशाही म्हटल्या जाणाऱ्या देशात मात्र नितीमान, चारित्रवान, त्यागी राज्यकर्ते शोधण्याचा प्रयत्न केल्यास निराशाच हाती लागते.

      लोकशाहीची व्याख्या महाराजांनी अतिशय अर्थपूर्ण केली. तिच म्हणावी लोकशाही जिथे कुणी कामचुकार नाही देशातील प्रत्येक घटकाची काही एक जबाबदारी आहे. प्रत्येकाचे समाज, देश विकासासाठी योगदान आवश्यक आहे. सहकार, सामुदायिकतेतून ते साकार होणार आहे असे मुलगामी विचार महाराजांनी मांडलेले आहेत. लोकशाहीच्या व्याख्येतून नागरिकांची कर्तव्ये स्पष्ट होतात. आपल्या देशाचा उध्दार करावयाचा असेल तर जात-धर्माच्या प्रचारकांनी एकत्र यावे असे ते म्हणतात. पुढे ते म्हणतात, “मतदान नव्हे करमणुक

निवडणुक नव्हे बाजार चुणूक निवडणूक ही संधि अचूक भवितव्याची' (ग्रामगीता अ. 10 ओवी 98 ) राष्ट्रसंत मतदारांना इशाराच आपल्या ग्रामगीतेतून देतात, "ऐसा नकोच पुढारी ज्याने नाही केली कर्तबगारी ते मित्र नव्हे वैरी समजतो आम्ही' जनतेची सेवा कामे करणारा उमेदवारच आपण एकमताने निवडून द्यावा असे ते सांगतात.आपल्याकडून जर सत्पात्र उमेदवार निवडला नाही तर ते म्हणतात, 'दूर्जन होतील शिरजोर आपल्या मताचा मिळता आधार सर्व गावांशी करतील जर्जर, न कळता सत्पात्री मतदान' म्हणून प्रत्येक मतदाराने विचार करावा व गुंड, भ्रष्टाचारी उमेदवार निवडून देऊ नये. स्वार्थासाठी सेवेचे सोंगे करू नका, प्रलोभने देवून मते घेवू नका, उमेदवारानीही आपले मत विकू नये असे प्रासं व महत्वाचे विचार महाराजांचे साहित्य देते. मत हे दुधारी तलवार आहे. मतदार व पुढायाने महाराजांचे प्रस्तुत विचार काटेकोरपणे आचरणात आणले तर महाराजांच्या स्वप्नातील भू-वैकुंठ भारतास बनण्यास वेळ लागणार नाही.

मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस नाही. मौज मजा करण्याचाही दिवस नाही. तो आहे कर्तव्याचा दिवस. आपले नेतृत्व निवडून देण्याचा दिवस. मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. ज्या दिवशी या देशांमध्ये शंभर टक्के मतदान होईल तोच खरा यशस्वी लोकशाहीचा सुवर्ण दिवस असेल.

चला तर मग आपले राष्ट्रीय 

कर्तव्य बजाऊ व इतरांनाही प्रवृत्त करू!

प्रा. डॉ. प्रल्हाद दत्तराव भोपे,

मराठी विभागप्रमुख,

श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी

pralhadbhope@gmail.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...