रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली
27 फेब्रुवारी हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण सारे "मराठी भाषा' दिन म्हणून साजरा करतो. मराठीला दुसरे ज्ञानपीठ मिळवून देणारे कुसुमाग्रज हे महान कवी या मातीत जन्मले हेही आपले भाग्यच होय. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हटलं की, "उठा, उठा चिऊताई'पासून "ओळखलंत का सर मला'पर्यंतच्या पाठ्यपुस्तकातील कविता आठवतात, तशाच पृथ्वीचे प्रेमगीत, स्वप्नांची समाप्ती, अहिनकुल, गर्जा जयजयकार अशा त्यांच्या अजरामर कविता आठवतात, पण मराठी भाषादिनाच्या निमित्ताने विचार करू लागलो की, "पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडोनी वाट वाकडी धरू नका, ' हा त्यांचा फटका आठवतो. मराठी भाषेची झालेली दैन्यावस्था कुसुमाग्रजांनी या फटक्यातून मांडली. शासनाने त्या कवितेची पोस्टर बनविली. शिधावाटप पत्रिकेवर त्यातल्या काही ओळी छापल्या आणि कर्तव्यपूर्तीचा श्वास घेतला. पण मराठीचे दशावतार संपले नाहीत. संपण्याची चिन्हे नाहीत. मराठी कवींनी मराठी भाषेबद्दल वेळोवेळी रचना केल्या आहेत. त्यातून मराठीचा अभिमान तर व्यक्त होतोच, पण काळजीही व्यक्त होते. मराठीचा आवाज सतत वाजता ठेवण्याचं काम मराठी कवींनी सातत्याने 700-800 वर्षे केले आहे. आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपण या आवाजाचा वेध घेऊ या.
मराठीची काव्य परंपरा साधारणतः ज्ञानेश्वरांपासून मानली जाते. मराठी कवितेचा भक्कम पाया ज्ञानेश्वरांनी रचला. त्या भक्कम पायावर आज मराठीची परंपरा उभी आहे. संत ज्ञानेश्वर मराठीची थोरवी सांगताना लिहितात-
जैसी दीपांमाझि दिवटी। का तिथी माझि पूर्णिमा गोमटी।
तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी। सर्वोत्तम।।
तीर्थांमध्ये काशी। व्रतांमध्ये एकादशी। भाषांमध्ये तैशी।
मऱ्हाटी शोभिवंत।।
ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील ओळी तर सर्वश्रुतच आहेत-
माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातेंही पैजां जिंके।
ऐसी अक्षरें रसिकें। मेळवीन।।
संत ज्ञानेश्वरांच्या नंतर होऊन गेलेल्या संत एकनाथांच्या काळात संस्कृत भाषेचा वृथा अभिमान धरून पंडित प्राकृत भाषेस कमी लेखत होते. त्यांना थेट सवाल करताना एकनाथ महाराज लिहितात-
संस्कृतवाणी देवें केली। तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली?
मराठी भाषेचा अभिमान असा थेट व्यक्त करून एकनाथ महाराजांनी मराठीत विपुल रचना केली. प्रौढ मराठीत तरी केलीच, पण लोकभाषेत भारूडे रचून मराठीला एक नावाच डौल प्राप्त करून दिला.
आज मराठीची प्रामुख्याने इंग्रजीशी तुलना होते. अशी तुलना करताना तुमच्या इंग्रजीत काका आणि मामाला एकच शब्द अंकल आणि काकी आणि मावशीलाही एकच आण्टी शब्द अशी टीका केली जाते. इंग्रजीची शब्दसंपत्ती अमाप आहे. तरी तिच्यातील नेमकी वैगुण्ये हेरून मराठी अभिमानी तिला कमी लेखून आपला अभिमान व्यक्त करतो. संस्कृताचा जोर होता तेव्हा दासोपंतांनी संस्कृताचे असेच वैगुण्य नेमके ओळखून मराठीचा आपला अभिमान व्यक्त केला आहे. तुमच्या संस्कृतात नुसता "घट'. पण आमच्या मराठीत त्याच्या नाना रूपांना नाना शब्द आहेत, हे सांगताना दासोपंत लिहितात-
संस्कृतें घट म्हणती। आतां तयाचे भेद किती
कवणा घटाची प्राप्ति। पावावी तेणें?
हारा, डेरा, रांजणु। मुठा, पडगा, आनु।
सुगडतौली, सुजाणु। कैसी बोलैल?
घडी, घागडी, घडौली। अलंदे वांचिकें वौळीं।
चिटकी, मोरवा, पातली। सांजवणें तें।।
ऐंसे प्रतिभाषे वेगळाले। घट असती नामाथिले।
एकें संस्कृतें सर्व कळे। ऐसें कैसेन?
आज मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. ती राजभाषा नव्हती तेव्हा कवी माधव ज्युलियन यांनी लिहिलेली "आमुची मायबोली' ही कविता आजही सर्वांच्या ओठावर आहे. ज्युलियन लिहितात-
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं,
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं,
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू वसे आमुच्या मात्र हृन्मदिरी
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवू वैभवाच्या शिरी।।
मराठी भाषेचा अभिमान ओवी, अभंग, लावणी, पोवाडा अशा विविध रचनांतून व्यक्त झालेला आपण अनेकदा पाहतो पण रावसाहेब र.लु.जोशी यांनी मराठीची भूपाळी लिहिली आहे. ते लिहितात-
प्रभातकाळी तुझी लागली ओढ मायबोली
भवती गुंजे तव गुण गाणी मंगळ भूपाळी
संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा अमृताशी पैजा जिंकते असे म्हटले आहे, हाच धाग धरून अमृताशी मराठीची तुलना करता करता सोपानदेव चौधरी म्हणतात-
अमृतास काय उणे?
सांगतसे मी कौतुकें
माझी मराठी बोलकी
परी अमृत हे मुके!
अमृत आणि मराठी इतर सर्व बाबीत समान, पण अमृताला बोलता येत नाही म्हणू ते थोडे कमीच, असे सोपानदेव म्हणतात. याचबाबत डॉ.ना.गो. नांदापूरकर आपल्या "माझी मराठी' कवितेत लिहितात-
माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे
गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्ग लोकाकडे
मराठी भाषेपुढे अमृताची गोडी फिकी पडल्याने अमृत थेट स्वर्गात पळून गेले अशी अद्वितीय कल्पना नांदापूरकर यांनी केली आहे.
मराठी गझलभास्कर सुरेश भट यांनी मराठीबाबत आपल्या मायबोली रचनेत म्हटले आहे-
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहला खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठी भाषेची उपेक्षा आधी संस्कृतकडून आणि आता इंग्रजीकडून होत आहे. ही उपेक्षा मराठीच्या पुत्रांना सदैव सलत आली आहे. म्हणूनच मराठीच्या जन्मापासून मराठी कवींनी मराठीच्या बाजूने सदैव रणशिंग फुंकले आहे. जन्मापासूनच ही भाषा लढते आहे. तिचा लढा अखंड चालू आहे. आजही तो संपलेला नाही. पण ज्या अर्थी ती लढली पण मेली नाही त्या अर्थी ती इथून पुढेही अशीच लढून आपले अस्तित्व नक्की टिकवील. मराठी भाषादिनानिमित्त आपण तिच्या या लढाईला थोडे अधिक बळ देऊ या!
ज्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आपण मराठी भाषा दिन साजरा करतो त्या कुसुमाग्रजांनीच बजावून ठेवले आहे-
भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे
गुलाम भाषिक होऊन अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका।।
प्रा. नारायण गोविंद नांदापूरकर (जन्म : १४ सप्टेंबर १९०१; मृत्यू : ?) हे एक मराठी कवी आणि , पंतकवींच्या काव्याचे व लोकसाहित्याचे अभयासक होते. मोरोपंत आणि मुक्तेश्वरयांच्या महाभारतावरील काव्यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी 'मयूर-मुक्तांची भारते' हा ग्रंथ लिहिला. नांदापूरकर हे उस्मानिया विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक होते.
ना.गो.नांदापूरकर यांची 'माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे' ही कविता प्रसिद्ध आहे.

नारायण नांदापूरकर यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

  • फुलारी (अनुवादित, मूळ Gardener, लेखक - रवींद्रनाथ टागोर)
  • मयूर-मुक्तांची भारते (मोरोपंत आणि मुक्तेश्वर यांच्या महाभारतावरील काव्यांचा परामर्श)
  • मायबोलीची कहाणी (मराठी बोलीभाषांचा इतिहास) (पहिली आवृत्ती
  • स्त्री-गीतसंग्रह भाग १ ते ३ (संपादित)
  • हसू आणि आसू (अनुवादित, मूळ Tears and Laughters, लेखक - खलील जिब्रान)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शरद baviskar- भुरा

भूरा