गुरुवार, ७ मार्च, २०१९

स्त्रीवाद- चर्चा - प्रवीण बांदेकर- मटा

       महाराष्ट्रातील स्त्री प्रश्नांसह विविध सामाजिक प्रश्नांसाठी आणि स्त्रीला आत्मसन्मान प्राप्त करून देण्यासाठी आपले अवघे आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या आजवरच्या कार्याविषयीची कृतज्ञता ‘निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’च्या विश्वस्त गीताली वि. म. आणि विद्याताईंच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या सहकाऱ्यांनी एका अभिनव पद्धतीने व्यक्त केली आहे. विद्याताई संपादित करीत असलेल्या ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. हे निमित्त साधून विद्याताई आयुष्यभर ज्या स्त्रीवादी विचारांची गांभीर्याने मांडणी करीत आहेत, त्याच विचारविश्वाची सांगोपांग चर्चा करणारा ‘संदर्भासहित स्त्रीवाद : स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. सुमारे ५८० पृष्ठांच्या या बृहद् ग्रंथात जवळपास बावन्न अभ्यासकांनी लिहिलेले स्त्रीवादाशी निगडित विविध विषयांची मांडणी करणारे लेख समाविष्ट करण्यात आलेत.

आपल्याकडे आधुनिक दृष्टीने स्त्रीकडे पाहण्याची सुरुवात पाश्चात्य स्त्रीवादी विचारांमुळेच झाली असे दिसते. स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही तर व्यवस्थेकडून तिला स्त्री बनवले जाते, असे प्रतिपादन करणाऱ्या स्त्रीवादी विचारवंत सिमॉन द बोवा यांच्या स्त्रीच्या विचार व भावविश्वाची पूर्णतः स्वतंत्र व आधुनिक दृष्टीने मांडणी करू पाहणाऱ्या काही संकल्पनांमुळे पाश्चात्य जगतातील स्त्रीला स्वतःकडे नव्याने पाहायला प्रवृत्त केलेले जाणवते. १९७५ मध्ये युनोने जाहीर केलेले आंतरराष्ट्रीय महिला वर्ष व नंतरची स्त्रीदशकाची घोषणा यांमुळे स्त्रीवाद या संकल्पनेची जगभरात चर्चा होऊ लागली. भारतीय संस्कृती आणि समाजव्यवस्थेच्या संदर्भात विचार करताना मात्र आपल्याकडे अशा काही स्त्रीवादी दृष्टिकोनातून स्त्रीच्या अस्तित्त्वाचा, तिच्या प्रश्नांचा विचार करता येऊ शकतो, याची विशेष जाणीव असल्याचे दिसत नाही. अगदी महाराष्ट्राच्याच बाबतीत पाहू गेले तरी, ताराबाई शिंदे यांच्यासारख्या सामाजिक प्रश्नांकडे गंभीरपणे पाहणाऱ्या एखाद्या स्त्रीने लिहिलेल्या स्त्रीपुरुष तुलना यांसारख्या दीर्घ निबंधाचा वा पंडिता रमाबाईंसारख्या विदूषीने लिहिलेल्या स्त्रीधर्मनीतीचा अपवाद वगळता ग्रंथरूपातही स्त्रीवादी जीवनदृष्टी मांडण्याचा प्रयत्न कुणी केल्याचे आढळत नाही. मात्र स्त्री-प्रश्नांचे, स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे वा स्त्रीपुरुष समानतेचे वगैरे कसलेही प्रागतिक भान आपल्याकडे आढळत नाही, असे म्हणता येत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच लोकहितवादी, म. जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे, र. धों. कर्वे अशा कृतिप्रवण विचारवंतांनी स्त्रीप्रश्नांकडे आधुनिक विचारांनी पाहण्याची भूमिका आग्रहाने लावून धरलेली दिसून येईल. रुढीपरंपरांच्या जोखडातून स्त्रीला मुक्त करणे, स्त्रीसुधारणांसाठी शिक्षण व कौटुंबिक हक्कांचा आग्रह धरणे, नोकरी व राजकारणात स्त्रीचा सहभाग वाढवणे, स्त्री-पुरुषांमध्ये प्रगल्भ साहचर्य असणे अशा स्वरूपाची मागणी व मांडणी पुढील काही दशकांत स्त्रीसंदर्भातील विचारांमध्ये केंद्रवर्ती राहिली. या अनुषंगाने ‘संदर्भासहित स्त्रीवाद : स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व’ या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये वंदना भागवत यांनी भारतीय परिप्रेक्ष्यातून आपल्याकडे रुजलेल्या स्त्रीवादाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. यशवंत सुमंत, गोपाळ गुरू, विद्युत भागवत, राजा दीक्षित, जास्वंदी वांबुरकर यांनीही त्यांच्या लेखांतून आवश्यकतेनुसार कमीअधिक प्रमाणात हा धांडोळा घेतला आहे. विशेषतः आधुनिक भारताच्या राजकीय तत्त्वचिंतनातील स्त्रीप्रश्नाची जाण हा यशवंत सुमंत यांचा दीर्घ लेख या संदर्भात महत्त्वाचा आहे. इंग्रजांच्या राजवटीत भारतात सुरू झालेली वासाहतिक आधुनिकीकरणाची प्रक्रिया, पश्चिमी संस्कृतीशी वाढत गेलेला संवाद, तत्कालीन स्त्रीप्रश्नांच्या संदर्भात सुधारणावादाचे चर्चाविश्व, १९व्या शतकातील धर्म आणि समाजसुधारणा चळवळींचा स्त्रीप्रश्नांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर झालेला परिणाम, फुले-आगरकरांसारख्या विचारवंतांचा समाजमानसावरील प्रभाव, स्त्रीसंघटनांचा उदय, स्त्रीहक्कांच्या चळवळी, अशा विस्तृत मुद्द्यांच्या अनुषंगाने डॉ. सुमंत यांनी चर्चा केली आहे. 
साधारणतः विसाव्या शतकातील ७०-८०व्या दशकापासून आपल्याकडे स्त्रीप्रश्नांकडे पाहताना लिंग, वर्ग, जात, विविधांगी शोषण, सामाजिक व नैतिक बंधने या सगळ्याच्या अनुषंगाने विचार सुरू झालेला दिसतो. स्त्रीसमस्यांची चर्चा करणाऱ्या चळवळी, स्त्रीकेंद्री संस्था, साहित्य, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण व स्त्रीसुधारणाविषयक काही नवे कायदे इत्यादींमुळे आधुनिक स्त्रीलाही आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचे भान येऊ लागले होते. विद्या बाळ यांच्यासारख्या कार्यकर्त्या, स्त्री, मिळून साऱ्याजणी, बायजा, स्त्री उवाच यांसारखी स्त्रीप्रश्नांची चर्चा करणारी नियतकालिके आणि गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे, कविता महाजन, प्रज्ञा दया पवार, नीरजा यांच्यासारख्या लेखिका यांमुळे स्त्रीविश्व आणि एकूणच संस्कृती यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल होऊ लागलेले जाणवतात. स्त्रीकडे नव्या दृष्टीने पाहण्यासाठी प्रवृत्त करणारे हे सर्व कार्यकर्ते सिमॉन बोव्हा, बेटी फ्रिडन अशा पाश्चात्य स्त्रीवादी विचारवंत लेखिकांच्या सम्यक विचारांमुळे प्रभावित झालेले आहेत, हेही जाणवून येते. आधुनिक काळात विविध सामाजिक व राजकीय विचारधारांमध्येही स्त्रीवादी विचारांचा प्रभाव कसा दिसून येतो, याविषयी सविस्तर विवेचन करणारे लेखही या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘दलित स्त्रीवाद आणि स्त्रीवादी दलितत्व’ या लेखात प्रवीण चव्हाण यांनी भारतीय समाजव्यवस्थेचा अपरिहार्य भाग बनलेल्या जातिव्यवस्थेच्या संदर्भात स्त्रीवादाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. दलित स्त्रीवाद ही दलितत्वाची वर्ग जाणीव आणि स्त्रीवादी जाणीव यांच्या एकात्मीकरणातून निर्माण झालेली एकसंध अशा स्वरुपाची जाणीव आहे आणि लिंगभाव जडणघडणीच्या गाभ्याशी असणारी जातजाणीव ही दलित स्त्रीवादाच्या केंद्रस्थानी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. मात्र दलित स्त्रीवादाने जाहीरपणे सैद्धांतिक पातळीवर आणि व्यावहारिक पातळीवर स्त्रीवादी दलितपणाला नाकारले पाहिजे, तसेच पितृसत्ताक व ब्राह्मणी असंवेदनशीलतेबद्दल प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे, असेही त्यांना वाटते. छाया दातार यांनीही त्यांच्या लेखात स्त्रीमुक्ती चळवळीच्या विविध संकल्पनांचा ऊहापोह करीत मार्क्सवादी स्त्रीवाद, जहाल स्त्रीवाद, दलित स्त्रीवाद, उदारमतवादी स्त्रीवाद, पर्यावरणवादी स्त्रीवाद अशा अंगांची चर्चा केली आहे.

स्त्रीवादाचे यथामूल स्वरूप समजावून घेण्याच्या दृष्टीने या ग्रंथातील जवळ जवळ सर्वच लेख अत्यंत उपयुक्त असे आहेत. लैंगिकतेच्या वा लिंगभानाच्या दृष्टिकोनातून स्त्रीचळवळीतील लैंगिकतेच्या राजकारणाचे बहुसुरी कथन (अनघा तांबे), विज्ञान, लिंगभाव आणि शरीर (चयनिका शहा), स्त्रियांची समलैंगिकता आणि धर्म-पितृसत्तेचे राजकारण (आनंद पवार), लिंगभाव व मानसशास्त्र (साधना नातू) यांसारखे लेख महत्त्वाचे आहेत. तर जात, धर्म, परंपरा, नैतिक बंधने, हिंसा, शोषण, पुरुषी मानसिकता यासंदर्भात स्त्रीवादाची गरज अधोरेखित करणारे हिंसा-अहिंसाः एक तात्त्विक ऊहापोह (दीप्ती गंगावणे), हिंसा आणि स्त्रीजीवन (कल्पना कन्नबिरन), हिंदु धर्म आणि स्त्री (सदानंद मोरे), बहुजन स्त्रीची लैंगिकता आणि जात (संध्या नरे-पवार) हे लेख उल्लेखनीय आहेत. हिंदू धर्माप्रमाणेच जैन, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, शीख या धर्मातील स्त्रीप्रश्नांच्या अनुषंगानेही लिहिलेले चिकित्सक लेख यात समाविष्ट आहेत.

आधुनिक मराठी साहित्यामध्ये ऐंशी-नव्वदच्या दशकातील स्त्रियांच्या लेखनामध्ये स्त्रीवादी जाणिवा केंद्रस्थानी आलेल्या दिसतात. विविध सांस्कृतिक व वर्गीय स्तरातील स्त्रियांना आपले अनुभवविश्व लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करावसे वाटू लागण्यालाही सामाजिक संदर्भात एक प्रतीकात्मक अर्थ आहे. या लेखिकांच्या लेखनामागील प्रेरणा, त्यांतून व्यक्त होणाऱ्या जाणिवा, स्त्रियांचा आत्मशोध, अन्य सांस्कृतिक घटक व त्यांना उपलब्ध असलेले सामाजिक पर्यावरण यांचा, स्त्रियांच्या कथा (बंदना बोकील-कुलकर्णी), कविता (नीलिमा गुंडी), कादंबऱ्या (रेखा इनामदार-साने) व नाटकांच्या (मकरंद साठे) अनुषंगाने धांडोळा घेणारा स्वतंत्र विभाग या ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे. या अंतर्गत प्रज्ञा दया पवार यांचा ‘जात, वर्ग, लिंगभाव आणि दलित साहित्यासमोरील आव्हाने’ हा लेख विशेष महत्त्वाचा आहे.

संदर्भासहित स्त्रीवाद
संपादक : वंदना भागवत, कुमार अनिल, गीताली वि. म.
प्रकाशक : शब्द पब्लिकेशन, मुंबई
पृष्ठे : ५७९, किंमत : ७०० रु.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शरद baviskar- भुरा

भूरा