मंगळवार, २३ जुलै, २०१९

डोळे हे जुलमी गडे - भा. रा. तांबे


डोळे हे जुलमि गडे
डोळे हे जुलमि गडे
रोखुनि मज पाहुं नका!
जादुगिरी त्यांत पुरी
येथ उभे राहुं नका.

घालुं कशी कशिदा मी?
होती किति सांगुं चुका!
बोचे सुइ फिरफिरुनी
वेळ सख्या, जाय फुका.

खळबळ किति होय मनीं!
हसतिल मज सर्वजणी;
येतिल त्या संधि बघुनि
आग उगा लावुं नका!
गीत-भा. रा. तांबे
संगीत-वसंत प्रभू
स्वर-आशा भोसले ,  जी. एन्‌. जोशी
राग-मिश्र मारुबिहाग
• काव्य रचना- १८९१ साल.
• स्वर- आशा भोसले, संगीत- वसंत प्रभू.
• स्वर- जी. एन्‌. जोशी, संगीत- जी. एन्‌. जोशी.




भावकवी - भा.रा.तांबे....


कविवर्य भा.रा.तांबे अंथरुणास खिळले होते तेंव्हाची काव्य जन्माची एक कथा आहे… आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो असल्याचे त्याना जाणवत होते त्यावेळी त्यांचे एक स्नेही जवळ येऊन त्यांच्यापाशी कविता लिहिण्याचे आर्जव करू लागले. तांबेंनी आयुष्याच्या अंतिम वाटेवर काही तरी बोलावे किंवा लिहावे अशी विनवणीही त्यांनी जाता जाता केली…. काही दिवसांनी त्या संपादक महोदयांचे कविता पाठविण्यासाठीचे आठवण वजा विनंती करणारे पत्र तांबेंना मिळाले. त्यांच्या त्या विनंतीस उत्तर म्हणून भा.रा. तांबेंनी या प्रसंगावर त्यांना सुचलेली एक कविता पोस्टकार्डावर लिहून त्या संपादक मित्रास पाठवली होती.पाठविली होती...
तांबेंनी लिहिलेली ती कविता म्हणजे मृत्यूकडे केलेली एक तक्रारवजा कैफियत आहे ! अंथरुणाला खिळलेल्या तांबेंनी आपल्या मित्राची विनंती पुरी करताना आर्त शब्दात स्वतःच्या वेदना भावबद्ध केल्या अन एक अजरामर कविता जन्मास आली ती म्हणजे, 'मधु मागसी आता …"

मधु मागसी माझ्या सख्या, परि
मधुघटचि रिकामे पडति घरी !

आजवरी कमळाच्या द्रोणीं
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करि न रोष सख्या, दया करी.

नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणीं कशी तरी.

तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवे तुज,
मधु पिळण्या परि बळ न करीं !

ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविति हृदया,
आता मधुचे नाव कासया ?
लागले नेत्र हे पैलतिरीं.

जो काव्यमधु तू मागत आहेस त्याचे कित्येक मधुघट रिते होऊन घरी पडून आहेत ज्याकडे बघायला आता फुरसत राहिली नाही. आता मात्र नव्याने हे मधुघट माझ्याकडे सहजतेने निर्मिले जावेत अशी माझी शारीरिक अवस्था राहिलेली नाही अशी दिनवाणी कबुली या कवितेच्या सुरुवातीस कवींनी दिली आहे.

जेंव्हा माझी गात्रे शिथिल नव्हती, स्मृती सक्षम होत्या अन शरीर साथ देत होते तेंव्हा माझ्या मनातली फुलपाखरे हा काव्यमधु अगदी लीलया निर्मित होती. अगदी कमळाच्या विशाल द्रोणी भरून मी हा शब्दरस तुझ्या स्वाधीन करत होतो. तेंव्हा मला साधनांची कमतरता भासत नव्हती. मनातली उर्मी दाटून आली की ती शब्दबद्ध व्हायची पण आता तशी परिस्थिती उरली नाही. तुला देण्याजोगे माझ्याकडे काही नुरले जरी माझी पूर्वीची ही काव्यसेवा ध्यानात घेऊन तू आता माझ्यावर रागावू नकोस. तू मला माफ कर अन माझ्यावर थोडासा दयाभाव दाखव अशी विनंती कवी आपल्या 'त्या' मित्रास करतात.

माझा हा अखेरचा प्रवास सुरु आहे, हा प्रवास कधी अन कसा संपेल हे मलाही माहिती नाही. मात्र शेवटच्या काळात मला त्या परमात्म्याचे परमेश्वराचे आराधन करायचे आहे. त्याचे स्तवन करायचे आहे, त्याच्या पूजनासाठी माझ्या प्रतिभेचे उरले सुरले चार शब्द मी जपून ठेवले आहेत, या भावनेचे अगदी हळवे वर्णन करताना भा.रा.तांबेंनी जो उपमा अलंकार वापरला आहे तो अगदी अद्भुत अन विलक्षण परिणामकारी असा आहे. ते म्हणतात की दुधाच्या नैवेदयाची एकच वाटी माझ्या गाठी आहे अन देवपुजेस्तव एकच काटेरी फुलझाड (कोरांटी) मी कसेबसे माझ्या अंगणी तग धरून राखिली आहे ! उरले सुरले काव्यस्फुरण फक्त प्रभूचरणी अर्पण करण्यासाठी राखून ठेवल्याने आता तुला देण्यासाठी माझ्याकडे मधुघट राहिले नाहीत याची मला खूप खंत वाटते आहे असे कवी इथे सुचवतात.

आपल्या मित्रास किंवा आपल्या रसिक वाचक- चाहत्यांना आपल्याकडून काय लिहिले जावे याची मर्मभेदी जाणीव तांबेंना आहे. युवा मनाची स्पंदने ज्या प्रेमभावनेत कैद असतात, ती प्रेमभावना युवामनाची भाषा असते अन त्यांचे श्वास हीच त्यांची कुजबुज असते. प्रतिभावंत साहित्यिक या श्वासांना शब्दात परावर्तित करतात अन या कुजबुजीला कवितेचे प्रारूप मिळवून देतात. हे प्रेमकाव्य आपल्या नवनावोन्मेशशाली प्रतिभासामर्थ्याने कवी जिवंत करतात अन वाचक त्या काव्यास आपल्या हृदयात अढळ स्थान देतात. याहीपुढे जाऊन काहींना जगण्याचे ध्येय हवे असते तर काहींना जगण्याचा खरा अर्थ शोधायचा असतो त्यासाठी ते अविरतपणे संसारसुखाचे मर्म शोधत असतात. कवी मात्र फुलांचे परागकणदेखील न दुखावता त्यातून अलगद मधुर मधुकण शोषून घ्यावे इतक्या सहजतेने जीवनातील मर्म हलकेच समोर मांडत जातात. त्यातला अर्थ बघून आपण दिग्मूढ होऊन हरखून जातो. कवी म्हणतात की आता अशा भावना, असे विचार शब्दबद्ध करावे इतके भान माझ्याकडे उरले नाही. माझ्या अंगी तितके बळही राहिले नाही.तेंव्हा तू त्याविषयीची आर्जवे मला करू नकोस !

शेवटच्या कडव्यात कवी अगदी आर्ततेने ह्रदयाला पीळ पडतील अशा शब्दात आपली व्यथा मांडतात. 'आता अंतःकाळ जवळ आला आहे, ज्याप्रमाणे पूर्वेस रम्य प्रभातीस उगवलेला सूर्य निरव सांजेला मावळतो हा निसर्गनियम आहे त्याप्रमाणे जन्माला आलेल्या प्रत्येकास मृत्यू अटळ असतो. या निसर्ग नियमास आपण कसे अपवाद असू शकू ? आता माझा श्वाससूर्य ढळणार आहे, ही सांजवेळ मला काहीशी कातरवेळ वाटते आहे अन त्यामुळे थोडीशी घबराट देखील माझ्या मनात दाटून आली आहे असे प्रामाणिक कथन ते इथे करतात. अशा या बिकट प्रसंगी काव्यमधुचे स्फुरण होईल तरी कसे असा सवाल कारतानाच ते म्हणतात की आता माझे चित्त कशातच गुरफटले नसून माझे नेत्र केवळ आणि केवळ पैलतीरावरच्या आत्मीय ज्योतीत लीन झाले आहेत. तेंव्हा माझ्या सख्या आता मला तू ह्या काव्यमधुचा आग्रह करू नकोस' असे म्हणत म्हणत साश्रूपूर्ण शब्दांची ओंजळ ते आपल्या मित्राच्या ओंजळीत रिती करतात.
कविवर्य भा.रा.तांबे यांची ही कविता म्हणजे अंथरुणाला खिळलेल्या जर्जर माणसाने मृत्यूशी केलेली गुजगोष्टच आहे.

बालभारतीच्या पुस्तकातील कवितांचे शालेय जीवनाशी असणारे नाते दृढ करणारे जे प्रमुख कवी आहेत त्यात भा.रा.तान्बेंचे नाव सदैव असणार आहे याचे कारण म्हणजे स्मरणकुपीत त्रिकाल दरवळत राहतील अशा त्यांच्या आर्त आणि हळव्या भावकविता होय.

आजकाल जो तो म्हणतो की, 'मनाला उभारी देईल असे चांगले अन आवर्जून वाचावे असे लिहिले जात नाही. जर कुणी लिहिलेच तर वाचले जात नाही अन थोडे फार वाचले गेले त्यावर म्हणावी तशी साधकबाधक चर्चाही होत नाही…' मात्र सिंहावलोकन करून मागे पाहिले तर साहित्याचा हिमालय आपल्याला दिसतो पण आपण त्याकडे पाहत नाही. कारण आपण खरे कर्मदरिद्री रसिक झाले आहेत. शब्दसारस्वत आहेत, त्यांचा ठेवा आहे पण रसिक, वाचक, श्रोते अज्ञातात गुरफटलेत. अनमोल ठेवा आपल्याकडे असून आपण त्याचा आस्वाद घेत नाही. आस्वादाचे मधुघट पडून आहेत अन आपण आभासी अमृत शोधत आहोत अशी आपली अवस्था झालीय…अशाच एका महान कवीच्या काव्यप्रतिभेचा ओझरता आलेख या लेखात मांडला आहे.

जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय !'
मी जाता राहिल कार्य काय ?
सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय ?
मेघ वर्षतिल, शेते पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल
कुणा काळजी की न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय ?
सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामिं लागतिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जाता त्यांचे काय जाय ?
अशा जगास्तव काय कुढावे !
मोहिं कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ?
लोकभावना आणि मनातला आक्रोश यांवर अत्यंत बोलके भाष्य करणारी ही कविता आज सहा दशकानंतरही तितकीच टवटवीत वाटते कारण कवितेची साधी रचना प्रवाही अशी गेय काव्यशैली होय !

घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्‍न मना, बघ जरा तरी !
ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणीं
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी
फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणिं अमरता ही न खरी ?
मना, वृथा का भीशी मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरीं
या कवितेतील कोणत्याही ओळी जरी मनःचक्षुपुढे आल्या तरी मनातली मरगळ दूर होते. या कवितेत 'मना, वृथा का भीशी मरणा' असा रोकडा सवाल ते करतात.

डोळे हे जुलमि गडे
रोखुनि मज पाहु नका !
जादुगिरी त्यात पुरी
येथ उभे राहु नका.
घालु कशी कशिदा मी ?
होती किति सांगु चुका !
बोचे सुइ फिरफिरुनी
वेळ सख्या, जाय फुका.
खळबळ किति होय मनीं !
हसतिल मज सर्वजणी;
येतिल त्या संधि बघुनि
आग उगा लावु नका !
नवप्रेमाची पहिली बोलणी ही डोळ्यांच्या माध्यमातून होते. प्रत्यक्ष बोलणी अशी होत नसतात. जे काही सांगायचे आहे ते नयनकटाक्षातून सांगावे लागते. अशा वेळी जर आपला सखा सर्वासमोर आपल्याकडे एकटक रोखून बघत राहिला तर अवघडून गेल्या सारखे वाटते.

"तुझ्या गळां, माझ्या गळां
गुंफू मोत्यांच्या माळा "
"ताई, आणखि कोणाला ?"
"चल रे दादा चहाटळा !"
"तुज कंठी, मज अंगठी !"
"आणखि गोफ कोणाला ?"
"वेड लागले दादाला !"
"मला कुणाचे ? ताईला !"
"तुज पगडी, मज चिरडी !"
"आणखि शेला कोणाला ?"
"दादा, सांगू बाबांला ?"
"सांग तिकडच्या स्वारीला !"
"खुसू खुसू, गालिं हसू"
"वरवर अपुले रुसू रुसू "
"चल निघ, येथे नको बसू"
"घर तर माझे तसू तसू."
"कशी कशी, आज अशी"
"गंमत ताईची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशी"
"तर मग गट्टी कोणाशी ?"
भा.रा.तांबे प्रामुख्याने भाष्यस्वरुपात्मक काव्य लिहित असत असे नव्हे तर अगदी सहजसुंदर आणि अकृत्रिम अशी काव्यरचनाही त्यांनी केली आहे.

मावळत्या दिनकरा
अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करां !
जो तो वंदन करी उगवत्या
जो तो पाठ फिरवि मावळत्या
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा.
उपकाराची कुणा आठवण ?
'शिते तोवरी भूते' अशी म्हण;
जगांत भरले तोंडपुजेपण
धरी पाठिवर शरा !
असक्त परि तू केलीस वणवण
दिलेस जीवन, हे नारायण,
मनीं न धरिले सानथोरपण
समदर्शी तू खरा !
अशी भेदक विचारणा देखील ते आपल्या कवितांतून करतात. नव्याला नमस्कार करण्याच्या जगरूढीवर ते इथे प्रहार करतात.

विधात्याच्या रचनेचे गुण गाताना ते त्याला उद्देशून म्हणतात की,
ते दूध तुझ्या त्या घटातले
का अधिक गोड लागे न कळे.
साईहुनि म‍उम‍उ बोटें ती
झुरुमुरु झुरुमुरु धार काढती,
रुणुझुणु कंकण करिती गीती
का गान मनांतिल त्यात मिळे ?
अंधुक श्यामल वेळ, टेकडी
झरा, शेत, तरू, मधे झोपडी
त्यांची देवी धारहि काढी
का स्वप्‍नभूमि बिंबुनि मिसळे ?
या दृष्याचा मोह अनावर
पाय ओढुनी आणी सत्वर
जादु येथची पसरे मजवर
का दूध गोडही त्याचमुळे ?
निसर्गाचे मोहक वर्णन या कवितेत आढळते. निर्मिकासच देव मानून ते त्याच्या गोडीचे रहस्य त्याला विचारतात.

नववधूच्या भावनांचा घेतलेला हा वेध आपल्या डोळ्याच्या कडा ओलावून जातो.
आपले माहेर सोडून सासरी जाणारया हळदओल्या नववधूच्या मनात विचारांचा कोण कल्लोळ माजलेला असतो ! तो अगदी अल्वारपणे आपल्या शाईत कवी उतरवतात. हे भावगीत आजही तितक्याच तन्मयतेने ऐकले जाते.
नववधू प्रिया, मी बावरते
लाजते, पुढे सरते, फिरते
कळे मला तू प्राण-सखा जरि,
कळे तूच आधार सुखा जरि,
तुजवाचुनि संसार फुका जरि,
मन जवळ यावया गांगरते.
मला येथला लागला लळा,
सासरिं निघता दाटतो गळा,
बागबगीचा, येथला मळा,
सोडिता कसे मन चरचरते !
जीव मनींच्या मनीं तळमळे
वाटे बंधन करुनि मोकळे
पळत निघावे तुजजवळ पळे-
परि काय करू ? उरिं भरभरते
अता तूच भय-लाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळ पळभर मात्र ! खरे घर ते !

प्रेम परिपक्व झाल्यावर दाटून येणारी त्यांची काव्यभावना अधिक समृद्ध अशी आहे. सुरुवातीचा अल्लडपणा हलकेच मागे पडतो आणि एकमेकाप्रती असणारा स्नेहभाव वृद्धिंगत होत जातो. आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाच्या जीवनात हे वळण येतेच. या वेळी घेतल्या जाणारया आणाभाका ह्या आधीच्या शपथांपेक्षा भिन्न असतात.
तीनी सांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला
आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला
कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा
चक्रवाल हे पवित्र, ये जी शांत गभीर निशा
त्रिलोकगामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा
साक्षी ऐसे अमर करुनि हे तव कर करिं धरिला
नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत
गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षांत
पाणि जसे मोत्यांत, मनोहर वर्ण सुवर्णांत
हृदयीं मी साठवीं तुज तसा जीवित जो मजला
कशी काळनागिणी, सखे ग, वैरिण झाली नदी !
प्राणविसावा पैलतिरावरिं, अफाट वाहे मधी.
सुखी मीन हे तरति न गणुनी लाटा कोट्यावधी.
सुखी पाखरें गात चालली पार वादळीं सुधी.
पैलतटिं न का तृण मी झाले ? तुडविता तरी पदीं.
पैलतटिं न का कदंब फुलले ? करिता माळा कधी.
पापिण खिळले तिरा, विरह हा शस्‍त्राविण वधी.
प्राणांचे घे मोल नाविका, लावि पार, ने अधी !
या कवितेतील शब्दांची निवड हटके शब्दांची आहे. गद्यात वापरले जाणारे शब्द त्यांनी अगदी चपखलपणे कवितेत वापरले आहेत.

आई आणि मुलाचे अगाध प्रेमाचे नाते आपल्या शब्दकुंचल्यातून रंगवताना त्यांनी त्यात निखळ लडिवाळ रंग भरले आहेत. हसवता हसवता शेवटी ते डोळे ओले करून जातात अशी रचना त्यांनी इथे केलीय.
निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टि सारखी धरी
तिचा कलीजा पदरी निजला
जिवापलीकडे जपे त्याजला
कुरवाळुनि चिमण्या राजाला चुंबी वरचेवरीं
सटवाई, जोखाइ हसविती
खळी गोड गालांवरि पडती
त्याची स्वप्‍नें बघुनि मधुर ती कौतुक ते अंतरीं
अशीच असशी त्रिभुवनजननी
बघत झोपल्या मज का वरुनी ?
सुखदुःखांची स्वप्‍नें बघुनी कौतुकशी का खरी ?

भा.रा.तांबे म्हणजे दुःख, दैन्य, औदासिन्य, प्रेम, हळवेपणा यांचेच संमिश्र मिश्रण नव्हे, त्यांनी लिहिलेली राष्ट्रभावनांना आवाहन करणारी वीररसाने ओथंबलेली ही कविता आजही त्वेषाने गायली जाते. अंगवार रोमांच उभे करण्याची ताकद या कवितेत आहे, केवळ झाशीच्या राणीची शौर्यगाथा असे हिचे सीमित स्वरूप न ठेवता तिला एक देशभक्तीपर जोशिली कविता बनवण्यात कवी यशस्वी झाले आहेत.
रे हिंदबांधवा, थांब या स्थळीं अश्रु दोन ढाळीं,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशिवाली
तांबेकुलवीरश्री ती, नेवाळकरांची कीर्ती,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली !
घोड्यावर खंद्या स्वार, हातात नंगि तर्वार,
खणखणा करित ती वार,
गोर्‍यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे आली.
कडकडा कडाडे बिजली, शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमिच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली !
मिळतील इथे शाहीर, लववितील माना वीर,
तरू, झरे ढाळतिल नीर,
ह्या दगडां फुटतिल जिभा कथाया कथा सकळ काळीं !

आपल्या जगण्याचे अंतिम इप्सित सांगताना ते विश्वनिहंत्यास लिहितात की
चरणिं तुझिया मज देई, वास हरी
चरणतळीं तव कमल विराजे,
तेच करीं मज देवा, कल्पवरी.
कुणा संतती, कुणा राज्य दे,
मजला हरिचे देई रे, चरण परि.
कुणा स्वर्ग दे, कुणा मुक्ति दे,
मजला परि चरणाचा, दास करी.
मी घाली ना संकट तुजवरि,
केवळ मज चरणाचे, रजच करी.
चिकटुनि राहिन सदा पदांला,
इतुकी मम पुरवावी रे, आस परि.
मिरवीन वैभव हे त्रैलोक्यीं
येइल तरि नृपतीला, काय सरी ?
बालपण सरले, तारुण्य आले, प्रेम झाले, ते प्रेमही परिपक्व झाले, संसारसुखाचे मर्मही गवसले आता पुढे काय विचार मनी असावेत. वानप्रस्थआश्रमाच्या उंबरठ्यापाशी उभे असताना मनी कोणते विचार यावेत अन आयुष्याचे अंतिम मागणे काय असावे याचा तेजस्वी आरसा ही कविता आहे.

भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - डिसेंबर ७, १९४१)अर्वाचीन मराठी कवींमधील एक लोकमान्यता आणि राजमान्यता असलेले कवी होते. भा.रा.तांबे यांचा जन्म मध्य प्रदेशातील मुगावली या गावी झाला. झाशी येथे त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर देवासच्या राजकुमाराचे शिक्षक म्हणून नोकरी केली. आणि त्यासाठी इंदुर येथे वास्तव्य केले. याच काळात त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. सन १८९७ मध्ये ते विवाहबद्ध झाले. संस्थानी नोकरीमुळे त्यांना ग्वाल्हेर, अजमेर,प्रतापगड अशा अनेक ठिकाणी फिरावे लागले. पण ग्वाल्हेर येथे संस्थानाचे राजकवी म्हणून ते स्थायिक झाले. म्हणूनच ‘राजकवी तांबे’ या नावानेही ते ओळखले जातात.

हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. भा.रा. तांबे यांच्या कवितेचे वैशिष्ठय म्हणून आपणास त्यातील गेयता व भावमधुरता या गुणांचा उल्लेख करता येईल. त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनाचे निर्दोष व आनंदी असे वर्णन केले आहे. म्हणून त्याच्या कवितेस ‘संतुष्ट कविता’ असे यथार्थतेने संबोधता येईल. बालगीत व नाटयगीत हे काव्यप्रकारही त्यांनी तितक्याच समर्थपणे हाताळले व लोकप्रिय केले.

सन १९२० मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. आज त्यांच्या २२५ कविता उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रेम कविता, बालगीते, विधवाविषयक गीते, मृत्युगीते,अशा अनेक प्रकारांचा समावेश होतो. याशिवाय नाट्यगीते व भावगीते हे त्यांचे खास लेखन प्रकार आहेत. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. आपल्या काव्यात कवी तांबे यांनी रंगरेषांचा योग्य वापर आणि नाद व अर्थ यांचा सुरेख संगम साधलेला आढळतो. गेयता हे त्यांच्या कवितेचे खास वैशिष्ट्य आहे.

भा. रा. तांबे हे मराठी काव्य सृष्टीमध्ये फुललेले, व रसिकतेला आपल्या हजारो नवकल्पनांच्या पाकळ्यांनी भुरळ पाडणारे विलोभनीय व सप्तरंगी कमळ होते. मृत्यूसारख्या धीरगंभीर व अथांग अशा खोल विषयाला कल्पक शब्दरचनांच्या शृंखलांमध्ये बांधण्याचा प्रयत्न त्यांच्या कवितांनी केला. मृत्यू या शब्दाबद्दल पहिल्यापासून, त्यांना कसले तरी सुप्त आकर्षण होते. मृत्यूविषयी आतुरता, असाहाय्यता, निराशा, वात्सल्य, भय, निराशा, साशंकता, अनामिक खिन्नता अशा विविध भावनांची चित्रे शब्दकुंचल्याने रंगवित, तांबे मृत्यूच्या स्वागतासाठी स्वतःला तयार करत गेलेले दिसतात. मृत्यूविषयीच्या त्यांच्या कविता इतक्या करूणसुंदर आहेत, की प्रत्यक्ष मृत्यूलाही पाझर फुटावा! म्रूत्यू म्हणजे परमेश्वरभेटीचे एक माध्यम असल्याचे त्यांनी मानले. आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असे समजून स्वतःचा आणि इतरांचा प्रवास सुखकर कसा होईल ह्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी नेहमी सुचविले.

मराठी कवितेला भावोत्कटतेचा वेगळा आयाम प्राप्त करून देणाऱ्या या विलक्षण प्रतिभावंत कवीचे नाव मराठी साहित्यात सदैव सुवर्णाक्षरांनी कोरलेले राहील.

- समीर गायकवाड.

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

कवि भा. रा. तांबे यांच्या घाबरु नको, बावरू नको! ह्या कवितेचे रसग्रहण मिळेल का?

टिप्पणी पोस्ट करा

लेखन कौशल्य

Monday 4 December 2017 भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता हो...