मंगळवार, १३ जुलै, २०२१

भाषाशास्त्र आणि व्याकरण

अ *विषय* : मराठी *वर्ग*: बी. ए. तृतीय वर्ष / सत्र- सहावे *अभ्यास पत्रिका* :- भाषाशास्त्र आणि व्याकरण ---------------------------------------- घटक: भाषेचे स्वरूप व कार्ये १. मराठीतील भाषा हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील *भाष्* या धातूपासून बनला आहे. २. भाष् या धातूचा अर्थ *बोलणे* असा आहे. ३. भाषा हे अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादी प्रगट करण्याचे एक *साधन* आहे. ४. भाषेचा अभ्यास करण्यासाठी *भाषा* *विज्ञान* ही ज्ञानशाखा विकसित झाली आहे. ५. कोणता ना कोणता *आशय* दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाषा उपयोगात येते. ६. भाषा म्हणजे बोलण्याची विशिष्ट *पद्धती* होय. ७. भाषा हे *अभिव्यक्तीचे* प्रमुख साधन होय. ८. भाषा म्हणजे एक *संकेत* *व्यवस्थाच* असते. ९. वरवर सोप्या वाटणाऱ्या भाषेचे स्वरूप हे *गुंतागुंतीचे* असते. १०. *बोलली* *जाते* ती भाषा. ११. मोजक्या भाषांना *लिपी* असते; बाकी इतर भाषा बोली स्वरूपातच असतात. १२. भाषेला चिरस्थायी रूप देण्यात *लिपीची* भूमिका महत्त्वाची आहे. १३. *देवनागरी* ही मराठी भाषेची लिपी आहे . १४. भाषेत *शब्दांचे* कार्य महत्त्वाचे असते. १५. अक्षरांची अर्थ युक्त रचना म्हणजेच *शब्द* होय. १६. भाषा ही मानवाची *अद्भुत* निर्मिती आहे. १७.इतर प्राण्यांपासून वेगळे ठरण्यासाठी *भाषा* हा घटक माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. १८. "भाषा म्हणजे सांकेतिक परंतु मौखिक प्रतिकांचा आ़ंतर व्यवहाराकरिता उपयोगात येणारा *आकृतीबंध* होय " - रा. सो. सराफ. १९." Language is *arbitrary* Vocal symbols used for human communication". - Ronald ward F. २०. भाषेमुळे समाजाचा विकास होतो, समाजाचे ऐक्य टिकून राहते आणि *संस्कृती* संवर्धन होते. २१. "भाषा व साधन है जिसके द्वारा हम अपने विचारों को व्यक्त कर सकते है और इसके लिये हम *वाचिक* ध्वनीयों का प्रयोग करते है." २२. "भाषा मुख से उच्चारित होने वाले शब्द और वाक्य आदीका वह समूह है जिनके द्वारा *मन* की बात जताई जाती है." २३. "धन्यात्मक शब्दों द्वारा *विचारों* को प्रकट करना ही भाषा है." २४. भाषा हे मानवाच्या दैनंदिन व्यवहाराचे *मूलभूत* साधन आहे. २५. "भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणार्‍या सार्थ व *अन्वित* ध्वनींचा समूह " - कृ.पां. कुलकर्णी. २६. "मनातील कल्पना *शब्दांच्या* द्वारे प्रकट करण्याचे साधन म्हणजे भाषा" वा.गो. आपटे. २७. " मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या *ध्वनी* *संकेतांनी* बनलेली, समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी भाषा एक पद्धती आहे. " -ना. गो. कालेलकर. २८. "यादृच्छिक *ध्वनी* *संकेतांवर* आधारलेली, समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धती म्हणजे भाषा" - श्री.न. गजेंद्रगडकर. २९. "ध्वनी व अर्थ यांची सांगड घालण्याऱ्या *चिन्हांची* व्यवस्था म्हणजे भाषा" - फेर्दिना दि सोस्यूर ३०. "कल्पना , भावना , इच्छा दुसऱ्याला सांगण्याचे ; *स्वतःच्या* इच्छेवर अवलंबून असणारे मानवी साधन म्हणजे भाषा" - एडवर्ड सपीर. *घटक* - २ *भाषिक* *परिवर्तन* : *ध्वनी* *परिवर्तन* व *अर्थ* *परिवर्तन* . ३१. भाषा हे सर्वात सुलभ, प्रभावी आणि अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असे *संपर्क* *माध्यम* आहे. ३२. भाषेचा उद्देश *संदेश* व्यवहार पूर्ण करणे हा आहे. ३३. भाषेला *सामाजिक* आणि सांस्कृतिक संदर्भ असतात. ३४. कोणताही नवा *संदेश* देण्याची आणि ग्रहण करण्याची क्षमता भाषेमध्ये असते. ३५. भाषा व्यवहारांमध्ये शब्दांना प्राप्त होणारे अर्थ हे *समाजाकडून* निश्चित झालेले असतात. ३६. जसा *समाज* बदलतो तशी भाषा बदलते. ३७. भाषिक परिवर्तन हे *नकळत* घडून येते. ३८. भाषिक परिवर्तन ही *काळाच्या* ओघात घडून येणारी प्रक्रिया आहे. ३९. भाषिक परिवर्तन हे सूक्ष्म, तरल आणि *संथ* गतीने अविरत सुरू असते. ४०. एकाच भाषेच्या दोन किंवा अधिक कालखंडांतील *रूपांची* तुलना केली असता त्यात विभिन्नता आढळते ही विभिन्नता म्हणजेच भाषिक परिवर्तन होय. ४१. कोणत्याही कालखंडात कोणतीही भाषा *स्थिर* राहिल्याचे आढळून येत नाही. ४२. परिवर्तनशीलता हे भाषेचे *अंगभूत* वैशिष्ट्य होय. ४३. प्रत्येक भाषेवर इतर भाषांचे *ऋण* असतातच. ४४. जगातील अनेक भाषांमध्ये शब्द *साम्य* आढळून येते. ४५. भाषेत दोन प्रकारे परिवर्तन घडते; एक म्हणजे ध्वनी परिवर्तन आणि दुसरे म्हणजे *अर्थ* परिवर्तन. ४६. भाषा ही ध्वनी संकेतांनी सिद्ध झालेली असल्यामुळे ध्वनी हे भाषेचे *मूलभूत* घटक ठरतात. ४७. ध्वनि परिवर्तन म्हणजेच *उच्चार* प्रक्रिया होय. ४८. कर्णेंद्रियांवर एका विशिष्ट प्रकारची संवेदना घडविणार्‍या *वायूलहरींना* ध्वनी असे म्हणतात. ४९. भाषेच्या अंतरंगातील बदल म्हणजेच *अर्थातील* बदल होय, यालाच आपण अर्थ परिवर्तन असे म्हणतो. ५०. भाषेच्या बहिरंगातील बदल म्हणजेच ध्वनींतील किंवा उच्चारांतील बदल होय; यालाच आपण *ध्वनीपरिवर्तन* किंवा उच्चार प्रक्रिया असे म्हणतो. ५१. "एका विशिष्ट काली विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या, विशिष्ट समाजाच्या भाषेतील ध्वनी कालांतराने बदलतात. ध्वनीत होणाऱ्या बदलाच्या प्रक्रियेस *ध्वनी* परिवर्तन किंवा उच्चार परिवर्तन असे म्हणतात"- ना. गो. कालेलकर. ५२.ध्वनि परिवर्तन हे *अमर्याद* असते. ५३. ध्वनि परिवर्तन हे *सर्वव्यापी* असून जगातील सर्व भाषात ते घडत असते. ५४. ध्वनि परिवर्तन *प्रवाही* असते तसेच ते अज्ञेय असते. ५५. विशिष्ट ध्वनीचा एक उच्चार जाऊन दुसरा उच्चार *रुढ* होणे या प्रक्रियेलाच ध्वनी परिवर्तन असे म्हणतात. ५६. मुखरचनेतील *भिन्नतेमुळे* ही दोन्ही परिवर्तन घडत असते. ५७. प्रत्येकाची मुख यंत्रणा आणि श्रवण यंत्रणा *भिन्न* असते. त्यामुळे उच्चारात फरक पडू शकतो. ५८. माणूस हा अनुकरणशील प्राणी आहे. भाषेचे *अपूर्ण* अनुकरण हे धनी परिवर्तनाचे एक कारण ठरते. ५९. *आळशी* प्रवृत्तीमुळे माणूस उच्चारात ढिलाई करतो आणि उच्चार प्रक्रिया घडते. ६०. *उच्चारासाठी* कष्ट न घेण्याच्या प्रवृत्तीमुळे ध्वनि परिवर्तन घडते. ६१. शब्दाच्या उच्चारात अकारण *आघात* निर्माण केल्यास उच्चार प्रक्रिया घडते. ६२. भौगोलिक परिस्थितीमुळे ध्वनी परिवर्तन घडते. कोकणातील माणूस नाकात बोलतो. उदा. तूप च्या ऐवजी तूंप. ६३. रूढी, प्रथा, परंपरांमुळेही ध्वनी परिवर्तन घडते. काही *आदिवासी* जमातींमध्ये स्त्रिया ओठाआड लाकडाचा तुकडा ठेवतात, त्यामुळे त्यांच्या उच्चारात फरक पडतो. ६४. *घाईघाईत* बोलण्याच्या सवयीमुळे सुद्धा उच्चार परिवर्तन घडते. ६५. जीत जेते संबंध हे सुद्धा उच्चार परिवर्तनाचे कारण ठरते. ६६. निरपेक्ष ध्वनीपरिवर्तन आणि *सापेक्ष* ध्वनीपरिवर्तन असे धनी परिवर्तनाचे दोन मुख्य प्रकार आहेत. ६७. शब्दातील एक वर्ण जेव्हा जवळच्या वर्णाला आपल्यासारखाच करून घेतो तेव्हा *सदृशीकरण* ही प्रक्रिया घडते उदाहरणार्थ चक्र= चाक. ६८. सानिध्यात असलेल्या वर्णांना जेव्हा एखादा आगंतुक वर्ण दूर सारतो ;तेव्हा या क्रियेला *वियोजन* असे म्हणतात. उदाहरणार्थ श्री= सिरी. ६९. गुण, वृद्धी आणि *संप्रसारण* ही उच्चार प्रक्रिया होय. ७०. उच्चारात वर्णांची आदला बदल होणे म्हणजेच वर्ण *विपर्यास* . ७१. समान वर्णलोप या प्रकाराचे जुनी परिवर्तन म्हणजे 'नाक कटा' चे 'नकटा' होणे. ७२. ईस्टोरी, ईस्नान, ईस्क्रू ही उदाहरणे *आद्य* *स्वरागम* या प्रकारातील होत. ७३. ध्वनी हे भाषेचे बाह्यांग; तर *अर्थ* हे भाषेचे अंतरंग होय. ७४. शब्द हा भाषेतील *लघुत्तम* सार्थ घटक होय. ७५. भाषेचे कार्य *अर्थ* *निर्मिती* हे असल्यामुळे ध्वनी गौण ठरून अर्थाला प्राधान्य मिळते. ७६. ईश्वरी संकेत आणि *रूढी* यामुळे शब्दांना अर्थ प्राप्त होतो, असे भारतीय भाषा अभ्यासकांना वाटते. ७७. प्लेटोच्या मते भाषा ही *स्वयंभू* असून नैसर्गिक आहे. ७८. ॲरिस्टॉटलच्या मते भाषा ही *सामाजिक* संकेतांतून निर्माण झालेली आहे. ७९. आधी वस्तूची निर्मिती, मग मानवी मनात तिची कल्पना निर्मिती आणि नंतर *तर्कदर्शक* शब्द निर्माण झाला, असे मानले जाते. ८०. शब्दांच्या त्रिविध अर्थांनाच *शब्दशक्ती* असे म्हणतात. ८१. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या शब्दांच्या *तीन* *शक्ती* आहेत. ८२. अभिधा या शब्द शक्तीमुळे आपणाला वाच्यार्थ किंवा *रूढार्थ* मिळतो. ८३. लक्षणेमुळे लक्ष्यार्थ मिळतो तर व्यंजनेमुळे *व्यंग्यार्थ* . ८४. परिस्थिती आणि मानवी *मनोवृत्ती* यामुळे अर्थ परिवर्तन घडवून येते. ८५. 'गोठा' म्हणजे गाई बांधण्याचे ठिकाण. मात्र आज जिथे गाई-बैल, म्हैस, शेळ्या आदी बांधण्याच्या ठिकाणाला ही 'गोठा ' च म्हणतात. हा *अर्थविस्तार* होय. ८६. 'महायात्रा' म्हणजे मोठी यात्रा हा मूळचा अर्थ; मात्र आज महायात्रा म्हणजे अंत्ययात्रा असा *अर्थसंकोच* झाला आहे. ८७. *अर्थच्युती* म्हणजे शब्दातील मूळ अर्थ नष्ट होऊन त्या जागी दुसराच अर्थ येणे होय.उदा. तुरुंग= बिनभाड्याची खोली. ८८. 'परसाकडे जाणे' , ' मोरीवर बसणे ' ही *ग्राम्यता* *परिहारातून* अर्थ परिवर्तन झालेली उदाहरणे होत. ८९. ' *अवघड* जागेचे दुखणे', 'मायांग' ही अश्लीलता निवारणातून अर्थ परिवर्तन झालेली उदाहरणे होत. ९०. एखाद्या शब्दाचा अर्थ उन्नत होणे किंवा प्रशस्त होणे म्हणजेच *अर्थप्रशस्ती* होय. उदा. लहान लेकराला गुलामा, लबाडा असे म्हणणे. ९१. समानार्थी आणि परस्पर संबंधी अशा दोन शब्दांच्या अर्थात जेव्हा भेद होतो; तेव्हा *अर्थभेद* झाला असे म्हणतात. उदा. शर्ट= सदरा. ९२. *अर्थसार* म्हणजे थोड्या शब्दात बहुमोल अर्थ व्यक्त करणारी शब्द संहिता. उदा. अठराविश्व दारिद्र्य, ग्यानबाची मेख इ. ९३. *साहचर्य* हे एक अर्थ परिवर्तनाचे कारण होय. ९४. दानशूर कर्ण, भोळा शंकर ही *साम्यतत्त्वाची* उदाहरणे होत. ९५. चंद्रमुखी ,मृगनयनी ही *रूपकजन्य* अर्थप्रक्रिया होय. ९६. *बदलत्या* सामाजिक जीवनामुळे अर्थ परिवर्तन मोठ्या प्रमाणात घडते. ९७. *अशुभनिवारण* या मानवी प्रवृत्तीमुळे अर्थ परिवर्तन घडते. उदा. स्वर्गवासी होणे= मृत्यू पावणे. ९८. *अतिशयोक्ती* हे सुद्धा अर्थ परिवर्तनाचे एक कारण आहे. *घटक* - *३* *प्रमाण* *भाषा* *आणि* *बोली* ९९. जगातील कोणतीही भाषा मूळ *बोली* रूपातच असते. १००.' भाष् म्हणजे *बोलणे* ' यावरूनच भाषा ही संज्ञा रूढ झाली आहे. १०१. भाषिक व्यवहार हा मुळात *संवादाच्या* पातळीवरच असतो. १०२. भाषा जेव्हा बोलली जाते तेव्हा ती कोणती तरी एक *बोली* असते. १०३. बोली म्हणजे एखाद्या व्यापक भाषिक परिसरातील *प्रादेशिक* भाषा. १०४. संकेतबद्ध स्वनिमसंरचनेच्या *संप्रेषण* व्यवस्थेलाच भाषा असे म्हणतात. १०५. भाषा ही एखाद्या समाजाची बोली असते , तिलाच पुढे *प्रमाणभाषेचा* दर्जा प्राप्त झालेला असतो. १०६. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांच्यामध्ये *श्रेष्ठ* - *कनिष्ठ* असा भेदभाव नसतो. १०७. वेगवेगळ्या प्रादेशिक बोलींना सामावून घेणारी भाषा म्हणजेच *प्रमाणभाषा* होय. १०८. बोली ही बोलण्यासाठी तर प्रमाणभाषा ही *लिहिण्यासाठी* प्राधान्याने वापरली जाते. १०९. बोली ही *नैसर्गिक* असते तर प्रमाणभाषा ही कृत्रिम असते. ११०. बोली ही सहज अवगत झालेली असते तर प्रमाणभाषा ही मुद्दामहून *शिकावी* लागते. १११. बोलीमध्ये गोडवा , आपलेपणा , जिव्हाळा असतो तर प्रमाण भाषेमध्ये *शिस्तबद्धता* असते. ११२. बोली ही घरात , कुटुंबात, नातेवाईकात , मित्रात बोलायची भाषा असते तर प्रमाण भाषा ही *अनोळखी* लोकांत बोलायची भाषा असते. ११३. बोली ही विशिष्ट प्रदेशाची असते तर प्रमाणभाषा ही *संपूर्ण* प्रदेशाची असते. ११४. बोली ही लोक व्यवहाराची तर प्रमाणभाषा ही *शासकीय* व्यवहाराची भाषा असते. ११५. बोली ही मोकळेपणाने बोलता येते तर प्रमाणभाषा ही *नियमांनी* बांधलेली असते. ११६. प्रसारमाध्यमांत वापरली जाणारी, शासकीय कार्यालयीन कामकाजासाठी वापरली जाणारी आणि मुद्दामहून लेखनाचे नियम करून जिला एकरूपत्व देण्याचा प्रयत्न केला जातो अशी भाषा म्हणजे *प्रमाण* *भाषा* होय. ११७. बोली ही *घरीच* शिकवली जाते तर प्रमाणभाषा ही शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांतून जाणीपूर्वक शिकविली जाते. ११८. ज्या बोलीला *राजमान्यता* आणि समाजमान्यता मिळते तीच पुढे प्रमाण भाषा बनते. ११९. बोलीचा विचार करताना ती ज्या प्रदेशात बोलली जाते त्या *प्रदेशाचा* विचारही अपरिहार्य ठरतो. १२०. बोली ही त्या त्या प्रदेशाची *अस्मिता* असते. १२१. बोलीचे क्षेत्र मर्यादित असते; तर प्रमाण भाषेचे अमर्याद. १२२. एकाच भाषेच्या *अनेक* बोली असू शकतात. १२३. बोली या प्रमाणे भाषेला *पूरक* ठरत असतात. १२४. प्रमाण भाषेच्या तुलनेत बोली ही अधिक *परिवर्तनशील* असते ‌. १२५. ३,०७,७६२ चौरस किलोमीटर इतके व्यापक क्षेत्रफळ असणाऱ्या महाराष्ट्रात *मराठी* ही प्रमाणभाषा मानली जाते. १२६. मराठवाडी, वऱ्हाडी, कोकणी , अहिराणी( खान्देशी) , डांगी या मराठीच्या प्रमुख बोली आहेत. *घटक* -४ *विभक्ती* *विचार* १२७. वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो त्यालाच मराठीत *विभक्ती* असे म्हणतात. १२८. विभक्ती म्हणजे *विभागीकरण* . १२९. नाम, सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या *विकारांना* विभक्ती असे म्हणतात. १३०. नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात; त्या अक्षरांना *प्रत्यय* असे म्हणतात. १३१.नाम व सर्वनामांना प्रत्यय लागून *विभक्तीची* रुपे तयार होतात. १३२. विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्व नामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्यास *सामान्यरूप* असे म्हणतात. १३३. क्रियापदाने दर्शविलेली क्रिया दाखविण्याचे कार्य करतो तो *कर्ता* . १३४. प्रथम विभक्तीचा कारकार्थ *कर्ता* असतो. १३५. द्वितीय विभक्तीचा कारकार्थ *कर्म* असतो. १३६. नाम किंवा सर्वनामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध आठ प्रकारचा असतो, म्हणून मराठीत विभक्तींची संख्या *आठ* आहे. १३६. मराठी व्याकरणात आठ प्रकारच्या विभक्ती असून त्यांना *संस्कृत* प्रमाणे नावे दिलेली आहेत. १३७. आठवी विभक्ती ही संबोधनासाठी असून त्यामुळे तिचे नाव *संबोधन* असेच दिले आहे. १३८. प्रथमा या विभक्तीला एक वचनी आणि अनेक वचनी *प्रत्यय* नाहीत. १३९. स, ला, ते ; स, ला, ना, ते हे द्वितीया आणि *चतुर्थी* चे प्रत्यय सारखेच आहेत. १४०. ने,ए,शी ; ने, शी, ही, ई हे *तृतीया* विभक्तीचे प्रत्यय आहेत. १४१. ऊन, हून ; ऊन, हून हे *पंचमी* या विभक्तीचे प्रत्यय आहेत. १४२. चा,ची,चे ; चा,ची,चे हे *षष्ठी* या विभक्तीचे प्रत्यय आहेत. १४३. त,ई, आ; त, ई, आ हे *सप्तमी* या विभक्तीचे प्रत्यय आहेत. १४४. नो हा *संबोधन* या विभक्तीचा प्रत्यय आहे. *घटक* - *५* *प्रयोग* *विचार* १४५. प्रयोग हा शब्द *संस्कृत* मधील " प्र + युज" या धातूपासून बनला आहे. १४६. प्रयोग याचा अर्थ *जुळणी* किंवा रचना होय. १४७. कर्त्याची किंवा कर्माची *क्रियापदाशी* अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते; तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. १४८. वाक्यातील सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे *क्रियापद* होय. १४९. क्रियापद हा वाक्यरुपी कुटुंबाचा *प्रमुख* असतो. १५०. वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या *परस्पर* *संबंधाला* प्रयोग असे म्हणतात. १५१. प्रयोगात *प्रथमान्त* पदाला महत्त्व असते. १५२. कर्ता जेव्हा *प्रथमेत* असतो; तेव्हा कर्तरी हा प्रयोग होतो. १५३. कर्म जेव्हा प्रथमेत असते किंवा अप्रत्ययी द्वितीयेत असते; तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. १५४. कर्ता व कर्म यापैकी एकही पद जेव्हा प्रथमेत नसते तेव्हा *भावे* *प्रयोग* होतो. १५५. कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून, त्याला ' *णारा* ' हा प्रत्यय लावून कोण? असा प्रश्न करावा म्हणजे कर्ता मिळतो. १५६. मराठीत प्रयोगाचे मुख्य प्रकार *तीन* आहेत. १५७. जेव्हा क्रियापदाचे रूप हे *कर्त्याच्या* लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो. १५८. जेव्हा क्रियापदाचे रूप हे *कर्माच्या* लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते तेव्हा कर्मणी हा प्रयोग होतो. १५९. सकर्मक कर्तरी आणि *अकर्मक* *कर्तरी* हे कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात. १६०. पुराण कर्मणी, नवीन कर्मणी, समापन कर्मणी, शक्य कर्मणी, प्रधान कर्तृक कर्मणी असे कर्मणी प्रयोगाचे पाच *उपप्रकार* पडतात. -+++++++++++++++++---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...