बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

लेखन कौशल्य


Monday 4 December 2017
भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन
A. लेखनाचे महत्व :
१.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता होय.
२.लेखनाद्वारे भाव,विचाराची अभिव्यक्ती होते.
३.मराठी भाषा संस्कृतमधून आली आहे व तिचे लेखन उच्चारानुसार होते.
४.जीवनात यश संपादन करण्यासाठी लेखन कौशल्य असणे आवश्यक आहे.

B. लेखनाचे सर्वसामान्य उद्दिष्टे :
१.आत्माविष्कार : मनातील भावना,कल्पना,विचार,
लिखित स्वरुपात व्यक्त करणे .
२.प्रचार : आपले विचार, मत दुसऱ्यापर्यंत लेखनाद्वारे पोहचवणे .
३.मन:शांती : मनातील भावना लिहून मनाला शांतता होते.
४.सुसंस्कार : दुसऱ्याला आपले विचार वाचण्यास दिले असता त्या त्या व्यक्तीवर चांगले सुसंस्कार होतात.

C. लेखनातील शिक्षणातील उद्दिष्टे :
१.वहीवर योग्य रेखा आखणे .
२.लेखन व्याकरण शुध्द व समास पाडून करणे.
३.मुख्य मुद्द्याला अधोरेखा मारणे.
४.अक्षरावर शिरोरेषा मारणे.

D. लेखन सिध्दता व ती कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे:
१.पकड : हाताची बोटे व मनगटाच्या बळकटीत ३ से.मी.अंतरावर पेन धरावा .
२.आसनबंध : वि.वयानुसार व उंचीनुसार टेबल खुर्चा असाव्यात .
३.दृष्टी हस्त संयोजन : लेखन करतांना तेथे दृष्टी पोहचेल तिथे हात पोहचावा .

E. सुलेखन :
सुलेखन हे लेखनाचे बाह्यांग आहे.सुवाच्च ,वळणदार,
प्रमाणबद्ध व आकर्षक अक्षरात केलेले लेखन म्हणजे सुलेखन होय.

F. चांगल्या हस्ताक्षराचे वैशिष्टे :
१.लेखनातील स्पष्टता वळण व आकार.
२.दोन शब्द व अक्षरातील आंतर .
३.लेखन शुध्दता व लेखनातील गती.
४.लेखनाचे नियोजन .
५.लेखनातील मुद्याची गुंपण.
६.लेखनातील आटोपशीरपणा.
७.लेखनातील लक्ष अकृट करण्यासाठी वापर लेखन हे व्यक्ती मत्वाचे दर्पण आहे.
८.लेखनातील मुख्य मुद्याला अधोरेख करणे.

G. हस्ताक्षर सुधारण्याच्या पध्दती :
१.वर्णमालेचे तक्ते वापरावे.
२.शब्द पट्ट्या वापराव्यात .
३.चित्राचा वापर करावा उदा-गरुड ‘ग’
४.खादी फलकाचा वापर अक्षर काढण्यासाठी .
५.रेषा,गोल ,अर्धवर्तुळ ,कमान काढून अक्षर शिकवावे.
६.रंगीत खडूचा व रंगीत चित्राचा वापर करावा.
७.विद्यार्थाला वर्णमालेच्या वह्या बाजारातुन उपलब्धता करून देऊन प्रात्यक्षिक द्यावे.
८.हस्ताक्षर स्पर्धा घ्यावे.

H. अनुलेखन ,दृकलेखन ,श्रुतलेखन ,गतीलेखन :
१.अनुलेखन :फळ्यावरचे शिक्षकाचे पाहून लेखन करणे त्यास अनुलेखन म्हणतात.
२.दृकलेखन : शिक्षकाने स्वाध्याय दिल्यास त्या प्रश्नांचे उत्तर पाहण्यासाठी पुस्तकातील पाहून लेखन करणे त्यास दृक लेखन म्हणतात.
३.श्रुतलेखन :शिक्षकाचे एकूण लेखन करणे त्यास श्रुतलेखन म्हणतात .
४.गती लेखन :योग्य वेगाने लेखन करणे त्यास गती लेखन म्हणतात.

I. लेखनातील दोष किंवा उणीवा त्यावर उपाय:
१.खराब अक्षर :हस्ताक्षर सुधारण्याच्या पध्दती .
२.अनुचित गती :रोज श्रुत लेखन देणे.
३.अशुध्द लेखन :ऱ्हस्व दीर्घची ओळख करून देणे.
४.अनुचित शब्दप्रयोग :योग्य शब्द प्रयोग करणे.

J. लेखनासाठी योग्य साहित्य व साधनाची निवड :
१.कागद :एक रेषाची ,दोन रेघी,तीन रेषाचा कागद.
२.कागदाखाली धरावयाचा पुठ्ठा :फळी,
३.लेखन :बॉलपेन ,साईपेन ,पेन्सिल.

K. विविध लेखनाचे प्रकार :
१.निबंधलेखन .
२.पत्र लेखन.
३.कथा व संवाद लेखन .
४.संवाद लेखन .
५.कल्पना विस्तार.
६.सारांश लेखन.
७.दैनंदिनी लेखन.
८.अहवाल लेखन .
९.भावानुवाद.
१०.आकलन.
११.निवेदन .
१२.वार्तालेखन.

१.निबंध लेखनाचे प्रकार :
१.कथनात्मक निबंध :घटना,इतिहास,चारित्र्य ,कथायाचे अनुभव आपल्या शब्दात सांगणे त्यास कथनात्मक निबंध म्हणतात उदा-साने गुरुजी.

२.वर्णनात्मक निबंध :व्यक्ती वस्तु,स्थल,प्रसंग यांचे प्रकृती वर्णन करणे त्यास वर्णनात्मक निबंध म्हणतात .
उदा-माझी शाळा .

३.चारित्र्यात्मक निबंध :व्यक्ती ,पशु,पक्षी स्थलाचे चारित्र्य दर्शन मांडणे त्यास चारित्र्यात्मक निबंध म्हणतात.
उदा-माझा आवडता नेता.

४.कल्पना प्रधान निबंध :आपल्या मनातील कल्पना ,भावना,विचार मांडणे त्यास कल्पना प्रधान निबंध म्हणतात .
उदा-मी पंतप्रधान झाली तर .....

५.रसग्रहण निबंध :कथा ,कविता,कादंबऱ्या ,वाचुन निबंध लेखन करतात त्यास रसग्रहणात्मक निबंध म्हणतात .
उदा-माझे आवडते पुस्तक .

२.पत्र लेखनाचे प्रकार व त्यातील आवश्यक गोष्टी :
१.व्यक्तिगत (घरगुती पत्र )

२.व्यावसायिक (कार्यालयीन पत्र )

३.बातमीपत्र .

त्यातील आवश्यक गोष्टी :
१.स्थळ व तारीख :पत्राच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात लिहावी.
२.मायना (शीर्षक) :ज्याला पत्र लिहिण्याचे आहे त्यासंबधी 
उदा-तीर्थस्वरूप ,प्रिय.
३.आशय (कलेवर ): यात पत्र लिहिण्याचा मुख्य उद्देश लिहिणे आवश्यक आहे.
४.शेवट (समाप्ती ): आपले स्वताचे पत्र पाठवणाराचे नाव लिहावे उदा-तुझा मित्र .
५.पत्ता : ज्याला पत्र पाठवायचे त्याचा पत्ता लिहणे आवश्यक आहे.

३.कथा लेखन :
१.कथा लेखन मुद्याच्या साह्याने करावे.
२.कथेतील घटना तंतोतंत डोळ्या समोर उभी करणे .
३.कथेतील पात्राची व्यक्तीरेखा व स्वभाव रेखा .
४.कथा सांगणे व कथेतील योग्य शीर्षक देणे.

४.संवाद लेखन :
१.व्यक्ती समोरा-समोर बोलत आहे असे लेखन करणे.
२.दोन व्यक्तीचे भावना,कल्पना,विचार लेखनाद्वारे प्रगट करणे.

५.कल्पना विस्तार :
१.कल्पनेचे आकलन होणे आवश्यक आहे.
२.कल्पना,फुलुन,ती पटून देता यावी .
३.सोपी समर्पक उदाहरणे देणे.
४.निबंधापेक्षा कमी ओळीत कल्पना विस्तार असावा.

६.सारांश लेखन :
१.कल्पना विस्ताराच्या उलट प्रकार आहे.
२.गद्य /पद्य १/३ सारांश लिहावा लागतो.
३.पण सर्व मुद्दे यायला हवे.
४.आपल्या शब्दात लेखन करणे.

७.दैनंदिनी लेखन :
१.व्यक्तीने स्वतः स्वतःच्या मनाशी साधलेला संवाद म्हणजे दैनंदिनी होय.
२.दैनंदिनी कामाच्या नियोजनाला यशाशक्ती म्हणतात.
३.रोजच्या व्यवहारात आपण केलेली कार्य लिहून ठेवणे.
४.दैनंदिनीत दिनांक, वार, महिना लिहून ठेवणे.

८.अहवाल लेखन :
१.शाळेत झालेले विविध कार्यक्रमाचा आढावा मोजक्या शब्दात विद्यार्थी आपल्या वहीत लिहून ठेवतात.
२.महत्वाचे मुद्दे गाळू नये.
३.महत्वाच्या व्यक्ती ,घटना याची नोंद ठेवणे.
४.दिनांक ,वार ,महिना लिहिणे.

९.भावानुवाद:
१.मराठीचे इंग्रजीत रुपांतर करणे.
२.इंग्रजीतील लेखनाचे मराठीत रुपांतर करणे.

१०.आकलन :
लेखक त्याची भावना,विचार कल्पना,त्याच्या लेखनाद्वारे व्यक्त करत असतो ती आपण वाचून मनाने लेखन करणे त्यास आकलन म्हणतात.

११.निवेदन :
आपल्या तक्रारी ,सूचना,मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्या समोर मांडण्यासाठी निवेदन लेखन करावे लागते.

१२. वार्तालेखन :
वर्तमान पत्रात कविता,कथा,सुविचार व परिसरातील घटना लिहून पाठवणे त्यास वार्तालेखन म्हणतात.

L. शैलीयुक्त लेखनाची वैशिष्टे :
१.शैली हा लेखनाचा प्राण आहे.
२.अनुभवाशी एक निष्ठ असलेले लेखन म्हणजे शैलीयुक्त लेखन होय.
३.समर्पक शब्द योजना असावी .
४.प्रवाह व लयबध्दता असावी.१३.रसास्वाद परीक्षण (रसग्रहण लेखन )एखाद्या कविचे किंवा पद्य काव्याचे परीक्षण करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.शब्द सौदर्य .
२.अर्थ सौदर्य .
३.भाव सौदर्य.
४.कल्पना सौदर्य.
५.अलंकार सौदर्य .
६.विचार सौदर्य .

M. लेखन मूल्यमापन करण्याचे साधने : 
परीक्षा 
1. निरीक्षण : १.अक्षराचे वळण. २.शुध्द लेखन.
2. लेखी परीक्षा : १. दीर्घोत्तरी प्रश्न . २.लघुत्तरी प्रश्न . ३.वस्तुनिष्ठ प्रश्न .
3. प्रात्याक्षिके : १.हस्ताक्षर स्पर्धा, २. वैयक्तिक नोंदी, ३. प्रासंगिक नोंदी, ४. पडताळा सूची

वैचारिक लेखनाचे स्वरूप

आपले विचार,भावना,कल्पना इत्यादींचे आपण लेखन करतो किंवा आपल्या विचारांना आपण लिपीबद्ध करतो.यालाच आपण लेखन म्हणतो.हे एक भाषिक कौशल्य आहे.लेखनाला व्याकरणीक अशी नियमांची चौक असते.लेखन करत असतांना किंवा त्या पूर्वी आपण मानसिक चिंतन करीत असतो,ही एक प्रकारची विचार निर्मितीची प्रक्रिया असते. यात आपण आपल्याला पटलेले वा न पटलेलेही विचार व्यक्त करू शकतो. किंवा इतरांचे विचार,मतेही आपण विचार प्रतिपादनात घेऊ शकतो.

साहित्य हा खूप व्यापक विषय आहे पण इथे आपण भाषेच्या कार्यामागील व वापरामागील हेतूवरून ललित व वैचारिक लेखन असे जे दोन प्रकार मानता येतात असे ललित साहित्य प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहे.

 वैचारिक लेखनाचे स्वरूप व प्रकार
वैचारिक स्वरूपाच्या लेखनात लेखक हा लोकसत्ताक समाजव्यवस्थेत वैचारिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून स्वतःचे विचार मांडत असतो.या विचार प्रकटिकरणातून कधी तो इतरांचे विचार ग्रहण करतो किंवा कधी त्या विचारांना सभ्यपणे मतभेद देखील व्यक्त करत असतो.भाषेद्वारे जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती,वस्तू,स्तिथीविषयी किंवा इतर कुठल्याही विषयांवर विचार प्रकट करतो,त्या विचारांमधून आपण आपले ज्ञान,अभिरुची,आपली जीवनधारणा,नैतिक भूमिका,आपले व्यक्तिमत्त्व देखील प्रकट करत असतो.
एखाद्या विषयांवरील इतरांच्या मतांना मांडत जात त्यातील उणिवा,त्रुटी दर्शवत स्वतःचे विचार युक्तिवाद कौशल्याने पूरक उदाहरणे,संदर्भ देऊन पटवून देणे अशीही एक पद्धत वैचारिक लेखनात आहे.ज्याला खंडन मंडन असे म्हणतात.

तर्कशुद्ध निष्कर्ष काढून,विषय विवेचन करत साहित्य व कला समीक्षा,वर्तमानपत्रे, ग्रंथ,संशोधन,पाहणी अहवालाचे निष्कर्ष इत्यादी क्षेत्रात वैचारिक लेखन केले जाते. सामान्यतः न्याय व्यवस्था,कलामुल्य मापन,अध्यात्म,वर्तमानपत्र,संस्कृती-इतिहास मीमांसा,तत्वज्ञानात्मक ग्रंथ या क्षेत्रात मोठया प्रमाणात वैचारिक लेखन होत असते.



अग्रलेख 
नियतकालिके वा वर्तमानपत्र यांच्या संपादकांनी लिहलेल्या संपादकीय लेखाला अग्रलेख म्हणतात.जागृती, लोकशिक्षण,जाणीव या प्रेरणेतून हे लेख लिहिले जातात. सद्यस्थितीतील प्रश्न, समस्या,घटना,व्यक्तीच्या कृती अशा विविध जीवनक्षेत्रासंबंधित विषयांवर अग्रलेखातून ठराविक शब्दात विचार मांडल्या जातो.सामान्य माणसाला जागे करणे व विधायक कृतिसाठी प्रेरित करणे हे अग्रलेखाचे उद्दिष्ट असते.संपादकीय लेखणाचे मूळ कार्य हे वर्तमानातील सामाजिक,राजकीय परिस्थितींवर भाष्य करणे असते.अलीकडच्या काळात जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे मुखपृष्ठ असलेले स्वतंत्र असे वर्तमानपत्र आहे.त्यामुळे अग्रलेखातील निष्पक्षपणा(जो असायलाच हवा) वाचायला मिळत नाही.अग्रलेखातील भूमिका ही त्या वर्तमानपत्राची अधिकृत भूमिका असते.


वैचारिक निबंध लेखन :-
आपल्या विचारांची सुसूत्र,तर्कशुद्ध मांडणी वैचारिक निबंध लेखनात केली जाते.हा गांभीर्यपूर्वक लिहलेला तसेच समाजाला उपयुक्त असे विचार,दृष्टिकोन मांडत असतो.निबंध या साहित्य प्रकाराचा उदय विचारप्रतिपादन करण्यासाठी झाला आहे.विचार अनुभूती किंवा कल्पनांची,मुद्यांची सुसूत्र बांधणी येथे अभिप्रेत आहे.निबंध एक प्रकारे सौंदर्यपूर्ण रचनेशी संबंधित आहे.ही रचना विचार,विषय,कल्पना,विषय विश्लेषण यांची असू शकेल.मराठी शब्दकोशात 'निबंध म्हणजे =प्रबंध,नियमबद्ध असणारा लेख,मोठा लेख,नीटपणे पक्का जडलेला लेख' असा अर्थ दिलेला आहे.



स्फुट लेखन
एखाद्या विशिष्ट विषयावर समकालीन संदर्भ देत लिहलेला वर्तमानपत्रातील लेख.यात वैचारिक गांभीर्य राहीलच असे नाही.मनमोकळेपणाने विषय विषयांतरे, विषय वाढवीत नेणे असे करीत एखादा नवा विचार,माहिती चिंतानफल मांडलेले असावे लागते.मर्यादित शब्दात सुत्ररूपाने,संक्षेपाने असे लेखन केले जाते.लेखनात मृत्यू लेख व वैचारिक लेख असे प्रकार देखील आहे.



ललित साहित्याचे प्रकार
प्रथम आपण बघू ललित साहित्य म्हणजे काय

ललित शब्दाचा अर्थ 'सौंदर्य' 'सुरेख' 'मनमोहक' असा आहे.मनाला आनंद देणारे सौंदर्यतत्व या शब्दांमधून सूचित होते.लेखक हे लालित्य भाषेद्वारे निर्माण करीत असतो.आलंकारिक शब्दरचनेतून रसात्मक अनुभव वाचकांंना करून दिल्या जातो.लेखक प्रत्यक्षातल्या माणसावरून,अनुभवावरून कल्पनेच्या साहाय्याने पात्र निर्माण करतो.ती निर्मिती प्रतिभासिक निर्मिती असते. तात्पर्य. प्रत्यक्षातल्या जीवनाचे कल्पनापूर्ण निर्मितीत परिवर्तन घडविण्याची क्रिया म्हणजे साहित्यनिर्मिती होय.

गोष्ट / कथा आणि लघुकथा
गोष्ट हा लोककथेचा एक प्रकार मानावा लागेल.निसर्ग घटकांच्या,माणसांच्या,प्राणांच्या जीवनातल्या घटनांच्या आधारे गोष्ट रचली जाते.गोष्टी या बहुदा रंजन वा उपदेश करणे या प्रेरणेतून निर्माण होतात.

जेव्हापासून मानवाला बोलण्याची कला अवगत झाली तेव्हापासून एकमेकांना गोष्टी सांगण्याची कला ही विकसित झाली.पूर्वी या गोष्टी प्राण्यांच्या(इसापनीती)वैगरे असत.नंतरच्या काळात लोकजीवणाचा व लोकव्यवहाराच्या अनुभवावर आधारित अशा कथा एकमेकांना सांगण्यात येत असत.या कथांमध्ये सांगण्याचे कौशल्य, उत्कंठा,व आकर्षकपणा असे त्यामुळे कथा रंजक बनत असे आणि एकमेकांच्या कथा लोक आवडीने ऐकत असत.विकासाच्या ओघात हळूहळू लिपीचा शोध लागला त्यानंतर लिहिण्याची कथा अस्तित्वात आली.शिलालेख कोरले गेले ताम्रपट व भूर्ज पत्रावर लेखन केले गेले.त्यानंतर कागदाचा शोध लागला. त्यानंतर मुद्रण कलेचा शोध लागला.

मुद्रणकलेच्या शोधानंतर कथा लिखित स्वरूपात साकार झाली आणि वाङ्मय प्रकारात एक महत्त्वाचा प्रकार म्हणून लोकप्रिय ठरली.लघुकथेत मोजकी पात्रे,घटना,प्रसंग यांच्या आधारे जीवनाचे अंगदर्शन घडते.कल्पित माणसे,निसर्ग घटक ही लघुकथेतील पात्रे असतात.कवितेनंतर प्रचंड लोकप्रिय असलेला हा दुसरा साहित्य प्रकार आहे.



आत्मकथन,ललित निबंध,कविता व प्रवासवर्णन
आत्मकथा/बायोग्राफी
स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या ओढीतून आत्मकथन हा साहित्य प्रकार अस्तित्वात आला आहे. स्वतःच्या जीवनातल्या घटना ,भेटलेल्या व्यक्ती,घेतलेले अनुभव, आपल्या भावना याचे स्वतः केलेले कथन म्हणजे आत्मकथा.

आत्मचरित्राच्या वाचकाला नेहमी यशस्वी लोकांच्या आत्मकथेत रस असतो.उद्योगपती,साहित्यिक,मोठा राजकीय नेता,सिलेब्रिटी अभिनेता-अभिनेत्री,सामाजिक कार्यकर्ता,वरिष्ठ पत्रकार,IS/IPS अधिकारी अशा लोकांच्या जीवनातील घटना,त्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी आत्मचरित्र वाचल्या जाते.जगभरातील कित्येक मोठया व्यक्तीचें अनुवादित बायोग्राफी आपल्याला आज उपलब्ध आहे.

मराठी साहित्यातील 'आत्मचरित्रा'ला खऱ्या अर्थाने दलित साहित्यिकांच्या आत्मकथनाने समृद्ध केले.दया पवार लिखित 'बलुत' या आत्मकथेने देशातीलच नव्हे तर विदेशातील शोषित-पीडितांना देखील 'आत्मकथा' लिहिण्यास प्रोत्साहित केले.



ललित निबंध
वैचारिक निबंधापेक्षा ललित निबंधाचे स्वरूप वेगळे असते.यात एखादे व्यक्ती चित्र,एखादी घटना,एखादा अनुभव किंवा एखादा क्षण असे काहीही स्व केंद्री भूमिकेतून कथन करणे ही एक रीत आहे.'स्व' ने केलेले चिंतन,'स्व' च्या आठवणी,'स्व' च्या भावावस्था याचे दर्शन ललित निबंधातून घडते.लालित्यपूर्ण चिंतनप्रक्रिया हे याचे वैशिष्ट्य सांगता येईल.विषयाचे बंधन वा मांडणीची शिस्त असे काही न पाळणारा हा मुक्त लेखन प्रकार आहे.अनुभव,घटना किंवा व्यक्तींकडे पाहण्याची दृष्टी ही लेखकाची खास व्यक्तिगत दृष्टी असते म्हणून ललित निबंधाला विविधताही प्राप्त होऊ शकते. घटना-व्यक्ती यांचा विशिष्ट कालानुक्रम गृहीत धरून 'मी' जेव्हा बोलू लागतो तेव्हा त्या बोलण्याला कथनपरता प्राप्त होते व एखादी हकीगतही ल.निबंधात सामावली जाऊ शकते.सोंदर्ययुक्त मूल्यदृष्टीने जीवनानुभव घेणारा 'मी' ललित निबंधातून प्रकट होत असतो.सर्व मानवीमनाचे - स्वभावाचे सर्व रंग प्रकट करण्याचे सामर्थ्य ललित निबंधात असते.



कविता
कविता हा भावनेला महत्व देणारा साहित्य प्रकार आहे.कवीच्या भावनात्मकतेचे सहज,उत्कट व प्रत्ययकारी संक्रमण वाचकांमध्ये होणे आवश्यक मानले जाते. कवीला भावनात्मक अनुभवाची तीव्र, उत्कट अशा अविष्काराची ओढ असते.त्यातूनच तो काव्यशब्द,काव्यभाषा घडवतो.कवितेत भाषिक मोडतोड मोठ्या प्रमाणावर होते,त्यामागे कवीचा सौंदर्यसर्जनाचा हेतू असतो.व्यवहारभाषेची परंपरागत नियमव्यवस्था, संकेतव्यवस्था मोडली गेल्याने वाचक किंवा श्रोता मूळच्या संकेतव्यवस्थेचे स्मरण ठेवीत कविनिर्मित नव्या व्यवस्थेकडे आकर्षित होतो.भाषेच्या लयींचा,नादगुणांचा,दृश्यागुणांचा,दृश्यात्मकतेचा सूचक वापरही कवी करत असतो. भाषेच्या गद्य साहित्य प्रकारांमध्ये भाषा हे बहुदा माध्यम व साधन म्हणून कार्य करते.परंतु कवितेत भाषा हे भावसंप्रेषणाचे माध्यम बनते.



प्रवास वर्णन
प्रवासवर्णनामध्ये प्रवासात भेटलेल्या व्यक्ती,त्या व्यक्तींचे गुण वैशिष्ट्ये,प्रवासात आलेले संमिश्र अनुभव,ज्या ठिकाणी प्रवास घडला त्या ठिकाणचा भूगोल,इतिहास,लोकांच्या रितिभाती,लोकजीवन,स्थळ वैशिष्ट्ये या सर्वांचाच समावेश असावा लागतो.या सर्व गोष्टींची शब्दाच्या माध्यमातून पुर्नरचना प्रवासवर्णनकारास करावी लागते.तेव्हाच ते ललितरुप धारण करते.नाहीतर ते रुक्ष प्रवासवृत ठरू शकते.प्रवासातील कोणत्या घटना,व्यक्ती,प्रदेश व त्यांच्या अनुभूतीचे दर्शन घडवायचे. हे लेखकाने ठरविलेले असते.'निवड' हे तत्व येथे असते.कारण 'काय सांगायचे?' हा लेखकाचा कलामुल्याशी निगडित प्रश्न आहे.भाषिक निवडीएतकीच आशयाची निवड महत्वाची असते.या निवडीमधून 'वर्णन' ही कलात्मक ठरते.प्रवासवर्णन हे केवळ 'वर्णन' असत नाही त्यात संवाद,कथन,भाष्ये यांचाही यथोचित वापर लेखकाने केलेला असतो.भाषिक सर्जनशीलता प्रकट करणारी प्रवासवर्णने ही उत्कट प्रत्ययकारकता निर्माण करतात. असा लेखक वाचकाला आपल्या अनुभवात सहभागी करून घेतो.त्यामुळे भावनिक व सौंदर्यात्मक संक्रमण घडून येते.मराठीत 'पूर्वरंग व 'अपूर्वाई हे पु. ल. देशपांडेंची प्रवासवर्णने सुंदर उदाहरण आहे.

हे काही प्रमुख प्रकार ललित साहित्यात आहे.या व्यतिरिक्त रुपककथा,लोककथा,दृष्टांत कथा हेही ललित साहित्याचा भाग आहे.

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

भंगु दे काठीन्य माझे - कवी बा.सी.मर्ढेकर

भंगु दे काठीन्य माझे,
आम्ल जाऊ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सुर तुझ्या आवडीचे,

राहू दे स्वातंत्र्य माझे,
फक्त उच्चारांतले गा,
अक्षरां आकार तूझ्या,
फुफ्फुसांचा वाहू दे गा.

लोभ जीभेचा जळू दे,
दे थिजू विद्वेष सारा,
द्रौपदीचे सत्त्व माझ्या
लाभू दे भाषा शरीरा.

जाऊ दे कापर्ण्य 'मी' चे,
दे धरू सर्वांस पोटी;
भावनेला येऊ दे गा
शास्त्र काट्याची कसोटी.

खांब दे ईर्ष्येस माझ्या
बाळगू तूझ्या तपाचे;
नेऊ दे तीतून माते
शब्द तूझ्या स्पंदनांचे.

धैर्य दे अन् नम्रता दे
पाहण्या जे जे पाहणे;
वाकू दे बुद्धीस माझ्या,
तप्त पोलादाप्रमाणे.

आशयाचा तूच स्वामी,
शब्दवाही मी भिकारी,
मागण्याला अंत नाही
आणि देणारा मुरारी.

काय मागावे परि म्या,
तूही कैसे काय द्यावे;
तूच देणारा जिथे अन्
तूच घेणारा स्वभावे.

- कवि बाळ सीताराम मर्ढेकर (१९०९-१९५६)

मी पणाचे कवच, अहंकार गळून पडल्याशिवाय निखळ कवितेची निर्मिति होऊ शकणार नाही
असा ह्या कवितेचा आशय आहे. ही कविता वाक्देवतेला उद्देशून आहे.

करांच्या बाबतीत पहिल्यांदा वाचताना येऊ शकतो.

मर्ढेकरांच्या बाबतीत अश्लीलतेचा आरोप अनेकांनी केला. तो धुरळा आता बर्‍यापैकी खाली बसलेला आहे. त्याबाबतीत मी जास्त काही लिहीत नाही. त्यांना बेधडक भाषा वापरून वाचकांना खडबडून जागे करायचे होते असे वाटते. 'हाडांचे सापळे' झालेले पुरूष, आणि 'किरटी हाडबंडले' झालेल्या बायका, ह्यांच्यातल्या अर्थहीन, यंत्रवत् समागम त्यांना भयावह वाटत होता.

'सोडवेना सोडवीतां
गेल्या रात्रींचा हा पाश
जागा आहें तरी आता
मेल्या इच्छा सावकाश.'

अशा ओळींवर त्या काळात लोक भडकले, वादविवाद घडले. अनेक मान्यवरांनी त्यात भाग घेतला. 'लिंग', 'स्तन'सारखे शब्द मर्ढेकरांच्या कवितेत आल्याने खळबळ माजली. मराठी कवितेला हे नवीन परिमाण मर्ढेकरांनी बहाल केले. तिची नवी अभिव्यक्ती मर्ढेकरांनी घडवली. अभिव्यक्तीच्या कल्पनांत भारतात अजूनही इतका गोंधळ जाणवतो, की हे काम त्या काळात मर्ढेकरांनी केले, हा मोठाच क्रांतिकारी बदल आहे.

मर्ढेकरांचा आशयच इतका संपन्न आहे, की त्यांच्या भाषाशैलीकडे बघायला लोकांना ताकद उरत नाही. बोरकरांसारख्या कवीकडे जे भाषेचे लेणे दिसते, ते मर्ढेकरांकडे दिसत नाही, हे मात्र मान्य केले पाहिजे. शब्दांच्या आविष्कारात, शैलीबाजपणात मर्ढेकर थोडे कमी पडतात की काय, असे वाटत राहते. परंतु मर्ढेकरांनी रुपक, उपमा, उत्प्रेक्षा ह्या अलंकारांचा प्रभावी वापर करून ही त्रुटी फार जाणवू दिली नाही. मर्ढेकरांची रुपके आणि प्रतिमा ह्यांना स्वतःचे एक अस्तित्व येते. त्या कळीचे फुलात रूपांतर व्हावे तशा स्वतःहूनच फुलायला लागतात. त्यांच्या प्रतिमा वाचकाशी भावनांचे नाते जोडून समानता दाखवतात. 'गोळ्यांचे पराग' ह्या वर आलेल्या उपहास करणार्‍या प्रतिमेमधून मर्ढेकर किती चटकन वैफल्य सांगतात! हे सर्वच खुल्या डोळ्यांनी, झापडे न लावता बघायला हवे.

मर्ढेकरांवर असंख्य पुस्तके, लेख लिहिले गेले आहेत. चर्चासत्रे, परिसंवाद ... काही विचारू नका. ह्या लेखात मी कितीसे सांगणार? त्यांच्या सौंदर्यशास्त्रविषयक लिखाणाला मी स्पर्शही करू शकलेलो नाही. माझा तेवढा काही अभ्यासही नाही. त्यांच्या कवितांबद्दल जे वाटलं, ते लिहीलं, एवढंच. दोन-चार आवडलेल्या ओळी वगैरे. मराठी भाषा दिनानिमित्त एका महाकवीबद्दल मराठी भाषेला दिलेला हा छोटासा नजराणा. शेवटी मर्ढेकरांबद्दल ते त्यांच्या देवाला किंवा आदिशक्तीला उद्देशून जे म्हणतात तेच लागू पडते.

'किती पायी लागूं तुझ्या
किती आठवूं गा तूंतें;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनीं येतें.'

कार्ल मार्क्‍स - नारायण सुर्वे

नारायण गंगाराम सुर्वे (जन्म : १५ ऑक्टोबर १९२६; - १६ ऑगस्ट २०१०[]) हे मराठी भाषेतील कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८चा पद्मश्री पुरस्कार प्राप्त.
 नारायण सुर्वे यांच्यावरती मार्क्सवादी विचाराचा पगडा होता ,आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाची कवने लिहिली.

१९२६-२७ मध्ये मुंबईतील चिंचपोकळीतील एका कापडगिरणीसमोर रस्त्यावरचा एक अनाथ जीव गंगाराम सुर्वे या मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये साचेवाला म्हणून काम मरणाऱ्या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. []त्याच गिरणीत बाईंडिंग खात्यात काम करणाऱ्या गिरणी कामगार काशीबाई सुर्वे यांनी या "बाळगलेल्या पोराला' स्वतःच्या मुलासारखे प्रेम दिले आणि "नारायण गंगाराम सुर्वे' हे नावही दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत ते वाढले. कमालीचे दारिद्ऱ्य, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यांतून नारायण सुर्वे यांचे आयुष्य चांगलेच शेकून निघाले. घरात अठराविश्वे दारिद्र्य असतानाही या नारायणाला चार अक्षरे लिहिता-वाचता यावीत म्हणून दादर, अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत घातले. हे दांपत्य मुळचे कोकणातील हेताचीवाडी(भुईबावडा) येथील होते. त्यांनी नारायणास मराठी चौथीपर्यंत शिक्षण दिले. पुढील शिक्षण नारायण सुर्वे यांनी स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केले.नारायण सुर्वे १९३६ मध्ये चौथी इयत्ता उत्तीर्ण झाले आणि गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मुंबई सोडून ते कोकणात गावी निघून गेले. गावी जाताना त्यांनी नारायणाच्या हातावर दहा रुपये ठेवले आणि समोर मुंबईचा विशाल सागर.

मग भाकरीचा चतकोर चंद्र मिळविण्यासाठी नारायण सुर्वे एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशा विसळणारा पोऱ्या, कुणाचे कुत्रे-कुणाचे मूल सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणारा पोरगा, अशी कामे करीत वाढले. गोदरेजच्या एका कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले, टाटा ऑइल मिलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीत धागाही धरला. बॉबीन भरली. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. आणि १९६१ मध्ये शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे "सुर्वे मास्तर' झाले.

"कधी दोन घेत, कधी दोन देत' आयुष्याची वाटचाल सुरू असतानाच जिंदगीच्या धगीवर शब्द शेकून घेत त्यांनी मराठी काव्यप्रांतात एक नवा सूर घुमवला. त्यांची पहिली कविता १९५८ मध्ये "नवयुग' मासिकात प्रसिद्ध झाली. "डोंगरी शेत माझं गं....' हे त्यांचे पहिले गाजलेले गीत. एचएमव्हीने त्याची ध्वनिफीत काढली. .

गुजराण करण्यासाठी नारायण छोटेमोठे व्यवसाय करत असे. या काळात स्वतःच्या हिंमतीने तो लिहिण्या-वाचण्यास शिकला संदर्भ हवा ]. इ.स. १९६२ साली त्यांनी लिहिलेल्या कवितांचा पहिला संग्रह - "ऐसा गा मी ब्रह्म" - प्रकाशित झाला.त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.

सुर्वे वाढले त्या चाळीतील सारेच जण साम्यवादी पक्षात होते. डावी चळवळ जोरात होती. ती चळवळ हा त्यांचा मोठा आधार बनली. सुर्व्यांच्या वैचारिक प्र वासाची ही सुरुवात होती. "माझ्या पहिल्या संपात मार्क्सआ मला असा भेटला,' असे सांगणाऱ्या सुर्व्यांची साम्यवादी, डाव्या विचारप्रणालीशी बांधिलकी आहे. कम्युनिस्ट चळवळीत ते "रेडगार्ड' बनले. या चळवळीतील एक कॉम्रेड तळेकर यांच्या भाचीवर त्यांचे प्रेम बसले. आई-बापाविना वाढलेल्या कृष्णा साळुंके हिच्याशी त्यांनी विवाह केला. आयुष्यातील कष्ट संपले नव्हते. खारजवळ एका झोपडपट्टीत त्यांनी संसार थाटला होता. मोठा मुलगा अवघा बावीस दिवसांचा असतानाच हे झोपडे तोडले गेले. आठ दिवस फुटपाथवरच संसार होता. या अनुभवातून आलेल्या कवितेला दैनंदिन जीवनातील कठोर वास्तवाशी, दैनंदिन संघर्षाशी जोडण्याचे क्रांतिकार्य श्री. सुर्वे यांनी केले आहे. जीवनात जे वास्तव अनुभवले, त्यांचे भांडवल करायचे नाही, अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे ते अनेकांना आपले वाटतात. पदपथापासून विद्यापीठापर्यंत आणि कामगारांपासून ते बुद्धिनिष्ठ समीक्षकांपर्यंत त्यांच्या कवितांना रसिकमान्यता मिळाली. संत कबीरालाही त्याच्या आईने नदीकाठी सोडले. कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला...त्यालाही त्याची जात सांगता आली नाही अन् मलाही...असे सुर्वे म्हणत.

त्यानंतर सुर्वे यांचे कवितासंग्रह एकामागोमाग येत राहिले. गाजत रा हिले. "माझे विद्यापीठ', "जाहीरनामा', "पुन्हा एकदा कविता', "सनद' हे त्यांचे कवितासंग्रह. नालबंदवाला याकूब, चंद्रा नायकीण, दाऊद शिगवाला, हणम्या, इस ल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी सह्याद्रीचा कडा उतरून मुंबईत कामधंद्याच्या शोधात आलेल्या व समुद्राच्या तीरावर झुंजत मरण पावलेल्या एका कष्टकरी मुलाचा बाप, आपल्या तारुण्यातील पराक्रम मुलाला ऐकविणारा वृद्ध पिता, गोदीवर काम करणारा आफ्रिकन चाचा, पंडित नेहरूंचे निधन झाले म्हणून धंदा बंद ठेवणारी सुंद्री वेश्या , अशी अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी अत्यंत समर्पकपणे व रेखीवपणे उभी केली आहेत. सुर्व्यांचे पहिलेवहिले काव्यवाचन झाले ते कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगावच्या साहित्य संमेलनात. त्या वेळेपासून ते प्रत्येक काव्यमैफलीत खड्या सुराने रंग भरत आहेत. "मास्तर, तुमचंच नाव लिवा...', "असं पत्रात लिवा', "मर्ढेकर', "सर कर एकेक गड', "मनिऑर्डर', "मुंबईची लावणी', "गिरणीची लावणी' या त्यांच्या कविता हमखास पावती घेतात. श्री. सुर्वे यांनी त्यांच्या कवितेतून ईश्वरवाद, प्रारब्ध, उच्च-नीचता किंवा जातीचा कधीही उल्लेख केलेला नाही. त्यांनी मराठी कवितेत कामगारांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे जग शब्दबद्ध करून आणि त्यांच्या संघर्षातून कृतिशील आशावादाकडे झेपावणाऱ्या आकांक्षांचे चित्रण, पुरोगामी विचारांच्या मुशीतून निघालेल्या शब्दकळेद्वारे केले आणि मराठी कवितेला सामाजिक बांधिलकीचा विशाल आशय प्राप्त करून दिला.

नारायण सुर्वे यांचे १६ ऑगस्ट २०१० रोजी निधन झाले.

ज्यांना सुर्वे दिसू आले नाहीत, अशांसाठी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी एकदा सांगितले, "अरे, केशवसुत कशाला शोधतांय? तुमचा केशवसुत परळ मध्येच राहतोय.

काव्य संग्रह 

ऐसा गा मी ब्रह्म

जाहीरनामा

नव्या माणसाचे आगमन

पुन्हा एकदा कविता

माझे विद्यापीठ

सनद

नारायण सुर्वे यांच्या काव्याचा नमुना

आम्ही नसतो तर हे सूर्यचंद्र , तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते.
बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते.
जन्ममरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते, चला बरे झाले;
आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते...जेव्हा मी या अस्तित्त्वाच्या पोकळीत नसेन, तेव्हा एक कर, .......


"असे आम्ही लक्षावधी नारीनर दिवस असे तो वावरतो,

राबता, खपता आयुष्य मेणबत्तीसम विझवुन घेतो."

[[ तेव्हा एक कर ! ]]

जेव्हा मी या अस्तित्त्व पोकळीत नसेन

तेव्हा एक कर

तू निःशंकपणे डोळे पूस.

ठीकच आहे चार दिवस-

उर धपापेल, जीव गुदमरेल.

उतू जणारे हुंदके आवर,

कढ आवर.

उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस

खुशाल, खुशाल तुला आवदेल असे एक घर कर

मला स्मरून कर,

हवे अत्र मला विस्मरून कर.

{{ दोन दिवस वाट पाहण्यात गेले}}

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले

हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो

दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

[[इतका वाईट नाही मी]]

इतका वाईट नाही मी ; जितका तू आज समजतेस

दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस

तडजोड केली नाही जीवनाशी ; हे असे दिवस आले

आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले

हारलो कैकदा झुंजीत ; तूच पदराचे शीड उभारलेस

हताश होऊन गोठलो ; तूच पाठीवर हात ठेवलेस

कसे जगलो आपण , किती सांगू , किती करून देऊ याद

पळे युगसमान भासली ; नाही बोलवत. नको ती मोजदाद.

अशी उदास , आकुल , डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको

आधीच शरमिंदा झालो आहे ; अधिक शरमिंदा करू नको

आयुष्य घृणेत सरणार नाही ; हवीच तर घृणाही ठेव.

नारायण सुर्वेवरील पुस्तके

ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.

नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांनी नारायण सुर्व्यांच्या आठवणी ’मास्तरांची सावली’ या आत्मकथनात्मक पुस्तकात लिहिल्या आहेत.

सुर्व्यांच्या काव्याची इहवादी समीक्षा (डाॅ. श्रीपाल सबनीस)

नारायण सुर्वे यांना मिळालेले पुरस्कार 

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (इ.स. २००४)

मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९९८)

सोव्हिएत रशियाचं नेहरू ॲवॉर्ड

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा नरसिंह मेहता पुरस्कार

कराड साहित्य पुरस्कार

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, वगैरे.

कार्ल मार्क्स - कविता

माझ्या पहिल्या संपातच

मार्क्‍स मला असा भेटला.

मिरवणुकीच्या मध्यभागी

माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता.

जानकी अक्का म्हणाली, ‘वळिखलंस ह्याला –

ह्यो आमचा मार्कसबाबा

जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले

आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला.

‘सन्याषाला काय बाबा

सगळीकडची भूमी सारखीच

तुझ्यासारखी त्यालाही चार कच्चीबच्ची होती.’

माझ्या पहिल्या संपातच

मार्क्‍स मला असा भेटला.

 नारायण सुर्वे हे परभणी येथे इ.स. १९९५मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

पुढे एका सभेत मी बोलत होतो,

– तर या मंदीचे कारण काय

दारिद्र्याचे गोत्र काय

पुन्हा मार्क्‍स पुढे आला; मी सांगतो म्हणाला,

आणि घडाघडा बोलतच गेला.

परवा एका गेटसभेत भाषण ऐकत उभा होता.

मी म्हणालो –

‘आता इतिहासाचे नायक आपणच आहोत,

यापुढच्या सर्वच चरित्रांचेही.’

तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजविली

खळखळून हसत, पुढे येत;

खांद्यावर हात ठेवीत म्हणाला,

‘अरे कविता-बिविता लिहितोस की काय

छान, छान.

मलासुद्धा गटे आवडायचा.’

मैत्री २०१२शोधा
शोधा 
मुख्य मेनू
मुखपृष्ठ
About
पोस्टचे नॅव्हिगेशन← PreviousNext →
कार्ल मार्क्स
Posted on एप्रिल 12, 2023
कवितांच्या प्रदेशात : २
 
डॉ. उमेश करंबेळकर 
एकोणिसाव्या शतकातील, ज्याच्या विचारांनी संपूर्ण जगातील औद्योगिक विश्वात क्रांती घडवून आणली आणि साम्यवादी विचारसरणीचा ज्याने पाया घातला, असा महान जर्मन तत्वज्ञ म्हणजे कार्ल मार्क्स ! भारतातील कामगार चळवळीचं, विशेषतः गेल्या शतकातील मुंबईतील गिरणी कामगारांच्या चळवळीचं, प्रेरणास्थानही ‘मार्क्स आणि त्याची विचारसरणी’ हेच होतं. साहजिकच ज्यांचं बालपण गिरणगावात एका सामान्य गिरणी कामगाराच्या घरात गेलं त्या कविवर्य नारायण सुर्व्यांच्या कानावर मार्क्सचं नाव फार लहानपणीच पडलं आणि साम्यवादी विचारसरणीचं बाळकडूही त्यांना तेव्हाच मिळालं. मार्क्सचा हा प्रभाव सुर्व्यांवर अखेरपर्यंत कायम राहिला.
कार्ल मार्क्स सुर्व्यांच्या शरीरात आणि मनात किती खोलवर भिनला होता याचे उदाहरण म्हणजे त्यांची ‘कार्ल मार्क्स’ ही कविता. ही कविता त्यांच्या ‘जाहीरनामा’ या काव्यसंग्रहातील आहे. खरं तर, कार्ल मार्क्स हा एका महाकाव्याचाच विषय. त्याला तीस-चाळीस ओळींच्या कवितेत बसविणे म्हणजे कठीणच. परंतु असामान्य कवितेचं वैशिष्ट्य असं की अल्प पण समर्पक शब्दांत ती फार मोठा आशय आणि विषय प्रकट करते. कार्ल मार्क्स या कवितेत आपल्याला ह्या गोष्टीची प्रचिती येते.

कार्ल मार्क्स

माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला

मिरवणुकीच्या मध्यभागी
माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता.
जानकी अक्का म्हणाली ‘वळिखलंस ह्याला-
ह्यो आमचा मार्क्सबाबा
जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले
आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला.
संन्याशाला काय बाबा
सगळीकडची भूमी सारखीच
तुझ्यासारखीच त्यालाही चार कच्चीबच्ची होती.’
माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला.

पुढे; एका सभेत मी बोलत होतो,
तर या मंदीचं कारण काय ?
दारिद्याचे गोत्र काय ?
पुन्हा मार्क्स पुढे आला ; मी सांगतो म्हणाला
आणि घडाघडा बोलतच गेला.

परवा एका गेटसभेत भाषण ऐकत उभा होता.
मी म्हणालो –
‘आता इतिहासाचे नायक आपणच आहोत,
या पुढच्या सर्वच चरित्रांचेही.’
तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजविली
खळखळून हसत, पुढे येत ;
खांद्यावर हात ठेवीत म्हणाला,
‘अरे, कविता-बिविता लिहितोस की काय ?
छान, छान.
मलासुद्धा गटे आवडायचा.’

नारायण सुर्व्यांच्या जीवनसंघर्षाची सुरुवात त्यांच्या जन्मापासूनच सुरू होते. त्यांच्या आईने त्यांन चार-पाच महिन्यांचे असताना एका कापड गिरणीच्या गेटवर टाकून दिलं. १९२६ साली गंगाराम सुर्वे ह्या गिरणी कामगाराला त्याच्या गिरणीच्या गेटपाशी हे अनाथ मूल सापडलं. त्याने त्या मुलाला घरी आणलं आणि त्याचं नाव ठेवलं नारायण.विशेष म्हणजे त्याने आणि त्याच्या बायकोने ह्या मुलाला कधी परकं मानलं नाही आणि पोटच्या गोळ्याप्रमाणे त्याचं पालन-पोषण केलं. अशा तऱ्हेने माणुसकीचे संस्कार सुर्व्यांवर फार लहानपणीच झाले होते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आधुनिक मराठी कवितेला ज्यांच्या कवितांनी वेगळे वळण दिलं त्या कविवर्य नारायण सुर्व्यांची ही आगळीवेगळी जन्म कहाणी.

सुर्व्यांनी गिरणी कामगाराचं हलाखीचं जीवन फार जवळून पाहिलं. काही काळ त्यांनी गिरणीत नोकरीही केली. नंतर त्यांनी शाळेत शिपाई म्हणून व नंतर तेथेच शिक्षक म्हणून काम केलं. १९५६ च्या सुमारास त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली. सुर्व्यांचं ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘माझे विद्यापीठ,’ ‘जाहीरनामा’ आणि ‘नव्या माणसाचे आगमन’ असे चार काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.सुर्व्यांची कविता कामगार, वेश्या, दादर पुलाखालची माणसे, पोस्टर चिकटवणारी माणसे अशा मुंबापुरीतील उपेक्षितांच्या वेदना सजीव करणारी आहे. ह्या सर्वांच्या जीवनाशी त्यांचा निकटचा संबंध आल्यामुळे त्यांच्या कवितेतील वास्तव काळजाला भिडणारं ठरतं. सुर्व्यांना माणसांच्या गर्दीत वावरायला आवडायचं. त्यामुळे त्यांच्या कवितेचा विषयही प्रामुख्याने माणूसच राहिला.

त्यांच्या बऱ्याचशा कविता निवेदन शैलीतील आहेत. याचं कारण त्यांना कवितेच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधायचा असे. कागदावरील कवितेपेक्षा सादरीकरणातून प्रकट झालेली कविता अधिक परिणामकारक ठरते. सुर्वे आपली कविताही तितक्याच ताकदीने सादर करत. त्यामुळे त्यांच्या कवितावाचनास रसिकांची गर्दी होई.

‘संथ निवेदनात्मक, संवादांचा वापर प्रभावीपणे करणारी, बोली भाषेशी जवळीक साधणारी आणि गद्याच्या अंगाने जाणारी’ असं सुर्व्यांच्या काव्यशैलीचं थोडक्यात वर्णन करता येईल.
सुर्व्यांच्या कवितेची ही सर्व वैशिष्ट्यं त्यांच्या कार्ल मार्क्स या कवितेत आपल्याला पाहायला मिळतात.
कवितेच्या सुरुवातीस मार्क्स आपल्याला पहिल्या संपात भेटला असं सांगून सुर्वे तो कसा भेटला याचा किस्सा सांगतात. कुठल्याही संपाची सुरूवात मिरवणुकीने किंवा मोर्चाने होते. मिरवणूकीत कोण आणि किती सामील झाले यावरून कामगारांना जशी आपल्या शक्तीची जाणीव होऊन उमेद मिळते, आधार मिळतो त्याप्रमाणे मालकवर्गालाही कामगारांची ताकद कळते आणि कामगारांच्या असंतोषाची जाणीव होते.

अशाच एका मिरवणुकीत सुर्व्यांच्या खांद्यावर मार्क्सचं छायाचित्र असलेला बॅनर होता. त्याकडे बोट दाखवून अशिक्षित जानकी अक्का आपल्या ग्रामीण भाषेत सुर्व्यांना मार्क्सची ओळख करून देते. मार्क्सचा ती ‘आमचा मार्क्सबाबा’ असा एकेरी उल्लेख करते. मार्क्सचा जन्म जर्मनीत झाला पण त्याचा शेवट इंग्लंडमध्ये झाला. त्याचं सर्वात मोठं कार्य म्हणजे त्याची ढीगभर ग्रंथसंपदा. खरं म्हणजे जानकीअक्कासारख्या एका अशिक्षित कामगार बाईनं सुर्व्यांना मार्क्सची ओळख करून द्यावी हीच एक अपूर्व घटना मानली पाहिजे. यातून सुर्वे मार्क्स कामगारवर्गात किती आणि कसा रुजला होता हे अप्रत्यक्षरित्या आपल्या ध्यानात आणून देतात. पोताभर ग्रंथ यातून मार्क्सचा विचार केवढा व्यापक आहे हे ते दाखवतात. त्याचबरोबर आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी शिकणं किती महत्वाचं आहे याची जाणीव जानकीअक्काला झाल्याचंही यातून दिसून येतं.
‘सन्याशाला काय बाबा सगळीकडची भूमी सारखीच’ या वाक्यातून मार्क्स केवळ जर्मन अथवा इंग्लंडपुरता मर्यादित नव्हता तर तो जगातील सर्व देशातील कामगारांचा, कष्टकरी वर्गाचा निरिच्छ नेता होता हे जानकीअक्का सांगते.

परंतु ह्या सर्वांपेक्षा ‘तुझ्यासारखीच त्यालाही चार कच्चीबच्ची होती.’ या वाक्यातून कार्ल मार्क्सची एखादा धीरगंभीर चेहऱ्याचा, हस्तिदंती मनोऱ्यात राहून प्रबोधन करणारा तत्वज्ञ अशी प्रतिमा डोळ्यासमोर न येता एखाद्या सर्वसामान्य कुटुंबवत्सल गृहस्थाचा प्रेमळ चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो आणि मार्क्सची ही प्रतिमा आपल्याला अधिक भावते.
त्यानंतर सुर्वे आपल्याला एका सभेतील अनुभव सांगतात. एका कामगार सभेत बोलत असताना सुर्वे आर्थिक मंदी आणि त्यातून निर्माण होणारी गरिबी यांचा संबंध कामगारांना सोप्या भाषेत समजावून देत असतात. तेव्हा त्यांच्या तोंडातून मार्क्सचे विचार बाहेर पडू लागतात. हा अनुभव कवितेत शब्दबद्ध करताना सुर्वे म्हणतात, ‘पुन्हा मार्क्स पुढे आला; मी सांगतो म्हणाला, आणि घडाघडा बोलतच गेला.’ त्यावेळी सुर्व्यांच्या आचार विचार आणि उच्चारातून मार्क्सच प्रकट होत होता. इतका तो त्यांच्या शरीरात भिनला होता.

जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास घेता तेव्हा तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी तीच गोष्ट दिसू लागते. विठ्ठलाचा ध्यास घेतलेल्या तुकाराम महाराजांना ‘विठ्ठल गिती, विठ्ठल चित्ती’ असे झाले आणि ते अवघे विठ्ठलमय होऊन गेले.

मार्क्सचा ध्यास घेतलेल्या सुर्व्यांना असाच अनुभव एका गेट सभेत बोलताना आला. सुर्व्यांना चक्क मार्क्स त्यांचं भाषण ऐकताना दिसला.त्या सभेत बोलण्याच्या ओघात,’ आता इतिहासाचे नायक आपणच आहोत, या पुढच्या सर्वच चरित्रांचेही’ या वाक्यातून सुर्व्यांमधला कवी डोकावला आणि त्या वाक्याला मार्क्सने कडाडून टाळी वाजवली. पुढे येऊन सुर्व्यांच्या खांद्यावर हात टाकून तो म्हणाला, ‘अरे कविता बिविता लिहितोस की काय ? छान छान, मलासुद्धा गटे आवडायचा.’

इथे कविता संपते. ‘मलासुद्धा गटे आवडायचा’ यातून मार्क्स रूक्ष,कोरडा विचारवंत नव्हता. त्याला साहित्याची आवड होती, तो काव्यप्रेमी रसिक होता हे जाणवतं आणि त्याच्याबद्दलचा आपल्या मनातील आदरभाव दुणावतो हे खरे. पण तेवढाच मर्यादित अर्थ त्यातून ध्वनित होत नाही.

खरं म्हणजे सुर्व्यांच्या कवितांचा शेवट फार परिणामकारक असतो. उदाहरणार्थ, ‘शीगवाला’ या कवितेत शेवटी दाऊदचाचा आजच्या जीवनाचं कठोर वास्तव सांगताना, ‘सब्दाला, जागवेल असा कोन हाय दिलवाला, सबको पैसेने खा डाला.’ असं म्हणतो तेव्हा त्यातील दाहक वास्तवता आपल्या काळजाला भिडते. किंवा ‘का गा ग्रंथगर्व’ या कवितेत भाकरी महात्म्य सांगताना शेवटी सुर्वे ‘संपलाच नाही भाकरीचा मार्ग, ग्रंथातले स्वर्ग कशापायी ?’ असा रोखठोक सवाल करतात तेव्हाही आपण असेच सुन्न होतो.

कार्ल मार्क्स या कवितेच्या शेवटी सुर्वे आपल्याला असाच एक वेगळा धक्का देतात. ‘मलासुद्धा गटे आवडायचा’ या मार्क्सच्या वाक्यातून गटेचे पर्यायाने कवीचे सामाजिक, राजकीय तसेच वैचारिक क्रांतीमधील महत्व अधोरेखित होते.सर्व क्षेत्रातील क्रांतिकारकांना आणि त्यांच्या क्रांतीला काव्याचे अधिष्ठान असतं. किंबहुना क्रांतीची ज्योत ऊर्जस्वल कवनाने पेटविली जाते असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

फ्रान्सच्या राज्यक्रांतीला ‘रूझे द लील’ या तरुण अधिकाऱ्याने लिहिलेल्या ‘ला मार्सेएझ’ या गीताने चैतन्य दिलं. या गीताचा खेड्यापाड्यांतून, वस्तीवस्तीतून प्रसार झाला आणि संपूर्ण फ्रेंच सैन्य या गीताच्या ध्वनीने स्वातंत्र्यसिद्ध झालं. हेच गीत पुढे फ्रान्सचं राष्ट्रगीत म्हणून मान्यता पावलं. कवी आणि कवितेचं महत्त्व लक्षात येण्यासाठी हा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे.

गटे हा जर्मनीचा महान कवी समजला जातो आणि मार्क्सवर गटेचा प्रभाव होता. असाच प्रभाव सुर्व्यांच्या काव्यवाचनामुळे मुंबईतल्या कामगार वर्गावर पडत असे. म्हणूनच ‘सुर्व्यांची कविता लढाऊ वृत्तीची व सामाजिक क्रांतीची उपासना करणारी आहे’ असे गौरवोद्गार , ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ हे अजरामर काव्य रचणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रजांनी काढले.

सुर्वे स्वतःला ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुतांच्या कविपरंपरेचा पाईक समजत. ‘ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत नसते तर आपण कोणीच नसतो’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘मलासुद्धा गटे आवडायचा’ यातून मार्क्सपेक्षाही कवी गटे अधिक श्रेष्ठ हेच त्यांना सुचवायचं आहे. कवितेच्या एका ओळीतदेखील प्रस्थापित व्यवस्थेला हादरा देण्याचं सामर्थ्य असतं, हे सुर्वे जाणून होते. त्या दृष्टीने कवी असामान्य, असाधारण असतो. म्हणूनच ‘मार्क्स आणि मार्क्सवाद श्रेष्ठ आहेच पण पोथिनिष्ठ मार्क्सवाद्यांकडून माणूस आणि कलेच्या स्वातंत्र्यावर बंधने आली तर … तर माणसाचा आणि कलेतील सच्चा स्वातंत्र्याचा पक्ष तोच माझाही राहील’ असं सुर्व्यांनी ‘कविता आणि मी’ या लेखात ठामपणे सांगितलं आहे.

‘मलासुद्धा गटे आवडायचा’ या वाक्यातून मार्क्सवादाची मर्यादा आणि विचार स्वातंत्र्य जपणाऱ्या व त्याचा आग्रह धरणाऱ्या कवीचं श्रेष्ठत्व एकाच वेळी सुर्वे आपल्या नजरेस आणतात. त्यामुळे कवितेला एक वेगळेच परिमाण प्राप्त होऊन ही कविता सुर्व्यांच्या सर्वोत्कृष्ट कवितांमध्ये स्थान प्राप्त करते.

– संग्रहित साभार ©️ डॉ. उमेश करंबेळकर, सातारा.


बातमी लेखन

अलीकडील, सद्य घडामोडींविषयी लिहिलेली माहिती म्हणजे बातमी होय. अर्थातच बातमीतील मजकुराला काळाचा संदर्भ असतो. बातमी ही अनेक माध्यमांद्वारे दिल...