मंगळवार, २३ जुलै, २०१९

डोळे हे जुलमी गडे - भा. रा. तांबे


डोळे हे जुलमि गडे
डोळे हे जुलमि गडे
रोखुनि मज पाहुं नका!
जादुगिरी त्यांत पुरी
येथ उभे राहुं नका.

घालुं कशी कशिदा मी?
होती किति सांगुं चुका!
बोचे सुइ फिरफिरुनी
वेळ सख्या, जाय फुका.

खळबळ किति होय मनीं!
हसतिल मज सर्वजणी;
येतिल त्या संधि बघुनि
आग उगा लावुं नका!
गीत-भा. रा. तांबे
संगीत-वसंत प्रभू
स्वर-आशा भोसले ,  जी. एन्‌. जोशी
राग-मिश्र मारुबिहाग
• काव्य रचना- १८९१ साल.
• स्वर- आशा भोसले, संगीत- वसंत प्रभू.
• स्वर- जी. एन्‌. जोशी, संगीत- जी. एन्‌. जोशी.




भावकवी - भा.रा.तांबे....


कविवर्य भा.रा.तांबे अंथरुणास खिळले होते तेंव्हाची काव्य जन्माची एक कथा आहे… आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो असल्याचे त्याना जाणवत होते त्यावेळी त्यांचे एक स्नेही जवळ येऊन त्यांच्यापाशी कविता लिहिण्याचे आर्जव करू लागले. तांबेंनी आयुष्याच्या अंतिम वाटेवर काही तरी बोलावे किंवा लिहावे अशी विनवणीही त्यांनी जाता जाता केली…. काही दिवसांनी त्या संपादक महोदयांचे कविता पाठविण्यासाठीचे आठवण वजा विनंती करणारे पत्र तांबेंना मिळाले. त्यांच्या त्या विनंतीस उत्तर म्हणून भा.रा. तांबेंनी या प्रसंगावर त्यांना सुचलेली एक कविता पोस्टकार्डावर लिहून त्या संपादक मित्रास पाठवली होती.पाठविली होती...
तांबेंनी लिहिलेली ती कविता म्हणजे मृत्यूकडे केलेली एक तक्रारवजा कैफियत आहे ! अंथरुणाला खिळलेल्या तांबेंनी आपल्या मित्राची विनंती पुरी करताना आर्त शब्दात स्वतःच्या वेदना भावबद्ध केल्या अन एक अजरामर कविता जन्मास आली ती म्हणजे, 'मधु मागसी आता …"

मधु मागसी माझ्या सख्या, परि
मधुघटचि रिकामे पडति घरी !

आजवरी कमळाच्या द्रोणीं
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करि न रोष सख्या, दया करी.

नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणीं कशी तरी.

तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवे तुज,
मधु पिळण्या परि बळ न करीं !

ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविति हृदया,
आता मधुचे नाव कासया ?
लागले नेत्र हे पैलतिरीं.

जो काव्यमधु तू मागत आहेस त्याचे कित्येक मधुघट रिते होऊन घरी पडून आहेत ज्याकडे बघायला आता फुरसत राहिली नाही. आता मात्र नव्याने हे मधुघट माझ्याकडे सहजतेने निर्मिले जावेत अशी माझी शारीरिक अवस्था राहिलेली नाही अशी दिनवाणी कबुली या कवितेच्या सुरुवातीस कवींनी दिली आहे.

जेंव्हा माझी गात्रे शिथिल नव्हती, स्मृती सक्षम होत्या अन शरीर साथ देत होते तेंव्हा माझ्या मनातली फुलपाखरे हा काव्यमधु अगदी लीलया निर्मित होती. अगदी कमळाच्या विशाल द्रोणी भरून मी हा शब्दरस तुझ्या स्वाधीन करत होतो. तेंव्हा मला साधनांची कमतरता भासत नव्हती. मनातली उर्मी दाटून आली की ती शब्दबद्ध व्हायची पण आता तशी परिस्थिती उरली नाही. तुला देण्याजोगे माझ्याकडे काही नुरले जरी माझी पूर्वीची ही काव्यसेवा ध्यानात घेऊन तू आता माझ्यावर रागावू नकोस. तू मला माफ कर अन माझ्यावर थोडासा दयाभाव दाखव अशी विनंती कवी आपल्या 'त्या' मित्रास करतात.

माझा हा अखेरचा प्रवास सुरु आहे, हा प्रवास कधी अन कसा संपेल हे मलाही माहिती नाही. मात्र शेवटच्या काळात मला त्या परमात्म्याचे परमेश्वराचे आराधन करायचे आहे. त्याचे स्तवन करायचे आहे, त्याच्या पूजनासाठी माझ्या प्रतिभेचे उरले सुरले चार शब्द मी जपून ठेवले आहेत, या भावनेचे अगदी हळवे वर्णन करताना भा.रा.तांबेंनी जो उपमा अलंकार वापरला आहे तो अगदी अद्भुत अन विलक्षण परिणामकारी असा आहे. ते म्हणतात की दुधाच्या नैवेदयाची एकच वाटी माझ्या गाठी आहे अन देवपुजेस्तव एकच काटेरी फुलझाड (कोरांटी) मी कसेबसे माझ्या अंगणी तग धरून राखिली आहे ! उरले सुरले काव्यस्फुरण फक्त प्रभूचरणी अर्पण करण्यासाठी राखून ठेवल्याने आता तुला देण्यासाठी माझ्याकडे मधुघट राहिले नाहीत याची मला खूप खंत वाटते आहे असे कवी इथे सुचवतात.

आपल्या मित्रास किंवा आपल्या रसिक वाचक- चाहत्यांना आपल्याकडून काय लिहिले जावे याची मर्मभेदी जाणीव तांबेंना आहे. युवा मनाची स्पंदने ज्या प्रेमभावनेत कैद असतात, ती प्रेमभावना युवामनाची भाषा असते अन त्यांचे श्वास हीच त्यांची कुजबुज असते. प्रतिभावंत साहित्यिक या श्वासांना शब्दात परावर्तित करतात अन या कुजबुजीला कवितेचे प्रारूप मिळवून देतात. हे प्रेमकाव्य आपल्या नवनावोन्मेशशाली प्रतिभासामर्थ्याने कवी जिवंत करतात अन वाचक त्या काव्यास आपल्या हृदयात अढळ स्थान देतात. याहीपुढे जाऊन काहींना जगण्याचे ध्येय हवे असते तर काहींना जगण्याचा खरा अर्थ शोधायचा असतो त्यासाठी ते अविरतपणे संसारसुखाचे मर्म शोधत असतात. कवी मात्र फुलांचे परागकणदेखील न दुखावता त्यातून अलगद मधुर मधुकण शोषून घ्यावे इतक्या सहजतेने जीवनातील मर्म हलकेच समोर मांडत जातात. त्यातला अर्थ बघून आपण दिग्मूढ होऊन हरखून जातो. कवी म्हणतात की आता अशा भावना, असे विचार शब्दबद्ध करावे इतके भान माझ्याकडे उरले नाही. माझ्या अंगी तितके बळही राहिले नाही.तेंव्हा तू त्याविषयीची आर्जवे मला करू नकोस !

शेवटच्या कडव्यात कवी अगदी आर्ततेने ह्रदयाला पीळ पडतील अशा शब्दात आपली व्यथा मांडतात. 'आता अंतःकाळ जवळ आला आहे, ज्याप्रमाणे पूर्वेस रम्य प्रभातीस उगवलेला सूर्य निरव सांजेला मावळतो हा निसर्गनियम आहे त्याप्रमाणे जन्माला आलेल्या प्रत्येकास मृत्यू अटळ असतो. या निसर्ग नियमास आपण कसे अपवाद असू शकू ? आता माझा श्वाससूर्य ढळणार आहे, ही सांजवेळ मला काहीशी कातरवेळ वाटते आहे अन त्यामुळे थोडीशी घबराट देखील माझ्या मनात दाटून आली आहे असे प्रामाणिक कथन ते इथे करतात. अशा या बिकट प्रसंगी काव्यमधुचे स्फुरण होईल तरी कसे असा सवाल कारतानाच ते म्हणतात की आता माझे चित्त कशातच गुरफटले नसून माझे नेत्र केवळ आणि केवळ पैलतीरावरच्या आत्मीय ज्योतीत लीन झाले आहेत. तेंव्हा माझ्या सख्या आता मला तू ह्या काव्यमधुचा आग्रह करू नकोस' असे म्हणत म्हणत साश्रूपूर्ण शब्दांची ओंजळ ते आपल्या मित्राच्या ओंजळीत रिती करतात.
कविवर्य भा.रा.तांबे यांची ही कविता म्हणजे अंथरुणाला खिळलेल्या जर्जर माणसाने मृत्यूशी केलेली गुजगोष्टच आहे.

बालभारतीच्या पुस्तकातील कवितांचे शालेय जीवनाशी असणारे नाते दृढ करणारे जे प्रमुख कवी आहेत त्यात भा.रा.तान्बेंचे नाव सदैव असणार आहे याचे कारण म्हणजे स्मरणकुपीत त्रिकाल दरवळत राहतील अशा त्यांच्या आर्त आणि हळव्या भावकविता होय.

आजकाल जो तो म्हणतो की, 'मनाला उभारी देईल असे चांगले अन आवर्जून वाचावे असे लिहिले जात नाही. जर कुणी लिहिलेच तर वाचले जात नाही अन थोडे फार वाचले गेले त्यावर म्हणावी तशी साधकबाधक चर्चाही होत नाही…' मात्र सिंहावलोकन करून मागे पाहिले तर साहित्याचा हिमालय आपल्याला दिसतो पण आपण त्याकडे पाहत नाही. कारण आपण खरे कर्मदरिद्री रसिक झाले आहेत. शब्दसारस्वत आहेत, त्यांचा ठेवा आहे पण रसिक, वाचक, श्रोते अज्ञातात गुरफटलेत. अनमोल ठेवा आपल्याकडे असून आपण त्याचा आस्वाद घेत नाही. आस्वादाचे मधुघट पडून आहेत अन आपण आभासी अमृत शोधत आहोत अशी आपली अवस्था झालीय…अशाच एका महान कवीच्या काव्यप्रतिभेचा ओझरता आलेख या लेखात मांडला आहे.

जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय !'
मी जाता राहिल कार्य काय ?
सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय ?
मेघ वर्षतिल, शेते पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल
कुणा काळजी की न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय ?
सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामिं लागतिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जाता त्यांचे काय जाय ?
अशा जगास्तव काय कुढावे !
मोहिं कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ?
लोकभावना आणि मनातला आक्रोश यांवर अत्यंत बोलके भाष्य करणारी ही कविता आज सहा दशकानंतरही तितकीच टवटवीत वाटते कारण कवितेची साधी रचना प्रवाही अशी गेय काव्यशैली होय !

घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्‍न मना, बघ जरा तरी !
ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणीं
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी
फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणिं अमरता ही न खरी ?
मना, वृथा का भीशी मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरीं
या कवितेतील कोणत्याही ओळी जरी मनःचक्षुपुढे आल्या तरी मनातली मरगळ दूर होते. या कवितेत 'मना, वृथा का भीशी मरणा' असा रोकडा सवाल ते करतात.

डोळे हे जुलमि गडे
रोखुनि मज पाहु नका !
जादुगिरी त्यात पुरी
येथ उभे राहु नका.
घालु कशी कशिदा मी ?
होती किति सांगु चुका !
बोचे सुइ फिरफिरुनी
वेळ सख्या, जाय फुका.
खळबळ किति होय मनीं !
हसतिल मज सर्वजणी;
येतिल त्या संधि बघुनि
आग उगा लावु नका !
नवप्रेमाची पहिली बोलणी ही डोळ्यांच्या माध्यमातून होते. प्रत्यक्ष बोलणी अशी होत नसतात. जे काही सांगायचे आहे ते नयनकटाक्षातून सांगावे लागते. अशा वेळी जर आपला सखा सर्वासमोर आपल्याकडे एकटक रोखून बघत राहिला तर अवघडून गेल्या सारखे वाटते.

"तुझ्या गळां, माझ्या गळां
गुंफू मोत्यांच्या माळा "
"ताई, आणखि कोणाला ?"
"चल रे दादा चहाटळा !"
"तुज कंठी, मज अंगठी !"
"आणखि गोफ कोणाला ?"
"वेड लागले दादाला !"
"मला कुणाचे ? ताईला !"
"तुज पगडी, मज चिरडी !"
"आणखि शेला कोणाला ?"
"दादा, सांगू बाबांला ?"
"सांग तिकडच्या स्वारीला !"
"खुसू खुसू, गालिं हसू"
"वरवर अपुले रुसू रुसू "
"चल निघ, येथे नको बसू"
"घर तर माझे तसू तसू."
"कशी कशी, आज अशी"
"गंमत ताईची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशी"
"तर मग गट्टी कोणाशी ?"
भा.रा.तांबे प्रामुख्याने भाष्यस्वरुपात्मक काव्य लिहित असत असे नव्हे तर अगदी सहजसुंदर आणि अकृत्रिम अशी काव्यरचनाही त्यांनी केली आहे.

मावळत्या दिनकरा
अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करां !
जो तो वंदन करी उगवत्या
जो तो पाठ फिरवि मावळत्या
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा.
उपकाराची कुणा आठवण ?
'शिते तोवरी भूते' अशी म्हण;
जगांत भरले तोंडपुजेपण
धरी पाठिवर शरा !
असक्त परि तू केलीस वणवण
दिलेस जीवन, हे नारायण,
मनीं न धरिले सानथोरपण
समदर्शी तू खरा !
अशी भेदक विचारणा देखील ते आपल्या कवितांतून करतात. नव्याला नमस्कार करण्याच्या जगरूढीवर ते इथे प्रहार करतात.

विधात्याच्या रचनेचे गुण गाताना ते त्याला उद्देशून म्हणतात की,
ते दूध तुझ्या त्या घटातले
का अधिक गोड लागे न कळे.
साईहुनि म‍उम‍उ बोटें ती
झुरुमुरु झुरुमुरु धार काढती,
रुणुझुणु कंकण करिती गीती
का गान मनांतिल त्यात मिळे ?
अंधुक श्यामल वेळ, टेकडी
झरा, शेत, तरू, मधे झोपडी
त्यांची देवी धारहि काढी
का स्वप्‍नभूमि बिंबुनि मिसळे ?
या दृष्याचा मोह अनावर
पाय ओढुनी आणी सत्वर
जादु येथची पसरे मजवर
का दूध गोडही त्याचमुळे ?
निसर्गाचे मोहक वर्णन या कवितेत आढळते. निर्मिकासच देव मानून ते त्याच्या गोडीचे रहस्य त्याला विचारतात.

नववधूच्या भावनांचा घेतलेला हा वेध आपल्या डोळ्याच्या कडा ओलावून जातो.
आपले माहेर सोडून सासरी जाणारया हळदओल्या नववधूच्या मनात विचारांचा कोण कल्लोळ माजलेला असतो ! तो अगदी अल्वारपणे आपल्या शाईत कवी उतरवतात. हे भावगीत आजही तितक्याच तन्मयतेने ऐकले जाते.
नववधू प्रिया, मी बावरते
लाजते, पुढे सरते, फिरते
कळे मला तू प्राण-सखा जरि,
कळे तूच आधार सुखा जरि,
तुजवाचुनि संसार फुका जरि,
मन जवळ यावया गांगरते.
मला येथला लागला लळा,
सासरिं निघता दाटतो गळा,
बागबगीचा, येथला मळा,
सोडिता कसे मन चरचरते !
जीव मनींच्या मनीं तळमळे
वाटे बंधन करुनि मोकळे
पळत निघावे तुजजवळ पळे-
परि काय करू ? उरिं भरभरते
अता तूच भय-लाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळ पळभर मात्र ! खरे घर ते !

प्रेम परिपक्व झाल्यावर दाटून येणारी त्यांची काव्यभावना अधिक समृद्ध अशी आहे. सुरुवातीचा अल्लडपणा हलकेच मागे पडतो आणि एकमेकाप्रती असणारा स्नेहभाव वृद्धिंगत होत जातो. आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाच्या जीवनात हे वळण येतेच. या वेळी घेतल्या जाणारया आणाभाका ह्या आधीच्या शपथांपेक्षा भिन्न असतात.
तीनी सांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला
आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला
कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा
चक्रवाल हे पवित्र, ये जी शांत गभीर निशा
त्रिलोकगामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा
साक्षी ऐसे अमर करुनि हे तव कर करिं धरिला
नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत
गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षांत
पाणि जसे मोत्यांत, मनोहर वर्ण सुवर्णांत
हृदयीं मी साठवीं तुज तसा जीवित जो मजला
कशी काळनागिणी, सखे ग, वैरिण झाली नदी !
प्राणविसावा पैलतिरावरिं, अफाट वाहे मधी.
सुखी मीन हे तरति न गणुनी लाटा कोट्यावधी.
सुखी पाखरें गात चालली पार वादळीं सुधी.
पैलतटिं न का तृण मी झाले ? तुडविता तरी पदीं.
पैलतटिं न का कदंब फुलले ? करिता माळा कधी.
पापिण खिळले तिरा, विरह हा शस्‍त्राविण वधी.
प्राणांचे घे मोल नाविका, लावि पार, ने अधी !
या कवितेतील शब्दांची निवड हटके शब्दांची आहे. गद्यात वापरले जाणारे शब्द त्यांनी अगदी चपखलपणे कवितेत वापरले आहेत.

आई आणि मुलाचे अगाध प्रेमाचे नाते आपल्या शब्दकुंचल्यातून रंगवताना त्यांनी त्यात निखळ लडिवाळ रंग भरले आहेत. हसवता हसवता शेवटी ते डोळे ओले करून जातात अशी रचना त्यांनी इथे केलीय.
निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टि सारखी धरी
तिचा कलीजा पदरी निजला
जिवापलीकडे जपे त्याजला
कुरवाळुनि चिमण्या राजाला चुंबी वरचेवरीं
सटवाई, जोखाइ हसविती
खळी गोड गालांवरि पडती
त्याची स्वप्‍नें बघुनि मधुर ती कौतुक ते अंतरीं
अशीच असशी त्रिभुवनजननी
बघत झोपल्या मज का वरुनी ?
सुखदुःखांची स्वप्‍नें बघुनी कौतुकशी का खरी ?

भा.रा.तांबे म्हणजे दुःख, दैन्य, औदासिन्य, प्रेम, हळवेपणा यांचेच संमिश्र मिश्रण नव्हे, त्यांनी लिहिलेली राष्ट्रभावनांना आवाहन करणारी वीररसाने ओथंबलेली ही कविता आजही त्वेषाने गायली जाते. अंगवार रोमांच उभे करण्याची ताकद या कवितेत आहे, केवळ झाशीच्या राणीची शौर्यगाथा असे हिचे सीमित स्वरूप न ठेवता तिला एक देशभक्तीपर जोशिली कविता बनवण्यात कवी यशस्वी झाले आहेत.
रे हिंदबांधवा, थांब या स्थळीं अश्रु दोन ढाळीं,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशिवाली
तांबेकुलवीरश्री ती, नेवाळकरांची कीर्ती,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली !
घोड्यावर खंद्या स्वार, हातात नंगि तर्वार,
खणखणा करित ती वार,
गोर्‍यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे आली.
कडकडा कडाडे बिजली, शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमिच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली !
मिळतील इथे शाहीर, लववितील माना वीर,
तरू, झरे ढाळतिल नीर,
ह्या दगडां फुटतिल जिभा कथाया कथा सकळ काळीं !

आपल्या जगण्याचे अंतिम इप्सित सांगताना ते विश्वनिहंत्यास लिहितात की
चरणिं तुझिया मज देई, वास हरी
चरणतळीं तव कमल विराजे,
तेच करीं मज देवा, कल्पवरी.
कुणा संतती, कुणा राज्य दे,
मजला हरिचे देई रे, चरण परि.
कुणा स्वर्ग दे, कुणा मुक्ति दे,
मजला परि चरणाचा, दास करी.
मी घाली ना संकट तुजवरि,
केवळ मज चरणाचे, रजच करी.
चिकटुनि राहिन सदा पदांला,
इतुकी मम पुरवावी रे, आस परि.
मिरवीन वैभव हे त्रैलोक्यीं
येइल तरि नृपतीला, काय सरी ?
बालपण सरले, तारुण्य आले, प्रेम झाले, ते प्रेमही परिपक्व झाले, संसारसुखाचे मर्मही गवसले आता पुढे काय विचार मनी असावेत. वानप्रस्थआश्रमाच्या उंबरठ्यापाशी उभे असताना मनी कोणते विचार यावेत अन आयुष्याचे अंतिम मागणे काय असावे याचा तेजस्वी आरसा ही कविता आहे.

भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - डिसेंबर ७, १९४१)अर्वाचीन मराठी कवींमधील एक लोकमान्यता आणि राजमान्यता असलेले कवी होते. भा.रा.तांबे यांचा जन्म मध्य प्रदेशातील मुगावली या गावी झाला. झाशी येथे त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर देवासच्या राजकुमाराचे शिक्षक म्हणून नोकरी केली. आणि त्यासाठी इंदुर येथे वास्तव्य केले. याच काळात त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. सन १८९७ मध्ये ते विवाहबद्ध झाले. संस्थानी नोकरीमुळे त्यांना ग्वाल्हेर, अजमेर,प्रतापगड अशा अनेक ठिकाणी फिरावे लागले. पण ग्वाल्हेर येथे संस्थानाचे राजकवी म्हणून ते स्थायिक झाले. म्हणूनच ‘राजकवी तांबे’ या नावानेही ते ओळखले जातात.

हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. भा.रा. तांबे यांच्या कवितेचे वैशिष्ठय म्हणून आपणास त्यातील गेयता व भावमधुरता या गुणांचा उल्लेख करता येईल. त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनाचे निर्दोष व आनंदी असे वर्णन केले आहे. म्हणून त्याच्या कवितेस ‘संतुष्ट कविता’ असे यथार्थतेने संबोधता येईल. बालगीत व नाटयगीत हे काव्यप्रकारही त्यांनी तितक्याच समर्थपणे हाताळले व लोकप्रिय केले.

सन १९२० मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. आज त्यांच्या २२५ कविता उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रेम कविता, बालगीते, विधवाविषयक गीते, मृत्युगीते,अशा अनेक प्रकारांचा समावेश होतो. याशिवाय नाट्यगीते व भावगीते हे त्यांचे खास लेखन प्रकार आहेत. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. आपल्या काव्यात कवी तांबे यांनी रंगरेषांचा योग्य वापर आणि नाद व अर्थ यांचा सुरेख संगम साधलेला आढळतो. गेयता हे त्यांच्या कवितेचे खास वैशिष्ट्य आहे.

भा. रा. तांबे हे मराठी काव्य सृष्टीमध्ये फुललेले, व रसिकतेला आपल्या हजारो नवकल्पनांच्या पाकळ्यांनी भुरळ पाडणारे विलोभनीय व सप्तरंगी कमळ होते. मृत्यूसारख्या धीरगंभीर व अथांग अशा खोल विषयाला कल्पक शब्दरचनांच्या शृंखलांमध्ये बांधण्याचा प्रयत्न त्यांच्या कवितांनी केला. मृत्यू या शब्दाबद्दल पहिल्यापासून, त्यांना कसले तरी सुप्त आकर्षण होते. मृत्यूविषयी आतुरता, असाहाय्यता, निराशा, वात्सल्य, भय, निराशा, साशंकता, अनामिक खिन्नता अशा विविध भावनांची चित्रे शब्दकुंचल्याने रंगवित, तांबे मृत्यूच्या स्वागतासाठी स्वतःला तयार करत गेलेले दिसतात. मृत्यूविषयीच्या त्यांच्या कविता इतक्या करूणसुंदर आहेत, की प्रत्यक्ष मृत्यूलाही पाझर फुटावा! म्रूत्यू म्हणजे परमेश्वरभेटीचे एक माध्यम असल्याचे त्यांनी मानले. आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असे समजून स्वतःचा आणि इतरांचा प्रवास सुखकर कसा होईल ह्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी नेहमी सुचविले.

मराठी कवितेला भावोत्कटतेचा वेगळा आयाम प्राप्त करून देणाऱ्या या विलक्षण प्रतिभावंत कवीचे नाव मराठी साहित्यात सदैव सुवर्णाक्षरांनी कोरलेले राहील.

- समीर गायकवाड.
विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर(२७ फेब्रुवारी, १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवीलेखकनाटककार कथाकार व समीक्षकहोते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्त्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. मराठी कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणा-या आहेत. त्यांची कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे.

जीवनसंपादन करा

कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले. [१] कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबतस्वराज्यप्रभातनवयुगधनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले.
१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले.
वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.[ https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF.%E0%A4%B5%E0%A4%BE._%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0&action=edit&section=1]
त्यांच्या टिळकवाडी, नाशिक येथील निवासस्थानी आता मराठी पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय आहे .

लेखनशैलीसंपादन करा

सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. "साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे" या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कविता, नाटककादंबरीकथालघुनिबंधइत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले.

                  कणा

ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!


कणा"

        नववीत असताना कुसुमाग्रजांची "कणा" ही कविता अभ्यासक्रमात होती...खरतर ही कविता प्रत्येक मराठी मनाच्या जवळची आहे.खूप साध्या शब्दात मांडलेली  ही कविता...स्वाभिमान जपणं शिकवणारी...कठीण परिस्थितीतही जगण्याचे बळ देणारी...शाळेत शिकलेली ही कविता आयुष्यभरासाठी पाठ होऊन गेली कारण तिचा आशय...तिच्यातून  मिळणारी प्रेरणा आणि तिचा साधेपणा !!!
 
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiMp4SZ0KMvSU6Lq9ptvS__AnjAfIJv7ufM5ff1-Km_IZe42Z9pPKX9pcM1Q6LgOFs7eA8vKBAUTX23GStljjrRz8bK2Sr8HNzlI_1ajNB-9XCLEW9k0QKiFQE_vbmYz1wY59XptSGbXI4/s1600/1503.jpg
  
     तर, नव्याने संसार थाटलेल्या घरात गंगा नदीच्या पुराचे पाणी येते आणि  संसार उध्वस्त होतो..होत्याचे नव्हते  व्हायला काही क्षण पुरतात आणि शेवटी डोळ्यांतही आसवांचा पूर ओसंडून वाहू लागतो.अशा या परिस्थितीत त्या मुलाला मायेने आपल्यावर हात फिरवणारे,प्रसंगी धीर देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे शिक्षक आठवतात.
    तो सरांना भेटून  सारी कहाणी सांगतो.ते ऐकून सरांचा आपसूक पैशांची मदत करण्यासाठी  खिशाकडे जाणारा हात पाहताच तो सरांना अडवतो आणि म्हणतो, "मी तुमच्याकडे आर्थिक नाही तर मानसिक मदत मागायला आलोय.एकटेपणा जाणवत होता म्हणून धीराचे दोन शब्द ऐकायला आलोय.माझा संसार जरी मोडून पडला असेल तरी माझा पाठीचा कणा (स्वाभिमान) अजूनही ताठ  आहे.तुमचा आशीर्वाद फक्त द्या पुढची लढाई मी लढू शकतो." असा आशय असलेली ही कविता साऱ्यांनाच आयुष्यात प्रेरणादायी वाटते.
    संवादाच्या रिसेप्शन सिद्धांता नुसार, कवितेचा अर्थ वाचणाऱ्याच्या  मानसिकतेनुसार आणि त्याच्या अनुभवानुसार बदलत असतो.परंतु कुसुमाग्रजांची ही कविता मराठी माणसाच्या जवळ असण्याच कारण म्हणजे प्रत्येक मराठी मनाला ही कविता जगण्याच धैर्य देते.एक नवीन आशा निर्माण करते,वाचणाऱ्याच्या  मानसिकतेनुसार तिचा प्रभाव वेगळा ठरू शकतो परंतु आशय हा बदलत नाही.आणि म्हणूनच ती साऱ्यांनाच जवळची वाटते.

साहित्यविचारसंपादन करा

प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णतः लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंताच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्यव्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे. कुसुमाग्रज हे अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानतात, त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखनप्रक्रियेला प्रेरणा आणि गती देतो, हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. आविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो, म्हणजे हे तत्त्व कलाकृतिसापेक्ष आहे. वर्चस्व हे तत्त्व रसिकसापेक्ष आहे, तर लेखकाच्या अनुभवाची समृद्धी लेखकाच्या सामीलकीवर अवलंबून असते, हे तत्त्व समाजसापेक्ष आहे. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार समाजसापेक्ष असून ते सामाजिकतेलाच परतत्त्व मानतात, विविध जातींतील लेखक लिहू लागणे यात त्यांना साहित्याची परपुष्टता, समृद्धी वाटते.[२][३]
कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाचवेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याचा व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. त्यांच्या मते "अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही साहित्याचीच नव्हे कोणत्याही मानवनिर्मित कलेची आधारभूत तत्त्वे होत.” (रूपरेषा,पृ.२३)
प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कलाकृतीत नावीन्य अनुभवामुळेच येते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजे कुसुमाग्रजांची नावीन्याची संकल्पना आकृतिवादी नसून आशयवादी आहे. नावीन्य व अनुभव समृद्धीसाठी लेखकाने सामीलकी आणि सामाजिकतेचा स्वीकार करावा. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाज जीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातीयता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानतात.
कुसुमाग्रज, क्रांती ही साहित्याची प्रेरणा मानतात. साहित्य परिवर्तनास पूरक ठरू शकते, असे मानतात. त्यामुळे साहित्याला ते विशुद्ध कला मानत नसून सामाजिक साधन मानतात. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार बा. सी. मर्ढेकर आणि कुसुमावती देशपांडे यांच्या साहित्यविचारांचा संवादसेतू आहे. मर्ढेकरांच्या नंतर मराठी साहित्यात दुर्बोधता, अश्लीलता आणि लैंगिकता हीच श्रेष्ठ साहित्याची लक्षणे रूढ होत होती, त्यावर कुसुमाग्रजांनी टीका केली आहे. मात्र त्याचबरोबर पारंपरिक नीतिमत्ता आणि श्लीलता या कल्पनांना ढोंगी ठरवून नकार दिला आहे. नाटक मूलतः वाङमय असते, नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण असते, असे म्हणणे त्यांच्या अहंकार-आविर्भाव सुसंगत आहे. मीपणाशिवाय अहंकार आणि आविर्भाव शक्य नाहीच.
"साहित्य ही मानवी संसारातील एक समर्थ, किंबहुना सर्वात अधिक समर्थ अशी वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करीत असते. माणसे मर्त्य असतात, पण त्यांनी उच्चारलेला वाङ्‍मयीन शब्द मात्र अजरामर असतो. पृथ्वीवरच्या नाशवंत पसार्‍यामध्ये हीच एक शक्ती अशी आहे, की जिला चिरंजीवनाचे वरदान लाभलेले आहे. शब्दाच्या या शक्तीचा उपयोग करूनच संस्कृती जगत असते, पुढे जात असते. देशादेशांतील अंतर या शब्दाने कमी होते आणि युगायुगांची साखळी या शब्दानेच जोडली जाते. या प्रभावी शक्तीचे, शब्दाचे अवतारकार्य कोणते? माणसांच्या मनावर संस्कार करणे हे एकच एक त्यांचे अवतारकार्य होय. संस्कार करणे हा शब्दांचा स्वभाव आहे. साहित्य हे शब्दाश्रित असल्यामुळे तेही वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या मनावर कोणते न कोणते संस्कार केल्याविना राहत नाही."
कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर हे कवी, नाटककार म्हणून जितके प्रसिद्ध आहेत, तितके साहित्यमीमांसक म्हणून प्रसिद्ध नाहीत. तसेच त्यांनी आपला साहित्यविचार स्वतंत्रपणे मांडला नाही. ‘रूपरेषा’ या ग्रंथात त्यांचे साहित्य-चिंतन संकलित करण्यात आले आहे. त्याच्याच आधारे कुसुमाग्रजांचा साहित्यविचार प्रस्तुत निबंधात शोधला आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेत आलेला साहित्यविचारही येथे विचारात घेतलेला नाही. त्यांच्या काव्यविचाराचा अभ्यास व विचार स्वतंत्रपणे करता येईल.

कलेचे आधारभूत तत्त्व 
कुसुमाग्रजांच्या या विचारात मर्ढेकरी कलाविचारातील आत्मनिष्ठा, सौंदर्य किंवा नेमाडेप्रणित लेखकाची नैतिकता, देशीयता यांपेक्षा वेगळी भूमिका दिसते. सर्व संत ज्या अहंकाराच्या विसर्जनाला महत्त्व देतात त्या अहंकाराला शिरवाडकर कलेत महत्त्वाचे मानतात. त्यांचे म्हणणे असे की, लेखकाचा अहंकार अनन्यसाधारण रूप धारण करतो तेव्हाच लेखकाला लिहावेसे वाटते. या अहंकारामुळेच स्वतःचे स्वत्व बाहेर पल्लवीत करण्याचा एक आंतरिक आग्रह त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो. अहंकाराची ही प्रवृत्ती नुसत्या आविष्काराने नव्हे तर वर्चस्वाने समाधान पावते. हे वर्चस्व लेखकाला जवळ व दूर प्रत्यक्षात वा अप्रत्यक्षात असलेल्या वाचकांच्या संदर्भात प्राप्त होते. म्हणजे वाचकवरील वर्चस्वाच्या भावनेने कलानिर्मिती होते असे त्यांचे म्हणणे आहे.
ही प्रक्रिया रसिक, वाचक कशी स्वीकारतो? तर, वाचक शब्दांच्या माध्यमातून लेखकाच्या विश्वात प्रवेश करतो आणि स्वतःच्या जीवनाचे संन्यसन करून त्या वेळेपुरता लेखकाच्या आधीन होतो. याला Empathy म्हणजे ``अंतरानुभूती म्हणतात. वाचकाच्या दृष्टीने जी अंतरानुभूती; तेच लेखकाच्या दृष्टीने वर्चस्वाचे स्वरूप. कुसुमाग्रज म्हणतात, ”कोणत्याही कलेच्या मुळाशी असलेल्या अहंकाराच्या प्रेरणेने आपल्या अंकित होणार्‍या मनांचे म्हणजेच माणसांचे हे अस्तित्व मूलत:च गृहीत धरलेले असते. या प्रेरणेच्या अभावी साहित्याची अथवा कोणत्याही कलेची निर्मितीच सर्वस्वी अशक्य आहे.” (रूपरेषा, पृ.२३/२४)
या अहंकाराच्या प्रेरणेचा समावेश कुसुमाग्रज निर्मितिप्रक्रियेत करतात. त्यांच्या मते, वाचकांपर्यंत पोचण्याची लेखकाची इच्छा लेखनाच्या एकूण प्रक्रियेतच समाविष्ट करायला पाहिजे. असाधारण अहंकारातून इतर अनेक व्यवहारांप्रमाणे माणसाला साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळते. जग ऐकत आहे हे माहीत असल्यानेच कवी मोठ्याने बोलतो. “माणसाचे सारे अस्तित्व म्हणजे भोवतालच्या जगाशी तो प्रस्थापित करत असलेल्या अनेकविध संबंधांची मालिका असते. साहित्य म्हणजे मूलतः अशा प्रकारचा एक संबंध होय. हा संबंध एका बाजूला साहित्यिकाच्या अहंकाराने आणि दुसऱ्या बाजूला वाचकाच्या अनुभवशोधकतेने नियंत्रित झालेला असतो.” (रूपरेषा, पृ.२५/२६)

सोमवार, १५ जुलै, २०१९

कवी केशवसुत यांची *आम्ही कोण* ही कविता!या कवितेचे रसग्रहण मी करणार आहे.कवी केशवसुत या टोपणनावाने ओळखल्या जातात. त्यांचे संपूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असे आहे. वडील केशव यांचा सुत म्हणजेच मुलगा म्हणून त्याना *केशवसुत*या नावाने ओळखल्या जातात. *तुतारी* ही त्यांची कविता अतिशय प्रसिद्ध आहे. थोर साहित्यिक म्हणून ख्याती मिळवलेले कवी म्हणजे केशवसुत!
     *आम्ही कोण* ही कविता म्हणजे साहित्यिकांचा महिमा वर्णन करणारी कविता आहे. कवीचा कल्पनाविलास किती अप्रतिम असू शकतो,हे त्यानी यात सांगितले आहे. कवी प्रतिभेच्या जोरावर कल्पनेनेच स्वर्ग,नरक या सगळ्या बाबी त्यानी निर्माण केल्या आहेत. कवीची दृष्टी दिशा आणि काळ यांच्या पलीकडे जाऊन पोहोचलेली असते. ते म्हणतात,देवाने आम्हास साहित्य रचण्यासाठी संपूर्ण पृथ्वी दिली आहे. एखाद्या वस्तूत अप्रतिम सौंदर्य भरणे,वस्तूतील फोलपणा ठरवणे,हे सर्व आमच्या पाणिस्पर्शाने म्हणजे हाताने होत असते. खरे तर राक्षस,देव  आहेत की नाहीत हे कोणाला खात्रीने माहीत नाही,पण आमच्या साहित्यातून आम्ही त्याला वास्तवरुप दिले आहे. आमच्या कृतीतून अमृत पाझरुन त्यातून सुंदर आणि मंगल आम्ही निर्माण करतो. म्हणून आम्ही देवाचे लाडके आहोत.आम्हाला जर जगातून वगळले तर या जगात सौंदर्यच उरणार नाही. लोकाना हे जीवन विरान वाटेल आणि त्यांचे जगणे हे कवडीमोल होईल,आकाशातील तारे हे निष्प्रभ  ठरतील. त्यामुळे आम्हा कलावंतांना आम्ही कोण असा प्रश्न विचारु नका. कलावंतांना वगळल्यावर या जगाला काहीही किंमत उरणार नाही,एवढे आम्ही अनमोल आहोत. कलावंतांचे श्रेष्ठत्व आणि अस्तित्व कवी केशवसुतानी अतिशय मार्मिक आणि प्रभावपूर्ण शब्दात वर्णिलेले आहे. कवीची स्वाभिमानी वृत्ती यातून आपणास प्रत्ययास येते. 
कवी आणि त्याची काव्यनिर्मितीबाबतचा सार्थ अभिमान कवी प्रस्तुत कवितेतून व्यक्त करतो.

ससा रक्षण सालबर्डी लिळा

Mahanubhav abp majha part1

Mahanubhav Documentary : महानुभाव डॉक्यूमेंट्री, :

लीळाचरित्र आणि महानुभाव पंथ याबाबत Prof M R Lamkhade यांनी केलेले उत्तम...

ससीक रक्षण (Sasikam Rakshan) - Home Revise 9th Std. Maharashtra Board Ma...

ससीक रक्षण - आशय

गद्यपाठ १
ससीकरक्षण
ठळक मुद्दे
लेखक: म्हाइंभट
लीळेतील शिकवण - मुक्या जीवांचे रक्षण, शरण आलेल्यांना अभय, दुसऱ्या माणसाचे मतपरिवर्तन, आपल्या
भूमिकेवर ठाम असणे, अहींसा.
चक्रधर स्वामींचे व्यक्तीमत्त्व - उदार, कनवाळू ,अहिंसक, निर्भय, शरण आलेल्या जीवाला अभय देणारे,
मतपरिवर्तक, सुभाषी
भाषिक वैशिष्ट्ये: साधी, सोपी वाक्ये,छोटी ओघवती वाक्यरचना, यादवकाळातील बोली भाषेचे रूप,मधुर,
चक्रधरांची स्वत:ची शैली,’जी-जी, हां गा’ सारखी साधी संबोधके, एकाचप्रकारच्या विरामचिन्हाचा वापर,
भूतकाळाच्या रुपांसारखी भविष्यकाळाची रूपे उदा.’तरी हा गोसावीं राखीला’,
स्वाध्याय- उजळणी प्रश्न, वैचारिक प्रश्न

प्रस्तावना:

‘ससीकरक्षण’ ही लीळा चक्रधरस्वामींच्या चरित्रातून घेतली आहे ज्याचे नाव ‘लीळाचरत्र’ आहे. लीळा म्हणजे आठवणी.
आठवणींच्या स्वरूपातील चरित्र. चरित्र हे एखाद्या व्यक्तीविषयी दुसऱ्या एका व्यक्तीने लिहीलेले असते. तसे ह्या लीळा
म्हाइंभट ह्या चक्रधरस्वामींच्या शिष्ट्याने ऐकू न,आठवून व इतर शिष्ट्यांकडून गोळाकरून लिहिलेल्या आहेत.
चक्रधरस्वामींच्या निधनानंतर शिष्ट्यमंडळी स्वामींच्या लीळा आठवीत बसत. त्यातूनच पुढे ‘लीळाचरित्राची’ निर्मिती
झाली असे समजले जाते.

आद्यचारित्रकार म्हाइंभट


मराठीतील आद्य गद्य म्हणजे लीळाचरित्र आणि आद्य चारित्रकार म्हणजे म्हाइंभट. म्हाइंभट हा अहमदनगर जिल्ह्यातील शिराळे गावचा.  त्याच्या पत्नीचे नाव देभाइसा. म्हाइंभटाने गणपती आपयो यांच्याजवळ पाच शास्त्रांचे अध्ययन केले. तेलंगणात जाऊन सहावे शास्त्र ही शिकला. त्यामुळे तो गर्विष्ठ बनला. पायात गवताची चाळ आणि हातात दिवा घेऊन तो भर दिवसा हिंडत असे. सर्व लोक पंडित माझ्या दृष्टीने तृणवत आहेत व सुर्यप्रकाशापेक्षा माझा ज्ञानप्रकाश श्रेष्ठ आहे असे तो त्यातून सुचवीत असे. मात्र एकदा डोंबेग्रामी त्यांची व चक्रधर स्वामींची भेट झाली, संस्कृतमधून तत्वचर्चा झडली आणि त्यांनी चक्रधारांच्या पुढे हार मानली. पुढे ते त्यांचे एकनिष्ठ शिष्य बनले. लीळाचरित्र, रिद्धपुरचरित्र या चरित्रग्रंथामुळे त्यांची सर्वत्र ख्याती झाली. लीळाचरित्र हा ग्रंथ त्यांनी पूर्वार्ध व उत्तरार्थ अशा दोन भागात लिहिला. पूर्वार्धात श्री चक्रधर स्वामींच्या एकांतातील भ्रमणकाळातील लीळा आहेत तर स्वामींच्या लौकिक जीवनातील आठवणी संकलित आहेत.  म्हाइंभट यांचे कार्य एखाद्या आजच्या संशोधकाला लाजवेल एवढ्या तोडीचे आहे.


ससीक रक्षण लिळेचा आजच्या भाषेत अर्थ


मध्ययुगात श्री चक्रधर स्वामी नावाचे थोर महात्मा होऊन गेले. "प्राणीमात्रांवर दया करावी, कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये, कोणताही जीव मोठा किंवा छोटा मानू नये." अशी त्यांची शिकवण होती.
एकदा काय झाले, रानात दोन पारध्यांच्या गटात शर्यत लागली. ज्यांची कुत्री ससा धरतील , तो गट शर्यत जिंकेल अशी अट ठरली. मग त्यांनी झुडपातून ससा उठविला. ससा जिवाच्या आकांताने घाबरून जोरात पळू लागला. श्री चक्रधर स्वामी एका मोठ्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेले होते. घाबरलेल्या सशाला त्यांनी पाहिले. ससा त्यांच्या जवळ जाऊन थांबला. श्री चक्रधर स्वामींनी त्याला प्रेमाने कुरूवाळले. ससा त्यांच्या मांडीखाली जाऊन बसला. इतक्यात कुत्री आणि पारधी श्री चक्रधर स्वामींजवळ पोहचले. पारध्यांनी स्वामी चक्रधरांना ससा देण्याची विनंती केली. "जी! जी! ससा सोडवा" पारधी म्हणाले.
" हा ससा मी तुम्हाला देणार नाही" श्री चक्रधर स्वामी म्हणाले.
पारधी शिकारी म्हणाले, "स्वामी हा आमच्या पैजेचा ससा आहे, त्यामुळे आमच्यात मारामाऱ्या होतील , तो ससा आम्हांला द्या"  यावर स्वामी म्हणाले, "शरण आलेल्या कोणत्याही जीवाला जीवन द्यायचे असते. हा ससा रानात राहतो, गवत खातो, ओढ्या नद्यांचे पाणी पितो, त्याला तुम्ही झुडपातून का उठविले? त्याने तुमचे काय बिघडविले? विनाकारण का मारता त्याला?"
श्री चक्रधर स्वामींच्या बोलण्यावर शिकऱ्यांनी विचार केला. त्यांचे मन परिवर्तन झाले. ते म्हणाले, "महाराज, उगच, आता कोणत्याही प्राण्याला आम्ही मारणार नाहीत."
असे म्हणून पारधी निघून गेले. श्री चक्रधर स्वामींना आनंद झाला. त्यांचा चेहरा प्रसन्न दिसू लागला. त्यांनी हलकेच आपली मांडी उचलली आणि सशाला पाहून म्हणाले" महात्मे हो! पळा आता"
मग सशाने एकदम धूम ठोकली.


लीळाचरित्र याविषयी अधीक माहीती येथे वाचा-
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%
9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0
चक्रधरस्वामींविषयी येथे वाचा-
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%
A7%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0

लीळाचरित्र


महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर यांनी लिहिलेले काही वाङ्मय उपलब्ध नाही. परंतु त्यांच्याविषयीच्या आख्यायिका वेळोवेळी उतरून ठेवल्या गेल्या आहेत. या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ म्हणून त्या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. महींद्रबास ऊर्फ म्हाईंभट यांनी हा चरित्रग्रंथ संकलित केला आहे. चक्रधरांच्या उत्तरापंथे गमनानंतर त्यांचे सर्व शिष्य ऋद्धिपूर येथे जमले आणि स्वामींच्या आठवणी-स्मृती-लीळांचे स्मरण करू लागले. यातूनच म्हाईंभटास लीळाचरित्राची प्रेरणा मिळाली. पुढे मग त्याने नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. रचनाकाल १२८३ च्या आसपास. 
लीळाचरित्राच्या विविध उपलब्घ प्रतींमधील लीळांची संख्या कमीजास्त आहे. ९०० पासून १५०० पर्यंत ही संख्या आढळते. एकांक, पूर्वाध व उत्तरार्ध असे लीळाचरित्राचे तीन विभाग करण्यात आले. लीळाचरित्राच्या पूर्वार्धातील व उत्तरार्धातील लीळा अनेक शिष्यांकडून मिळाल्या पण त्यांच्या एकाकी अवस्थेतील लीळा कोणालाच ज्ञात नव्हत्या. महदाईसा या जिज्ञासू शिष्येकडून चक्रधरांच्या पूर्वायुष्यातील लीळा मग म्हाईंभटाने मिळवल्या.
चक्रधरस्वामी आणि महानुभाव संप्रदाय यांची वैविध्यपूर्ण माहिती या चरित्रग्रंथातून व्यक्त झाली आहे. चक्रधरस्वामी हे लीळाचरित्राचे नायक आहेत. त्यांचे बहुगुणी व्यक्तिमत्व यातून साकार झाले आहे. चक्रधर हे एकांतातून लोकांतात कसे कसे आले याची माहिती म्हणजे लीळाचरित्र होय. तत्कालीन राजकीय, सामाजिक व धार्मिक जीवनाचे मार्मिक चित्रण लीळाचरित्रातून सहजच आले आहे. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, चक्रधरांची वचने इत्यादी अनेक बाबी लीळाचरित्रातून साकार झाल्या आहेत. लीळाचरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धतेचा नमुनाच होय. छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये, अलंकृत साधेपणा हे तिचे विशेष होत.
लीळाचरित्र हे चक्रधरांचे चरित्र असले तरी त्यातील अनेक लीळांमघून तेव्हाच्या समाजजीवनाच्या विविध अंगांचे आपोआपच दर्शन घडते. त्यावेळचे भोजनपदार्थ, वस्रविशेष, चालीरिती, करमणुकीचे प्रकार,कायदे, सामाजिक सुरक्षितता, सण, उत्सव इत्यादी सामाजिक जीवनाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक उल्लेख या चरित्रग्रंथातून आले असल्यामुळे तत्कालीन समाजजीवनाच्या व धार्मिक जीवनाच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.
लीळाचरित्रात चक्रधरांचे व्यक्तिचित्र व त्या अनुषंगाने गोंविदप्रभू, महदंबा, नागदेव इत्यादींची रेखाटलेली स्वभावचित्रे लक्षणीय वाटतात. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी आलेले संवाद, वर्णने यामुळे ही चरित्रे एखाद्या कादंबरीप्रमाणे वेधक वाटतात. चक्रधरांच्या काळातील वाक्प्रचार, म्हणी यांचा उपयोग करून भाषेला सजविण्याचा प्रयत्न म्हाईंभटाने केला आहे. साधी, सरळ, सोपी पण आलंकारिक भाषा ही वाङ्मयीन वैशिष्ट्ये या चरित्रग्रंथात पहावयास मिळतात. 

केशवसुत


कवी केशवसुत

केशवसुत

जन्म : ७ ऑक्टोबर १८६६
मृत्यू : ७ नोव्हेंबर १९०५
आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी. पूर्ण नाव कृष्णाची केशव दामले. काव्यरत्नावली ह्या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून ‘केशवसूत’ या टोपण-नावाचा स्वीकार केला. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुड ह्या गावी. शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठिकाणी. शिक्षणकालातच १८८० मध्ये त्यांचा विवाह झाला. मॅट्रिकनंतर (१८८९) मुंबईला १८९७ पर्यंत निरनिराळ्या हंगामी नोकऱ्या केल्या. पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले. आरंभी भडगावच्या नगरपालिकेच्या शाळेत दुय्यम शिक्षकाची नोकरी केली. १९०१ पासून फैजपूरला मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९०४ मध्ये धारवाडच्या सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून बदली झाली. १९०५ साली हुबळीला गेले असताना प्लेगने त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागून आठच दिवसांनी त्यांची पत्नीही मरण पावली.
केशवसुतांनी विद्यार्थिदशेतच काव्यलेखनास आरंभ केला असला, तरी त्यांचा मुख्य काव्यरचनाकाल १८८५ ते १९०५ हाच होय. या काळातील त्यांच्या सु. १३५ कविता आज उपलब्ध आहेत. नागपुरास असताना रेव्ह. टिळक व कवी वसंत यांचा सहवास त्यांना लाभला होता. काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. या प्रयत्नात प्रारंभीच्या संस्कृत काव्याचा आदर्श अल्पकालीन ठरला व पूर्वकालीन मराठी काव्य प्रभावशून्य ठरले.परंतु इंग्रजीतील स्वच्छंदतावादी मनोवृत्तीच्या वर्ड्‌स्वर्थ, शेली आणि कीट्स यांसारख्या कवींचे काव्य मात्र त्यांना प्रेरक व अनुकरणीय वाटले. इंग्रजी अभ्यासक्रमातून व वि. मो. महाजनींनी विविधज्ञानविस्तारातून प्रकाशित केलेल्या भाषांतरांवरून इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्य त्यांस काहीसे परिचित झाले होते. त्या काव्याच्या चिंतन मननातून केशवसुतांनी आत्मलेखनात्मक स्फुट भावकविता लिहिली व मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्माविष्काराचे नवे व क्रांतिकारक वळण दिले. त्यांच्या काव्यात व्यक्तिगत स्नेहसंबंध, कवी व कवित्व, स्त्रीपुरुषांतील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ (सक्षात्कारी) अनुभूती अशा विविध विषयांवरील भावानुभवांचा आविष्कार आढळतो. एका दृष्टीने स्वच्छंदतावादी मनोवृत्तीचाच विविध रूपांनी झालेला हा आविष्कार आहे. ह्या मनोवृत्तीचा आविष्कार मराठी काव्यक्षेत्रात निश्चितच क्रांतिकारक ठरला; म्हणूनच केशवसुतांच्या, संख्येने अल्प असलेल्या प्रत्येक प्रकारच्या काव्यरचनेला नंतरच्या काळात स्वतंत्र परंपरा लाभू शकली.
नवीन काव्याबरोबरच काव्यविषयक नवा दृष्टिकोन व नवी अभिरुची निर्माण करण्याची जबाबदारी नव्या कवींवर पडते. केशवसुतांनी अशा जबाबदारीने लिहिलेल्या कवितांपैकी, ‘स्फूर्ति’ (१८९६), ‘कवितेचे प्रयोजन’ (१८९९), ‘आम्ही कोण?’ (१९०१) आणि ‘प्रतिभा’ (१९०४) या महत्त्वाच्या आहेत. व्यापक मानवी जीवनाच्या संदर्भात कवी व कवित्व यांच्या कार्याची आदर्शवादी भूमिका केशवसुतांनी मांडलेली असल्यामुळे त्या भूमिकेत चिरंतन प्रेरकता जाणवते. त्यांच्या निसर्गविषयक कवितांवर वर्ड्‌स्वर्थ व एमर्सन यांच्या विचारांचा परिणाम झालेला दिसतो. सृष्टीतील सौदर्य काव्याला प्रेरक ठरते व तीत मानवी जीवनातील विषमतेचा अभाव असल्याने निसर्गसहवास सुखद ठरतो, अशा दृष्टीने केशवसुत निसर्गाकडे बघतात. ‘भृंग’ (१८९०), ‘पुष्पाप्रत’ (१८९२) व ‘फुलपांखरूं’ (१९००) या त्यांच्या काही महत्त्वाच्या निसर्गकविता होत. प्रेमविषयक आत्मनिवेदन करणाऱ्या कविताही केशवसुतांनी लिहिल्या. क्रांतिकारक सामाजिक विचार ओजस्वीपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या प्रसिद्ध कविता म्हणजे, ‘तुतारी’ (१८९३), ‘नवा शिपाई’ (१८९८) व ‘गोफण केली छान’ (१९०५) या होत. त्यांच्या सामाजिक विचारसरणीची मुख्य तत्त्वे स्वातंत्र्य, समता, बंधुता व विशाल मानवतावाद ही आहेत. विशेष म्हणजे पृथ्वीला ‘सुरलोकसाम्य’ प्राप्त करून देण्याचे एक महान स्वप्न त्यांच्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहिले होते. त्याचाही निर्देश त्यांच्या काही कवितांतून आढळतो. गूढ अनुभूती व तिची नावीन्यपूर्ण अभिव्यक्ती असलेली ‘झपूर्झा’ (१८९३) ही त्यांची कविता विशेष गाजली. त्यांच्या अन्य गूढगुंजनात्मक कवितांत ‘म्हातारी’ (१९०१) व ‘हरपले श्रेय’ (१९०५) यांचा समावेश होतो. शैलीच्या द्दष्टीने केशवसुतांच्या काव्यात लालित्य कमी आहे; पण काहीशी राकट आणि रांगडी अभिव्यक्ती त्यांच्या काव्यप्रकृतीशी सुसंगत ठरते.
केशवसुतांनी काव्याच्या बाह्यांगातही परिवर्तन घडवून आणले. काव्याची खरी प्रकृती कथनाची व वर्णनाची नसून आत्मलेखनाची आहे; असे आत्मलेखन एकेका उत्कट अनुभूतीचे असते व म्हणून ते स्फुट स्वरूपाचे ठरते; अशा स्फुट आविष्कारासाठी गणवृत्तांपेक्षा मात्रावृत्तेच अधिक अनुकूल असतात, हे सर्व त्यांनी दाखवून दिले. इंग्रजी काव्यातील सुनीत हा छंदःप्रकार त्यांनी मराठीत प्रथमच रूढ केला. शिवाय काही नवीन मात्रावृत्तेही त्यांनी प्रचलित केली.
आयुष्याच्या शेवटीशेवटी आपली काव्यशक्ती नष्ट झाल्याची जाणीव त्यांस झाली होती, असे त्यांच्या एका पत्रावरून वाटते. काव्याशिवाय एक गद्य नाटकही त्यांनी लिहिले होते; पण ते अप्रसिद्ध आहे. काही इंग्रजी कविताही त्यांनी रचल्या होत्या.
केशवसुतांचा काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर हरि नारायण आपटे यांनी १९१६ मध्ये प्रकाशित केला. गोविंदाग्रज, बालकवी, रेंदाळकर, सोनाळकर, काव्यविहारी यांसारखे कवी स्वतःला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत. ‘तुतारी-मंडळ’ या नावाचे एक मंडळही स्थापन झाले होते.
केशवसुत हे आधुनिक मराठीतील सर्वांत जास्त वादग्रस्त कवी आहेत. त्यांचे कवित्व, कवीपण, काही दृष्टिकोन, काही कविता, क्रांतिकारकत्व व श्रेष्ठत्व हे सर्वच वादाचे विषय ठरले. एकांगी समीक्षेने पुष्कळदा अशा वादांचा जन्म होतो. ही वादग्रस्तता केशवसुतांच्या श्रेष्ठत्वाचाच एक पुरावा होय. केशवसुतांनंतरच्या गेल्या सत्तर–ऐंशी वर्षांत आधुनिक मराठी काव्यात कितीतरी परिवर्तने व प्रयोग झाले, तथापि केशवसुतांच्या काव्याची प्रेरकता व महत्त्व ही कायमच राहिली.
महाराष्ट शासनातर्फे १९६६ मध्ये केशवसुतांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती.  या समितीने केशवसुतांच्या काव्यसंग्रहाच्या हस्तलिखिताची यथामूल आवृत्ती १९६७ मध्ये प्रकाशित केली.
संदर्भ : १. कामत, गजानन; नाडकर्णी, सीताराम; जोशी, सुधाकर, संपा, केशवसुतसमीक्षा, १९०६-१९५६,  पुणे, १९६६, पुणे, १९६६.
२. जोग, रा. श्री. केशवसुत काव्यदर्शन, मुंबई, १९४७.
३. दामले, द. मो. सरस्वतीचे लाडके पुत्र, सोलापूर, १९६६.
४. दामले, पं. चि. संपा. केशवसुंत स्मृतिग्रंथ, पुणे, १९५५.
५. पंडित, भ. श्री. केशवसुत : पाच चिंतनिका, अमरावती, १९६१.
६. पंडित, भ. श्री. समग्र केशवसुत, पुणे, १९६४.
७. बेडेकर, दि. के. केशवसुतांची काव्यदृष्टी, मुंबई, १९६६.
८. माडखोलकर, ग. त्र्यं.आधुनिक-कविपंचक, पुणे, १९२१.
लेखक : रा.श्री.जोग

आम्ही कोण?

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी?आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्र्वी या प्रतिभावले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनि आरपार अमुची द्रुष्टी पहाया शके
सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया –
सौंदर्यातिशया,अशी वसतसे जादु करांमजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्व आम्ही निके!
शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!
आम्हांला वगळा-गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा-विकेल कवडीमोलावरी हे जिणे!

परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा व परभणी जिल्ह्यातील वास्तुशिल्प कला

परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा व  परभणी जिल्ह्यातील वास्तुशिल्प कला